बीड-बीड येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3 हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे लाडक्या बहीणींची दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही.
बीड येथील माजलगाव येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करतात, पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. ते सत्तेत असताना कोणती योजना आणली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माता आणि माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे, तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही काढू शकता, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, मी बोलतो तसा वागतो, हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे 3 हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला माझ्या लाडक्या बहिणींना मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे, असा विश्वास अजित पवारांनी दिला आहे. आम्ही दिलेल्या योजना पाच वर्षे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला घड्याळ या चिन्हाला मतदान करावे लागेल, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात चांगलीच लोकप्रिय ठरत असल्याचे दिसत आहे. महायुती सरकारचे सर्वच नेते लाडकी बहीण योजनेचा त्यांच्या सभेतून राज्यभरात प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत. याचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील घटक पक्षांना मिळणार का, याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी व विरोधक लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका देखील करताना दिसत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. रक्षाबंधन सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यात योजनेचे दोन हफ्त्यांचे 3000 रुपये जमा झाले होते. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी दूसरा हाफ्ता जमा करण्यात आला. आता दिवाळीला देखील महिलांच्या बँक खात्यात 3 हजार जमा होणार असल्याचा वादा अजित पवारांनी केला आहे. जर हे पैसे जमा झालेच तर यंदाची दिवाळी महिलांसाठी आणखी गोड होणार, यात काही शंका नाही.