विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा
पुणे: अविरत चौहान याने १६व्या विनायक नवयुग मंडळ खुल्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत सात फेऱ्यांअखेर ६.५ गुण मिळवून खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले.
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स येथे झाली. या स्पर्धेत सातव्या आणि अखेरच्या फेरीत पांढऱ्या मोहरांसह खेळताना अविरतला आदित्य जोशी विरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र, ही बरोबरीही विजयासाठी पुरेशी ठरली. पहिले सहा डाव जिंकल्यानंतर केवळ एका डावात त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. यात केवल निर्गुण आणि सौरभ म्हामणे यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवले. मात्र, टायब्रेकमध्ये सरस ठरल्याने केवल दुसऱ्या, तर सौरभ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कुशाग्र जैन चौथ्या आणि आदित्य जोशी पाचव्या क्रमांकावर राहिला.
पहिल्या पंधरा क्रमांकांच्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात विजेत्या अविरत चौहानला पाच हजार रुपये रोख आणि करंडक, तर दुसऱ्या क्रमांकावरील केवल निर्गुणला चार हजार रुपये आणि करंडक; त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावरील सौरभ म्हामणेला तीन हजार रुपये रोख आणि करंडक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गेहना शिंगवी (३.५ गुण, ७०० रुपये, करंडक) आणि समृद्धी मकतेदर (३ गुण, ३०० रुपये आणि करंडक) देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाडू म्हणून चंद्रकांत डोंगरे (४ गुण, ७०० रुपये आणि करंडक) आणि लहुचंद ठाकूर (३.५ गुण, ३०० रुपये आणि करंडक) देऊन सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अंकिता रैना, जलतरण प्रशिक्षक मनोज एरंडे, सुनील पांडे लोहगावकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी चीफ आर्बिटर राजेंद्र शिदोरे, दीप्ती शिदोरे माजी राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अपूर्व सोनटक्के, वरुण जकातदार अभिजीत मोडक, क्रीडा समिती अध्यक्ष योगेश माळी, दिनेश अंबुरे, समीर हळंदे यावेळी उपस्थित होते.
सातव्या आणि अंतिम फेरीचे काही निकाल : खुला गट – अविरत चौहान (६.५) बरोबरी वि. आदित्य जोशी (५.५), केवल निर्गुण (६) वि. वि. निहिरा कौल (५), सौरभ म्हामणे (६) वि. वि. ओम नागनाथ (५), कुशाग्र जैन (५.५) वि. वि. अर्णव कदम (५), गौरव बाकलिवाल (५) वि. वि. कुणाल शिंदे (४), यश वातरकर (५) वि. वि. ओंकार जाधव (४), निखिल भुते (४) पराभूत वि. आरुष डोळस (५), मिहीर सरवदे (५) वि. वि. मिलिंद नांदळे (४), चंद्रकांत डोंगरे (४) पराभूत वि. कल्पेश देवांग (५), भुवन शितोळे (४.५) बरोबरी वि. अलौकिक सिन्हा (४.५), पद्मानंद मेमन (४) पराभूत वि. रिषभ जठार (५), ओंकार चक्रदेव (४.५) वि. वि. श्रीकांत मुचंदिकर (३.५), अंश नायर (४.५) वि. वि. लक्ष्मण खुडे (३.५), अथर्व बाखरे (४.५) दिग्विजय भापकर (३.५), चंद्रकांत बाभुळगावकर (३) पराभूत वि. शुभम राहिंज (४).
अविरत चौहानने पटकावले विजेतेपद
१०० कोटींचे कर्ज मिळवून देतो सांगून सव्वा कोटींची फसवणूक
पुणे-पुणे भोसरी एमआयडीसी परिसरातील एका व्यावसायिकाची त्याच्याच मित्रांनी स्वामी महाराजांच्या मदतीने सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने आपली मोल्ड कंपनी विकल्यानंतर त्याच्याकडे दीड ते दोन कोटी रुपये आले होते.
ही बाब त्याच्या मित्रांना समजल्यानंतर त्यांनी कट रचून त्याला बांधकाम व्यवसायात उतरण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींनी व्यावसायिकाला प्रथम मोशीतील एका स्वामी महाराजांकडे नेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गुजरातमधील सुरत येथील कथित महाराजांच्या संपर्कात नेले. मुंबईतील डेस्टक बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फी म्हणून रक्कम उकळली.
