Home Blog Page 667

क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावनेची निर्मिती

सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांचे प्रतिपादन

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे बारामतीमध्ये थाटात उद्घाटन

बारामतीदि. ५ फेब्रुवारी २०२५: ‘वीज क्षेत्रासारख्या अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी सांघिकता अत्यंत महत्वाची आहे. दरवर्षीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व तेच अभिप्रेत आहे’ असे प्रतिपादन महावितरणच्या कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे यांनी केले.

बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलात बुधवारी (दि. ५) राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून श्री. जगदाळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार, ज्ञानेश कुलकर्णी, सुनील काकडे, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, ज्ञानदेव पडळकर, धर्मराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) श्री. भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, आयएसएमटी कंपनीचे किशोर भापकर, विद्या प्रतिष्ठानचे श्री. डी. एस. पवार, सहमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. ललीत गायकवाड यांची उपस्थिती होती.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११५० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी बारामती परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी लोककला नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी महावितरणमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतिक वाईकर, अमित जाधव, गुलाबसिंग वसावे, अमोल गवळी, दत्तात्रेय ठाकूर, नीलेश बनकर आदींचा गौरव करण्यात आला. तसेच बारामती परिमंडलातील पाच दिव्यांग कर्मचाऱ्यांना दूचाकी वाहन वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मृदूला शिवदे, श्री. रोहित राख, श्री. सुशांत कांबळे यांनी केले. या क्रीडा स्पर्धेत २२ क्रीडा प्रकारातील सामने रंगणार असून येत्या शनिवारी (दि. ८) समारोप होणार आहे.

१०० मीटर धावस्पर्धेत मसाणे, अंबादे प्रथम – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. तर गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांना रौप्यपदक मिळाले. महिला गटात श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) यांनी सुवर्णपदक पटकावले तर मेघा झुणघरे (कल्याण-रत्नागिरी) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा..

उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे “मुंबई ग्रंथोत्सव २०२४” मध्ये आवाहन..

मुंबई दिनांक-५ फेब्रुवारी…
मराठी साहित्य अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींचे उमेद,धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या,वाचन संस्कृती वाढवा असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथालय,दादर यांच्या वतीने मुंबई ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.५ आणि ६ फेब्रुवारी अश्या दोन दिवस सुरू राहणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई मराठी ग्रंथालय,दादर यांनी ग्रंथालयीन अभ्यासिका सुरू केली,जतन केली याबद्दल आभार व कौतुक करते.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नवीन लेखक लिखाण करत आहेत अनेक अनुभव लिहले जात आहेत याचा समाजाला नक्की फायदा होणार आहे.राज्य सरकार बालक व महिला साहित्य संमेलन घेणार आहेत यामुळे वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होईल अश्या डॉ.नीलम गो-हे म्हणाल्यात.
कुटुंबामध्ये लोकशाही नाही अशी मी मानते, लोकशाही असती तर ऑनर किलींगसारख्या घटना घडल्या नसत्या.समाजात वर्ण,रंग,लिंगभेद दुजाभाव वाढत चालल्याची खंत नीलम गो-हे यांनी यावेळी व्यक्त केली.सध्याच्या सोशल मीडियाच्या जमाना आहे काही वेबसाईटमुळे बुद्धीगहाण टाकण्यापर्यंत,आत्महत्त्येपर्यंत लोकांची मानसिकता तयार होत आहे.अश्यात सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे असे उपसभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या.
मुंबई मराठी ग्रंथालय,दादर प्रामाणिकपणे ग्रंथालय,वाचनालय चालवत आहेत.पुस्तक आदानप्रदान झाल्याने ३५ हजार पुस्तके ग्रंथालयात आली तीच पुन्हा घरोघरी गेली हा चांगला उपक्रम आहे.पुस्तक वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकार बाळ साहित्य संमेलन,युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन सुरू करणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.मराठी भाषेविरोधातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी सरकारने तयारी केल्याचेही मंत्री उदय सामंत म्हणाले.
“मुंबई ग्रंथोत्सव २०२४”च्या कार्यक्रमासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे, सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, ग्रंथालय संग्रहालय महाराष्ट्र राज्य प्रभारी अशोक गाडेकर, प्रमुख कार्यवाहक रवींद्र गावडे, किरण ढंढोरे, ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर उपस्थित होत्या.यावेळी ग्रंथ दिंडीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 5: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे कसे वळविता येईल यादृष्टीनेदेखील प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

