स्वानंदी क्रिएशनतर्फे रविवारी आयोजित प्रभातस्वर मैफलीत पंडित सुहास व्यास यांचे गायन
पुणे : स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफल रविवारी होत आहे. रागसंगीतावर आधारित या मैफलीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांचे गायन होणार आहे.
प्रभातस्वर मैफल रविवार, दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6:30 वाजता डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या प्रांगणात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजित करण्यात आली आहे. पंडित सुहास व्यास यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. पंडित सुहास व्यास यांच्याशी मंजिरी धामणकर आणि शैला मुकुंद संवाद साधणार आहेत, अशी माहिती अपर्णा केळकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि गायक पंडित सुहास व्यास यांच्या मैफलीचे प्रभातस्वरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
सांगीतिक वारसा लाभलेल्या सुहास व्यास यांनी लहान वयातच वडील पद्मभूषण सी. आर. व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत क्षेत्राची मूल्ये जाणून घेऊन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. भावना हा संगीताचा आत्मा आहे, असे मानणारे पंडित सुहास व्यास हे ग्वाल्हेर, आग्रा आणि किराणा घराण्याशी संबंधित असले तरी त्यांनी स्वत:ची स्वतंत्र गायन शैली निर्माण केली आहे. त्यांच्या गायनातून त्यांच्या वडिलांच्या गायकीची झलकही दिसते. भारतीय शास्त्रीय संगीत प्रवाही ठेवण्यासाठी पंडित सुहास व्यास हे सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या देश-परदेशात अनेक मैफली झाल्या असून त्यांनी अनेक शिष्यही घडविले आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.