Home Blog Page 673

आमदार चेतन पाटलांची गोची: दोन्ही डगरींवर हाथ ठेवण्याचे प्रयत्न सुरु

पुणे-महाराष्ट्राच्या राजकारणातील पवार कुटुंबात पडलेल्या दुहीत शरद पवारांचा हाथ सोडून अजितदादांना साथ देत अलिप्त झालेल्या हडपसर विधानसभा मतदार संघातील आमदार चेतन तुपे पाटलांची मोठी गोची झाल्याचे सूत्रांनी दिलेले वृत्त आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना अलीकडे चेतन तुपे पाटलांनी पुन्हा पक्षात येण्यासाठी आणि उमेदवारी मिळविण्यासाठी काही उद्योगपतींच्या मध्यस्थीने प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे. हे समजताच शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत विरोध करत खुद्द पवार साहेबांना लेखी पत्र देऊन आपला विरोध नोंदविल्याचे समजते आहे.

अगदी याच धर्तीवर,पार्श्वभूमीवर आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी,पवार साहेब २ दिवस पुण्यात आहेत,भाजपा किंवा दादा गटातून किवा अन्य कुठून अनेक जण तुमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार दोन प्रकारे मत प्रदर्शन केले आहे प्रथम त्या म्हणाल्या,मी विनम्रपणे सांगते,महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक होते,माय बाप जनतेने दाखवून दिले कि पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला, तेव्हा ते लोक आमदार, खासदार,सत्तेची पदे एवढेच नाही तर पक्ष व चिन्हही घेऊन गेले.आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्यावर माझ्या मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करण्याची वेळ आली. पण सत्य परेशान हो सकता आहे, मगर पराजित नही. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला दिल्लीतून काहीही करता येते हे वाटत होते. पण मायबाप जनतेनेने दिल्लीतून असे काहीही करता येत नाही हे अदृश्य शक्तीला दाखवून दिले. हा देश केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालतो आणि चालेल.मात्र पक्षात होणार्या इनकमिंग बाबत शेवटी बोलताना त्या म्हणाल्या..माझा फोन इनकमिंग साठी सदैव चालू असतो,ब्लॉक करून बंद करून त्याला.लोकशाही म्हणत नाही, माझी वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई नाही कोणाशी, डायलॉग माझा गेलेल्या सर्वांशी होता ते बोलत नाही त्यांचा प्रश्न आहे,मी कोणाशी कधीही संबंध तोडले नाहीत.

दुसरीकडे शरद पवार सरकारमध्ये मंत्री पदावर बसलेले आपले सोडून गेलेले सहकारी पुन्हा माघारी घ्यायचे नाहीत या निर्णयाप्रत आल्याचे समजते मात्र तरीही चेतन पाटलांच्या बाबत मात्र प्रश्न चिन्ह कायमच राहिल्याचे पाहायला मिळते आहे. तर आपल्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा विरोध होताना पाहून चेतन पाटलांनी मध्यस्थी करायला सांगितलेले उद्योगपती हि चिंतीत झाल्याचे समजते.

प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळू नये म्हणून चेतन पाटलांनी जगताप यांच्या विरोधात पवार गटातील काहींना इच्छुक म्हणून लढण्यास सांगितल्याचे देखील वृत्त आहे.आणि त्यानुसार काहींनी आपली स्व यात्रा सुरु केली आहे आता प्रत्यक्षात राजकारणात नेमके काय होईल ते उमेदवारी वाटप झाल्यावरच समजणार आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:वाडिया महाविद्यालयासमोर खा. सुप्रिया सुळे यांची निर्देशने

पुणे- येथील नामांकित वाडिया कॉलेज मधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु सदर गुन्ह्यात तातडीने दखल न घेणाऱ्या संस्थेच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याचे मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निर्देशने करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, विशाल तांबे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने तसेच नामांकित शिक्षण संस्था येथे असल्याने देशभरातून विद्यार्थी पुण्यात येत असतात. महिला सुरक्षा त्यामुळे महत्वपूर्ण आहे. सरकार महिला अत्याचार घटना दडपण्याचे प्रयत्न करत आहे. वाडिया महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलीवर चारजणांनी बलात्कार केला परंतु त्याबाबतचा गुन्हा लवकर दाखल करण्यात आला नाही. लैंगिक शोषण झालेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे ट्रस्टी सचिन सानप व अशोक चांडक व इतर पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या बेजबाबदार ट्रस्टींची संस्थेतून कायमस्वरुपी हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