कृषी विभागाने आपले नियमित काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण बाबी करण्यावर भर द्यावा, असे सांगून ते म्हणाले, पुणे व मुंबई यातील जवळचे अंतर, मोठी बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी जवळची सुविधा असेलले मुंबई शहर या जिल्ह्यासाठी जमेच्या बाजू आहेत. जिल्ह्यात फलोत्पादन आणि फूल शेतीच्या वाढीला मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात सध्या लागवड होत असलेली वैशिष्ट्यपूर्ण फळपिके, फूल शेती तसेच अन्य कृषीमाल व त्यांचे शेतकरी व लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. एकच वैशिष्ट्यपूर्ण पीक अधिक प्रमाणात उत्पादित करणारे गाव किंवा गावांचा समूह निवडून या पिकाचे क्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. त्या गावाची प्रसिद्धी त्या पिकांच्या नावाने कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत.

सध्या अस्तित्वात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गटांमध्ये अधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे. त्यांच्या माध्यमातून उत्पादित करण्यात येणाऱ्या कृषीमालाची प्रचार प्रसिद्धी (ब्रँडिंग), प्रक्रियेसाठी यंत्रसामुग्री तसेच बाजारपेठेशी जोडणी करुन देण्याच्यादृष्टीने जिल्हा नियोजन समितीतून निधीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा.

केंद्र शासनाचे नैसर्गिक शेती अभियान, राष्ट्रीय फळबाग अभियान, ठिबक सिंचन व अन्य सूक्ष्म सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी योजनांचे एकत्रिकरण करून वैशिष्ट्यपूर्ण पिकांच्या लागवडीला चालना देता येऊ शकते.

यावेळी श्री. काचोळे यांनी जिल्ह्यात महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन खरेदीसाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्याची मागणी केली. त्यावर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस, पुरंदर तालुक्यातील अंजीर व सिताफळ, इंदापूर तालुक्यातील द्राक्षे, केळी, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील नाचणी, बारामती तालुक्यातील कोरडवाहू भागात सूर्यफूल, करडई, साबळेवाडी, म्हसोबावाडी परिसरातील रेशीम उत्पादन, मावळ व आंबेगाव तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ, मावळ तालुक्यातील फूलशेती, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील भाजीपाला उत्पादन आदींच्या अनुषंगाने संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींकडून करण्यात येत असलेल्या नाविण्यपूर्ण कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली.

कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन

मुंबई, दि. ५ – कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकससाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.

पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

कलाकारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्यच – संदीप खर्डेकर.

समर्थ युवा प्रतिष्ठान,ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कलाकारांची मोफत आरोग्य तपासणी- योगेश सुपेकर.

पुणे-कलाकारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्यच असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच कलावंतांच्या थकीत निवृत्तीवेतनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून लवकरच ज्येष्ठ कलावंतांना थकीत निवृत्तीवेतन मिळवून देऊ असेही संदीप खर्डेकर म्हणाले.कलावंत हे चित्रपट, नाटक, सिरीयल च्या माध्यमातून समाजात मनोरंजनाचे महत्कार्य करत असतात व आपल्या जीवनात आनंद फुलवत असतात, मात्र उतारवयात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावेळी त्यांच्याप्रतीचे ऋण हे कर्तव्य म्हणून आपण फेडले पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.
ना. चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा प्रतिष्ठान च्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून कलावंतांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, समर्थ युवा प्रतिष्ठान चे सुनील पांडे,ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर,कार्याध्यक्ष अविनाश खेडकर, उपाध्यक्ष गणेश गायकवाड,सचिव गणेश मोरे,खजिनदार रशीद शेख,उपसचिव अश्विनी कुरपे,उपखजिनदार मनोज माझीरे,संचालक सोमनाथ फाटके,राजरत्न पवार, आमिर शेख,प्रमुख सल्लागार संदीप पाटील, जितेंद्र भुरूक,विशेष सल्लागार अभय गोखले इ पदाधिकारी उपस्थित होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील सातत्याने ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ला मदत करत असून त्यांनी समूत्कर्ष च्या माध्यमातून ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या सभासद असलेल्या कलावंतांना दरमहा निम्म्या दरात किराणा सामान उपलब्ध करून दिला याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत असे फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर म्हणाले. आज मा. चंद्रकांतदादांनी आमच्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून जे नातं जोडलंय त्यामुळे आम्ही सर्व कलाकार कृतज्ञ असल्याचेही सुपेकर यांनी सांगितले.
ह्या शिबिरात रक्त तपासणी,तोंडाचा कर्करोग,स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, कोलेस्ट्रॉल, डोळे, दात, रक्तातील घटक तपासणी अश्या विविध तपासण्यांचा समावेश असून ह्या सर्व तपासण्यांसाठी साधारणत: 13500 रुपये खर्च येतो असे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि समर्थ युवा प्रतिष्ठान चे सुनील पांडे यांनी सांगितले.
ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ने केवळ पडद्यावरील कलाकारच नव्हे तर बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सिने नाट्य उद्योगाशी संबंधित सर्व घटकांच्या एकत्रीकरणावर आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला असल्याचे योगेश सुपेकर, रशीद शेख,गणेश मोरे,गणेश गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.कलाकारांनी ह्या शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला आहे.

KBC ज्युनियरमध्ये प्रनुशा थामके झळकली – अमिताभ बच्चनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या

या आठवड्यात, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय ज्ञान-आधारित गेम शोमध्ये KBC ज्युनियर्स म्हणून 8 ते 15 वर्षे या वयोगटातील हुशार मुले स्पर्धक म्हणून येणार आहेत. ही मुले आपली हुशारी दाखवतील आणि थरारक आव्हानेही पेलताना दिसतील. या सगळ्या डोकेबाज मुलांमध्ये प्रनुशा थामके ही विदर्भातून आलेली सहावीत शिकणारी एक बेधडक आणि प्रसन्न मुलगी देखील आहे. होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी तिने खूप गप्पा मारल्या. आपल्या माता-पिता आणि बहिणीसह या कार्यक्रमात आलेली प्रनुशा अत्यंत निर्धाराने हॉटसीटवर विराजमान झाली.
गेम हळूहळू रंगत असताना या छोट्या मुलीने श्री. बच्चन यांच्याशी एक हलका फुलका क्षण शेअर केला. स्वतःची ओळख तिने ‘सुपरपॉवर बाथरूम सिंगर’ अशी करून दिली. आपल्या शैलीत तिच्याशी बोलताना श्री. बच्चन म्हणाले, “या जगात असे कुणीच नसेल, जो बाथरूम सिंगर नसेल.” यातून गप्पांना एक रोचक वळण मिळाले. त्यावेळी बिग बींनी त्यांच्या परिचयाच्या एका गायकाचा किस्सा सांगितला. “एक गायक आहे, जो गावात राहतो. त्याला गायला खूप आवडायचे. तो ट्रॅक्टर चालवायचा आणि त्याच्या सुरात सूर मिळवून गात राहायचा.”
आठवणींच्या ओघात श्री. बच्चन यांनी लहानपणीचा एक धाडसी किस्साही सांगितला. ते म्हणाले, “गार हवेसाठी आम्ही आमच्या टेबल फॅनच्या पुढ्यात बर्फाचे तुकडे ठेवायचो. काही वर्षांनी आमच्या घरी फ्रिज आला. तो उघडला तेव्हा आमच्या लक्षात आले की तो आतून गार गार आहे. आम्ही त्यावेळी लहान होतो आणि एके दिवशी आम्ही फ्रिजमध्ये अडकलो आणि फ्रिजचे दार लॉक होऊन गेले.” त्यानंतर त्यांनी हसत हसत सांगितले की, “आम्ही आरडाओरडा केला, तेव्हा कोणी तरी येऊन आम्हाला बाहेर काढले. गरमीतून वाचण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार असायचो.” जाता जाता त्यांनी प्रनुशाच्या छोट्या बहिणीला ‘तू असे करू नकोस’ असा खेळकर सल्लाही दिला. जे ऐकून प्रेक्षक खूप हसले. त्या चुणचुणीत मुलीनेही तत्काळ उत्तर दिले, “आमच्या फ्रिजचा अजून तसा वापर झालेला नाही.”
या भागात जिव्हाळा, हास्य आणि किश्श्यांची जी देवाणघेवाण झाली, त्यामुळे हा भाग नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

बालाजीनगरमध्ये पवार हॉस्पिटलमागे पिस्टल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला पकडले

