मुंबई/कोल्हापूर -काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. आता ते उद्या या दौऱ्यावर पोहोचतील.काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. ते सायंकाळी 5.30 वा. कोल्हापुरात येतील असा अंदाज होता. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कोल्हापूर विमानतळावर तळ ठोकून होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच पटोले आणि वडेट्टीवार हे कोल्हापूर विमानतळावरून निघून गेले. आता राहुल गांधी उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 8.30 वा. आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यावर येतील अशी माहिती आहे.
राहुल गांधी आपल्या आजच्या कोल्हापूर दौऱ्यात कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार होते. तसेच संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार होते. या दौऱ्यातून ते आरक्षणाचे जनक असणाऱ्या शाहू महाराजांच्या भूमीतून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी तब्बल 14 वर्षांनंतर कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी मार्च 2009 मध्ये ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी कागलच्या शाहू साखर कारखान्यावर त्यांचा कार्यक्रम झाला होता. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या कोल्हापूर शहरातील निवासस्थानालाही त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर आता ते शाहू नगरीत येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कोल्हापुरात सध्या काँग्रेसचे 4, विधानपरिषदेचे 2, तर 13 खासदार आहे. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक बळ देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी कोल्हापूरच्या 2 दौऱ्यावर येणार असल्यामुळे येथील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह संचारला होता. पण ऐनवेळी राहुल यांचा 2 दिवसीय दौरा 1 दिवसांचा झाल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.