Home Blog Page 671

श्री सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोडवर तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप.. श्रद्धा महत्वाची, तुम्ही कपडे पाहणार कि श्रद्धा?

पुणे– श्री सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू केल्याने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे, त्या म्हणाल्या , भक्तांची श्रद्धा महत्वाची असते , त्याचे कपडे नाही . त्याचे कपडे तुम्ही पाहणार कि श्रद्धा ?

मुंबई येथील प्रसिद्ध मंदिर व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिरात जाताना आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तसेच प्लॅस्टिक बंदीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर ‘न्यास’च्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बद्दलची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे.

तृप्ती देसाई यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडवर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात असे सांगण्यात आलेले आहे की तिथे येणाऱ्या भक्तांनी जे आहे ते तोकडे कपडे घालायचे नाही. जीन्स असेल, वेस्टर्न कपडे चालणार नाहीत. पारंपरिक वेशभूषा करावी. पण आपण जर बघितले तर आपल्या इथे संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कोणी कसे राहावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जो मंदिरात येतो, तो श्रद्धेने येत असतो. त्यामुळे त्याची श्रद्धा बघायची, त्याच्या कपड्यांकडे कोणाचे लक्ष जात नसते, असे मत तृप्ती देसाई यांनी मांडले आहे.

पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही लाऊ शकत नाही कारण सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला जगभरातून जे लोक येतात, ते वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्मांची वेगवेगळी वेशभूषा असते. ते त्यांच्या वेशभूषेत जे आहे ते दर्शनाला येत असतात. त्यामुळे या संदर्भामधील सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय घेतला पाहिजे कारण कोणीही चुकीचे कपडे घालून मंदिरात दर्शनाला येत नाही. मंदिरात दर्शनाला कसे यावे हे भक्तांना चांगले कळते. ते तुम्ही शिकवण्याची अजिबातच गरज नाही, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे म्हणाले, मंडळाच्या विश्वास्तांची बैठक झाली. मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. काही भक्तांच्या तक्रारी, तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या. मंदिरात काही भाविक येतात. ते कुठल्या जातीचे, धर्माचे पंथाचे असतील. स्त्री असो वा पुरुष, अनेकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तींना संकोच वाटेल असे होते, अशी माहिती राहुल लोंढे यांनी दिली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या:पोलीस तपासावर ताशेरे मारत हायकोर्टाने ५ आरोपी अखेर जामिनावर केले मुक्त

मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पोलीस तपासावर ताशेरे मारत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या ५ आरोपींना अखेरीस जामिनावर मुक्त केले आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती ए.एस. किल्लारे यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. या आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती.कोल्हापूर येथे 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे हे त्यांच्या पत्नीसह प्रभातफेरीसाठी गेले असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर, चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील या आरोपींना अटक केल्यापासून ते तुरुंगातच असल्याचे समजते. त्यामुळे खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याने जामीन मंजूर करण्यात आल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हेत तर हत्या प्रकरणातील तपासात लक्षणीय प्रगती झाली नसल्याने देखील हे पाचही आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए.एस. किल्लारे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील या आरोपींना तपासात प्रगती न दिसल्याने जामीनपात्र झाल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.

गेल्या सहा वर्षांपासून आपण अटकेत आहोत आणि अद्याप खटला सुरू आहे. नजीकच्या काळात तो संपण्याची शक्यता नाही, असा दावा करून आरोपींनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच दोन फरार आरोपीबाबत तपास वगळता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे. त्यामुळे दोन फरार आरोपींच्या कारणास्तव प्रकरणाच्या तपसावर न्यायालयाने देखरेख सुरू ठेवण्याची गरज नसल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते.

हत्येचे मुख्य सूत्रधार सापडेपर्यंत प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरूच ठेवण्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता.उपरोक्त निर्णय देताना, याप्रकरणी सुरू असलेला खटला जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने खटल्याची दररोज सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

पाच महीन्यापासुन फरारी असलेल्या मोक्कातील ३ आरोपींना गुन्हे शाखेने पकडले

पुणे-मोक्का लावल्यावरही फरार झालेल्या, अन ५ महिने पोलिसांच्या हातावर तुरी दिलेल्या ३ आरोपींना अखेरीस गुन्हे शाखेने पकडले आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ अपर पोलीस आयुक्त गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी युनिट-४ वे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करुन रेकॉर्ड वरिल आरोपी वेक करणे तसेच गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे, पाहीजे फरारी आरोपी, मोक्कयातील आरोपीचा शोध घेवुन मिळुन आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले.
दि.२८/०१/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट-०४ चे पथक चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जहांगीर पठाण, व विशाल गाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे किरण खुडे, दिपक डोके व अमन डोके हे इऑन आयटी पार्क समोरील गिल्ट हॉटेलमध्ये आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना माहीती दिली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन कारवाई करणेचे आदेश दिले.
गुन्हे शाखा, युनिट ०४ चे पथकाने बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाचे इसम हे हॉटेल गिल्ट खराडी पुणे येथे मिळुन आल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याची नावे १) अमन राजेंद्र डोके वय १९ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, खडकी, पुणे, २) दिपक राजेंद्र डोके वय २३ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, खडकी, पुणे, ३) किरण अनिल खुडे वय २३ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, खडकी, पुणे असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे प्राथमिक तपास करता, त्यांनी खडकी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. २५२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९ (४), १९१(२), १९१(३), १९०, ११०, ३२४ (४) (५), ३३३, ३०५ (ए), ३१०, ३११ सह आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेंड २०१३ चे कलम ७महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४) प्रमाणे त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट-४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उप निरीक्षक, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, विशाल गाडे, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, विनोद महाजन, सुभाष आव्हाड, चालक सहा.पो. फौ. शितल शिंदे यांनी केली आहे.

मगरपट्टा आयटी कंपन्यांसोबत पोलीस आयुक्तांनी साधला संवाद

पुणे-
महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या ७ कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांचा आयटी कंपन्यांसोबत परिसंवादाचे दिनांक २९/०१/२०२५ रोजी ११.०० ते १२.३० या कालावधीमध्ये अॅम्पी थिएटर, आदीती गार्डन जवळ मगरपट्टा हडपसर पुणे येथे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांनी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक पोलीस आयुक्त अमितेश कुमारआणि पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उद्योजक सतीश मगर,तसेच व्यवस्थापकीय संचालक, व आयटी कंपन्याचे संचालक/व्यवस्थापक/आयटी अभियंता/कर्मचारी तसेच मगरपट्टा परिसरातील शाळेचे विदयार्थी इ. मान्यवर असे सुमारे १००० अधिक नागरीक उपस्थित होते.
सदर समारंभामध्ये प्रमुख मार्गदर्शक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयटी कंपनीतील काम करणारे कर्मचारी तसेच अभियंते/संचालक यांचे कार्यालयात येणा-या अडीअडचणी, परिसरातील महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, तसेच मगरपट्टा परिसरात निर्माण होणारी वाहतुक समस्या यावर मार्गदर्शन केले.
तसेच तंबाखु व सिगारेट मुक्त शालेय परिसराबाबत स्थानिक हडपसर पोलीसांना कोप्टा कायदा अंतर्गत कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या. पुणे शहर आयटी करीता देशातील सर्वात सुरक्षित शहर राहील या करीता पुणे पोलीस कटीबद्ध आहे असे त्यांनी प्रतिप्रादन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी केली. तर सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार अनुराधा उदमले सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेस परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.

रमेश गायकवाड यांची भाजपा ओबीसी सेल उपाध्यक्षपदी निवड

पुणे – खडकवासल्याचे रहिवासी रमेश गायकवाड यांची भाजप ओबीसी सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.ओबीसी सेलचे अध्यक्ष नामदेव माळवदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. गायकवाड हे खडकवासला मतदार संघात गेली अनेक वर्षे सामाजिक तसेच राजकीय कार्यात सहभागी आहेत. खडकवासला ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या मातोश्री यांनी सरपंच व रमेश गायकवाड यांनी पंचायत सदस्य म्हणून काम केलेले आहे.दांडगा जनसंपर्क आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ते या भागात परिचित आहेत.नियुक्ती बद्दल आमदार भीमराव तापकीर,नगरसेवक अमोल बालवडकर, महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, सचिव दत्ता कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर धनकुडे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते, गणेश हगवणे, चारुदत्त लोखंडे, अंकित कोल्हे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

GBS चा १ रुग्ण दगावला,आजाराच्या फैलावाला महापालिकेचे पाणीपुरवठा खाते जबाबदार

पुणे- GBS चा १ रुग्ण पुण्यात दगावला असून ,शहराच्या विविध भागातील ११० पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले होते त्यापैकी ८ पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्याने GBS च्या फैलावाला महापालिकेचे पाणीपुरवठा खाते जबाबदार असल्याचा आरोप निश्चित होऊ शकणार आहे .यामुळे पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा करण्याचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे झाले आहे.
दरम्यान या आजरा विषयी महापालिकेने अधिकृत रित्या दिलेल्या माहिती नुसार हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आजार आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो.
थोडक्यात महत्वाचे-
• आज पर्यत एकुण १११ रुग्ण सापडले आहेत. तसेच १ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ३१ रुग्णांची GBS म्हणून निदान निश्चिती झाली आहे.
• यापैकी २० रुग्ण पुणे मनपा, ६६ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत, १२ रुग्ण पिपरी चिंचवड मनपा व ५ रुग्ण पुणे ग्रामीण व ८ इतर जिल्हयातील आहेत.
• त्यापैकी ७७ पुरुप व ३४ महिला आहेत.
• यापैकी १३ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
• आजाराची सर्वसाधारण लक्षणे –
अ) अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा
व) अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील आास किवा कमजोरी.
क) डायरिया (जास्त दिवसांचा)

  • आतापर्यत केलेल्या उपाययोजना
    2 राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट दिली.

पुणे मनपा व जिल्हयाला बाधित भागामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
12 रुग्‌णांचे ५७ शौच नमुने राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत त्यापैकी १७ नोरो व्हायरस व ५ शौच नमुने कॅम्फेलोबॅक्टर जेजुनी साठी पोझीटीव्ह आले आहेत.
एकूण ७६ रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. सर्व नमुने झिंका, डेंग्यू, चिकुनगुनिया साठी निगेटिव्ह आहेत.
शहराच्या विविध भागातील ११० पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत त्यापैकी ८ पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य आहेत.
आरोग्य शिक्षण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.
2 खाजगी वैदयकीय व्यवसायिकांना आव्हान करण्यात आले आहे की जीबीएस रुग्ण आढळुन आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवावे.
2 नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नसुन आरोग्य विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत तयारी आहे.
घरोघरी सर्वेक्षण अंतर्गत आजपर्यंत पुणे मनपा ३००३५ घरे, पिंपरी चिंचवड मनपा ५८९६ घरे व पुणे ग्रामीण ९१२१ अशा एकूण ४५०५२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
• नागरीकांनी घ्यावयाची काळजी
अ) पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून पिणे.
व) अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
क) वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
ड) शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (chicken, mutton) खावू नये.
तरी, नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जनतेने घावरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे, तसेच नागरिकांनी या आजाराच्या प्रतिबंधासाठी काळजी घ्यावी.
अशी माहिती २८ जानेवारी २०२५ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन महापालिकेने दिलेली आहे.

महाकुंभ – संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 ठार:आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शहा यांची योगींशी चर्चा

मंगळवार-बुधवारी रात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 14 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. 50 हून अधिक जखमी आहेत. मात्र, मृत किंवा जखमींची संख्या याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व 13 आखाड्यांनी आज मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले – संगमवर जास्त गर्दी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सीएम योगी यांच्याकडून फोनवरून घटनेची माहिती घेतली.दरम्यान येथे उपस्थित पत्रकारांच्या मते, एका अफवेमुळे संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. काही महिला जमिनीवर पडल्या आणि लोकांनी त्यांच्यावर धाव घेतली. अपघातानंतर 70 हून अधिक रुग्णवाहिका संगम बँकेत पोहोचल्या. जखमी आणि मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर एनएसजी कमांडोंनी संगम तीरावर पदभार स्वीकारला. संगम नाक्यावर सर्वसामान्यांचा प्रवेश बंद करण्यात आला. गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराज शहरातही भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान असून, त्यानिमित्त शहरात सुमारे ५ कोटी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत संगमसह ४४ घाटांवर आठ ते दहा कोटी भाविक स्नान करतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी साडेपाच कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. संपूर्ण शहरात 60 हजारांहून अधिक सैनिक सुरक्षेसाठी तैनात आहेत.

एस टी दरवाढ विरोधात शिवसेनेचे रास्ता रोको

पुणे : निवडणूका झाल्या त्याअगोदर लाडक्या बहीणींना पैसे वाटले, मत घेतली. भ्रष्टाचारी सरकार सत्तेवर आलं, लाडकी बहिण सावत्र झाली. आणि एस टी दरवाढ गोरगरीब जनतेवर लादली गेली. एका बाजूने मतांच्या जोगव्याकरीता लाडक्या बहिणींना पैसे वाटायचे आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे एस टी दरवाढ करून लाडक्या बहिणीसह दाजींच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे. या दरवाढी विरोधात शिवसेना पुणे शहराचे वतीने भ्रष्टाचारी राज्य सरकार व एस टी महामंडळाच्या विरोधात पुणे शहरातील स्वारगेट एस टी स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिवहन मंत्री म्हणतात एस टी दरवाढ कोणी केली मला माहीत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जर परिवहन मंत्र्यांना न सांगता दरवाढ करणार असतील तर सरकारमधे मंत्र्यांची काही गरजच उरली नाही. परिवहन मंत्र्यांच्या हक्कावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गदा आणत असतील तर परिवहन मंत्र्यांनी या दोघांचा निषेध करून राजीनामा द्यावा. दोन महिन्यांपूर्वी एस टी फायद्यात आहे, असे जाहिर केले जाते. मग आता असे काय झाले कि १५ टक्के एस टी दरवाढ सर्वसामान्य प्रवासी नागरिकांवर लादली गेली. लालपरीची अवस्था सरकारच्या नाकर्तेपणामुळे अगोदरच बिकट झाली आहे. त्यात सुधारणा करायची सोडून गरिबांच्या खिशाला चाट मारली गेली. तसेच डुप्लिकेट वकील सदावर्ते सरकारच्या आशिर्वादाने एस टी कामगारांची फसवणूक करत त्यांचे पैसे लाटतोय. त्यांची पिळवणूक करत आहे. सरकार यामधे लक्ष घालत नाही. एस टि दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना रस्तावर उतरली. सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला. आंदोलनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला संपर्क संघटिका स्नेहल आंबेकर, सहसंपर्क कल्पना थोरवे, युवाधिकारी राम थरकुडे, निकीता मारटकर, विद्या होडे, स्वाती कथलकर, रोहीणी कोल्हाळ, अमृता पठारे, ज्योती चांदेरे, सुनिता खंडाळकर, सुलभा तळेकर,पद्मा सोरटे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, पूजा चांदगुडे, परेश खांडके, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, समीर तुपे, आबा निकम, प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, किशोर रजपूत, उमेश वाघ, संजय वाल्हेकर, रमेश क्षीरसागर, सचिन पासलकर, निलेश वाघमारे, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विभागप्रमुख सूरज लोखंडे, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, दिलीप व्यवहारे, पराग थोरात, दिलीप पोमण, मकरंद पेठकर, रूपेश पवार, नंदू येवले, संदिप गायकवाड उपस्थित होते.

एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा- नाना पटोले

जीबीएसचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग आहे कुठे? जीबीएसवर तात्काळ उपाययोजना करा.

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२५
विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे, पण महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही, शिवशाही नावाने सुरु केलेल्या बससेचीही दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला रहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहित नसणाऱ्या मंत्री महोदयांना एसटी महामंडळाची राज्यातील १३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे. एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे, हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही असेही पटोले म्हणाले.

गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराकडे लक्ष द्या..
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराने सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसार माध्यमातून आली आहे. राज्यात १०० पेक्षा जास्त रुग्णांना या रोगाची लागण झाली असून १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत, योग्य ती खबरदारी घेऊन जनजागृती करावी. राज्य सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लावून या रोगाचा प्रसार होऊ नये यावर भर दिला पाहिजे. दुषित पाणी व अस्वच्छतेमुळे हा आजार होत असल्याचे समजते. ११ वर्षापासून ‘हर घर नल, हर नल में जल’ तसेच ‘स्वच्छता मोहिम’ राबिवली जात असतानाही स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात, असे म्हणावे लागेल असे नाना पटोले म्हणाले.

डीआरडीओतील शास्त्रज्ञ, संशोधकांनी जाणला तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा इतिहास

पुणे : डीआरडीओच्या पुणे येथील उच्च उर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळेतर्फे राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये डीआरडीओच्या राष्ट्रीय पातळीवरील जवळपास 100 शास्त्रज्ञ व संशोधकांनी सहभाग घेत किल्ले सिंहगडावर यशस्वी ट्रेक केला.
शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी अभ्यासपूर्ण व अमोघ वाणीद्वारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा त्याग व बलिदानाबाबतचा इतिहास सांगितला. कल्याण दरवाजा, तानाजीकडा येथील रणसंग्राम प्रत्यक्षात पाहतोय अशी अनुभूती शास्त्रज्ञ व संशोधकांना आली. किल्ले सिंहगडाचा इतिहास, शिवकालीन युद्धनीती व शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्य या बाबतही कर्डे यांनी मार्गदर्शन केले.
सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कर्तव्यनिष्ठेबाबत स्थापित केलेल्या उदाहरणातून प्रेरणा घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एचईएमआरएल व एआरडीई यांच्यामार्फत वनविभागास चार कचरापेट्या देण्यात आल्या.
या प्रसंगी संचालक अनिल प्रसाद दास, संचालक डॉ. हिमांशू शेखर, व्यवस्थापक संजीव गुप्ता, क्रीडा विभाग सचिव शिशिर कुमार श्रीवास्तव व डीआरडीओ वेस्ट झोन स्पोर्ट्स काऊन्सिलचे अध्यक्ष के. पी. सी. राव, सचिव चेतन सोळंकी व खजिनदार तृप्ती पटेल उपस्थित होते.
एचईएमआरएल स्पोर्ट्स कमिटीमधील कृष्णकांत जाधव, सिद्धार्थ गायकवाड, जितेंद्र भेगडे, मोरेश्वर देशपांडे, जितेंद्र राऊत, संजय लोहकरे व मुरली शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यात पुन्हा १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

पुणे-शहर पोलीस दलातील १८ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या केल्याचे या आदेशात म्हटले आहे.

बाणेर पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नवनाथ जगताप यांची बाणेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांची बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक (सध्याचे ठिकाण) व त्या पुढे बदलीचे ठिकाण

नवनाथ संभू जगताप (गुन्हे, बाणेर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलिस स्टेशन

शर्मिला शिवाजी सुतार (गुन्हे, खडक) ते (गुन्हे) समर्थ पोलिस स्टेशन

संगीता संपतराव देवकाते (गुन्हे, भारती विद्यापीठ) ते सायबर पोलिस स्टेशन

अजित पोपटराव गावीत (गुन्हे, पर्वती) ते नियंत्रण कक्ष

अनिल शिवाजी माने (गुन्हे, चंदननगर) ते (गुन्हे) अंलकार पोलिस स्टेशन

गुरुदत्त गोरखनाथ मोरे (गुन्हे, विशेष शाखा) ते (गुन्हे) नांदेड सिटी पोलिस स्टेशन

विकास तुकाराम भारमळ (गुन्हे शाखा) ते (गुन्हे) स्वारगेट पोलिस स्टेशन

रंगराव पांडुरंग पवार (गुन्हे शाखा) ते (गुन्हे) बाणेर पोलिस स्टेशन

राजेश दत्तू खांडे (वाहतूक शाखा) ते (गुन्हे) फुरसुंगी पोलिस स्टेशन

राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर ( नियंत्रण कक्ष) ते पोलीस कल्याण

मनोज एकनाथ शेडगे (नियंत्रण कक्ष) ते कोर्ट कंपनी

स्वाती रामनाथ खेडकर (गुन्हे, येरवडा) ते (गुन्हे) चंदननगर पोलिस स्टेशन

सुरज दत्तात्रय बेंद्रे (गुन्हे, कोंढवा) ते (गुन्हे) बिबवेवाडी पोलिस स्टेशन

अमर नामदेव काळंगे (गुन्हे, हडपसर) ते (गुन्हे) काळेपडळ पोलिस स्टेशन

रजनी जालिंदर सरवदे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा

आशालता गणेश खापरे (विशेष शाखा) ते (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन

सुरेखा मोतीराम चव्हाण (गुन्हे, अलंकार) ते (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन

हर्षवर्धन वसंत गाडे (वाहतूक शाखा) ते नियंत्रण कक्ष

विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली 100 रुपयांची सुपारी

दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार

पुणे- विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यासाठी 100 रुपये सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 22 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग आल्याने विद्यार्थिनीची सुपारी दिल्याची माहिती आहे. ही बाब शिक्षकांना समजल्यानंतरही शाळेची बदनामी होऊ नये, यासाठी शाळा प्रशासनाने हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला. ही बाब समोर आल्यानंतर मुख्याध्यापकांसह वर्गशिक्षक व शिक्षिका यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली होती. हे सर्व त्याच वर्गातील एका विद्यार्थिनीने पाहिले. त्यानंतर तिने ही बाब त्या विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला सांगितली. विद्यार्थीनी वर्ग शिक्षिकेकडे तक्रार केल्यामुळे विद्यार्थ्याने तिच्याबद्दल मनात राग धरला होता. खोट्या सहीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिची हत्या करावी यासाठी 100 रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली

मुलांनी ज्या विद्यार्थ्याला सुपारी दिली, त्यानेच हा सर्व प्रकार अल्पवयीन विद्यार्थिनीला येऊन सांगितला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना याची माहिती दिली. आपल्या मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी शाळेत जाऊन वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, शाळा प्रशासनाने त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट दौंड पोलिस ठाण्यात धाव घेत शाळा प्रशासनाविरोधात फिर्याद दिली.

शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हा धक्कादायक प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतुने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

संताची शिकवणुक सत्य, न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने,संतांच्या महाराष्ट्रात, संत संस्कारांचे अधिष्ठान बळकट होण्याची गरज !

  • काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी*

पुणे :
महाराष्ट्रात नुकत्याच बीड, परभणी, बदलापूर, ठाणे येथे घडलेल्या घटना या मानवतेस लाज आणणाऱ्या व देशात राज्याची बदनामी करणाऱ्या आहेत, तर दुसरीकडे संताची शिकवणुक सत्य, नैतिकता, मानवता व न्यायाची चाड असणारी व निर्भयतेची असल्याने.. सद्यः परीस्थितीत राज्यातील समाज जीवनात
संत संस्कारांचे व नैतिकतेचे अधिष्ठान अधिक बळकट करणे काळाची गरज असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.
अम्युनेशन फॅक्टरी व सलग्न संस्था खडकी यांच्यावतीने हभप ‘किर्तन महोत्सवांचे’ आयोजन करण्यात आले होते. याच्या समारोप प्रसंगी गोपाळ दादा तिवारी यांनी विचार मांडले. कीर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, किर्तन महोत्सवाचे संयोजक व अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, रमेश भिडे पाटील, विकास नाना दांगट, भोलाशेठ वांजळे इ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, वरील अमानवी घटनांमुळे महाराष्ट्र देशभर बदनाम होत असून
शिव – छत्रपतींच्या महाराष्ट्रात संतांचे संस्कार लोप पावत चालले काय(?) असा प्रश्न विचारून ते म्हणाले की,
“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।”
असे संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. राष्ट्राला आदर्श ठरणाऱ्या संतांच्या भूमीत नीतिमत्तेला पायदळी तुडवून विकृती डोके वर काढत असेल तर वारकरी संप्रदायाने सज्जनांचा धाक वाढण्यासाठी, संतांची चळवळ तीव्र करणे व नैतिक अधिष्ठान प्रस्तापित करणे गरजेचे आहे असे काँग्रेस नेते, गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
हभप संतोष महाराज पायगुडे यांनी समारोपाच्या किर्तनात सांगितले की, ‘भारतभूषण म्हणावे असे आपले पुणे आहे. पुण्यात पहिला अभंग लिहिला गेला, ज्ञानेश्वरी पुण्यात लिहिली गेली इतकेच नव्हे तर देशातील पहिला दारूगोळा कारखाना पुण्यात उभा राहिला, अशी पुण्याची कीर्ती आहे.
या प्रसंगी.. सामुदायिक अभंगां बरोबरच.. “जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा’ ही देश भक्तीपर सामुहीक गीत देखील गायले गेले..!
पैलवान माणिक ढोले, संतोष देशमुख, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी कीर्तन महोत्सवाला भेट दिली.
अमिनेशन फॅक्टरीचे मुख्य महाप्रबंधक संजय हजारी, दीपक महाजन, विजय कुटील, मनमोहन खंदारे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

महिलेचा विनयभंग करणार्‍या रिक्षाचालकास अटक

पुणे-

हडपसर येथून घरी जात असताना सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने महिलेचा हात धरुन तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केले होते. या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
शिवशंकर वैजनाथ परळीकर (वय २१, रा. श्रमिक वस्ती,गल्ली नंबर १८ कर्वेनगर) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना २४ जानेवारी रोजी घडली होती.
फिर्यादी या हडपसर येथून रिक्षाने त्यांच्या घरी मांजरी येथे जात होत्या. सिरम इस्टिट्युटजवळ रिक्षाचालकाने फिर्यादी यांचा हात धरुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले़ घटनास्थळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा निष्पन्न केली. तांत्रिक तपासाद्वारे शिवशंकर परळीकर याला अटक केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे.

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

  • साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित
  • तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

मुंबई : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे ;

  • सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

  • उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

  • उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

  • उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

  • उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

  • उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

  • उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

  • उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)

  • उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)

  • उत्कृष्ट अभिनेता :

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

  • उत्कष्ट अभिनेत्री :

१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

  • उत्कृष्ट विनोदी अभिनेता :

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

  • सहाय्यक अभिनेता :

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

  • सहाय्यक अभिनेत्री :

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

  • प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

  • प्रथम पदार्पण दिग्दर्शन :

१. 4 ब्लाइंड मेन

२. गाभ

३. अनन्या