पुणे -अजित पवार गटातील नेते आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर विलास लांडे हे तुतारी फुंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यातील आगामी निवडणुकींसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यात अनेक जण आपल्या उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला चांगले यश मिळाल्याने अनेक उमेदवार त्यांच्या पक्षात जाण्यास इच्छुक आहेत. त्यात अजित पवार गटाचे नेतेही यामध्ये मागे नाहीत. अजित पवार गटातील आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच, अजित पवारांच्या पक्षातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येत असल्याने विलास लांडे यांनी शरद पवारांकडून तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर विलास लांडे हे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचे त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी सांगितले आहे.
अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे तुतारी हातात घेणार असल्याचे त्यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा पिंपरी-चिंचवड मतदारसंघात शरद पवार पुन्हा एकदा धक्का देणार, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, विलास लांडे जोपर्यंत हाती तुतारी घेत नाही, तोपर्यंत त्यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला, हे कसे मानायचे, अशी चर्चा रंगली आहे.