Home Blog Page 674

बदलापूर:लैंगिक शोषण झालेल्या शाळेच्या संचालकासह सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई- बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी बचावात एन्काउंटर देखील केला व त्यानंतर मोठ्या विरोधानांतर अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला. याच प्रकरणातील शाळेचे संचालक व सचिव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, तो देखील कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे.

लैंगिक अत्याचाराची घटना ज्या शाळेत झाली होती त्या शाळेचे संचालक व सचिव यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

उच्च न्यायालयाने पीडितांचे वय, त्यांच्या मनावर झालेला परिणाम लक्षात घेत नमूद केले की आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. या कारणांमुळे अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांनी हा निर्णय दिला आहे.

पीडित अल्पवयीन आहेत हे लक्षात घेता, त्यांना झालेल्या आघाताचा त्यांच्या पौगंडावस्थेतील वयावर खोल परिणाम होईल, तसेच दीर्घकाळ टिकणारे आणि भरून न येणारे मानसिक जखमा होऊ शकतात. ज्या शाळेत दुर्दैवी घटना घडली त्या शाळेत अर्जदार महत्त्वाच्या पदांवर आहेत, त्यामुळे त्यांनी पुराव्याशी छेडछाड करण्याची आणि शाळेचे कर्मचारी असलेल्या साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, अशी मुंबई उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे.

दरम्यान, लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर तब्बल 6 दिवस मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. बदलापूर येथील स्थानिकांनी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंकाराला विरोध केला होता. त्यानंतर कळवा येथे देखील विरोध करण्यात आला होता. अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यानंतर दफनविधी करण्यात आली.

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नॅकचे ए प्लस मानांकन

पिंपरी, पुणे-पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन प्राप्त झाले आहे. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ए प्लस श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना २००९ साली झाली. ही संस्था स्थापने पासूनच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. या आधी संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एनबीए) मानांकन पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ‘ए प्लस’ ही श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या दुसऱ्याच फेरीत प्राप्त केली आहे. तसेच सुरुवातीपासूनच महाविद्यालयाची वाटचाल शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर चालली असून विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्वांगीण विकासावर महाविद्यालय भर देत असल्याने ‘नॅक’च्या परीक्षणात यश मिळाले. सर्व विश्वस्तांचे सहकार्य आणि अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे योगदान यामुळे हे मानांकन प्राप्त झाले. येथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होतात असेही पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, संशोधन विभाग व राष्ट्रीय परिषदेसाठीही एसबीपीआयएम चर्चेत असते. आता राष्ट्रीय पातळीवरील बहुमुल्य सन्मान प्राप्त करून देशातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून लौकिक मिळवला आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील,
उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या यशाबद्दल महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. अमरीश पद्मा व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

एसटी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’:एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय


मुंबई- विमानातील एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा उंचावेल अशी भावना व्यक्त केली जात आहे.

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या संचालक मंडळाची मंगळवारी 304 वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

343 बसस्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर “आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. या दवाखान्यांत अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांसह आसपासच्या सर्व नागरिकांना विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे.

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे.

थायलंडमध्ये स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू

थायलंडमध्ये स्कूल बसला लागलेल्या आगीत 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, बसमध्ये एकूण 44 मुले होती, त्यापैकी 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचाव कर्मचारी उर्वरित मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.मात्र, बसचे टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकच्या खु खोत परिसरात दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळेच्या सहलीवरून परतत होती. त्यात ५ शिक्षकही उपस्थित होते.

दिवाळीत लाडक्या बहिणींना मिळणार 3 हजार:भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, अजितदादांचा वादा

बीड-बीड येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3 हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे लाडक्या बहीणींची दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही.

बीड येथील माजलगाव येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माता आणि माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे, तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही काढू शकता, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे 3 हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला माझ्या लाडक्या बहिणींना मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे, असा विश्वास अजित पवारांनी दिला आहे. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला घड्याळ या चिन्हाला मतदान करावे लागेल, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात चांगलीच लोकप्रिय ठरत असल्याचे दिसत आहे. महायुती सरकारचे सर्वच नेते लाडकी बहीण योजनेचा त्यांच्या सभेतून राज्यभरात प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत. याचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील घटक पक्षांना मिळणार का, याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व विरोधक लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका देखील करताना दिसत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. रक्षाबंधन सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यात योजनेचे दोन हफ्त्यांचे 3000 रुपये जमा झाले होते. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी दूसरा हाफ्ता जमा करण्यात आला. आता दिवाळीला देखील महिलांच्या बँक खात्यात 3 हजार जमा होणार असल्याचा वादा अजित पवारांनी केला आहे. जर हे पैसे जमा झालेच तर यंदाची दिवाळी महिलांसाठी आणखी गोड होणार, यात काही शंका नाही.

सुरवसेला पकडला, ५ लाखाचा गुटखा जप्त

पुणे-बऱ्याच कालावधीपासून गुटखा विक्री करणा-या बिबवेवाडीतील सुरवसे याला पकडून पोलिसांनी सुमारे ५ लाखाचा गुटखा जप्त केला आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि ,’ अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक, राजकुमार केंद्रे, व स्टाफ असे दिनांक ३०सप्टेंबर रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना सुखसागर नगर लेन नंबर ०४ येथे एक लाल रंगाचा तिन चाकी पेगो टेम्पो वेगाने जात असताना दिसली या गाडीचा संशय आल्याने या गाडीचा पाठलाग करुन चितामणी रेसीडेन्सी समोर सुखसारगर नगर पुणे येथे थांबवुन गाडी चालक अक्षय तुकाराम सुरवसे वय ३० वर्षे, रा. बी-५८/७, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे याची व त्याच्या ताब्यातील महिन्द्रा कंपनीची तिन चाकी पेगो टेम्पोची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण ५,२९,६००/- रु किमतीचा ऐवज त्यामध्ये ४,७९,६००/-रु कि चा गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ, कि.रु. ५०,०००/- ची एक लाल रंगाचा तिन चाकी पेगो टेम्पो गाडी नं. एमएच १२ ई एफ ११९२ असा ऐवज व माल विक्री साठी बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे.
त्याचे विरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३, २७४, २७५, सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हीकारवाई ही पोलीस उप आयुक्त, गुन्हे,निखिल पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १, गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, दयानंद तेलंगेपाटील, यांनी केली आहे.

पिंपळे निलख, विशाल नगर परिसरातील अवैध धंदे बंद करा – सचिन साठे

पिंपरी, पुणे (दि. १ ऑक्टोबर २०२४) नवी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे निलख, विशाल नगर परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. तरुणी, महिला, जेष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. गुन्हेगारांवर व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. पिंपळे निलख, विशाल नगर परिसरातील अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मंगळवारी सचिन साठे यांनी पोलीस आयुक्तालय व नवी सांगवी पोलीस स्टेशन येथे पत्र दिले. यावेळी परिसरातील महिलांसोबत सह्यांचे निवेदन देखील देण्यात आले.
या पत्रात साठे यांनी पुढे म्हटले आहे की, सुजाण नागरिक जर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर धंद्यांविषयी तक्रार करण्यास गेले, तर त्यांची दखल घेतली जात नाही. या परिसरात सर्रासपणे दारू, हातभट्टी, गुटखा, जुगार असे धंदे राजेरोसपणे सुरू आहेत. साई मंदिराजवळ, सार्वजनिक शौचालय जवळ, मोकळ्या मैदानालगत, शाळा व पीएमपीच्या बस स्थानक परिसरात, नदीकिनारी असे अनेक बेकायदेशीर धंदे दिवसाढवळ्या सुरू असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे. असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
या परिसरातील सर्व बेकायदेशीर धंदे पुढील १५ दिवसात बंद करावेत, अन्यथा येथील नागरिकांकडून जनआंदोलन उभारण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