आरोपींनी बनावट आरबीआय मॅनेजरची भेट घडवून आणली आणि त्याला पाच लाख रुपये दिले. शेवटी बँकेची बनावट कागदपत्रे देऊन कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी संतोष सावकार कमलकर, किरण जगताप यांच्यासह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे यांचे पथक पुढील तपास करत आहे. आरोपींमध्ये पटेल महाराज, स्वामी महाराज, हसमुखभाई मनसुखभाई कावड, महाकाली यांचाही समावेश आहे.
भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 28 : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री श्री.पालव अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवत असून अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री.पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाची पाहणी करून आराखड्यासह अंदाजपत्रक तयार करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 28:- कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोरेगाव (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ग्रामविकास (रस्ते) विभागाचे सचिव सतीश चिखलीकर, सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरासह तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे, ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ही कामे करताना पुढील तीस वर्षांच्या वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करण्यात यावा. हे रस्ते दर्जेदार व मजबूत करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर एकसळ ते कुमठे रस्त्याचे कामही मार्गी लावावे.
कोरेगाव तालुक्यातील वाहतुकीचा ताण असलेला वर्धनगड घाट व त्रिपुटी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून खिंड फोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधणे, कोरेगाव येथे उड्डाणपूल बांधणे, वडूथ व वाढे पूलाची पुनर्बांधणी करणे, माहुली (ता. सातारा) येथे नवीन पूल बांधणे, ल्हासुर्णे पुलाची उंची वाढविणे, तळगंगा नदीवर पूलाचे काम मार्गी लावणे, कोरेगाव शहराजवळील रेल्वे स्टेशनजवळील पूलाची उंची वाढविणे, कोरेगाव शहरात ड्रेनेजसह विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे या विषयांचा आढावा घेण्यात आला.
अटल सेतूवर सध्याच्याच सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी
मुंबई-
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पुण्याची भाग्यश्री फंड तिसऱ्यांदा महिला महाराष्ट्र केसरी
वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-पुणे जिल्हा संघाला तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या वतीने वर्धा मधील देवळी येथे वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या भाग्यश्री फंड हिने हॅट्ट्रिक करत महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला. या स्पर्धेत कोल्हापूर शहर प्रथम, कोल्हापूर जिल्हा द्वितीय तर,पुणे जिल्ह्याला १२० गुणांसह तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद मिळाले,
महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, वरिष्ठ उपाध्यक्ष माऊली आण्णा ताकवणे, जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सल्लागार संदिप भोंडवे, विलास कथुरे, गणेश भाऊ दांगट, दिनेश गुंड, मारुती मारकड, कार्याध्यक्ष पांडाभाऊ खाणेकर, खजिनदार नवनाथ भाऊ घुले, सरचिटणीस प्रा. प्रदिप बोत्रे व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
मेघराज कटके म्हणाले, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीगीरांना पोषक वातावरण देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. या प्रयत्नांचे सार्थक करुन भाग्यश्री फंड हिने मिळविलेला विजय हा इतर महिला कुस्तीगीरांसाठी देखील प्रेरणादायी आहे.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पुणे जिल्ह्याच्या महिला कुस्तीगीरांची कामगिरी पुढीलप्रमाणे:- ५० किलो :- अर्पिता गोळे – तृतीय, ५९ किलो :- आकांक्षा नलावडे -तृतीय
६५ किलो :- प्रीतम दाभाडे- तृतीय, महिला महाराष्ट्र केसरी किताब वजन गट :- भाग्यश्री फंड -प्रथम
म. गांधी पुण्यतिथीदिनी सामुदायिक प्रार्थना,भजन,व्याख्यान
गांधीभवन येथे ३० जानेवारी रोजी आयोजन
पुणे :
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गुरुवार,दि.३० जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक प्रार्थना,भजन कार्यक्रम होणार असून खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेनंतर ‘गांधीजींची आजची प्रासंगिकता’ या विषयावर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे होतील.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य:येमेनी परदेशी नागरीकांवर कारवाई
पुणे –
पुणे शहरामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणा-या परदेशी नागरीक यांची तपासणी मोहीम विशेष शाखा अंतर्गत परकीय नागरीक नोंदणी विभाग (एफ आर ओ) यांचे कडून राबविण्यात येत आहे. सदर कारवाई अंतर्गत कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत परदेशी नागरीक रहाणा-या सोसायट्यांची तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. सदर मोहीमे अंतर्गत मोनार्च रेजेन्सी १ व २ एन आय बी एम उंद्री रोड, कोंढवा या सोसायटीत ५ येमन पुरूष व २ यमेन महिला बेकायदेशीरपणे पासपोर्ट / विजा मुदत संपल्या नंतरही वास्तव्यास असताना दिसून आले आहे.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कागदपत्रांची परकीय नागरीक नोंदणी विभाग (एफ आर ओ) विशेष शाखा पुणे शहर याच्याकडुन चौकशी करुन त्याना (Leave India Notice) लिव इंडिया नोटीस देवुन त्यांच्या मायदेशात परत पाठविण्याची (Deportation) कारवाई सुरू आहे.
मा. पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमितेशकुमार यांनी शहरामध्ये बेकायदेशीररित्या राहणा-या सर्व परदेशी नागरीकांना (Leave India Notice) लिव्ह इंडिया नोटीस देवून (Deportation) कारवाई पुणे शहरात व्यापक स्तरावर सुरू केली आहे.
केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते शनिवारी ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन
- वंचित विकास व उदयकाळ फाउंडेशनतर्फे १ व २ फेब्रुवारीला नीहार आनंद निवास, लोहगाव येथे आयोजन
पुणे: वंचित विकास व उदयकाळ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभया अभियाना अंतर्गत दोन दिवसीय ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीनाताई कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी वंचित विकास संस्थेच्या संचालक सुनीताताई जोगळेकर, मीनाक्षीताई नवले आणि उदयकाळ फाउंडेशनच्या प्रमुख आरतीताई बागुल आदी उपस्थित होते.
मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, “महाराष्ट्रातील एकल महिलांवर काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत. ही परिषद शनिवार, दि. १ व रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नीहार आनंद निवास, वडगाव शिंदे रोड,लोहगाव, पुणे येथे होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते होणार आहे.
“एकल महिलांचे प्रश्न व सामाजिकसंस्थेची जबाबदारी या अनुषंगाने काम करत असताना संस्थेला येणाऱ्या अडचणी समजुनघेण्यासाठी परिषदेमध्ये विविध चर्चासत्र आयोजित केले आहे. यामध्ये विविध संस्थांचा कार्यपरिचय, महिलांचे प्रश्न व केस स्टडी यावर विचारमंथन होणार आहे. आर्थिक साक्षरतेवर स्वाती दुधाले, एकल महिलांचे भावनिक व मानसिक व्यवस्थापन यावर डॉ. सागर पाठक मार्गदर्शन करणार आहेत. शासकीय योजना व सामाजिक संस्थांना संधी यावर शासकीय प्रतिनिधी मार्गदर्शन करतील, तर सर्व संस्थांच्या प्रतिनिधींकडून काही सूचना आणि ठराव मांडण्यात येणार आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदी सरकारचे धोरण स्त्रियांना सन्मान देणारे आहे. त्यांचे सक्षमीकरण करणारे आहे. एकल महिलांच्या प्रश्नाची गंभीरता केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी. आपल्या केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांच्यापुढे हा प्रश्न मांडला. महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सर्वच सख्यांचे म्हणणे ताईपर्यंत पोहोचवावे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. विजयाताई समजून घेऊन मार्ग काढतील, असा विश्वास मीनाताई कुर्लेकर यांनी नमूद केले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाने ब्राह्मण समाजातील व अमृत महामंडळाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यातील ब्राह्मण समाजातील प्रलंबित समस्या व प्रश्नांबाबत आढावा घेतला आढावा
मुंबई, दि. २८ जानेवारी, २०२५ : शासनाने ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळ’ ची स्थापन केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाज विकासासाठी प्रयत्न करावेत , असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
विधानभवनात राज्यातील ब्राह्मण समाजातील प्रलंबित समस्या व प्रश्नाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी बैठकीस परशुराम आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष आशिष दामले, माधव भंडारी, वित्त विभागाचे अवर सचिव गजानन कातकाडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक रुपेश राऊत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उप सचिव वर्षा देशमुख, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, ब्राह्मण सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ब्राम्हण समाज हा खुल्या प्रवर्गातील असल्याने जातीच्या निकषात बसत नाही. परंतु ब्राह्मण समाजातील काही परिवार आर्थिक उत्पनाच्या गटाच्या निकषात बसणारे आहे. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या ब्राह्मण समाजाला शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व परशुराम आर्थिक विकास महामंडळाने ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
भविष्यात वेद पाठशाळांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे. तसेच संत विद्यापीठ व वैदिक पाठशाळा यांच्या एकत्रीकरणातून प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत अभ्यासपूर्ण अशी टिपणी सादर करावी, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या , मंदिराचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी ब्राह्मण समाजाला कौशल्य विकास विभागामार्फत काही प्रशिक्षण वर्ग आयोजित करता येतील किंवा कसे याबाबत तांत्रिकबाबी तपासून नियोजन सादर करावे.
ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य आणि विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या अपेक्षेने शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळ’ ची स्थापना केली आहे, त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने गतीने काम करावे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व परशुराम आर्थिक विकास महामंडळाने महिला लाभधारक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) महामंडळाचे कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
डोंबिवलीत परप्रांतीयांचा हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध:सत्यनारायण पूजेवरही आक्षेप
मुंबई–डोंबिवली येथील एका सोसायटीत राहणाऱ्या परप्रांतीयांनी सत्यनारायण व हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री या सोसायटीत प्रचंड वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. या घटनेमुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे.
डोंबिवलीच्या नांदीवली परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. या सोसायटीतील मराठी कुटुंबातील महिलांनी ए्कत्र येऊन हळदी कुंकू व सत्यनारायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोसायटीत राहणाऱ्या काही परप्रांतीय लोकांनी या कार्यक्रमाला विरोध केला. त्यातून सोमवारी रात्री त्यांच्यात मोठा वाद झाला. या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी भाषिक महिलांच्या मते, आम्ही स्वखर्चाने हळी कुंकू आयोजित केले होते. सोसायटीकडे कोणत्याही प्रकारचा खर्च मागितला नव्हता.
त्यानंतरही संबंधित अमराठी व्यक्तीकडून आमच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. या व्यक्तीने सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सत्यनारायणाची पूजा व हळदी कुंकू कार्यक्रमावरही हरकत घेतली होती. त्यानंतर आम्ही महिला सोसायटीच्या आवारात एकत्र जमलो असता त्या व्यक्तीने तिथे येऊन आमच्याशी हुज्जत घातली. महिलांनी या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबईत डिझेल-पेट्रोल वाहनांवर बंदी घालण्याची तयारी:सरकारने अभ्यासासाठी 7 सदस्यांची समिती स्थापन केली, 3 महिन्यांत अहवाल देणार
मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण आणि गर्दीवर चिंता व्यक्त केली होती
मुंबई-वाढत्या प्रदूषणामुळे महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल-पेट्रोल वाहनांवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी राज्य सरकारने 7 सदस्यांची समिती स्थापन केली असून, ही समिती पुढील 3 महिन्यांत आपल्या सूचना सादर करणार आहे.
22 जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात निवृत्त आयएएस अधिकारी सुधीर श्रीवास्तव या समितीचे नेतृत्व करणार आहेत. यात परिवहन आयुक्त, सह पोलीस आयुक्त वाहतूक, महानगर गॅस लिमिटेडचे एमडी, पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) चे अध्यक्ष आणि संयुक्त परिवहन आयुक्त सदस्य म्हणून असतील.आदेशानुसार, या समितीला अभ्यासासाठी पॅनेलमध्ये विविध तज्ज्ञांचाही समावेश करता येणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये शेजारच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांचाही समावेश होतो.
9 जानेवारी रोजी एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई शहरातील वाढती वाहतूक आणि प्रदूषणामुळे जीवनमान आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाने म्हटले होते
वाहनांमधून निघणारा धूर हे वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. मुंबईतील वाहनांची संख्या आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सध्याच्या उपाययोजना अपुरी ठरत आहेत.डिझेल आणि पेट्रोल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करणे योग्य ठरेल का, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने राज्य सरकारला समिती स्थापन करून तीन महिन्यांत व्यवहार्यता अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) लाकूड आणि कोळसा वापरणाऱ्या बेकरींनी निर्धारित एक वर्षाच्या मुदतीऐवजी 6 महिन्यांच्या आत गॅस किंवा इतर हिरवे इंधन वापरावे, असे निर्देश दिले आहेत तेयापुढे कोळसा किंवा लाकडावर चालणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांना कोणतीही नवीन परवानगी दिली जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. केवळ हरित इंधन वापरण्याची अट पाळल्यानंतर नवीन परवाने दिले जातील.
यानंतर राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणि सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. न्यायालयाने बीएमसी आणि एमपीसीबीला बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण निर्देशक बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यात म्हटले आहे की, यापुढे कोळसा किंवा लाकडावर चालणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही नवीन मान्यता दिली जाणार नाही आणि ते फक्त हिरवे इंधन वापरतील या अटीचे पालन केल्यानंतर नवीन परवाने दिले जातील.
काळ्या कोटाला लावला डाग: अशिलाकडून पोलिसांच्या नावे वकिलानेच उकळली ५ लाखाची खंडणी
पुणे- बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका वकिलाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात प्रकरणात अडकलेल्या तरुणाच्या वडिलांकडून पोलीस, न्यायालय आणि कारागृह अधिकाऱ्यांच्या नावाखाली पैसे उकळल्याप्रकरणी ॲड. निलेश यादव (३०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी पवनकुमार सिंघल (५०) यांचा मुलगा, जो गुडगावमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे, त्याच्यावर डिसेंबरमध्ये पुणे स्टेशन परिसरात एका महिला वाहतूक पोलिसाला कारने धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी वकिलाने विविध बहाण्यांनी फिर्यादीकडून एकूण पाच लाख रुपये उकळले.
वकिलाने प्रथम मुलाच्या मित्र-मैत्रिणींना अटकेपासून वाचवण्याच्या नावाखाली दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कारागृहातील व्हीआयपी बॅरेकसाठी ५० हजार रुपये आणि जामीन प्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये वसूल केले. शिवाय न्यायाधीशांच्या मध्यस्थीसाठी १२ लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादी सिंघल यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात चौकशी केली असता वकिलाने केलेली फसवणूक उघडकीस आली. यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल’ योजनेच्या लाभासाठी दिव्यांगांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, दि. २८: दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.
सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने ही योजना लागू करण्यास १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे तसेच सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे या योजनेचे उद्देश आहेत.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी https://register.mshfdc.co.in हे नाव नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींनी त्यावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय- सामाजिक न्याय भवन, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण इमारत, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा, असेही महामंडळाचे पुणे जिल्हा व्यवस्थापक सी. के. माने यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये ? : आजची सुनावणी टळली, दोन्ही वकिलांनी दर्शवली सकारात्मकता
मुंबई-ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे आधीच लांबलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आणखी रखडल्या आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीने, निश्चित तारीख देऊन पुढील सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारी रोजीच या संबंधीचा निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात राहुल रमेश वाघ यांनी साधारण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आधीच खूप विलंब झाल्याने तसेच आता विधानसभा निवडणुकाही झाल्याने सुनावणी लवकर घ्यावी, अशी मागणी वाघ यांचे वकील देवदत्त पालोदकर यांनी केली होती. तर राज्य शासनाच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही या प्रकरणी लवकर निवडणुका घेण्याची राज्य सरकारची इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. मात्र, त्याच दिवशी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका असल्याने न्यायालयाने हे प्रकरण ऐकण्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही नव्याने समिती गठीत करुन ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार करुन ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि त्याचा अहवाल कोर्टाला सादर करून आरक्षणासह निवडणुकीला परवानगी मागितली आहे. त्यावेळी न्या. खानविलकर यांनी अशी संमती दिली. मात्र, आधी परवानगी दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय आणि यानंतरच्या निवडणुका आरक्षणासह होतील, असे स्पष्ट केले होते. न्या. खानविलकर निवृत्त झाल्याने हे प्रकरण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोर सुनावणीला आले. त्याच दरम्यान महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारने कोर्टाकडे अर्ज करुन, आधी आणि नंतर संमती दिलेल्या अशा सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मागितली. न्या. रमण्णा यांनी या प्रकरणावर तात्पुरती स्थगिती देत ते न्या. चंद्रचूड यांच्याकडे वर्ग केले होते. यावर प्रत्यक्ष सुनावणी होऊ न शकल्याने ही स्थगिती कायम आहे. हे प्रकरण न्या. चंद्रचूड यांनी न्या. सूर्यकांत आणि न्या. भुयान यांच्याकडे वर्ग केले आहे.
महाराष्ट्राने ओबीसी आरक्षणासाठीची ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नसल्याचे सांगत दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्या. अजय खानविलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. मात्र, त्या वेळी कार्यकाळ संपलेल्या काही संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यास परवानगी दिली. याच दरम्यान मध्य प्रदेशनेही ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने तेथील निवडणुकांनीही कोर्टाने स्थगिती दिली होती. मात्र, मध्य प्रदेश सरकारने तातडीने राज्यातील ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार करून ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तसा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला होता. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास कोर्टाने परवानगी दिली होती. आता महाराष्ट्रातही लवकरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