प्रशांत जगताप म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेले पुणे आता महिलांवरील अत्याचारांचे माहेरघर होत आहे. विद्येच्या मंदिरात, शाळा व कॉलेजातही आपल्या लेकींवर अत्याचार होत असून डोक्यावर सरकारचा आशिर्वाद असलेले लोक या अत्याचारांवर पांघरुण घालत आहे, ही दुर्देवाची बाब आहे.

लाडकी बहीण फक्त मतांसाठीच; ६४ हजार बेपत्ता भगिनी संदर्भात सरकारने खुलासा करावा..

लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून गृहंमत्री फडणविसांनी समतेच्या मुल्यांचा अपमान केला; जाहीर माफी मागा: नाना पटोले

भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM ; ही पैशाची मशीन वाचवण्यासाठी मोदी-शाहांची शेवटची धडपड.

मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२४
लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. व्होट जिहाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समतेच्या मुल्याचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचा इतिहासच माहित नाही. महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातीच्या मावळ्यांसह मुस्लीमही होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राने देशाला समतेचा संदेश दिला, त्याच राज्याचा गृहंमत्री लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशी वक्तव्ये करतो हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. लव्ह जिहादचे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली पाहिजे, ते स्वतः गृहमंत्री आहेत, कारवाई करण्याचे अधिकार त्याच्यांकडे आहेत मग कारवाई का करत नाहीत. त्यांच्याच पक्षाचा एक आमदार एका धर्माला शिव्या देत महाराष्ट्र तोडण्याचे पाप करत आहेत. महाभ्रष्ट महायुतीचे अडीच वर्षातील अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी फडणवीस आणि महायुतीकडून अशा प्रकारची धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत पण राज्यातील सुज्ञ जनता याला बळी पडणार नाही असे पटोले म्हणाले.
मोदी-शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा मविआलाच..
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राकडे एटीएम म्हणून पाहतात. हे त्यांना पैसे देणारे एटीएम मशीन वाचवण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
राज्यातील बेपत्ता ६४ हजार बहिणींचे काय झाले?..
भाजपा-शिंदे सरकार लाडकी बहिणी योजनेचा मोठा गवगवा करत आहे. त्यासाठी जाहिरबाजी करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एका वर्षात ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. यावर सरकारने खुलासा करावा. खरेच या सरकारला बहिणी लाडक्या आहेत का? का फक्त मतांसाठीच त्यांना लाडकी बहीण दिसत आहे. महिला बेपत्ता प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले असता राज्य सरकारने त्याचे उत्तर देणे टाळले तसेच बेपत्ता महिलांचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधानसभेत मांडला तेव्हा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी पळ काढला.
सरकार लाडकी बहीण म्हणते आणि भंडाऱ्यामध्ये डब्बे वाटपाच्या कार्यक्रमात महिलांवर पोलीस लाठीचार्ज करतात. महिलांना मारण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे का? भाजपा शिंदे सरकार हे महिला विरोधी आहे, महिलांवर अत्याचार करणारे सरकार आहे.
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी.
राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे सरकार धनदांडग्यांचे आहे. राज्यात सगळीकडे दुष्काळ आहे, अतिवृष्टीमुळे धान, कापूस, फळभाज्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार सर्वे करत नाही, सोयाबीनला ४ हजार भाव दिला जात आहे. मविआ सरकार असताना त्यावेळी विरोधी पक्षात असलेला भाजपा आंदोलन करून सोयाबीनला ६ हजार रुपयांचा भाव मागत होता. डिझेलचे भाव वाढले आहेत, खतांचा भाव वाढला, बी बियाणे महाग झाले पण सोयाबीनचा भाव मात्र वाढला नाही. शेतकरी संकटात आहे त्यातूनच तरुण शेतकऱ्याने सोयाबीन मंत्रालयासमोर टाकून सरकार विरोधातील राग व्यक्त केला असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

गांधी विचाराने देशाची प्रतिष्ठा जगात वाढली : शरद पवार

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे  ज्येष्ठ नेते,माजी संरक्षण मंत्री  शरद पवार यांच्या हस्ते,   ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१ ऑक्टोबर रोजी      सायंकाळी ५.३० वाजता  उद्घाटन झाले.

   पुण्यात दि.१ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान या सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने,परिसंवाद,पुस्तक प्रकाशन,भजन, शांती मार्च ,खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव,पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम  होणार आहेत.गांधी सप्ताह आयोजनाचे हे १३ वे वर्ष आहे. गांधी सप्ताहाचे सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते .

 सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . भन्ते सुदसन्न, पुनीत कौर मान,धनश्री हेबळीकर,,मौलाना इसाद शेख, बिशप प्रदीप चांदेकर, खजान माजगावकर, घैसास गुरुजी सहभागी झाले.या सर्वांचा सत्कार शरद पवार यांनी केला.सुरेश द्वाद‌शीवार यांच्या ‘गांधी आणि त्याचे टिकाकार’ या पुस्तकाच्या Gandhi And His Critics या इंग्रजी अनुवादाचे  प्रकाशन झाले .विवेक गोविलकर यांनी हा अनुवाद केला आहे. मोतीराम वाघ यांच्या ‘ भारत भ्रमण’ पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले .शरद पवार यांच्या हस्ते ‘सलोखा’  गटाचे प्रमोद मजुमदार यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात  आले .  
डॉ. शिवाजीराव कदम, अभय छाजेड, एम.एस. जाधव,अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, रामदास फुटाणे,जयदेव गायकवाड,प्रशांत कोठडिया, प्रशांत जगताप,काका चव्हाण, युवराज शहा, विकास लवांडे,,जांबुवंत मनोहर,डॉ. शशीकला राय, चंद्रकांत मोकाटे, अप्पा अनारसे उपस्थित होते .

शरद पवार म्हणाले,’डॉ. कुमार सप्तर्षी आणि आम्ही एकत्र काम केले आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात बिगर काँग्रेस पहिले सरकार आले, त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.त्यात संघर्षात जे मजबुतीने उभे राहिले, त्यात एसेम जोशी,डॉ. सप्तर्षी होते. ऐक्याचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विदयापीठाला देण्यात यश आले. त्यात त्यांची साथ मिळाली. सांस्कृतिक संस्था उंचीवर नेण्याचे काम डॉ. अशोक वाजपेयी यांनी केले. त्यांचेही विचार गांधी सप्ताहात ऐकायला मिळत आहेत, ही मोठी गोष्ट आहे.गांधी जयंती हा गांधीजींचा विचार देण्याचा हा जागतिक दिवस आहे. त्यांचे विचार जगाने स्वीकारला आहे. कुठेही गेले तरी त्यांच्या विचाराच्या खुणा दिसतात. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली. तरीही गांधी या चित्रपटामुळे त्यांचे नाव जगाला कळाले, असे आपले पंतप्रधान म्हणतात, याबदल त्यांचे ‘कौतुकच’ केले पाहिजे.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’   बिगर संसदीय राजकारणात आमचा आणि संसदीय राजकारणात शरद पवार यांचा हात कोणी धरणार नाही. वसंतराव नाईक यांच्या काळात पहिला मिसा शरद पवार यांना माझ्या नावे काढावा लागला होता. तरीही पुलोद स्थापना,नामांतर प्रसंगी आमचे विचार कृती एकच होता .  महाराष्ट्रात भावकीचे महाभारत चालू आहे . शरद पवार यांना भीष्माचार्याच्या भूमिकेत आहेत . सत्याचा सल्ला देणारे ज्येष्ठ असतात, बाकीचे म्हातारे असतात . सत्य हाच परमेश्वर आहे, हे गांधीजींनी ठामपणे सांगीतले. अशा गांधीजींना चैतन्याने जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना करण्यात आली.
आता दोन्ही काँग्रेसचा गांधीजीं बदल स्मृतीभ्रंश झाल्यासारखे वातावरण आहे . त्यांच्या साठी गांधीजींचे विचार चैतन्य आम्ही जपून ठेवले आहे . गांधी विचाराचा प्रसार अनेक अडचणींमधूनही आम्ही चालू ठेवले आहे .जाती वाद शरद पवार यांनी कधी केला नाही. आता पुन्हा महाराष्ट्राला जातीवादातून सोडविण्याचे कार्य पवार यांनी हाती घ्यावे
डॉ. अशोक वाजपेयी म्हणाले,’भारतीय समाज गांधी विचारापासून दूर गेला आहे. त्यांच्यावर टीका करणारे वाढत आहे. फाळणीला जबाबदार ठरवले जाते आहे. प्रत्यक्षात स्वप्नातील सर्वधर्म प्रार्थना सभेची त्यांची कल्पना जगात एकमेवाद्वितिय आहे. एकत्रित भारताचा विचार त्यांनी केला. एक खराखुरा  भारत उभारून दाखवला. हे सर्व धोक्यात आहेत. त्यांच्या विचाराची प्रासंगिकता वाढत चालली आहे. धर्माचे लोकशाही करण करून एकमेकांकडून शिकण्याची सुविधा त्यांनी दिली. सध्या लोकशाही घटत चालली आहे. गुन्हेगारी करण वाढत आहे. असहमती दाखविणाऱ्यांना शत्रू मानले जात आहे. हिंदू धर्म न मानणाऱ्य धर्मांनाही भारताने जन्म दिला आहे.हे विसरता कामा नये. आपल्याशिवाय इतरांना टिकूच द्यायचे नाही, असे वातावरण आता तयार झाले आहे. असत्य चकाचक करून दाखवले जात आहे, पण, सत्य नष्ट झालेले नाही. 
असत्य, हिंसा, द्वेश, बाजार ही बिरादारी बनली आहे. सरकारी संस्था भय निर्माण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. भयमुक्ती हा खरा राजधर्म महाभारतात सांगीतले आहे.या भयमुक्तीसाठी कार्यरत राहिले पाहिजेत. अन्यथा सार्वजनिक जीवनातून नैतिकतेचे उच्चाटन होण्याचा धोका आहे.अशा वेळी निर्भय नागरी समाजची गरज आहे.
*अहिंसा दिन आणि शांती मार्च* 

