पुणे : येरवडा परिसरातील प्रतिष्ठित एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे स्वरयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेला हा राग महोत्सव दि. 5 व दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
गायन-वादनाची पर्वणी असलेला हा महोत्सव दोनही दिवशी सायंकाळी 5:30 वाजता येरवडा येथील एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सरस्वती हॉलमध्ये होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. 5) सुरुवात विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांच्या गायन-वादनातून होणार आहे. त्यानंतर उस्ताद रईस बाले खान यांचे सतार वादन आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 6) डॉ. नरेश मडगांवकर यांचे संतूरवादन, पंडित प्रकाश हेगडे यांचे बासरीवादन, विदुषी सायली तळवलकर यांचे गायन, पंडित पॉली वर्गीस यांचे मोहनवीणा वादन, डॉ. अविनाश कुमार आणि डॉ. रिंदाना रहस्या यांचे गायन होणार आहे.
दोन दिवसीय आयोजित महोत्सवातील कलाकारांना समीर सूर्यवंशी, विदुषी मुक्ता रास्ते, विनायक गुरव (तबला), शुभम शिंदे (पखवाज), तुषार केळकर, उपेंद्र सहस्त्रबुद्धे (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
वयाच्या 98व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर आणि वयाची शंभरी पूर्ण केलेले अहमद सब्बास सतारमेकर यांचा या महोत्सवात सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान केला जाणार आहे. तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
पूर्व पुणे परिसरातील विद्यार्थी, पालक आणि रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा, भारतीय शास्त्रीय कला-संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने महोत्सवाची सुरुवात केली, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांनी सांगितले.
दोन दिवसीय सांगीतिक राग महोत्सवाचा विद्यार्थी, रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या रश्मी शुक्ला यांनी केले आहे.