Home Blog Page 666

SMS आले पण बँकांनी लाडक्या बहिणींचे हेलपाटे वाढविले

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम न आलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडणी व सिडींग करण्यासह आपले बँक खाते सुरू असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मनिषा बिरारीस यांनी कळविले आहे.

पुणे- SMS आल्यावर आनंदित होऊन बँकाकडे धावलेली लाडक्या बहिणींची पावले आता बँकांनी सुरु केलेय त्रासदायी वर्तनामुळे मंदावली आहेत . सरकारने सुरु केलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा मिळणे ज्यामुळे सरकारला दुर्लभ होऊ शकणार आहे असी नीती काही बँकांनी अवलंबली असल्याचे दिसून आले आहे. तुमचे खाते अॅकटीव्ह नाही असे सांगून नवीन खात्याचे फॉर्म देणे, नंतर जुने खाते अॅकटीव्ह करण्यास फॉर्म देणे,खाते १५ दिवसांच्या नंतर अॅकटीव्ह होईल सांगणे, ATM कार्ड नसताना , चेक बुक नसताना वीड्रॉल स्लीप वर पैसे न देता ,चेक बुक साठी अर्ज करायला लावणे , अशा पद्धतीचा कारभार धनकवडीतील महाराष्ट्र बँकेने सुरु केल्याने येथे खाते असलेल्या गोरगरीब लाडक्या बहिणी हेलपाटे मारून त्रस्त झाल्या आहेत तर इकडील अक्सीस बँकेने एक हप्ता दिल्यावर दुसऱ्या हप्त्याचा sms आलेल्या महिलांना देखील पैसे आलेत पण ते इथे रिफ्लेक्ट होत नाहीत असे सांगून हेलपाटे मारायला लावल्याचे सांगण्यात येते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेय लाडक्या बहिणीच्या योजनेला तुडुंब प्रतिसाद मिळाला . कार्यकर्त्यांनी देखील हि योजना घरोघरी पोहोचविली आणि या योजनेमुळे भाजपवासियांना आणि एकूणच शिंदे गट , पवार गट अशा सत्तेतील सर्वांना निवडणुकीसाठी हि योजना लाभदायी ठरेल अशी मोठी आशा वाटू लागली . परंतु अशा पद्धतीने बँकांनी वर्तन ठेऊन महिलांचे हेलपाटे वाढवीत पैसे देण्याचा आखडता हाथ घेतल्याचे चित्र दिसू लागल्याने आता आनंदित होऊन बँकांकडे जाणारी पावले मंदावू लागल्याचे जाणवू लागले आहे .आधार कार्ड, पॅन कार्ड,निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक असे सारे असतानाही केवळ आर्थिक स्थितीमुळे त्या बँकांची खाती अविरत पणे सुरु न ठेऊ शकल्याने त्यांची स्थिती बँकांनी अशी करवून पैसे वापरण्याचा घाट सुरु ठेवला कि काय ? असा प्रश्न निर्माण करण्याजोगी स्थिती आहे. धनकवडीतील बँकचा अनुभव मोठा त्रस्त करणारा असल्याच्या जास्त तक्रारीआहेत .

राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द:विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने निर्णय; उद्या नियोजित दौऱ्यावर येणार

मुंबई/कोल्हापूर -काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. आता ते उद्या या दौऱ्यावर पोहोचतील.काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. ते सायंकाळी 5.30 वा. कोल्हापुरात येतील असा अंदाज होता. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कोल्हापूर विमानतळावर तळ ठोकून होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच पटोले आणि वडेट्टीवार हे कोल्हापूर विमानतळावरून निघून गेले. आता राहुल गांधी उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 8.30 वा. आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यावर येतील अशी माहिती आहे.

राहुल गांधी आपल्या आजच्या कोल्हापूर दौऱ्यात कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार होते. तसेच संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार होते. या दौऱ्यातून ते आरक्षणाचे जनक असणाऱ्या शाहू महाराजांच्या भूमीतून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी तब्बल 14 वर्षांनंतर कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी मार्च 2009 मध्ये ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी कागलच्या शाहू साखर कारखान्यावर त्यांचा कार्यक्रम झाला होता. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या कोल्हापूर शहरातील निवासस्थानालाही त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर आता ते शाहू नगरीत येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कोल्हापुरात सध्या काँग्रेसचे 4, विधानपरिषदेचे 2, तर 13 खासदार आहे. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक बळ देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी कोल्हापूरच्या 2 दौऱ्यावर येणार असल्यामुळे येथील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला होता. पण ऐनवेळी राहुल यांचा 2 दिवसीय दौरा 1 दिवसांचा झाल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार,सावित्रीमाईंच्या कर्मभूमीतच महिला असुरक्षित : नाना पटोले

महिला सुरक्षा वाऱ्यावर आणि शासन व प्रशासन भ्रष्टाचारात मग्न.

बंजारा समाजाचे संत रामराव महाराजांना नरेंद्र मोदींनी फसवले, बंजारा समाज आता मोदींच्या भूलथापांना बळी पडणार नाही.

मुंबई, नागपूर दि. ४ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यांना फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित आहेत पण सरकारने याची जबाबदारी घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी व अशा घटनांना पायबंद घालावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलातना नाना पटोले म्हणाले की, पुण्यात शाळकरी मुलीवर ड्रायव्हरने अत्याचार केला, त्याआधी एका कॉलेजमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडली. आणि आता बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना झाली हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. सावित्रीबाईच्या भूमीत अशा घटना वाढत आहेत हे चिंतेची बाब आहे. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाईंनी जगाला संदेश दिला त्यांच्याच कर्मभूमीत हे पाप सुरु आहे याला सरकारच जबाबदार आहे. सरकारने याची जबाबदारी घ्यावी. या सरकारचे शेवटचे दिवस राहिले आहेत, त्यांनी काही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे, तसेही जनतेला हे भाजपा शिंदे सरकार नकोसे झाले आहे. राज्यातील भगिनींना सुरक्षित बही हवी आहे याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात पोहरादेवीला येत आहेत पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीला भेट देऊन त्यावेळी रामराव महाराज यांना बंजारा समाजाला आदिवासी जातीत समावेश करण्याचे लेखी आश्वासन दिले होते ते अद्याप पूर्ण केलेले नाही. नरेंद्र मोदी संतांनाही खोटे बोलतात त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार. पोहरादेवीला जगभरातील बंजारा लोक येतात मोदींचा जुमलेबाजीला व भूलथापांना आता बंजारा समाज बळी पडणार नाही.
नरहरी झिरवळ यांच्या आंदोलनावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली धनगर, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण ते पूर्ण केले नाही. आरक्षणाच्या नावावर भाजपा व फडणवीस यांनी जाती-जातीत भांडणे लावली आहेत, आज तेच लोक त्यांना जाब विचारत आहेत. ज्यांनी आश्वासन दिले त्यांना आता त्याची पूर्तता करावी लागणार आहे असे पटोले म्हणाले.

अजित पवारांच्या प्रश्नावर बोलताना, अजित पवार महायुतीतून बाहेर पडतात की त्यांना बाहेर काढले जात आहे हे माहित नाही असेही नाना पटोले म्हणाले.

यावेळी एका एनजीओच्या महिला सुरक्षासंदर्भातील ऍप नाना पटोलेंच्या हस्ते लाँच करण्यात आले. हे ऍप महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे असे पटोले यांनी सांगितले.

टेंभीनाका मित्र नवरात्रोत्सव मंडळाच्या आई जगदंबेची मिरवणूक संपन्न -मुख्यमंत्री शिंदे सहभागी

ठाणे- या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥ असा मंत्रोच्चार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल टेंभीनाका मित्र नवरात्रोत्सव मंडळाच्या आई जगदंबेची आगमन मिरवणुकीत सहभागी झाले . यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विकास रेपाळे तसेच जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संदर्भात CM शिंदे यांनी सांगितले ,’शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेतून सुरु करण्यात आलेल्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय संस्था टेंभीनाका मित्र नवरात्रोत्सव मंडळाच्या आई जगदंबेची आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडली. सर्वप्रथम अंबे मातेचे मनोभावे पूजन करून त्यानंतर तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वर्गीय दिघे साहेबांच्या परंपरेनुसार ढोल ताशा पथक, वारकरी, गोंधळी, वाघ्या मुरळी, कोळीनृत्य अशी वेगवेगळी कलापथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती. अंबे मातेचा यळकोट करत त्यांच्यासोबत या मिरवणुकीत सहभागी झालो.यावेळी स्थानिक नागरिकांनी जागोजागी अंबे मातेवर फुलांचा वर्षाव करत देवीचे स्वागत तसेच नागरिकांच्या या उत्साहात सहभागी होऊन लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढले तसेच महिला भगिनी आणि लाडक्या बहिणींना जागोजागी मला राख्या बांधल्या. तसेच दरवर्षीप्रमाणे ठाणे पोलिसांनी देवीचा रथ ओढत देवीचे जल्लोषात स्वागत केले. मोठया उत्साहात आणि अंबे मातेच्या जयघोषात ही मिरवणूक कळवा येथून टेंभीनाक्यापर्यंत काढण्यात आली.

केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात  दर्जा द्यायला १० वर्षे का लागली ?

पुणे-महाराष्ट्रातील लोकसभेच्या पार्श्वभूमिवर केंद्राने १० वर्षे उशिरा मराठी भाषेला अभिजात  दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे असे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे . तज्ञ समितीने ४३५ पानांचा एक अहवाल तयार केला. मे २०१३ मध्ये  तो अहवाल मला सादर केला. तो इंग्रजीत भाषांतर करून इंग्रजी अहवाल २०१३ मध्येच तातडीने आम्ही केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे पाठवला. साहित्य अकादमीने अहवालाचा सखोल अभ्यास केल्यावर फेब्रुवारी २०१४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल शिफारस करून अहवाल अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे परत पाठवला.परंतु यानंतर लगेच लोकसभेच्या  निवडणुका जाहीर झाल्या आणि पुढे केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाचे स्थापन झाले. पण तरीही यावर केंद्राने तातडीने निर्णय न घेता आता १० वर्षानंतर हा निर्णय घेतला आहे. उशिरा जरी घेतला तरी हा निर्णय आनंददायी आहे असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

चव्हाण यांनी असे म्हटले आहे कि,’मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मी केंद्रात मंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने १७ सप्टेंबर २००४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेऊन देशात काही भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णय घेतला. त्या साठी साहित्य अकादमीने एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निकष करण्यास सांगितले. त्यानुसार आधी तामीळ आणि त्यानंतर संस्कृत, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा देण्यात आला. 
मी महाराष्ट्रात आल्यावर मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गाठीत करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांना  अध्यक्ष नियुक्त केले. त्या समितीत प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. आनंद उबाळे, परशुराम पाटील, डॉ. मैत्रेयी देशपांडे आणि राज्य सरकारच्या भाषे विषयक संस्थांच्या संचालकांची सदस्य म्हणून नेमणूक केली.  
समितीने पुराव्यानिशी अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले. सुरूवातीला त्यांच्या एकूण सात बैठका झाल्या. त्यानंतर डॉ. पठारे अध्यक्ष, प्रा. नरके हे समन्वयक आणि डॉ. बहुलकर व डॉ. देशपांडे हे सदस्य असलेल्या मसुदा उपसमितीची स्थापना करण्यात आली व त्यांच्यावर अहवाल लेखनाचे काम सोपवण्यात आले. या उपसमितीने १९ बैठका घेतल्या, तज्ज्ञांशी चर्चा करून प्राचीन ग्रंथांचे संदर्भ, प्राचीन लेख, शिलालेख, ताम्रपट अशा सर्वांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ४३५ पानांचा एक अहवाल तयार केला. मे २०१३ मध्ये  तो अहवाल मला सादर केला.   अभिजात भाषा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो प्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरीत करण्यात आला.  हा इंग्रजी अहवाल २०१३ मध्ये आम्ही केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे पाठवला. त्यांनी तो अहवाल साहित्य अकादमी कडे सोपविला व त्यावर निर्णय मागविला. साहित्य अकादमीने अहवालाचा सखोल अभ्यास केल्यावर फेब्रुवारी २०१४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल शिफारस करून अहवाल अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे परत पाठवला. परंतु यानंतर लगेच लोकसभेच्या  निवडणुका जाहीर झाल्या आणि पुढे केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले.
 त्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाचे स्थापन झाले. त्यावेळेस सांस्कृतिक कार्य मंत्री असलेल्या श्री विनोद तावडे यांनी एक वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार अशी घोषणा केली होती. परंतु, त्या प्रस्तावावर पाच वर्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. राज्यातील काही साहित्यिकांच्या मते मागील सरकारच्या कालावधीत पाहिजे तितका पाठपुरावा झाला नाही. परिणामी साहित्य अकादमीने हिरवा कंदील दाखविला आत्तापर्यंत केंद्र सरकारने मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा दिला नव्हता हे खेदाने नमूद करावे लागते. 
आता महाराष्ट्रातील लोकसभेच्या पार्श्वभूमिवर केंद्राने १० वर्षे उशिरा हा निर्णय घेतला आहे. मी डॉ. रंगनाथ पठारे व त्यांच्या समितीच्या सदस्यांचे अभिनंदन करतो की त्यांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले. त्याच बरोबर सर्व मराठी साहित्यीकांचे धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये योगदान दिले आहे. 

बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार:काही आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्धीस

पुणे- बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या अत्याचार करणार्‍या काही आरोपींची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्धीला दिली आहेत.बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांची सामुहिक बलात्कार केला. (Gang Rape In Bopdev Ghat Pune) गुरुवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली होती. याची पोलिसांना माहिती मिळताच गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. या तरुणीने व तिच्या मित्रांनी सांगितलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी दोघांची रेखाचित्रे तयार केली आहेत. त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (Sr PI Vinay Patankar) 8691999689, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५ चे युवराज हांडे (PI Yuvraj Hande) 8275200947 / 9307545045 तसेच गुन्हे शाखा 020-26122880 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे नवरात्र महोत्सवात तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण आणि आदर्श मातांचा सन्मान

पुणे – ‘नवरात्रीचा उत्सव म्हणजे  स्त्री शक्तीचे पूजन करण्याचा उत्सव, मात्र सध्या समाजात सातत्याने घडणार्या स्त्री अत्याचाराच्या घटना पाहता, स्त्रियांनी पुढाकार घेत, एकत्रित येऊन स्त्री मधील शक्तीचे जागरण केले पाहिजे. स्त्री ही कोमल असेल, पण ती कमजोर अजिबात नाही, हे ठामपणाने सांगितले पाहिजे’, असे आवाहन अखिल भारतीय महिला कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी शुक्रवारी येथे केले. व्यासपीठावरील औपचारिकता सोडून देत, अलका लांबा उपस्थित महिलांमध्ये मोकळेपणाने मिसळल्या. त्यांनी अनेक महिलांशी संवाद साधला. सेल्फी काढल्या. गाणे म्हटले आणि महिलांनीही कोरस देत, त्यांना प्रतिसाद दिला. मराठमोळा फेटा बांधून आणि नथ घालून लांबा यांनी महिलांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला.
पुण्याची गौरवशाली ओळख असलेल्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात शुक्रवारी  दुपारी लांबा यांच्या हस्ते २५ व्या महिला महोत्सवाचे श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, शिवदर्शन, पुणे येथे उद्घाटन झाले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,  पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सरचिटणीस संगीता तिवारी, महिला कॉंग्रेसच्या सुनीता गवांडे , पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, व्यासपीठावर उपस्थित होत्या.


अलका लांबा पुढे म्हणाल्या, ‘देशाच्या लोकसंख्येपैकी निम्मी संख्या आपली आहे. आपणच आपल्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असले पाहिजे. घटनेने आपल्याला दिलेले अधिकार आणि हक्क बजावले पाहिजेत. एकमेकींना पाठिंबा देत, एकत्रित प्रयत्नाने समाजात पुढे आले पाहिजे. नवरात्र महोत्सवात शक्तीचे, देवीचे पूजन करणार्या पुरुषांनी आधी घराघरातील शक्तीरूपे समजून घेतली पाहिजेत. घरातील स्त्रीचे हक्क, अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे. बदलांची सुरवात घरापासून केली पाहिजे. स्त्रीचे शांत राहणे, म्हणजे तिचा दुबळेपणा नाही. स्त्री कोमल असेल पण ती कधीच कमजोर नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे’. आपल्या मोबाईलवर ‘कोमल है कमजोर नही तू’  हे प्रसिद्ध गीत लांबा यांनी सिलेक्ट केले आणि ते ध्वनिक्षेपकावरून सर्वांना ऐकवले. स्वतःही गात गात, त्या व्यासपीठावरून खाली उतरल्या आणि उपस्थित महिलांमध्ये मिसळल्या.

याप्रसंगी कर्तबगार महिलांना दिला जाणारा ‘तेजस्विनी’ पुरस्कार  सामाजिक कार्याबद्दल सोहम संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा  सोनवणे, आपत्ती व्यवस्थापक सुषमा खटावकर आणि  क्रीडापटू मधुरा धामणगावकर यांना लांबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच खडतर परिस्थितीत आपल्या मुलांना उत्तम शिकवणूक, विचार देऊन आदर्श नागरिक घडविणाऱ्या सुमारे ४०० अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक करताना जयश्री बागुल म्हणाल्या, ‘महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरु झालेल्या या महिला महोत्सवाचे यंदा २५ वे वर्ष आहे. दरवर्षी हजारो महिला या महोत्सवात सहभागी होतात. महिलांसाठी अनेक स्पर्धा घेतल्या जातात. उत्तम टीमवर्कमुळेच हा उपक्रम इतकी वर्षे सातत्याने शक्य होत आहे’.
आबा बागुल म्हणाले, ‘स्त्रीशक्तीच्या विविध रूपांचे दर्शन या महिला महोत्सवात घडते. आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी योगदान देणार्या तसेच मातृशक्तीला वंदन करण्याच्या हेतूने हा महिला उत्सव साजरा केला जातो’.
प्रारंभी शिवांजली नृत्य अकादमीच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना सादर केली. रत्नाकर शेळके डान्स अकॅडमी च्या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन तसेच देवीची आरती करण्यात आली. रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी योगिता नकम, प्रांजली गांधी, निर्मला जगताप, विद्युलता साळी उपस्थित होत्या.

श्रीसूक्त पठणातून तब्बल ५ हजार महिलांनी केली ‘देवी शक्तीची’ स्तुती 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव ; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम
पुणे : ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. तब्बल ५ हजार महिलांनी सामुहिकरित्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, माता माता की जय… चा नामघोष आणि शंख वादनाच्या निनादाने नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट मंगलमय झाली. 
निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात झालेल्या सामुहिक श्री सूक्त पठण कार्यक्रमाचे. यावेळी मुख्य आयकर आयुक्त रिना झा-त्रिपाठी, डॉ.सतिश देसाई, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, निलेश लद््दड आदी उपस्थित होते.  
कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशा वादनाने झाली. त्यानंतर केशव शंखनाद पथक आणि श्रीमंत केसरी शंखनाद पथकातील वादकांचे शंखवादन झाले. कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी… च्या जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. श्रीसूक्त म्हणजे काय? त्याचे महत्व आणि महती याविषयी मीनल चौरसिया यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्री सूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरित्या पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. 
अमिता अग्रवाल म्हणाल्या, धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. सामुहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. यंदा श्रीसूक्त पठणाच्या मोठया कार्यक्रमासह नारीशक्तीचा सन्मान सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम देखील होणार आहे. पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

“एक झाड आईचे”वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार -शोभाताई आर धारीवाल

पुणे-आर एम डी फाऊंडेशन द्वारा दरवर्षी हजारो झाडं संपूर्ण भारतभर लावली जातात . यावर्षीही रांजणगाव , उपलाट तलासरी , वाघोली , दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना शाळा , महाविद्यालयं, रुग्णालय , सार्वजनिक उद्याने ,डोंगर भाग तसेच गायरान ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते , त्यांना वर्षभर पाणी मिळेल व झाडं जगतील याची काळजी घेतल्या जाते . यापुढे शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून “एक झाड आईचे” अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे दिली . प्रत्येक विद्यार्थ्याने झाडं लावावी , ती झाडं दत्तक घ्यावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 2700 स्वदेशी झाडांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले . वितरीत केलेल्या झाडांची निगा , वाढ व जोपासना केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या . यावेळी शाळेचे विश्वस्त श्री देवीदास भन्साळी यांचेही सहकार्य मिळाले .
वृक्षवितरण व वृक्षारोपण वेळी प्राचार्य श्री भोसले , शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचीच संधी महत्वाची;४११५ ग्राहकांना सध्या नकोय नवीन वीजजोडणी

पुणे, दि. ०४ ऑक्टोबर २०२४: थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर व्याज व विलंब आकारासह वीजबिलांची थकबाकी वाढतच जाणार आहे. जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरावीच लागणार. त्यामुळे सध्याच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण व्याज व विलंब आकार शुल्काची माफी असलेल्या महावितरण अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थकबाकी असलेल्या जागेवर सध्या विजेची गरज नसली तरी अभय योजनेचा फायदा घेत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत ४ हजार ११४ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी नसल्याचे अर्जात नमूद केले आहे. तर उर्वरित ५ हजार ५८३ ग्राहकांनी मात्र नवीन वीजजोडणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. थकबाकी असलेल्या जागेवर पुन्हा वीजपुरवठा पाहिजे असल्यास एरवी सर्वप्रथम संपूर्ण थकबाकीची रक्कम भरणे आवश्यक असते. मात्र आता दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या जागा वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने अभय योजनेतून विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे व केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे.

कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही अभय योजना आहे. विशेष म्हणजे केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. सोबतच मागणीनुसार नवीन वीजजोडणी घेण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहकांना देखील ही संधी आहे. ही योजना दि. १ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत असल्याने थकबाकीमुक्तीच्या या योजनेचे केवळ ५७ दिवस शिल्लक आहेत.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर वीजबिलांची जुनी थकबाकी भविष्यात विजेच्या वापरासाठी नियमानुसार भरावीच लागणार आहे. त्यामुळे सध्या वीज वापराची गरज असो किंवा नसो, थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन किमान वीजबिलाच्या सध्याच्या थकबाकीतून मुक्त् व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ९ हजार ६९८ ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला आहे. यात पुणे जिल्हा- ४६१७, सातारा- ४५५, सोलापूर- १४३९, कोल्हापूर- ११०२ आणि सांगली जिल्ह्यातील २०८५ थकबाकीदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. या ग्राहकांनी मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकार शुल्काचे संपूर्ण ३ कोटी २४ लाख रुपये माफ होणार आहे. योजनेत सहभागी ४ हजार ११५ वीजग्राहकांनी केवळ जागेच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत नवीन वीजजोडणीची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे. तर उर्वरित ५ हजार ५८३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सहभागी ९ हजार ३१६ (९६ टक्के) ग्राहकांनी थकबाकी एकरकमी भरण्यास पसंती दिल्याने त्यांना मूळ थकबाकीमध्ये आणखी सवलत मिळणार आहे. 

महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी व थकबाकीची रक्कम भरण्याची सोय www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्व: विकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार-श्री अजित गुलाबचंद

 निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

पुणे: प्रमाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्व: विकासाचा आणि नवतंत्रज्ञानाच्या निर्माणाचा आधार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे. अपयाशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढून यश संपादन केले पाहिजे. विविध रणनीती आणि अनेक साधनांच्या माध्यमातून यशाची शिखर चढता येतात, म्हणून निराश न होता प्रमाणिकता राखत यश मिळवावे, असे प्रतिपादन निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एचसीसी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद यांनी केले.
देशातील पहिली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील विद्यापीठ म्हणून ओळख असणारी निकमार विद्यापीठ पुणे यांचा पहिला दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी, परीक्षा नियंत्रक डॉ. आदिनाथ दामले आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.दरम्यान पहिल्या दीक्षांत समारंभात एमबीए अडव्हान्स कंस्ट्रक्शन मॅनजमेंटचा विद्यार्थी लक्ष्मणन, एमबीए – एडवांस प्रोजेक्ट मैनेजमेंट, 2024चा विद्यार्थी पटगर रवींद्र नारायण, एमबीए – रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, 2024 चा विद्यार्थी बोंडे कुणाल शांताराम, पीजीपी – क्वांटिटी सर्व्यिंग आणि कंट्रक्ट् मैनेजमेंट, 2024चा विद्यार्थी विपुल भालदे, पीजीपी – क्वांटिटी सर्व्यिंग आणि कंट्रक्ट् मैनेजमेंट, 2023 चा विद्यार्थी प्रजापती शिवप्रसाद बाराखुराम आणि पीजीपी – मैनेजमेंट ऑफ फैमिली ओन्ड् कंस्ट्रक्शन बिजनेस , २०२३चा विद्यार्थी चोवट्या श्रेनिल विजयभाई यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तसेच विविध विद्याशाखेतील  790 हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एचसीसी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद म्हणाले की, अपयश ही यशाच्या जवळ घेऊन जाणारी आणि विविध बाबींचे मार्गदर्शन करणारी संस्था आहे. तुम्ही मजबूत निर्माणासाठी मेहनत घेऊन मानवता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे.

निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा आणि त्यांच्या मेहनतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दिवस आहे. निकमार हा विचार 1983 मध्ये सुरू करण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेक फळे या वृक्षाला आली आहे. संशोधन आणि नव तंत्रज्ञानाच्या शिकविण्यासाठी आणि शहरी विकासासाठीचे अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. ही आताची बॅच सगळ्यात महत्वाची आणि उच्च सॅन्डर्ड सेट करणारी आहे. आम्ही इंडस्ट्री रेडी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारताच्या विकासासाठी आणि विविध शहराच्या विकासासाठी आमचे विद्यार्थ्यी कटीबद्ध असतील. आम्ही निकमारच्या विद्यार्थ्यांकडे बदल घडविणारे आणि व्यावसायिक निर्माण करणारे हात म्हणून बघतो. उच्चस्तरावरील शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा आमचा मानस आहे.  

कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी यांनी प्रस्तावना केली. त्या म्हणाल्या की विद्यापीठाने व्यवसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. आमचे धैय्य आहे, की स्किलड टेक्नो मैनेजर निर्माण करणे आणि त्याद्वारे व्यावसायिक निर्माण करणे हा आहे. शाश्वत विकासासाठी आतापर्यंत 227 संशोधन पेपर प्रकाशित केले आहे. परदेशातील विविध विद्यापीठांसोबत एमओयु केल्याने आमच्या विद्यार्थ्यांना परदेशात संधीची दारे उघडी झाली आहेत.
डॉ. ज्योतिष आणि  डॉ.  धामा यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. आदिनाथ दामले यांनी आभार मानले. 

सकारात्मक विचाराने कार्य करा- झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहर मास्टर मूस

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे प्रेषित झरथुष्ट्र व हुएन -ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

 पुणे, दि. ४ ऑक्टोबर ः “सकारात्मक विचार ठेवा, उत्तम कार्य करा आणि चांगले बोला असा संदेश प्रेषित झरथुष्ट्र यांनी मानवतेला दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रेम आणि अहिंसेच्या शक्तीच्या आधारे विश्वशांतीसाठी प्रयत्न केले. जगातील सर्व धर्म हाच मानवतावादी संदेश दिला आहे.” असे मत झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहेरे मास्टर मूस यांनी व्यक्त केले.  
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि माईर्स एमआयटी आर्टस, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या वतीने गांधी जयंतीच्या निमित्ताने पारशी धर्माचे संस्थापक प्रेषित झरथुष्ट्र आणि चीनी बौध्द भिक्षू व महान दूरदर्शी विद्वान विचारवंत तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँड पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व जहांगीर रूग्णालयाचे अध्यक्ष जहांगीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होत.
डॉ. मेहेरे मास्टर मूस म्हणाल्या,”जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटात दोन महामानवांचे पूर्णाकृती पुतळे स्थापन केल्याबद्दल डॉ. मेहेर मास्टर मूस यांनी डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या. सर्व धर्मांनी आपल्या तत्वज्ञानातून चांगले मानव घडविण्याचा संदेश दिला आहे. त्याआधारेच विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड शिक्षणाच्या माध्यमातून चांगले मानव घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “प्रेषित झरथुष्ट्र आणि तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यासारख्या महामानवांनी मानवतेला विश्वशांती आणि एकोप्याचा संदेश दिला. सध्या जग गोंधळ, संभ्रम, हिंसाचार आणि दहशतवादाचा सामना करत असताना, या महान व्यक्तींचा संदेश समाजात प्रसृत होणे आवश्यक आहे. त्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वहितापेक्षा विश्वकल्याणाचा विचार केला पाहिजे आणि ज्ञानाची पूजा केली पाहिजे. विश्वशांती घुमट हा ज्ञान पूजेचे स्थान असून, भारत विश्वगुरू होण्यासाठी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत आहे.”
जहांगीर म्हणाले,”विश्वशांती घुमटाचा परिसर हा खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, तसेच सर्व धर्मीयांचे धार्मिक स्थळ आहे. चांगले बोला, सकारात्मक विचार करा आणि योग्य कृत्य करा, असा संदेश देणार्‍या प्रेषितांचे व महामानवांचे पुतळे सर्वांसाठी प्रेरणादायी असून, हे घुमट एकात्मतेचे मंदिर होवो.”
डॉ. विजय भटकर म्हणाले, “नवीन विचार दाबण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ते नवीन रुपात पुन्हा उदयास आले आहेत. तक्षशिला-नालंदा ही विद्यापीठे जाळली गेली, तरीही ती विश्वशांती घुमट च्या माध्यमातून पुनःस्थापित होऊन मानवतेला शांततेचा संदेश देत आहेत.”
राहुल कराड म्हणाले, ” या विश्वशांती घुमट परिसरात ५४ महामानवांचे पुतळे असून, त्यांनी मानवतावादाचा पाया रचला, तसेच समाजाला भविष्यवेधी विचार दिला. रस्ते वेगळे असले, तरी अंतिम उद्दिष्ट एकच आहे आणि ज्ञानाचा उपयोग हा मानवाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.”
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

आरक्षण मर्यादा 50% वरून 75% वर न्या:केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा, शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट

महिला अत्याचारांतील वाढ चिंताजनक-आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा
मुंबई -राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाचे आरक्षणावरुन वाद सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावरुन मोठे वक्तव्य केले आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या, असे शरद पवार म्हणाले. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली यावेळी आरक्षणासह विविध विषयांवर भाष्य केले. आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, आरक्षण मिळावे ही लोकांची भावना आहे, त्यात काही चुकीचे नाही. मात्र आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणासोबतच इतर जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे, अशी भूमिका शरद पवारांनी यावेळी मांडली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांवर जाता येत नाही. 50 टक्क्यांच्यावर आरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी संसदेत कायदेशीर दुरूस्ती करावी लागते. त्यात दुरूस्ती करायला काय हरकत आहे. आता 50 टक्क्यांवरील 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या. आता 50 टक्के आहे, 75 टक्के होण्यासाठी 25 ने वाढवावे लागेल. ज्याला आरक्षण मिळाले नाही, त्यांचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येईल. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. संसदेत विधेयक आणावे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे शरद पवार म्हणाले.

सरकारने लाडकी लेक योजना आणली आहे, त्याचे स्वागत आहे. पण तेवढ्यावर भागत नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारने पावले उचलले पाहिजे, महिला अत्याचारांतील वाढ चिंताजनक आहे.. लाडकी लेकसाठी हजारो कोटींची तरतूद करत असताना सरकारच्या अन्य योजना थंडावल्या आहेत, असेही शरद पवार म्हणाले.शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. देशाचा गृहमंत्री भाषणामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे सांगतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 18 ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यापैकी 14 जागांवर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी यावेळी देखील जास्त सभा घ्याव्यात, असा टोला शरद पवारांनी लगावला.ज्यांना एकही जागा निवडणूक आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलत असतात. केवळ प्रसिद्धीसाठी माझ्यावर बोलत असतात, अशी टीका शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणजे नेमकं काय?

भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे त्या भाषेचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, आणि साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा दर्जा मान्य करणे होय. भारत सरकारने काही भाषा अभिजात भाषांच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत, आणि त्याला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त होते.

अभिजात भाषेची व्याख्या

भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. सर्वप्रथम, ती भाषा अत्यंत प्राचीन असावी आणि तिचे ऐतिहासिक महत्व असावे. ती भाषा इतर भाषांच्या विकासात योगदान दिलेली असावी. तसेच, त्या भाषेतील साहित्यिक संपदा अत्यंत वैविध्यपूर्ण असावी, आणि ते साहित्य किमान १५०० ते २००० वर्षांपूर्वीचे असावे.

त्याशिवाय, ती भाषा सध्याच्या बोलीभाषांपासून वेगळी असावी, म्हणजेच ती आजच्या लोकांच्या दैनंदिन वापरात नसली, तरीही तिचे सांस्कृतिक महत्त्व अबाधित असेल. यामुळे भाषेला एक ऐतिहासिक ठेवा मानले जाते, जो काळाच्या ओघातही जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते.

अभिजात भाषांना मिळणारे फायदे

एकदा एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर त्या भाषेसाठी अनेक फायदे मिळतात. त्या भाषेच्या संशोधनासाठी विशेष निधी उपलब्ध होतो, आणि भाषाशास्त्रज्ञ व साहित्यिक त्या भाषेवर विस्तृत संशोधन करू शकतात. त्या भाषेतील साहित्य, लेखन, आणि इतर दस्तऐवजांचे अनुवाद, प्रकाशन, आणि पुनर्प्रकाशन करणे शक्य होते.

त्याचबरोबर, विद्यापीठे आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष विभाग स्थापन करता येतात. यामुळे भाषेच्या अध्ययन आणि संशोधनाला नवीन दिशा मिळते, आणि ती भाषा पुढच्या पिढ्यांसाठी जतन होते.

भारतातील अभिजात भाषा

भारतात सध्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यात तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलगू (२००८), मल्याळम (२०१३), आणि ओडिया (२०१४) या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाचे संवर्धन होण्यास मोठे योगदान मिळाले आहे.

भाषेच्या अभिजाततेचा सामाजिक प्रभाव

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे ती भाषा समाजाच्या दृष्टिकोनातून विशेष मानली जाते. त्यातील साहित्य आणि लेखन अनेकांच्या जीवनाचा भाग बनतो, आणि त्यातून विचारांचा प्रवाह देखील विकसित होतो. भाषा फक्त संवादाचे माध्यम नसते, तर ती संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असते. जेव्हा भाषेला अभिजात दर्जा मिळतो, तेव्हा त्या भाषेतून जन्मलेली संस्कृती, तिचे तत्त्वज्ञान आणि विचार अधिक ठळकपणे समाजासमोर येतात.

अशा प्रकारे, भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे त्या भाषेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक मूल्याचे मान्यकरण होय. त्यामुळे ती भाषा जतन होते, तिचा अभ्यास वाढतो आणि तिच्या वारशाचे संवर्धन होण्यासाठी सरकारकडून आणि समाजाकडून प्रयत्न केले जातात.

आपल्या मराठी भाषेला आज हा मान मिळतोय.. आज आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

नवी दिल्ली, दि. ३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांच्यासह मोलाचे सहकार्य करणाऱ्या तसेच मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.