टोळक्याकडून रस्त्यावरील वाहनांची तोडफोड,हडपसर काळेपडळ मध्ये दहशत


पुणे-पूर्ववैमनस्य वादातून टोळक्याने सार्वजनिक रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नऊ वाहनांची तोडफोड करत नुकसान केल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच आराेपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी साहिल कांबळे याच्यासह पाच आराेपी विरुद्ध भान्यास 324 (4), 189(2), 191 (2), 190,म.पाे.अ.37 (1), (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक उद्धव झगडे (वय 24, रा.स्वराज पार्क, म्हसोबा मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर ) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आराेपी कांबळे आणि तक्रारदार झगडे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. झगडे रागाने बघत असल्याने कांबळे आणि साथीदार काळेपडळ भागात आल्यावर त्यांना शिवीगाळ करून परिसरात दहशत माजविली. तसेच लाकडी दांडके उगारून धमकावले. त्यानंतर दांडक्याने दोन कारसह टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडल्या.तसेच दगडफेक करून कांबळे आणि साथीदार पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी आराेपी साहिल कांबळेला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक फौजदार एस साबळे पुढील तपास करत आहेत.पुणे शहरात मागील काही दिवसांपासून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. किरकोळ वादातून सामान्यांची वाहनांची तोडफोड केली जाते. उपनगरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात. नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे आयोजन

३ ते १६ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी

         पुणे -शहरातील -पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरुवारी ३ ऑक्टोंबर रोजी सायं. ५:०० वा.  लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे येथे होणार असून या पुढील १० दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पुणेकरांसाठी विनामूल्य  केले आहे. ढोल ताशाच्या पथकाच्या गजरात देवीचे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.  पुणे  लोकमान्य  फेस्टिव्हलचे हे २१ वे वर्ष असून या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पुणे जिल्ह्यातील एकमेव दसऱ्यानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम हे खास आकर्षण असणार आहे. बाल मित्रांनो बरोबरच मोठ्यांनी ही या कार्यक्रमाचे आकर्षण असते. याचबरोबर तरुणाईसाठी खास आकर्षण म्हणजे दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे.

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलमध्ये  नटले मी तुमच्यासाठी (लावणी), होम मिनिस्टर, सोलो डान्स आणि ग्रुप डान्स कॉम्पिटीशन, अहो ! नादच खुळा ( लावणी ), मॉ भगवती का दरबार, सुर संगम प्रेझेंट दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा, रावणदहन तसेच कोजागरी पौर्णिमानिमित्त चंदा रे चंदा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पुणे लोकमान्य फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते असून उत्सवाचे अध्यक्ष डॉ. नरेश महाले आणि संयोजक महेश महाले, शुभांगी सातपुते आदित्य सातपुते, गौरव सैटवाल, चेतन पाटील, रूशीकेश भोसले योगेश भोईर आहेत.  पुणे लोकमान्य फेस्टिवल च्या सर्व ग्रुप डान्स मध्ये सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी
आदित्य सातपुते८८८८७३३८८६ गौरव सैटवाल ९७३०३८०९०२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ॲड. गणेश सातपुते यांनी केले आहे.

हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम,संतुलित आहार व आनंदी जीवनशैलीचा अंगीकार करावा