 दि.२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने​ सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे.​ ११ ते ३ पर्यंत सर्वांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी ​सकाळी साडेनऊ  वाजता गोखले चौक(गुडलक हॉटेल) ते  गांधी पुतळा गांधी भवन  या मार्गावर ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.

दि.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे.दि.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.
दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर  यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी  ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११  वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे  यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने  ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि  बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर,पत्रकार रवींद्र पोखरकर सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील. 
*खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव*
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्येच विविध चित्रपट दाखवले जातील.दि.२ ऑकटोबर रोजी दुपारी १ वाजता ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’,दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७  ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. 

लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याने CM शिंदेंची बहिणाई आनंदी… महिलांनी अनुभवला सरकारच्या योजनांचा उत्सव- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, (दि.१ ऑक्टोंबर २०२४) : लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याने CM शिंदेंची तमाम महाराष्ट्रातील बहिणाई आनंदी झालेली असून महिलांनी सरकारच्या योजनांचा उत्सवच जणू अनुभवला आहे असे येथे शिवसेना नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सध्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गो-हे यांच्यावर आहे. या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी या आठवड्यात विविध ठिकाणी गेल्या असता तेथील महिलांशी संवाद साधत सरकारच्या योजनांची माहिती व सरकार कडे त्यांचा असणाऱ्या अपेक्षा आदी अनेक महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा केली याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना भवन पुणे, येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, जयश्री पलांडे, शैला पाचपुते, नेहा शिंदे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

