पुणे- येथील नामांकित वाडिया कॉलेज मधील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु सदर गुन्ह्यात तातडीने दखल न घेणाऱ्या संस्थेच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याचे मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निर्देशने करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, विशाल तांबे उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने तसेच नामांकित शिक्षण संस्था येथे असल्याने देशभरातून विद्यार्थी पुण्यात येत असतात. महिला सुरक्षा त्यामुळे महत्वपूर्ण आहे. सरकार महिला अत्याचार घटना दडपण्याचे प्रयत्न करत आहे. वाडिया महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलीवर चारजणांनी बलात्कार केला परंतु त्याबाबतचा गुन्हा लवकर दाखल करण्यात आला नाही. लैंगिक शोषण झालेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे ट्रस्टी सचिन सानप व अशोक चांडक व इतर पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या बेजबाबदार ट्रस्टींची संस्थेतून कायमस्वरुपी हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
प्रशांत जगताप म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेले पुणे आता महिलांवरील अत्याचारांचे माहेरघर होत आहे. विद्येच्या मंदिरात, शाळा व कॉलेजातही आपल्या लेकींवर अत्याचार होत असून डोक्यावर सरकारचा आशिर्वाद असलेले लोक या अत्याचारांवर पांघरुण घालत आहे, ही दुर्देवाची बाब आहे.