पुणे-बालाजीनगरमध्ये पवार हॉस्पिटलमागे पिस्टल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले, त्याच्याकडून पिस्टल व तीन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे ,रा. विजयश्री अपार्टमेंट ए/२ विंग चौथा मजला फ्लॅट नं. १९ पवार हॉस्पीटलमागे बालाजीनगर असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’दि.०३/०२/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशान्वये स.नगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयांना प्रतिबंध घालणेचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत बालाजीनगर येथील तुळजाभवानी मंदीराजवळ आले असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम पवार हॉस्पीटल पाठीमागील बजरंग दल चौकाजवळील अर्धवट बांधकाम चालु असलेल्या बिल्डींगचे बाहेरील रोडवर बालाजीनगर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबला असुन त्याचे कंबरेला पिस्टल सारखे हत्यार लावलेले दिसत आहे.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी तपास पथकाचे सपोनि सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
त्यानुसार लागलीच सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपी नामे ऋतीक संजय ननावरे वय २४ वर्षे धंदा काही नाही रा. विजयश्री अपार्टमेंट ए/२ विंग चौथा मजला फ्लॅट नं. १९ पवार हॉस्पीटलमागे बालाजीनगर पुणे यास ताब्यात घेवुन त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे पँन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदरचे ६३,०००/-रु कि.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस पंचासमक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८/२०२५ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलीक, अमोल पवार किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत, खंडु शिंदे यांनी केली आहे.

राहुल सोलापूरकर नाक घासून माफी मागा अन्यथा कडेलोट करू – शिवसेना आक्रमक….

पुणे- मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखती मधे बोलताना महाराजांची बदनामी करणारे व महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती व शौर्य कमी करणारे वक्तव्य केले होते, त्याविरोधात शिवसेना पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारक, कोथरूड गावठाण येथे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले, त्याला पायदळी तुडवला. त्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच आंदोलन स्थळावरून सर्व शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने मोर्चा वळविला आणि त्याच्या घरापर्यंत शिरून त्याच तोंड रंगवण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिस प्रशासनाने ताकदीने अडविल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच्या घराखालीच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सदर प्रकरणात अभिनेता राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सरकार त्याला पोलीस संरक्षण का देत आहे ? तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख न करता त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली. तरच माफी मिळेल अन्यथा शिवसेना पुन्हा तीव्र आंदोलन करून त्याचा कडेलोट करणार असल्याचे सांगितले. आंदोलनामधे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, मा नगरसेवक योगेश मोकाटे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहरसंघटक राजेंद्र शिंदे , संतोष गोपाळ, विलास सोनवणे, पराग थोरात, दिलीप पोमन, नितीन पवार, शिव आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, महिला सहसंपर्क संघटीका कल्पना थोरवे, छायाताई भोसले, जोती चांदेरे, करुणा घाडगे, सुनिता खंडाळकर, सोनाली जुनवणे, प्रज्ञा लोणकर, भारती भोपळे, युवासेनेचे परेश खांडके, गणेश काकडे, सोहम जाधव, वैभव दिघे, नीरज नभी, चिंतामण मुंगी, मयूर कोंडे, वैभव कदम, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे, संतोष तोंडे, भरत सुतार, हेमंत यादव, चंदन साळुंके, दिलीप व्यवहारे, अजय परदेशी, नंदू येवले, पुरुषोत्तम विटेकर, संतोष भुतकर, प्रसाद काकडे, अमित जगताप, मकरंद पेठकर, अनिल माझिरे, जगदीश दिघे, शिवाजी गाढवे, गिरीश गायकवाड, दिलीप जानवरकर, नागेश गायकवाड, संजय कोंडके, श्रीपाद चिकणे, प्रकाश चौरे, संजय साळवी, नितीन रावळेकर, बकुळ डाखवे, आकाश बालवडकर, नागेश खडके, ओंकार मारणे, राहुल शेडगे, संजय कोंडके, गणेश पोकळे, प्रणव आडकर इतर शिवसैनिक , शिवप्रेमी उपस्थित होते.

पत्नीने कळवीले,पतीचे झाले अपहरण अन १२ तासाच्या आत अपहृतची सुटका करत ३ आरोपीना केले जेरबंद

पुणे-पत्नीने पोलीस कंट्रोल रूमला कळवीले,घरात येऊन काहींनी पतीचे केले अपहरण अन १२ तासाच्या आत अपहृतची सुटका करत पुणे पोलिसांनी ३ आरोपीना जेरबंद केले आहे.१) अभिजीत दत्तात्रय भोसले वय २२ वर्ष रा. वाघमारे वरती वाघोली पुणे २) रणजीत रमेश डिकोळे वय २१ वर्ष रा. लाडोवा वस्ती, वाडेबोल्हाई रोड, केसनंद पुणे. ३) मारूती अशोक गायकवाड वय २३ वर्ष रा वाडेगाव, बोलाई माता मंदिर केसनंद पुणे असे पोलिसांनी पकडलेल्या ३ आरोपींची नावे असून चौथा फरार झाला आहे. फिर्यादी यांचा मुलगा आणि एका मुलीच्या प्रेम प्रकरणातून हे प्रकरण घडले असल्याचे वाटत असताना आता याबाबतचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’फिर्यादी यांनी नियंत्रण कक्ष पुणे येथे कॉल करून कळवीले की, त्यांचे पती यांचे काही लोकांनी अपहरण केले असून मदत पाहीजे, नमुद कॉलच्या ठिकाणी हडपसर मार्शल ही गेली असता दिलेल्या कॉलप्रमाणे प्रकार मिळून आला परंतु संशयीत हे निघून गेले होते. प्राप्त झालेल्या कॉलच्या ठिकाणी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, डॉ. राजकुमार शिवे, व इतर अधिकारी यांनी भेट देवुन माहिती घेतली.
फिर्यादी यांचे मुलाचे काही दिवसापुर्वी वाघोली येथील मुलीशी प्रेमसंबध होते. सदर प्रेम संबधांना मुलीच्या कुटूंबियांचा विरोध होता. दिनांक ०३/०२/२०२५ रोजी नमुद मुलगी ही मिळून येत नसल्याने तिचे घरातील नातेवाईक हे फिर्यादी यांच्या घरी दुपारच्या सुमारास येवून त्यांच्यात वादविवाद झाले होते. व त्यानंतर ते निघून गेले होते. परत फिर्यादी हे घरी असताना मुलीचा भाऊ व इत्तर ३ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे पतीला जबरदस्तीने घराचे बाहेरून ओढून त्यांनी आणलेल्या दोन दुचाकी गाडीवर जबरीने बसवून घेवून गेल्याची हकीगत सांगितली. त्याप्रमाणे हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १६५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४० (३),३५२,३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे व महेश कवळे यांची दोन पथके तयार केली. तपासपथक अधिकारी सपोनिरी अर्जुन कुदळे, परि पोउपनिरी. राघवेंद्र सलगर, व स्टाफ यांचे पथक वाघोली भागात रवाना झाले होते. आरोपी वाघोली, केसनंद, वाडे बोल्हाई परिसरात फिरत असल्याची माहीती बातमीदारांकडून मिळाली. परंतु आरोपी हे वारंवार त्याचा ठावठिकाणा बदलत होते. त्यानंतर सदर आरोपी हे बार्शी, सोलापूर या ठिकाणी जात असलेबाबत माहीती प्राप्त झाल्याने सपोनिरी अर्जुन कुदळे व वरिल तपास पथकाने आरोपीतांचा पाठलाग करून, पाटस टोलनाका याठिकाणी आरोपींना ताब्यात घेवून अपहृत इसमाची सुखरूप सुटका केली. अनोळखी आरोपींची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अभिजीत दत्तात्रय भोसले वय २२ वर्ष रा. वाघमारे वरती वाघोली पुणे २) रणजीत रमेश डिकोळे वय २१ वर्ष रा. लाडोवा वस्ती, वाडेबोल्हाई रोड, केसनंद पुणे. ३) मारूती अशोक गायकवाड वय २३ वर्ष रा वाडेगाव, बोलाई माता मंदिर केसनंद पुणे व त्यांचा पळून गेलेला एक साथीदार यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास महिला सपोनिरी हसीना शिकलगर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, परि पोउपनिरी. राघवेंद्र सलगर, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अजित मदने, कुंडलीक केसकर, प्रशात दुधाळ, निखील पवार, अमोल जाधव यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

बिबवेवाडीत मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ: 60 वाहनांची तोडफोड

पुणे – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात अप्पर इंदिरानगर परिसरात एका गुंडांच्या टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नागरिकांच्या कार, टेम्पाे, दुचाकी अशा 50 ते 60 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकाराने नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला असून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन आराेपींना अटक करण्यात आली आहे.

अंडी ऊर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे व गणराज सुनील ठाकर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदर आराेपींनी गुन्हयात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली असून त्यांच्या विराेधात कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर भागात बुधवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग करुन लावण्यात आलेल्या दुचाकी,कार, टेम्पो, रिक्षांची लाकडी दांडक्याने तुफान तोडफोड करत शिवीगाळ करुन टाेळक्याने दहशत पसरवली.वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर टोळके घटनास्थळावरुन दुचाकीवर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच, बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरु केला.तीन आराेपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आराेपींचे अन्य साथीदार यांचा देखील शाेध घेण्यात येत आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुबईहून सोन्याची स्मगलिंग: मुंबई विमानतळावर सव्वादोन कोटीचे सोने पकडले

मुंबई-

मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III च्या अधिकाऱ्यांनी, 03-04 फेब्रुवारी 2025 च्या रात्री,  2.21 कोटी रुपये किमतीचे 2.830 किलो वजनाचे सोने जप्त केले. या प्रकरणी 04 जणांना अटक करण्यात आले आहे.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुबईहून मुंबईला येणारे 03 प्रवासी आणि याच विमानतळाच्या डिपार्चर हॉल येथे काम करणाऱ्या एका खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याला रोखले आणि त्यांच्याकडून वॅक्स मध्ये मिसळलेली 24 कॅरेट शुद्धतेची गोल्ड डस्ट जप्त केली. या सोन्याचे एकूण वजन 2.966 किलो तर निव्वळ वजन 2.830  किलो आहे  आणि त्याचे अंदाजे मूल्य 2.21 कोटी रुपये आहे.

या प्रवाशांनी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये हे सोने लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हे सोने नंतर दुकानात लटकवलेल्या ब्रँडेड ज्यूट बॅगमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर, तीच बॅग त्या दुकानात काम करणाऱ्या खाजगी विमानतळ कर्मचाऱ्यांनी उचलली होती.सीमाशुल्क कायदा,1962 अंतर्गत 04 जणांना अटक करण्यात आली.

संगमावर स्नान हा दिव्य संयोगाचा क्षण: पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. 

एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे:

“प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कोट्यवधी जनांप्रमाणे मी सुद्धा येथील दिव्यत्वाच्या अनुभूतीने भारून गेलो आहे.

शांती, शहाणीव, उत्तम आरोग्य आणि सुसंवाद यांचा  आपणा सर्वांना माता गंगेचा आशीर्वाद लाभो.”

प्रयागराज महा कुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा अर्चा करण्याचे  परम भाग्य लाभले. माता गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने अतिशय शांत वाटते आहे. संपूर्ण देशाला सुख शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा अशी कामना मां गंगेकडे केली. हर – हर गंगे

प्रयागराज मधल्या दिव्य भव्य महा कुंभामध्ये श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम प्रत्येकाला भारावून टाकत आहे. पावन पूर्ण कुंभातील स्नानाची काही क्षणचित्रे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी प्रयागराजला पोहोचले. महाकुंभमेळ्यादरम्यान त्यांनी संगमात स्नान केले. भगव्या रंगाचे कपडे परिधान करून, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून त्यांनी सूर्याची प्रार्थना केली आणि सुमारे 5 मिनिटे मंत्रांचा जप करत राहिले.संगम नाक्यावर गंगा पूजेदरम्यान पंतप्रधानांनी माता गंगेला दूध आणि साडी अर्पण केली. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीचा प्रवासही केला. मोदींचा महाकुंभ दौरा सुमारे 2 तास चालला.

पाकीट अन मोबाईल चोरून रात्रीत २६ लाख लांबविले

पुणे-रात्री सवा बारा ते सकाळी साडेआठ च्या दरम्यान झोपलेल्या ३६ वर्षीय युवकाचे पाकीट आणि मोबाईल चोरून भामट्याने तब्बल २६ लाख ३५ हजार रुपये लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विमानतळ पोलीसांनी अज्ञात चोर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील फिर्यादी प्रोसिडा हॉटेल , संजय पार्क येथे झोपले असताना अज्ञात चोरट्याने हि चोरी करून रात्रीतून क्रेडीट कार्ड ,आणि मोबाईलचा वापर करून विविध बँकेतून २६ लाख ३५ हजार काढून पोबारा केला. फौजदार हर्शल घागरे अधिक तपास करत आहेत.

‘देवेंद्र हे बाहुबली’ असा उल्लेख केला अन आ.धस म्हणाले,’ ,मेरे पास देवेंद्र है…

‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है’….देवेंद्र फडणवीस यांनी मला भरपूर काही दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम राहील, असेही सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी यावेळी ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील डायलॉगचा दाखला दिला. लोक विचारतात ‘तेरे पास क्या है’. मात्र ‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है’, असे ते म्हणाले. यावेळी आपल्या आईची आठवण काढताना सुरेश धस हे भाऊक देखील झाले होते.