त्या म्हणाल्या २८ सप्टेंबर रोजी खेड, राजगुरु नगर, चर्होली, आळंदी, मंदिर परिसर, येथे भेटी घेत लाडक्या बहिणी सोबत संवाद साधला. २९ सप्टेंबर रोजी भोर तालुक्यातील कापूरहोळ व धांगडवाडी येथे महाविजय संवाद मेळाव्यात संबोधित करून भोर तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उ‌द्घाटन करण्यात आले. येथे २००० जनसमुदाय हजर होता, त्यात १००० महिला होत्या . ३० सप्टेंबर रोजी नारायण गावातील सफाई कर्मचारी वसाहत, शेलार विहार कॉलनी, आवटी मळा, वैदू वसाहत येथील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तसेच ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या त्यांच्या सोबत चर्चा साधत सरकारच्या वयोश्री, आरोग्य सहाय्यता निधी, युवक योजनांची माहिती देखील दिली. पिंपळवंडी तर जुन्नर शहर येथे आमदार शरद सोनवणे आयोजित १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित करून सरकार आपल्या पाठीशी आहे असा विश्वास उपस्थितांना दिला असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. जागा वाटप बाबत विषयी बोलताना नीलमताई म्हणाल्या, जरी काही विरोधी पक्षाच्या वतीने काही मतदार संघात उमेदवार जाहीर केले असले तरी आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून मतदार जनते समोर जाणार आहोत. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य उमेदवार दिला जाईल. इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी महायुती म्हणून पुन्हा एकदा आमचे सरकार निवडून येईल यासाठी योग्य व्यक्तीला न्याय मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील. १९ लाख ६२ हजार ६६७ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यातील१९. लाख १४ हजार ५७९ लाभार्थी पात्र झाल्याचे माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुणे सांगितले

पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्या. पैकी आंबेगाव, बारामती ,भोर ,दौंड ,हवेली, इंदापूर ,जुन्नर ,खेड ,मावळ, मुळशी ,पुरंदर ,शिरूर, वेल्ला ,व पुणे शहर. या तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आले होते त्यापैकी पाच हजार अठरा अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले तर१३३२९ अर्ज कागदपत्रांच्या पूर्तते अभावी प्रलंबित आहेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या योजनेबाबत माहिती नीलमताई यांनी पुणे जिल्ह्यात फिरून प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संपर्क साधून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत मिळतो की नाही याची माहिती त्यांनी घेतली.

पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील. कोणत्या तालुक्यात किती अर्ज आले होते व किती पात्र ठरले यांची माहिती पुढील प्रमाणे आलेले अर्ज व कंसात दाखवलेले पात्र लाभार्थ्यांची संख्या;
आंबेगाव तालुका-६२७९५(६१७०२)
बारामती तालुका-१, १५,९७२(११३२६२)
भोर तालुका-५०, ५४५(४९६८४)
दौंड तालुका-९६, ३४३(९४२४६)
हवेली तालुका-४,१०, ६४२(४, ०३५५०)
इंदापूर तालुका-१, ०३९७४(१, ०२८३६)
जुन्नर तालुका-१, ००,६२९(९८७१९)
खेड तालुका-१, १२,५९८(१, १०१७७)
मावळ तालुका-९०, ७३१(८७७०५)
मुळशी तालुका-४४, ६७५(४३, ६६०)
पुरंदर तालुका-६४, ६४४(६३७९९)
शिरूर तालुका-१, ००१७८(९९१३४)
वेल्हा तालुका-१४, १२६(१३५३३)
पुणे शहर-५,९४, ७८५(५२७२७९)

अभियंता दिनानिमित्त उत्कृष्ठ अभियंता पुरस्कारांचे वितरण

पुणे – पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने अभियंता दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागातील उत्कृष्ठ अभियंता पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, उपअभियंता राजेसाहेब आगळे, योगेश भंडलकर शाखा अभियंता तेजेश्री देशमुख, सानू सोनकांबळे, शशिकांत तुपे व वरिष्ठ लिपिक नर्गिस शेख यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संघटनेच्या वतीने अष्टविनायक परिक्रमा मार्ग पूर्ण केल्याबद्दल मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

रवींद्र भोसले म्हणाले की, चांगल्या कामासाठी ऊर्जा देऊन जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतात. कंत्राटदार संघटनेतर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जात असून चांगले काम करणाऱ्या अभियंत्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सूरेंद्र काटकर, उज्वला घावटे, अमोल पवार, विनय कुलथे, संजय वागज व मोठ्या संखेने अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित होते.

‌‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार‌’‘भवरा बडा नादान है‌’, ‌‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा‌’: गीतांवर रसिकांनी धरला ठेका

पुणे : ‌‘वो शाम कुछ अजीब थी‌’, ‌‘ना तुम हमे जानो‌’, ‌‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार‌’, ‌‘कही दीप जले कही दिल‌’ ‌‘ये नयन डरे डरे..‌’, ‌‘भवरा बडा नादान है‌’, ‌‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा‌’, ‌‘गोमू संगतीनं माझ्या तु येशील का‌’ अशा अवीट गोडी असलेल्या मराठी-हिंदी चित्रपट गीतांनी रसिकांना भुरळ घातली.
निमित्त होते संगीतकार-गायक हेमंतकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‌‘ये नयन.. डरे.. डरे..‌’ या विशेष स्वरांजली सांगीतिक कार्यक्रमाचे. या विशेष सांगीतिक कार्यक्रमात रसिकांनी सुमधूर गीतांचा आनंद घेतला. आनंद सराफ, उदय नानिवडेकर, अविनाश वैजापूरकर आदी उपस्थित होते.
हेमंत कुमार यांची गायकी गाणारे सुप्रसिद्ध गझल गायक हेमंत खणंग प्रस्तुत कार्यक्रमात हेमंत खणंग यांच्यासह मधुरा घैसास-बेहेरे, शितल म्हसतकर, मनाली राजे यांनी चित्रपट गीते सादर केली. चित्रपट गीतांसंदर्भात विविध किस्से सांगत डॉ. भाग्यश्री कश्यप निवेदनाद्वारे गीतांच्या निर्मिती मागील अनेक किस्से सांगितले. गायन आणि संगीत क्षेत्रात अव्वल कामगिरी बजावणारे हेमंत कुमार यांची पुणेकर रसिकांना नव्याने ओळख झाली. पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.
धीर गंभीर, आर्त, घुमावदार, भावनेची कोवळीक दर्शविणारा आवाज असलेले सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हेमंत कुमार यांच्या आवाजाची भुरळ पडलेल्या हेमंत खणंग यांनी आपल्या अनोख्या आवाजाने रसिकांना मोहित केले. रसिकांनी अनेक गीतांना भरभरून दाद दिली तर अनेकदा वन्स मोअरची मागणीही केली.
‌‘याद किया दिल ने कहा हो तुम‌’, ‌‘मेरा दिल ये पुकारे आजा‌’, ‌‘छुपा लो यूँ दिल मे प्यार‌’, ‌‘ये रात ये चांदनी फिर कहाँ‌’, ‌‘नींद ना मुझको आए‌’ आदी गीतांना रसिकांनी विशेष पसंती दर्शविली. ‌‘पुकार लो …. तुम्हारा इंतजार है‌’, ‌‘बेकरार करके हमे यूँ ना जाईये‌’, ‌‘तुम्हे याद होगा कभी हम मिले थे‌’, ‌‘ये अपना दिल तो आवारा‌’, ‌‘जाने वो कैसे लोग थे‌’, ‌‘राह बनी खुद मंझिल‌’, ‌‘जिंदगी प्यार की दो-चार घडी होती है‌’, ‘चली गोरी फिरचे मिलन को चली‌’ अशा अनेक गीतांचे सूर आणि स्वर उपस्थितांच्या मनात रूंजी घालत राहिले.

स्वानंदी क्रिएशनतर्फे रविवारी प्रभातस्वर मैफल

स्वानंदी क्रिएशनतर्फे रविवारी आयोजित प्रभातस्वर मैफलीत पंडित सुहास व्यास यांचे गायन
पुणे : स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफल रविवारी होत आहे. रागसंगीतावर आधारित या मैफलीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांचे गायन होणार आहे.
प्रभातस्वर मैफल रविवार, दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6:30 वाजता डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या प्रांगणात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजित करण्यात आली आहे. पंडित सुहास व्यास यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. पंडित सुहास व्यास यांच्याशी मंजिरी धामणकर आणि शैला मुकुंद संवाद साधणार आहेत, अशी माहिती अपर्णा केळकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि गायक पंडित सुहास व्यास यांच्या मैफलीचे प्रभातस्वरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
सांगीतिक वारसा लाभलेल्या सुहास व्यास यांनी लहान वयातच वडील पद्मभूषण सी. आर. व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत क्षेत्राची मूल्ये जाणून घेऊन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. भावना हा संगीताचा आत्मा आहे, असे मानणारे पंडित सुहास व्यास हे ग्वाल्हेर, आग्रा आणि किराणा घराण्याशी संबंधित असले तरी त्यांनी स्वत:ची स्वतंत्र गायन शैली निर्माण केली आहे. त्यांच्या गायनातून त्यांच्या वडिलांच्या गायकीची झलकही दिसते. भारतीय शास्त्रीय संगीत प्रवाही ठेवण्यासाठी पंडित सुहास व्यास हे सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या देश-परदेशात अनेक मैफली झाल्या असून त्यांनी अनेक शिष्यही घडविले आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

एस. एन. बी. पी.तर्फे शनिवार-रविवारी स्वरयज्ञ महोत्सव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग : गायन-वादनाची पर्वणी

पुणे : येरवडा परिसरातील प्रतिष्ठित एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे स्वरयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेला हा राग महोत्सव दि. 5 व दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
गायन-वादनाची पर्वणी असलेला हा महोत्सव दोनही दिवशी सायंकाळी 5:30 वाजता येरवडा येथील एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सरस्वती हॉलमध्ये होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. 5) सुरुवात विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांच्या गायन-वादनातून होणार आहे. त्यानंतर उस्ताद रईस बाले खान यांचे सतार वादन आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 6) डॉ. नरेश मडगांवकर यांचे संतूरवादन, पंडित प्रकाश हेगडे यांचे बासरीवादन, विदुषी सायली तळवलकर यांचे गायन, पंडित पॉली वर्गीस यांचे मोहनवीणा वादन, डॉ. अविनाश कुमार आणि डॉ. रिंदाना रहस्या यांचे गायन होणार आहे.
दोन दिवसीय आयोजित महोत्सवातील कलाकारांना समीर सूर्यवंशी, विदुषी मुक्ता रास्ते, विनायक गुरव (तबला), शुभम शिंदे (पखवाज), तुषार केळकर, उपेंद्र सहस्त्रबुद्धे (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
वयाच्या 98व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर आणि वयाची शंभरी पूर्ण केलेले अहमद सब्बास सतारमेकर यांचा या महोत्सवात सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान केला जाणार आहे. तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
पूर्व पुणे परिसरातील विद्यार्थी, पालक आणि रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा, भारतीय शास्त्रीय कला-संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने महोत्सवाची सुरुवात केली, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांनी सांगितले.
दोन दिवसीय सांगीतिक राग महोत्सवाचा विद्यार्थी, रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या रश्मी शुक्ला यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजन पाटील यांनी स्विकारला पदभार

पुणे, दि. १ : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदाचा नूतन अध्यक्ष श्री. राजन पाटील यांनी राज्य सहकारी परिषदेच्या कार्यालयात पदभार स्विकारला.

यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, अपर आयुक्त व विशेष निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक राजेश सुरवसे, उपनिबंधक किरण सोनवणे उपस्थित होते.

सहकारी चळवळीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे, सहकारी संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी मार्ग व पर्याय सुचविणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे यांची शिफारस करणे आदी बाबी सहकारी परिषदेकडून करण्यात येतील, असे श्री. राजन यावेळी म्हणाले.

लखनौ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि १: सेना चिकित्सा संगठन केंद्र तथा कॉलेज लखनौ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत २०२४-२५ साठी कार्यरत सैनिक (सर्व्हिसमन), माजी सैनिक, युद्ध विधवा आणि सेवारत जवानांचे भाऊ तसेच संरक्षण सुरक्षा कॉर्प्स मधील कर्मचाऱ्यांचे पुत्र, बंधू यांच्यासाठी विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

नियमित संवर्गातील सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) या पदाची भरती प्रक्रिया ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तर ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अग्निवीर ऑफिस असिस्टंट (लिपिक), अग्निवीर स्टोअर कीपर टेक्निकल (एसकेटी), अग्निवीर जनरल ड्युटी (ॲम्ब्युलन्स असिस्टंट) आणि ड्रायव्हर मिलिटरी व्हेईकल (डीएमव्ही), अग्निवीर ट्रेड्समन- शेफ, कारभारी व ड्रेसर (१० वी पास) या पदासह संगितकार (खुला प्रवर्ग), अग्निवीर ट्रेड्समन हाऊस कीपर (८ वी पास) या पदांचीदेखील भरती आयोजित करण्यात येणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज uhq2024@joinamc.in या ईमेल वर १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करून नोंदणी करावी. उमेदवारांना तात्पुरत्या स्वीकृती ई- मेलद्वारे सूचित केल्या जाणाऱ्या तारखेला सेना चिकित्सा संगठन केंद्राचे स्टेडियम, लखनौ-रायबरेली रोड येथे भरती प्रक्रियेसाठी हजर रहावे. अपूर्ण कागदपत्रे असणारे उमेदवार रॅलीत भाग घेण्यास पात्र असणार नाहीत.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

चतु:श्रृंगी येथे माजी सैनिकांतून सुरक्षा रक्षकांची कंत्राटी भरती

पुणे, दि. १ : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या अधिपत्याखाली चतु:श्रृंगी येथे माजी सैनिकांतून व त्यांचे पुरूष अवलंबितांमधून सुरक्षा रक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

सुरक्षा रक्षक पदासाठी उमेदवाराचे वय ५० वर्षाच्या आत असावे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून त्याच्याकडे सुरक्षा रक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराला तीन शिफ्ट मध्ये काम करावे लागेल. निवड झालेल्या उमेदवाराला २९ हजार ८०६ रूपये वेतन दिले जाईल. वेतनातून ईपीएफ, उपदान, बोनस व ईडीएलआय नियमानुसार कपात करण्यात येईल.

शारीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १० ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

बदलापूर:लैंगिक शोषण झालेल्या शाळेच्या संचालकासह सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई- बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी बचावात एन्काउंटर देखील केला व त्यानंतर मोठ्या विरोधानांतर अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला. याच प्रकरणातील शाळेचे संचालक व सचिव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, तो देखील कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे.

लैंगिक अत्याचाराची घटना ज्या शाळेत झाली होती त्या शाळेचे संचालक व सचिव यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

उच्च न्यायालयाने पीडितांचे वय, त्यांच्या मनावर झालेला परिणाम लक्षात घेत नमूद केले की आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. या कारणांमुळे अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांनी हा निर्णय दिला आहे.

पीडित अल्पवयीन आहेत हे लक्षात घेता, त्यांना झालेल्या आघाताचा त्यांच्या पौगंडावस्थेतील वयावर खोल परिणाम होईल, तसेच दीर्घकाळ टिकणारे आणि भरून न येणारे मानसिक जखमा होऊ शकतात. ज्या शाळेत दुर्दैवी घटना घडली त्या शाळेत अर्जदार महत्त्वाच्या पदांवर आहेत, त्यामुळे त्यांनी पुराव्याशी छेडछाड करण्याची आणि शाळेचे कर्मचारी असलेल्या साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, अशी मुंबई उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे.

दरम्यान, लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर तब्बल 6 दिवस मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. बदलापूर येथील स्थानिकांनी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंकाराला विरोध केला होता. त्यानंतर कळवा येथे देखील विरोध करण्यात आला होता. अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यानंतर दफनविधी करण्यात आली.

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नॅकचे ए प्लस मानांकन

पिंपरी, पुणे-पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन प्राप्त झाले आहे. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ए प्लस श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना २००९ साली झाली. ही संस्था स्थापने पासूनच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. या आधी संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एनबीए) मानांकन पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ‘ए प्लस’ ही श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या दुसऱ्याच फेरीत प्राप्त केली आहे. तसेच सुरुवातीपासूनच महाविद्यालयाची वाटचाल शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर चालली असून विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्वांगीण विकासावर महाविद्यालय भर देत असल्याने ‘नॅक’च्या परीक्षणात यश मिळाले. सर्व विश्वस्तांचे सहकार्य आणि अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे योगदान यामुळे हे मानांकन प्राप्त झाले. येथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होतात असेही पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, संशोधन विभाग व राष्ट्रीय परिषदेसाठीही एसबीपीआयएम चर्चेत असते. आता राष्ट्रीय पातळीवरील बहुमुल्य सन्मान प्राप्त करून देशातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून लौकिक मिळवला आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील,
उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या यशाबद्दल महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. अमरीश पद्मा व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

एसटी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’:एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय


मुंबई- विमानातील एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या योजनेमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा उंचावेल अशी भावना व्यक्त केली जात आहे.

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या संचालक मंडळाची मंगळवारी 304 वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

343 बसस्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर “आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. या दवाखान्यांत अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांसह आसपासच्या सर्व नागरिकांना विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे.

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे.