पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे ज्येष्ठ नेते,माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता उद्घाटन झाले.
पुण्यात दि.१ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान या सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने,परिसंवाद,पुस्तक प्रकाशन,भजन, शांती मार्च ,खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव,पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.गांधी सप्ताह आयोजनाचे हे १३ वे वर्ष आहे. गांधी सप्ताहाचे सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते .
सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली . भन्ते सुदसन्न, पुनीत कौर मान,धनश्री हेबळीकर,,मौलाना इसाद शेख, बिशप प्रदीप चांदेकर, खजान माजगावकर, घैसास गुरुजी सहभागी झाले.या सर्वांचा सत्कार शरद पवार यांनी केला.सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधी आणि त्याचे टिकाकार’ या पुस्तकाच्या Gandhi And His Critics या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन झाले .विवेक गोविलकर यांनी हा अनुवाद केला आहे. मोतीराम वाघ यांच्या ‘ भारत भ्रमण’ पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले .शरद पवार यांच्या हस्ते ‘सलोखा’ गटाचे प्रमोद मजुमदार यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
डॉ. शिवाजीराव कदम, अभय छाजेड, एम.एस. जाधव,अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, रामदास फुटाणे,जयदेव गायकवाड,प्रशांत कोठडिया, प्रशांत जगताप,काका चव्हाण, युवराज शहा, विकास लवांडे,,जांबुवंत मनोहर,डॉ. शशीकला राय, चंद्रकांत मोकाटे, अप्पा अनारसे उपस्थित होते .
शरद पवार म्हणाले,’डॉ. कुमार सप्तर्षी आणि आम्ही एकत्र काम केले आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात बिगर काँग्रेस पहिले सरकार आले, त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.त्यात संघर्षात जे मजबुतीने उभे राहिले, त्यात एसेम जोशी,डॉ. सप्तर्षी होते. ऐक्याचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विदयापीठाला देण्यात यश आले. त्यात त्यांची साथ मिळाली. सांस्कृतिक संस्था उंचीवर नेण्याचे काम डॉ. अशोक वाजपेयी यांनी केले. त्यांचेही विचार गांधी सप्ताहात ऐकायला मिळत आहेत, ही मोठी गोष्ट आहे.गांधी जयंती हा गांधीजींचा विचार देण्याचा हा जागतिक दिवस आहे. त्यांचे विचार जगाने स्वीकारला आहे. कुठेही गेले तरी त्यांच्या विचाराच्या खुणा दिसतात. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली. तरीही गांधी या चित्रपटामुळे त्यांचे नाव जगाला कळाले, असे आपले पंतप्रधान म्हणतात, याबदल त्यांचे ‘कौतुकच’ केले पाहिजे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ बिगर संसदीय राजकारणात आमचा आणि संसदीय राजकारणात शरद पवार यांचा हात कोणी धरणार नाही. वसंतराव नाईक यांच्या काळात पहिला मिसा शरद पवार यांना माझ्या नावे काढावा लागला होता. तरीही पुलोद स्थापना,नामांतर प्रसंगी आमचे विचार कृती एकच होता . महाराष्ट्रात भावकीचे महाभारत चालू आहे . शरद पवार यांना भीष्माचार्याच्या भूमिकेत आहेत . सत्याचा सल्ला देणारे ज्येष्ठ असतात, बाकीचे म्हातारे असतात . सत्य हाच परमेश्वर आहे, हे गांधीजींनी ठामपणे सांगीतले. अशा गांधीजींना चैतन्याने जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना करण्यात आली.
आता दोन्ही काँग्रेसचा गांधीजीं बदल स्मृतीभ्रंश झाल्यासारखे वातावरण आहे . त्यांच्या साठी गांधीजींचे विचार चैतन्य आम्ही जपून ठेवले आहे . गांधी विचाराचा प्रसार अनेक अडचणींमधूनही आम्ही चालू ठेवले आहे .जाती वाद शरद पवार यांनी कधी केला नाही. आता पुन्हा महाराष्ट्राला जातीवादातून सोडविण्याचे कार्य पवार यांनी हाती घ्यावे
डॉ. अशोक वाजपेयी म्हणाले,’भारतीय समाज गांधी विचारापासून दूर गेला आहे. त्यांच्यावर टीका करणारे वाढत आहे. फाळणीला जबाबदार ठरवले जाते आहे. प्रत्यक्षात स्वप्नातील सर्वधर्म प्रार्थना सभेची त्यांची कल्पना जगात एकमेवाद्वितिय आहे. एकत्रित भारताचा विचार त्यांनी केला. एक खराखुरा भारत उभारून दाखवला. हे सर्व धोक्यात आहेत. त्यांच्या विचाराची प्रासंगिकता वाढत चालली आहे. धर्माचे लोकशाही करण करून एकमेकांकडून शिकण्याची सुविधा त्यांनी दिली. सध्या लोकशाही घटत चालली आहे. गुन्हेगारी करण वाढत आहे. असहमती दाखविणाऱ्यांना शत्रू मानले जात आहे. हिंदू धर्म न मानणाऱ्य धर्मांनाही भारताने जन्म दिला आहे.हे विसरता कामा नये. आपल्याशिवाय इतरांना टिकूच द्यायचे नाही, असे वातावरण आता तयार झाले आहे. असत्य चकाचक करून दाखवले जात आहे, पण, सत्य नष्ट झालेले नाही.
असत्य, हिंसा, द्वेश, बाजार ही बिरादारी बनली आहे. सरकारी संस्था भय निर्माण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. भयमुक्ती हा खरा राजधर्म महाभारतात सांगीतले आहे.या भयमुक्तीसाठी कार्यरत राहिले पाहिजेत. अन्यथा सार्वजनिक जीवनातून नैतिकतेचे उच्चाटन होण्याचा धोका आहे.अशा वेळी निर्भय नागरी समाजची गरज आहे.
*अहिंसा दिन आणि शांती मार्च*
दि.२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ११ ते ३ पर्यंत सर्वांसाठी प्रसादभोजन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता गोखले चौक(गुडलक हॉटेल) ते गांधी पुतळा गांधी भवन या मार्गावर ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे.
दि.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे.दि.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.
दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर,पत्रकार रवींद्र पोखरकर सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.
*खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव*
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्येच विविध चित्रपट दाखवले जातील.दि.२ ऑकटोबर रोजी दुपारी १ वाजता ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’,दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत.