महिला अत्याचारांतील वाढ चिंताजनक-आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आमचा पाठिंबा
मुंबई -राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाचे आरक्षणावरुन वाद सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावरुन मोठे वक्तव्य केले आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या, असे शरद पवार म्हणाले. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली यावेळी आरक्षणासह विविध विषयांवर भाष्य केले. आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, आरक्षण मिळावे ही लोकांची भावना आहे, त्यात काही चुकीचे नाही. मात्र आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणासोबतच इतर जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे, अशी भूमिका शरद पवारांनी यावेळी मांडली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांवर जाता येत नाही. 50 टक्क्यांच्यावर आरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी संसदेत कायदेशीर दुरूस्ती करावी लागते. त्यात दुरूस्ती करायला काय हरकत आहे. आता 50 टक्क्यांवरील 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या. आता 50 टक्के आहे, 75 टक्के होण्यासाठी 25 ने वाढवावे लागेल. ज्याला आरक्षण मिळाले नाही, त्यांचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येईल. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. संसदेत विधेयक आणावे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे शरद पवार म्हणाले.
सरकारने लाडकी लेक योजना आणली आहे, त्याचे स्वागत आहे. पण तेवढ्यावर भागत नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारने पावले उचलले पाहिजे, महिला अत्याचारांतील वाढ चिंताजनक आहे.. लाडकी लेकसाठी हजारो कोटींची तरतूद करत असताना सरकारच्या अन्य योजना थंडावल्या आहेत, असेही शरद पवार म्हणाले.शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. देशाचा गृहमंत्री भाषणामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे सांगतात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 18 ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यापैकी 14 जागांवर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी यावेळी देखील जास्त सभा घ्याव्यात, असा टोला शरद पवारांनी लगावला.ज्यांना एकही जागा निवडणूक आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलत असतात. केवळ प्रसिद्धीसाठी माझ्यावर बोलत असतात, अशी टीका शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.