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये जागतिक हृदय दिवस उत्साहात
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये जागतिक हृदय दिवस उत्साहात साजरा झाला. ‘कृतीसाठी हृदय वापर’ या संकल्पनेवर हृदयाचे आरोग्य याबाबतीत जनजागृती करण्यासाठी विशेष एरोबिक सत्राचे आयोजन केले होते.
परिणामकारक आरोग्य उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला. सहयोगी प्राध्यापक डॉ. सबिना हकीम यांच्या नेतृत्वात कार्डिओ वॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी (सीव्हीआरएस) विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सहायक प्राध्यापक डॉ. अंजली बैस यांनी विद्यार्थ्यांना एरोबिक्स व्यायामातून हृदयाचे आरोग्य कसे जपायचे याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सीमी रेठरेकर यांनी व्यायाम हा आपल्या शरीरासाठी उपयुक्त, सुरक्षित व आनंददायक असल्याने नमूद केले.
उत्साही एरोबिक सत्रानंतर, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी चार्टवर अंगठ्याच्या ठशांसह हृदय रंगवले, हृदयाच्या आकाराचे सजावटी साहित्य तयार केले आणि सेल्फी बूथ्स उभारले. संस्थेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी हृदयाच्या आकारात उभे राहून एकतेचे व हृदयाच्या आरोग्याप्रती वचनबद्ध असल्याचे दाखवून दिले. सामूहिक छायाचित्रांतून आपण सर्व एक आहोत, अशी भावना प्रत्येकाने मनात रुजवली.
दातृत्व भाव व समाधानी मन आपल्याला तणावमुक्त ठेवण्यास मदत करत असते. ‘यूज हार्ट फॉर ऍक्शन’ या संदेशामागील उद्देश केवळ आपल्या हृदयाची काळजी घेणे इतकाच नाही, तर इतरांनाही निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा आहे. आज कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये कृतीतून हा संदेश दिला गेला. आपले हृदय कायम तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प सर्वानी केल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले. 

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आनंदी जीवनशैली अंगिकारण्याची गरज आहे. हृदयरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मात्र, अलीकडे आपण आरोग्याच्या बाबतीत सजग होत आहोत, ही चांगली गोष्ट आहे. सूर्यदत्त संस्थेने नेहमीच आरोग्यदायी शिक्षण देण्यावर भर दिला आहे. तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन दिले असून, येथे जिम, नियमित योगासने व अन्य व्यायाम करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे सूर्यदत्तचे विद्यार्थी कायम शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवतात.- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

धनुर्विद्येचे दोन दिवसीय पंच – प्रशिक्षक शिबिर पुण्यात संपन्न.  

बाणेर-  पिंपरी चिंचवड आर्चरी असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया द्वारा आयोजित सीएम स्कूल परिसरामध्ये धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील पंच आणि प्रशिक्षक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. 
शिबिरा दरम्यान सहभाग घेतलेल्या शिबिरार्थींना धनुर्विद्या खेळाचे मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण, धनुर्विद्येचे स्पर्धा पंच व नियम, खेळ मानसिकता विकास, खेळाडूंना आवश्यक असलेले आहार तज्ञांचे मार्गदर्शन आधी विषयांवर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले.  सदर शिबिरामध्ये जिल्ह्यातून सुमारे 60 शिबिरार्थींनी सहभाग घेतला.
शिबिरार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी, धनुर्विद्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच सोनल बुंदेले, आहारतज्ञ पायल शहा आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 
या शिबिराबद्दल माहिती देताना मुख्य आयोजिका आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले म्हणाल्या, “धनुर्विद्या खेळाचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा, धनुर्विद्या खेळासाठी उत्तम तांत्रिक पाठबळ निर्माण व्हावे जेणे करून खेळाडूंना अधिकाधिक पूरक वातावरण निर्माण होईल  आणि ऑलिंपिक गेम्स मध्ये भारताला आणि महाराष्ट्राला विशेष प्राविण्य मिळेल असे खेळाडू तयार होतील ह्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन मार्गदर्शकान साठी करण्यात आले.” 
सदर शिबिराच्या समारोप समरंभा प्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव अभिजित दळवी, पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले आदी उपस्थित होते.  
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पुणे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे म्हणाले, “या शिबिराचा सर्व पंच आणि नियोजित मार्गदर्शकाना जास्तीत जास्त खेळाडू तयार करण्यासाठी तसेच त्यांची प्रात्यक्षिक गुणवत्ता वाढविण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल”
या वेळी श्री.कसगावडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वेग वेगळ्या योजनां बद्दल माहिती उपस्थितांना दिली.
सहभागी सर्व पंच प्रशिक्षक आणि नियोजित मार्गदर्शकाना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर शिबिराचे आयोजन आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले यांनी केले.
शिबिरार्थींनी शिबिरात मिळालेल्या उपयोगी माहितीबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

शहर विकासासाठी पीडब्ल्यूडी च्या नियमानुसार छोट्या निविदांची प्रक्रिया सुरू ठेवावी

पिंपरी, पुणे (दि. १ ऑक्टोबर २०२४) पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये करदात्या नागरिकांबरोबरच प्रशासन आणि छोट्या ठेकेदारांचे योगदान आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या सर्व विकास प्रकल्पांमध्ये या ठेकेदारांनी जबाबदारीने काम केले आहे. परंतु मागील दीड वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असताना या छोट्या ठिकेदारांवर अन्याय करण्याचे धोरण प्रशासनाकडून सुरू आहे. यापूर्वी एक कोटी रुपये पेक्षा कमी किंमतीच्या अनेक विकास कामांच्या निविदा वेळोवेळी प्रसिद्ध होत होत्या. या प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे ७० टक्के छोटे ठेकेदार सहभागी होऊन ती कामे करत असत, परंतु प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून छोट्या-छोट्या रकमेच्या निविदा न काढता त्या एकत्रित करून मोठ्या रकमेच्या निविदा काढण्यात येत आहेत. हे केवळ निवडक ठेकेदारांसाठी केले जात आहे असे दिसून येते अशी माहिती पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिपिन नाणेकर यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महेश शिंदे, सचिन जाधव, सलीम मुल्ला, सोमनाथ भालेराव, अशोक बोरुडे, महादेव वागले, मच्छिंद्र माने, केदार भोईर आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी महेश शिंदे यांनी सांगितले की, नुकतेच स्थापत्य उद्यान विभागात GAP Analysis च्या नावाखाली प्रत्येक प्रभागात प्रत्येकी एकच मोठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जल निसारण विभागातून देखील छोट्या रकमे ऐवजी एकच मोठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा मोठ्या निविदा भरण्यास असोसिएशनचे छोटे ठेकेदार असमर्थ व अपात्र होत आहेत. हे अतिशय अन्यायकारक असून त्यामुळे छोट्या ठेकेदारांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. यापूर्वी पीडब्ल्यूडी च्या नियमानुसार असणाऱ्या शर्ती, अटींप्रमाणे टेंडर प्रक्रिया होत होती, आता त्यामध्ये अन्यायकारक पद्धतीने बदल करून छोट्या ठेकेदारांना अडचणीत आणले जात आहे. तसेच टेंडर फी मध्ये देखील खूपच मोठी वाढ केली आहे. प्रशासन काळात सुरू झालेल्या या अन्यायकारक पद्धतीमध्ये असेही निदर्शनास आले आहे की, महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पांमध्ये पुरेशी आर्थिक तरतूद न करताच मोठ्या टेंडरची प्रक्रिया केली जात आहे. यामुळे अशी विकास कामे नियोजित वेळेत पूर्ण होणार नाहीत, परिणामी अधिकची आर्थिक तरतूद करावी लागेल त्यातून महानगरपालिकेच्या तिजोरीवर बोजा वाढेल. आम्ही पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्व सभासद ठेकेदार या निवेदनाद्वारे नम्र विनंती करतो की, पूर्वीप्रमाणेच पीडब्ल्यूडी च्या नियमानुसार छोट्या छोट्या टेंडरची प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवावी अन्यथा छोट्या ठेकेदारांवर बेरोजगारीची वेळ येईल. त्यामुळे आमच्यावर अवलंबून असणारे हजारो कुशल, अकुशल कामगार देखील बेरोजगार होतील. कृपया याविषयी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन छोट्या ठेकेदारांवरील अन्याय दूर करावा अशी ही मागणी पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवालाही समान नियम करा!-नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

पुणे-गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवालाही समान नियम करावेत, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्राद्वारे आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळांनीही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

गणेशोत्सव सर्वांना उत्साहाने साजरा करता यावा; यासाठी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यातच गणेशोत्सव काळातील स्वागत कमानी आणि इतर जाहिरातीवरील शुल्क माफ करण्याचा महापालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यामुळे सर्व गणेशभक्तांना मोठ्या आनंदात गणेशोत्सव साजरा करता आला.

नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरात देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच महापालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांना जाहिरात शुल्क आकारले जात असल्याने नवरात्रोत्सव मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे सदर शुल्क माफ करण्यात यावे, अशी विनंती नवरात्रोत्सव मंडळांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर नामदार पाटील यांनी आयुक्तांना पत्राद्वारे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे शहरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात काळात अनेक सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतात. तसेच, या नवरात्रोत्सवात अबालवृद्ध, स्त्री, पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या उत्सव काळात महापालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांकडून जाहिरात शुल्क आकारले जाते. सदर शुल्क आकारले जाऊ नये, असे निर्देश नामदार पाटील यांनी पत्राद्वारे आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या भूमिकेमुळे नवरात्रोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्याबद्दल सर्व मंडळाच्या वतीने दादांप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे.

अजितदादांना धक्का:शरद पवारांच्या भेटीनंतर विलास लांडे आता तुतारी फुंकणार

पुणे -अजित पवार गटातील नेते आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर विलास लांडे हे तुतारी फुंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यातील आगामी निवडणुकींसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यात अनेक जण आपल्या उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला चांगले यश मिळाल्याने अनेक उमेदवार त्यांच्या पक्षात जाण्यास इच्छुक आहेत. त्यात अजित पवार गटाचे नेतेही यामध्ये मागे नाहीत. अजित पवार गटातील आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच, अजित पवारांच्या पक्षातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येत असल्याने विलास लांडे यांनी शरद पवारांकडून तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर विलास लांडे हे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचे त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी सांगितले आहे.

अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे तुतारी हातात घेणार असल्याचे त्यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा पिंपरी-चिंचवड मतदारसंघात शरद पवार पुन्हा एकदा धक्का देणार, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, विलास लांडे जोपर्यंत हाती तुतारी घेत नाही, तोपर्यंत त्यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला, हे कसे मानायचे, अशी चर्चा रंगली आहे.

सुभाष बांठिया यांचा अमृतमहोत्सव साजरा

पुणे: उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष बांठिया यांचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा झाला. वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात बांठिया यांना माजी महापौर दत्ताजी गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते वालचंद संचेती यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील आरसी जैन स्थानकात झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ नेते अभय छाजेड, कवी द्वारका जालान यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हॅल्युअर व सल्लागार म्हणून बांठिया गेल्या पाच दशकाहून अधिक काळ काम करत आहेत. परफेक्ट व्हॅल्युएशन अँड कंसल्टंट्सचे बांठिया संस्थापक आहेत. नुकत्याच झालेल्या ग्लोबल व्हॅल्युएशन समिटमध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कुलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय, एनआयटी सुरत येथून इंजिनिअरिंग व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरू येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतलेले आहे. व्यवस्थापन, अभियांत्रिकी, संपत्ती मूल्यांकन क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

वयाच्या पंच्याहत्तरीतही बांठिया यांनी अतिथंड असलेल्या अंटार्टिका व दक्षिण ध्रुवाचा प्रवास, विविध मॅरेथॉन, ट्रेकिंग, सुरत ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास अनेकांसाठी प्रेरक असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मान्यवरांनी केला. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशकार्यासाठी व्हावा, त्यातून आपली प्रगती व्हावी, या उद्देशाने आजवर काम करत आलो आहे. यामध्ये माझ्या कुटुंबियांचेही योगदान मोलाचे आहे. आज या कार्याचा गौरव झाला, याचा मनस्वी आनंद आहे, अशी भावना बांठिया यांनी व्यक्त केली.