बीड- जिल्ह्यातील आष्टी येथे उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बहुप्रतिक्षित खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन, तसेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) येथील समाधी मंदिराचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला. आम्हाला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा आहे, असे सुरेश धस म्हणाले.

सुरेश धस म्हणाले, आष्टी तालुक्यातील या योजनेला विरोध करण्यात आला होता. आता आष्टी सिंचन योजनेचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ होत आहे. मात्र ही योजना सुरू होत असताना येथील नागरिकांनी मला दगड मारले. अनेकांना हा प्रकल्प नको होता. मात्र, मी ठाम राहिलो आणि त्यासाठी नागरिकांचे मने वळवली. या योजनेसाठी रामदास कदम, प्रवीण दरेकर, प्रीतम मुंडे आणि नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी आम्हाला मदत केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना सुरेश धस यांनी अध्यक्ष महोदय असा उल्लेख केला. मात्र यावर एकच हशा पिकला. कधी कधी आम्हाला सभागृहातच बोलत असल्याचे वाटते, असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवींचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख केला. सुरेश धस म्हणाले, 2014 मध्ये मी पडल्यानंतर 2024 पर्यंत खुंटेफळ साठवण तलावाचे केवळ 2 टक्के काम झाले. मी निवडून आल्यानंतर आतापर्यंत 23 टक्के काम झाले. देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या पंपींग मशिनरीची एका दिवसात परवानगी दिली. त्यामुळेच हे काम शक्य होऊ शकले.

23.66 पैकी केवळ 7 टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले आहेत. त्यातील 1.68 टीएमसी आम्हाला आले. 7 टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवले आहे. ते 7 टीएमसी आणि आणखी 9.66 टीएमसी पाणी दिले, तर बीड जिल्हा, बीडमधील आष्टी तालुका आणि धाराशीवमधील 5 तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. ही आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे, असे सुरेश धस म्हणाले. आम्हाला इतर कुणाकडूनही अपेक्षा नाही. इतरांकडून मिळणारही नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात.

फडणवीस माझ्या पाठीमागे दत्त बनून उभे माझे भाग्य आहे, परमभाग्य आहे 1999 ते 2004 या कालावधील साहेबांच्यासोबत बसण्याची संधी मला मिळाली, त्यांच्या मागे-पुढे मी असायचो. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राजकीय कटकारस्थान करुन त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण, आपण माझ्या पाठीमागे दत्त बनून उभे राहिलात, असेही धस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री आणि सभागृहात माझे नाव घेऊन या योजनेसाठी 300 कोटी रुपये दिले असल्याची माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. प्रशांत बंब यांची योजना एका झटक्यात मंजूर केली. ते तुमचे लाडके आहेत, तसा मी देखील लाडका आहे. मला जायकवाडीतून 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी यावेळी केली.

सध्या बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असे काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील निवडून दिले, बबनराव ढाकणे दिले, प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचाचा माणूस दिला. गोपीनाथराव मुंडे एवढा पहाडासारखा माणूस दिला, आज ज्या जमिनीवर ह्या कामाचा शुभारंभ होतोय, प्रकल्प उभारतोय ती जमीन रक्षा विभागाकडे जाणार होती, पण जॉर्ज फर्नांडिस हे रक्षा मंत्री होते, मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली असे सुरेश धस यांनी सांगितले.

मी जिवंत असेल किंवा नसेल. मात्र या मतदारसंघात कायम भाजपचा आमदार निवडून येईल, असे देखील सुरेश धस ठामपणे म्हणाले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, ठराविक राजकारणांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे जिल्ह्याची बदनामी झाली होती. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या तुमच्या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे धस यांनी म्हटले आहे. राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी विनंती सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केली.

2019 मध्ये बहुमत येऊन सुद्धा मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजुने होता. पण पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थाने आखली गेली. परंतु, आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोडच नाही. बिनजोड पैलवान म्हणतात तो पैलवान आहात तुम्ही, असे सुरेश धस म्हणाले.

संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

पुणे-प्रसिद्ध शिवव्याख्याते ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजलेले नाही.शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा सुध्दा झाला होता. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरण या सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते.