Home Blog Page 663

डीएसके गुंतवणूकदार भेटल्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,’ मी तुमच्या पाठीशी …

पुणे : डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यात ठेवी बुडलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) ने हिंदू महासंघाच्या पुढाकाराने  डीएसके गुंतवणूकदारांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट  घेतली.गुंतवणूकदारांचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी सरकार आणि पक्ष म्हणून देखील  गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहू ,असे आश्वासन दिले. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली ५०० गुंतवणूकदार उपस्थित होते. 

रविवारी  सकाळी 10.30 वाजता  आर सी एम कॉलेज येथील जनता भेटी च्या कार्यक्रमात हिंदू महासंघ आणि ठेवीदार यांनी मोहोळ यांची  भेट घेतली. ‘ आमचा विषय दिल्लीत मांडावा आणि केंद्रीय यंत्रणानी कशा पद्धतीने नियोजन पूर्वक आमचे पैसे बिल्डर च्या घशात घातले आहेत ते पाहून तोडगा काढावा’,अशी मागणी केली.येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र केले  जाईल यांची सुद्धा त्यांना कल्पना देण्यात आली. येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करत बिल्डर्स च्या घरात आंदोलने होणार आहे’,असेही आंदोलकांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,’गुंतवणूकदारांच्या भावना आम्ही समजू शकतो.या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले परत मिळाले पाहिजेत,हीच सर्वांची भावना आहे.सरकारी पातळीवर पावले उचलू.वरिष्ठ कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करून  करून पुढे जाऊ.गुंतवणूकदारांनी काळजी करू नये.त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तोडग्यासाठी प्रयत्न केले जातील’.

गांधीजी म्हणजे सहस्त्रकाचा आदर्शवाद: डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर

२१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘२१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर (दिल्ली)यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. स्वामिनी पारखे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. उमेश ठाकूर यांनी स्वागत केले. रोहन गायकवाड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. अन्वर राजन यांनी आभार मानले.

डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी, संजय आल्हाट, संदीप गव्हाणे, श्रीराम टेकाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर म्हणाले,’ पुण्यात विचार मंथन होते. म्हणून इथे यावेसे वाटते.गांधी एक व्यक्त नसून समाजाची आत्मा आहेत. बुद्ध, महावीर,विदुर, कबीर, गांधीजी हे सर्व मानवतेचे आत्मा आहेत. सर्व आत्मा हे परमात्मा बनू शकतात, तसे हे सर्व साधनेतून, विचारातून, कार्यातून परमात्मा झाले. ज्यांनी ज्यांनी मानवी समस्यांचा अभ्यास केला, त्यांच्याकडे आपल्याला वारंवार जावे लागते. त्यामुळे गांधीजींना संपविता येत नाही. गांधी समजून घेण्यासाठी त्यांनी ज्या समस्यांवर काम केले त्या समजून घेतल्या पाहिजे. गांधीजींवर टीका केली की मार्केट व्हॅल्यू वाढते कारण इतक्या परिपूर्ण व्यक्तीमधील काय कमतरता शोधून काढली, याची उत्सुकता तयार होते. गांधीजी हे नव्या सहस्त्रकाच्या आदर्शवादाच्या शोधात होते. हा आदर्शवाद त्यांनी नुसता मांडला नाही तर जगून दाखवला. संवादाने प्रश्न सुटतील हा मार्ग गांधीजींनी दाखवला आहे.

स्व – चिंतनाचा मार्ग आपण सोडता कामा नये. आपली विचार क्षमता दुसऱ्या शक्तीच्या ताब्यात देवून चालणार नाही. गांधीजी प्रमाणे सर्व भिंती, मर्यादा यांच्या पलीकडे जावून मानवतेसाठी कार्य करणारे ‘ गांधी जन ‘ हवे आहेत. मुक्ती मिळवून देणे हे धर्माचे काम आहे, मात्र वर्चस्ववाद करणे हे धर्माचे काम नाही.

वास्तव समजुन घेणे, त्यातील समस्यांवर उत्तरे शोधण्याची क्षमता प्रत्येकाकडे आहे, असे गांधीजी मानत. एकविसाव्या शतकात आपला निसर्गाशी संबंध तुटत चालला आहे. स्वार्थ, लालसा हे अर्थ व्यवस्थांच्या सर्व संकटांच्या मुळाशी आहे. हे गांधीजींनी आधीच सांगितले आहे. या शतकात मानवी विचार करण्याच्या क्षमता ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण सर्व विश्वस्त भावनेने वागले पाहिजे. फक्त भांडवलवाद जगाच्या समस्या सोडवू शकणार नाही.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ गांधीजी हे अंतिम सत्य सांगून गेलेत असे नाही, मात्र गांधीजींचे बोट सोडले तर पृथ्वी निर्जीव होण्याकडे लवकर जावू. त्यामुळे युद्धाने, द्वेषाने प्रश्न सुटणार नाही. हे गांधी विचार पुढे नेण्यात सर्वांचे हित आहे.’

दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.

खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव

गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्ये विविध चित्रपट जात आहेत.५ ऑक्टोबर रोजी ‘ कोर्ट ‘ हा चित्रपट दाखविण्यात आला. ६ ऑक्टोबर रोजी ‘द किड’ हा चित्रपट दाखविण्यात आला.दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.

पुनित बालन ग्रुप आयोजित ‘आपला पुणे मॅरेथॉन सीझन-4’ मध्ये होणार दहा हजार धावपटू सहभागी

२० ऑक्टोंबरला होणार स्पर्धा

पुणे : प्रतिनिधी
पुनित बालन ग्रुपकडून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘आपल पुणे मॅरेथॉन सीझन-४’ मॅरेथॉनसाठी तब्बल दहा हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. पुणेकरांनी दाखविलेल्या या उस्फूर्त प्रतिसादामुळे ‘आपल पुणे मॅरेथॉन’ ही शहरातील सर्वात प्रतिष्ठित धावण्याच्या स्पर्धांपैकी एक बनली आहे.
पुणे पोलिस, पिंपरी चिंचवड पोलिस, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमपीएमएल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेरॉथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील तरुणांनी तंदुरस्त रहावे आणि सकारात्मक जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. से नो टू ड्रग्स, येस टू रन’ हे मॅरेथॉनचे ब्रीदवाक्य आहे. खेळ आणि तंदुरुस्तीच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला चालना देणे आणि अंमली पदार्थ मुक्त जीवनाविषयी जागरुकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

  • असे असेल मेरॉथॉन स्पर्धेचे नियोजन
    श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत आपल पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, 21 किमी अर्ध मॅरेथॉन, 10 किमी रन आणि 5 किमी जॉय रन अशा अनेक श्रेणी आहेत. यामुळे अनुभवी खेळाडूंपासून ते नवीन धावपटूंपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी मिळेल.
    सहभागीं स्पर्धकांना शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे बिब वितरण आणि मॅरेथॉन एक्स्पोसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी प्रायोजकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.
    मॅरेथॉन मार्गावर नियमित अंतराने हायड्रेशन स्टेशन उभारले जाणार आहेत. त्याच बरोबर वैद्यकीय पथक नेहमी उपस्थित असेल. याशिवाय, उत्साही स्वयंसेवक सहभागींना मदत करतील. लाइव्ह म्युझिक आणि चीअर झोन शर्यत चालू ठेवतील आणि सहभागी फिनिशर सेल्फी स्टेशनवर संस्मरणीय फोटो घेऊ शकतात.
  • सामाजिक जबाबदारीसाठी विशेष शर्यत

लोहा फाऊंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 5 किलोमीटर सोशल रनचेही आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यासाठी जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. समाजसेवेचे महत्त्व आणि सामूहिक प्रयत्नांची शक्ती अधोरेखित करण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणणे हा या अनोख्या शर्यतीचा उद्देश आहे. या कार्यक्रमाद्वारे जमा होणारा निधी सामाजिक कल्याणासाठी निर्देशित केला जाईल, ज्यामुळे प्रत्येक सहभागी चांगल्या समाजासाठी योगदान देऊ शकेल.

  • आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा सत्कार

कार्यक्रमाचे मानद रेस डायरेक्टर आयपीएस कृष्ण प्रकाश आहेत. ते फिटनेस आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध आहेत. आयर्नमॅन ट्रायथलॉन आणि रेस ॲक्रॉस द वेस्ट पूर्ण करणारे ते पहिले भारतीय नागरी आहेत. त्याची उपस्थिती सहभागींना त्यांच्या मर्यादा ढकलण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्प्रेरित करेल.

  • 18 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे

ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) मान्यता दिल्याने आपल पुणे मॅरेथॉनची विश्वासार्हता वाढली आहे. या मॅरेथॉनमध्ये 18 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हे देशातील सर्वोत्तम धावपटूंना आकर्षित करेल आणि उच्चस्तरीय स्पर्धेसाठी वातावरण तयार करेल.

  • कॉम्रेड्स फिनिशर्सचा उत्सव

या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये 2024 कॉम्रेड्स मॅरेथॉनमधील 125 विजेत्यांना सन्मानित केले जाईल. हे धावपटू केवळ त्यांच्या विजयासाठीच नव्हे तर त्यांच्या समर्पणासाठीही प्रेरणास्त्रोत आहेत. याशिवाय, पुण्यातील धावण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या स्थानिक प्रभावकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

आपल पुणे मॅरेथॉन’ला प्रोत्साहन देणे म्हणजे केवळ धावण्याच्या स्पर्धेला प्रोत्साहन देणे नाही. हे एक निरोगी समाज निर्माण करण्याच्या दिशेने आणि पुण्यातील तरुणांना फिटनेसबद्दल उत्साही बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. पुणेकरांनी या स्पर्धेसाठी दाखविलेला प्रचंड प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणारा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकानां सर्वोत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप व मुख्य प्रायोजक.

बजरंग दलाकडून बारामतीत दांडियाचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न: मॉरल पोलिसिंग चालणार नाही, सुप्रिया सुळेंनी ठणकावले

पुणे-बजरंग दल या हिंदुत्त्ववादी संघटनेने दांडियाचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामतीत घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत अशा संघटनांची मॉरल पोलिसिंग खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, बारामती चिराग गार्डन येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली. तसेच अशी मॉरल पोलिसिंग खपवून घेणार नसल्याचाही इशारा दिला.

बारामती येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही. हे ‘मोरल पोलिसींग’ यापुर्वीही आम्ही खपवून घेतले नव्हते आणि यापुढेही घेणार नाही. अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटद्वारे केली.सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटनंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नवरात्रोत्सवात दांडिया व गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी नवरात्रीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी पोलिस ठाणे, गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायी गस्त घालण्याचेही आदेश दिलेत.

नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्याच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त तैनात करावा. विशेषतः आपापल्या हद्दीतील उद्याने, मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवरील गस्त वाढवावी. गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशी सूचना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा विद्यार्थ्यांनी एकत्र केला आनंदोत्सव

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व नूमवि प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने आनंदोत्सव साजरा
पुणे ः मराठी भाषा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि नूमवि प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा गौरव करण्यात आला. यावेळी तब्बल हजार मुलांनी एकत्र येत महाराष्ट्र गीत गात आनंदोत्सव साजरा केला. 

बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या नेतृत्वाखाली नूमवि शाळेतील तब्बल १००० विद्यार्थीं मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी एकत्रित “महाराष्ट्र गीत” सादर केले. यावेळी  शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नियामक मंडळाचे सदस्य सुधीर काळकर, शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, प्रबोधिनीचे अरुणकुमार बाभुळगावकर, अक्षदा इनामदार, मुकुंद कोंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया सोयाम आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेत मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले,  केंद्र सरकारने  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. याचे महत्व विद्यार्थ्यांनादेखील समजावे यासाठी विद्यार्थ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत आहोत, असे सांगत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व देखील त्यांना पटवून दिले. 

पराग ठाकूर म्हणाले, माझा मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजासी जिंके म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीतून आतां विश्वात्मके देवे म्हणून जगासाठी प्रार्थना करतात. ही महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची उंची आहे. त्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले. 

गदिमा स्मारकासाठी शासनाकडून निधी मिळणार!

स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पुणे-नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या गदिमांचे देखणे स्मारक व्हावे; ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आयुक्तांना दिले.यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, युवराज देशमुख, गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, भाजपा प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोथरूड मधील महात्मा सोसायटीजवळ गदिमांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाला गती मिळावी; यासाठी नामदार पाटील यांनी जानेवारी २०२३ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला होता. तसेच सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे स्मारकाच्या पुढील टप्प्याचेही काम मार्गी लागावे; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुन्हा स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला.

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे जगभरातील १५ कोटी मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्यांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आधुनिक वाल्मिकी महाकवी गदिमांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊन; देखणे स्मारक व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे महापालिकेने स्मारकाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास स्मारकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु,” अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली.

जगातील सर्वात मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प

शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई दि. ५ ऑक्टोबर २०२४:- शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.

मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.

कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून ते टप्प्या टप्प्याने सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यापैकी धोंदलगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), बामणी बुद्रक (जिल्हा नांदेड), हरोली (जिल्हा कोल्हापूर), जलालाबाद (जिल्हा अकोला), पलशी बुद्रुक (जिल्हा बुलढाणा) या एकूण १९ मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण आज झाले. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना मा. पंतप्रधानांच्या हस्ते २०.५५ कोटी रुपये विकासनिधी ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला.

याखेरीज ४८०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल. या योजनेत एकाच हेतूने राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून अशा विकेंद्रित स्वरुपातील हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. योजनेच्या अनुषंगाने राज्यात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीजनिर्मिती कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

राज्य सरकारने एप्रिल २०२३ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला मंजुरी दिल्यानंतर राज्याचा ऊर्जा विभाग आणि महावितरणने केवळ अकरा महिन्यात ४० हजार एकर सार्वजनिक जमीन उपलब्ध करणे, सौर ऊर्जा निर्मितीसाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण करणे, वीज खरेदीचे करार करणे, वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे आणि विकसकांना ९२०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीची लेटर ऑफ ॲवॉर्ड देणे ही कामे केली. विकसकांना आदेश दिल्यानंतर केवळ सहा महिन्यात त्यापैकी १९ मेगावॅट क्षमतेचे पाच प्रकल्प सुरू झाले. या प्रकल्पांचे लोकार्पण मा. पंतप्रधानांच्या हस्ते आज झाले.

शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी सध्या दिवसा व रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी त्यांची मागणी आहे. पीएम कुसुम अर्थात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. या योजनेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी दरवर्षी सव्वा लाख रुपये प्रती हेक्टर दराने जमीन भाड्याने देण्याचीही सुविधा शेतकऱ्यांसाठी आहे.

या योजनेमध्ये खासगी गुंतवणूकदारांकडून एकूण ६५ हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून ग्रामीण भागात ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. सध्याच्या साडे आठ रुपये प्रती युनिट दराच्या ऐवजी सरासरी ३ रुपये प्रती युनिट इतक्या किफायतशीर दराने वीज उपलब्ध होणार असल्याने वीज खरेदीमध्ये दरवर्षी १० हजार कोटी रुपयांची बचत होईल. परिणामी राज्य सरकारवरील वार्षिक ४५०० कोटी रुपये अनुदानाचा व उद्योगांवरील वार्षिक १३ हजार कोटी रुपयांचा क्रॉस सबसिडीचा बोजा दूर होईल. तसेच हरित ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होईल.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुणे –

 शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात संपन्न झालेल्या म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ४०० हून अधिक महिला यात सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेत तंबोला गायक आरती दीक्षित आणि आकाश सोळंकी यांनी बहरदार गीते सादर केली. आकर्षक नृत्येही सादर झाली. गाण्याच्या मुखड्याच्या ओळीतील शेवटच्या शब्दावर आधारित पुढचे गाणे असे या रंजकदार  खेळामध्ये महिलांनी मोठा आनंद लुटला. वेजेत्यांना टी.व्ही, ओव्हन, शेगडी, मिक्सर इत्यादी बक्षिसांचे वाटप पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते देण्यात आली.

शिवदर्शनचे श्री लक्ष्मीमाता मंदिर लक्षावधी दिव्यांचा ‘लक्ष्मीमहाल’ विशेष आकर्षण

पुणे-

पुण्यातील शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘लक्ष्मी महाल’ विशेष आकर्षण बनला आहे .हजारो भक्तांची येथे गर्दी उसळत असून श्री लक्ष्मीमाता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.  संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे.  मंदिरावर एल.ई .डी. लाईट्ससह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून साकारण्यात आलेला ‘लक्ष्मी महाल’ १०० हून अधिक कारागिरांनी सुमारे १ महिना  कष्टपूर्वक तयार केला आहे. नैसर्गिक विविध सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर करण्यात आली आहे. मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने सजवले गेले आहे.  या व्यतिरिक्त मंदिराच्या भोवतालच्या परिसराची स्वच्छताही करण्यात आली आहे.

मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरती रोज होत असून धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासांमुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार दि. ०३ ऑक्टोबर रोजी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.०५ वाजता विधिवत घटस्थापना येथे संपन्न झाली. श्री लक्ष्मीमातेला सोन्याच्या मुगुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजवण्यात आले आहे. 

येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती तसेच प्रसाद वाटप होत असून नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होत  आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे.  हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही चोख आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कार्यक्रम व स्पर्धा  होत आहेत.  अशी माहिती  पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली. 

उद्योगपती आणि राजकारण्यांची प्रसारमाध्यमे खरेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत काय ? -डॉ. सुब्रतो रॉय

पत्रकारितेवर मर्यादा आली
डॉ. सुब्रतो रॉय म्हणाले, पत्रकारितेत खूप बदल झाले आहेत. पूर्वी, समाजातील वंचितांना न्याय मिळण्यासाठी आणि योग्य माहितीचा प्रसार होण्यासाठी प्रसारमाध्यमांची निर्मिती झाली. मात्र, आज प्रसार माध्यमे उद्योगपती आणि राजकारण्यांची आहे. त्यांचे काम हे पत्रकारितेतून उत्पन्न मिळवण्याचे आहे. अशा परिस्थितीत पत्रकार आपले काम कसे करू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. मात्र, हा खरचं चौथा स्तंभ आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सध्याच्या पत्रकारांवर काम करण्याबाबत अनेक मर्यादा घातल्या आहेत,

जगात शांतता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी ‘पीस जर्नलिझम’च्या तत्त्वांचा अंगीकार करावा

 १० व्या जागतिक संसदेत  ‘रोल ऑफ मीडिया इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ पीस’ या परिसंवादात माध्यम तज्ज्ञांची भूमिका

पुणे, दि 5 ऑक्टोबर :” युद्धजन्य किंवा ताणतणावाच्या परिस्थितीचे वार्तांकन करताना परिस्थिती चिघळणार नाही, याची काळजी पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. संवेदनशील परिस्थिती हाताळताना, त्यातून चुकीची माहिती समाजात पसरण्याची शक्यता असते. अशावेळी विचारपूर्वक वार्तांकन करणे गरजेचे आहे. तसेच पत्रकारिता करताना एका विचारधारेची बाजू घेऊन, एकांगी वृत्तांकन टाळावे.  पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला समाजात आणि देशांमध्ये शांतता निर्माण करायची झाल्यास, पीस जर्नलिझमची मूल्ये तत्त्वे पत्रकारांना आत्मसात करावी लागेल.” असे मत देशातील विविध प्रसारमाध्यमांध्ये काम करणारे पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित १० व्या जागतिक संसदेत दुसऱ्या दिवशी ‘रोल ऑफ मीडिया इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ पीस’ या विषयावर परिसंवाद रंगला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुब्रतो रॉय, प्रतिभा चंद्रन, मोहम्मद वजीउद्दिन, मुनिश शर्मा,  शेफाली वैद्य, डॉ. उज्वला बर्वे , विनायक प्रभू आणि माध्यमतज्ज्ञ डॉ.मुकेश शर्मा यांनी सहभाग घेतला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.

प्रतिभा चंद्रन म्हणाल्या की, युद्धजन्य किंवा तणाव असणाऱ्या ठिकाणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची मनस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. आजच्या प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना काम करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, तरीही पत्रकार आपले काम चोखपणे करतात.  मुंबईवरील हल्ला किंवा बदलापूर येथील घटना असेल, तेथे वार्तांकन करतांना अशांततेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची अनेकांनी काळजी घेतलेली असते. अशा घटनांचे रिपोर्टिंग करतांना, येथील घटना प्रत्यक्ष अनुभवताना अनेक पत्रकारांच्या मनामध्ये स्वतःशीच भांडणाची परिस्थिती असते. त्याचाही कुठेतरी विचार व्हावा, अशी अपेक्षा चंद्रन यांनी व्यक्त केली

शेफाली वैद्य म्हणाल्या की, वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या नकारात्मक बातम्या पाहता आपण पत्रकारितेची मूल्ये हरवली आहेत का, असे वाटत आहे. त्यामुळे समाजातील अनेक व्यक्तींमध्ये नकारात्मकता पसरत आहे. आजची प्रसारमाध्यमे  निष्पक्ष नसून, ते कोणत्यातरी विचारधारेची बाजू घेऊन काम करीत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पत्रकारितेत येणाऱ्या युवा पिढीने पत्रकारितेचे मूल्य पाळत, निष्पक्ष राहून काम करण्यासाठी प्रेरणा घ्यावी. युद्ध किंवा ताणतणाव निर्माण झालेल्या घटनेचे वार्तांकन करतांना, पत्रकारांनी ते प्रकरण अजून चिघळणार नाही, याची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. आपल्याला समाजामध्ये सर्वांना एकसंध बांधून ठेवणाऱ्या पत्रकारितेची आवश्यकता असून, दोन गटांत दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पत्रकारिता करतांना पत्रकारांनी पीस जर्नालिझम मूल्ये आत्मसात केल्यास, शांतता निर्माण होण्यास मदत होईल.

डॉ. उज्वला बर्वे म्हणाल्या की, आपल्याला शांततेची व्याख्या विस्ताराने समजावी लागेल. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारच्या शांतता आहेत. प्रसारमाध्यमांनी सकारात्मक शांततेचा विचार करीत न्याय, समानता, एकात्मता, प्रेम, सहकार्य अशा मूल्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पत्रकार म्हणून अशांतता किंवा तणाव असलेल्या परिसरात काम करताना खूप काळजी घेण्याची गरज आहे. तेथे जबाबदारी आणि विचारपूर्वक काम करावे लागते. नव्याने पत्रकारितेत येणाऱ्यांनी पीस जर्नलिझमची व्याख्या लक्षात घेऊन, काम केल्यास खऱ्या अर्थानं जगात शांतता नांदण्याचे काम होईल.

डॉ. मुकेश शर्मा आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन असून, त्याद्वारे  सर्व प्रकारच्या माहितीचा मोठ्या प्रमाणावर माहितीचा प्रचार-प्रसार होत आहे. स्मार्टफोन म्हणजेच बातम्या, मनोरंजन, माहितीचा खजिना झाला आहे. आपल्या स्मार्टफोनवर येणारी माहिती खरी आहे की खोटी, याची पडताळणी केल्याशिवाय ती शेकडो स्मार्टफोनवर फॉरवर्ड केली जात आहे. सोशल मीडियावर क्षणात खोटे चित्र किंवा व्हिडिओ व्हायरल होऊन, समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे समाजात अशांतता पसरून आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक आणि हुशारीने सोशल मीडियाचा वापर करायचा आहे.

ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद वजीउद्दिन म्हणाले की, न्याय आणि शांतता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नसल्यास, शांतता कशी प्रस्थापित होईल, याचा आपण विचार करायला हवा. अशा परिस्थितीत न्यायदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आणि जलदगतीने व्हायला हवे. त्याद्वारे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. प्रसारमाध्यमांची मालकी ही उद्योजकांकडे जात आहे. हे तातडीने थांबण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही कायदा करता आल्यास, त्याचा विचार करावा.

विनायक प्रभू म्हणाले,  पत्रकारितेचा वारसा आपल्याला देवर्षी नारद यांच्याकडून मिळाला आहे. त्यामुळे आपल्याला वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजीटल क्षेत्राच्या माध्यमातून समाजात शांतता पसरवण्याचा दृष्टीने उत्तम काम करायचे आहे. पत्रकारिता करतांना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हेही ठरवता आले पाहिजे. त्याचवेळी चांगल्या गोष्टींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
मुनीष शर्मा यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवांद्वारे उपस्थितांना शांततेचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी क्राईम रीपोर्टिंग; तसेच जम्मू काश्मीर येथे काम करतांना आलेल्या अनुभवांचे कथन केले.

 पुण्याचे बिशप जॉन रॉड्रिग्स यांनी व्हॅटिकन सिटी येथील मुख्य पोप यांचा शांतता संदेश वाचून दाखविला. त्यानंतर या संदेशाची प्रत डॉ. विश्वनाथ कराड यांना सुपूर्त केली.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत, पत्रकारांनी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेऊन पत्रकारिता केल्यास, जगात शांतता निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे
 प्रा. धीरज सिंह यांनी सूत्रसंचालन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धनाच्या उपक्रमांचा केला शुभारंभ

वाशीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांमध्ये पीएम-किसान (PM-KISAN) सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता जारी, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, 9,200 शेतकरी उत्पादक संस्था, संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क, आणि पशुधनासाठी युनिफाइड जीनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ, याचा समावेश होता.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान वाशिमच्या पवित्र भूमीतून पोहरादेवी मातेसमोर नतमस्तक झाले आणि आपण आज माता जगदंबेच्या मंदिरात दर्शन घेतले आणि देवीची पूजा केली याचा उल्लेख त्यांनी केला. संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन या थोर संतांना आपण आदरांजली वाहिली असे त्यांनी सांगितले.

गोंडवानाची महान योद्धा, राणी दुर्गावती यांच्या जयंतीचाही त्यांनी उल्लेख केला आणि गेल्या वर्षी देशाने या राणीची 500 वी जयंती साजरी केली होती, त्याचे स्मरण केले.

हरियाणामध्ये आज सुरू असलेल्या मतदानाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी तिथल्या जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांचे मत हरियाणाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे ते म्हणाले.

पीएम-किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याचे आज वितरण  झाले असून, या अंतर्गत  सुमारे 20,000 कोटी रुपये 9.5 कोटी शेतकऱ्यांना वितरीत केल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही उल्लेख केला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 1900 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. शेतकरी उत्पादक संस्थांशी संबंधित शेकडो कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आल्याचे ते म्हणाले. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जात असलेल्या सहाय्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, ही योजना नारी शक्तीच्या क्षमतांना बळ देत आहे. आजच्या प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील आणि देशातील नागरिकांचे अभिनंदन केले.

पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालयाच्या आज झालेल्या उद्घाटनाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, नव्याने उद्घाटन करण्यात आलेले संग्रहालय भावी पिढ्यांना बंजारा समाजाच्या प्राचीन संस्कृतीची आणि समृद्ध वारशाची ओळख करून देईल.पोहरादेवी येथील बंजारा समाजाशी झालेल्या संवादाचे स्मरण करून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि अभिमानाचे भाव पंतप्रधानांनी अधोरेखित केले, कारण या संग्रहालयाच्या माध्यमातून त्यांच्या वारशाला ओळख मिळाली आहे. बंजारा वारसा संग्रहालयाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी या समुदायाचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये  बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

“आपल्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात आणि विकासाच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली आहे”, पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या समुदायाची लवचिकता, तसेच कला, संस्कृती, अध्यात्म आणि व्यापार यासह विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासात त्यांनी बजावलेली मोलाची भूमिका, याबद्दल त्यांची प्रशंसा केली. राजा लखी शाह बंजारा, ज्यांनी परकीय राजवटीत अपार कष्ट सहन केले, आणि समाजसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले, त्यांच्यासारख्या  बंजारा समाजातील अनेक आदरणीय व्यक्तींना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. त्यांनी संत सेवालाल महाराज, स्वामी हाथीराम जी , संत ईश्वरसिंह बापूजी आणि संत लक्ष्मण चैत्यन बापूजी यांसारख्या इतर आध्यात्मिक प्रभावी व्यक्तींचेही स्मरण केले, ज्यांच्या योगदानामुळे भारताच्या आध्यात्मिक जाणीवेला अपार  ऊर्जा मिळाली. “आपल्या बंजारा समाजाने असे अनेक संत दिले आहेत, ज्यांनी भारताच्या अध्यात्मिक जाणीवेला अपार  ऊर्जा दिली आहे,”  ते म्हणाले. शतकानुशतके देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला, आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश राजवटीने संपूर्ण बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवून केलेल्या ऐतिहासिक अन्यायाबद्दलही खंत  व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये  बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

सध्याच्या सरकारचे प्रयत्न अधोरेखित करत, पंतप्रधानांनी उपस्थितांना यापूर्वीच्या सरकारच्या वृत्तीचे स्मरण करून दिले. ते पुढे म्हणाले की, पोहरादेवी मंदिर विकास प्रकल्पाची कामे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती, पण महाआघाडी सरकारने ती बंद केली, पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  ते काम पुन्हा सुरू केले. पोहरादेवी मंदिर विकास प्रकल्पासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्राचा कायापालट होईल, तसेच यात्रेकरूंचा प्रवास सुलभ होईल आणि आसपासच्या परिसराची जलद प्रगती होईल.

भारताच्या विकास आणि प्रगतीला खीळ घालणाऱ्या धोकादायक घटकांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “केवळ नागरिकांमधील एकी, देशाचे अशा आव्हानांपासून रक्षण करू शकते.”पंतप्रधानांनी नागरिकांना अमली पदार्थांचे व्यसन आणि त्याच्या धोक्यांपासून सावध केले आणि ही लढाई एकत्रितपणे जिंकण्यासाठी त्यांनी मदत करावी असे आवाहन केले.

“आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आमचे शेतकरी या दृष्टिकोनाचा मुख्य पाया आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.  भारतातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी उचललेल्या प्रमुख पावलांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी कृषी उत्पादनांची साठवण, प्रक्रिया आणि व्यवस्थापन क्षमता वाढवून त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी 9,200 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि अनेक प्रमुख कृषी पायाभूत प्रकल्प समर्पित केल्याचा उल्लेख केला. “महाराष्ट्रात, सध्याच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शेतकऱ्यांसाठी शून्य वीज बिल धोरणाचे त्यांनी कौतुक केले.

अनेक दशकांपासून मोठ्या संकटांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत यापूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांना गरीब आणि हतबल बनवले होते, असे पंतप्रधानांनी सांगितले. महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असेपर्यंत शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प थांबवणे आणि या प्रकल्पांच्या पैशांचा भ्रष्टाचार करणे या दोनच कार्यक्रमपत्रिका घेऊन काम केले, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला. केंद्राकडून पाठवण्यात आलेला निधी लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचवता इतरत्र वळवला जात होता अशी टीका त्यांनी केली. ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील सध्याचे महायुती सरकार शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीसह वेगळे पैसे देत आहे तसाच अतिरिक्त निधी कर्नाटकात भाजपचे सरकारही देत होते, मात्र नवीन सरकारच्या सत्ताकाळात हा निधी बंद करण्यात आला याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.  तेलंगणातील शेतकरी आज निवडणुकीतील कर्जमाफीच्या आश्वासनावर राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या विलंबाचीही पंतप्रधानांनी नागरिकांना आठवण करून दिली आणि सध्याच्या सरकारच्या आगमनानंतरच जलद गतीने काम सुरू झाल्याचे निदर्शनास आणून दिले.  अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर आणि वर्धा या भागातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुमारे 90,000 कोटी रुपये खर्चून वैनगंगा-नळगंगा नद्या जोडण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.  कापूस आणि सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  अमरावती येथे टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही नुकतीच करण्यात आली असून त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

देशाच्या आर्थिक प्रगतीचे नेतृत्व करण्याची अफाट क्षमता महाराष्ट्रात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  गरीब, शेतकरी, मजूर, दलित आणि वंचितांच्या सक्षमीकरणाची मोहीम जोरात सुरू राहिली तरच ही क्षमता प्रत्यक्षात येऊ शकते, असे ते म्हणाले.  आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  अजित पवार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान तसेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला.  आजच्या 18 व्या हप्त्यासह, प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे 3.45 लाख कोटी रुपये इतका आहे. याशिवाय पंतप्रधानांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 5व्या हप्त्याच्या वितरणाचाही प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 1,920 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 7,500 प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.  प्रमुख प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांना शेतीची औजारे भाडेतत्त्वावर देणारी केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, शितगृह प्रकल्प आणि पीक काढणीनंतरचे व्यवस्थापन या प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी सुमारे 1,300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असणाऱ्या 9,200 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) राष्ट्राला समर्पित केल्या.

याशिवाय, पंतप्रधानांनी गुरांसाठीच्या युनिफाइड जीनोमिक चिप आणि स्वदेशी लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा  प्रारंभ केले.  या उपक्रमाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत लिंग वर्गीकरण केलेल्या वीर्याची उपलब्धता वाढवणे आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे 200 रुपयांनी कमी करणे हे आहे.  युनिफाइड जीनोमिक चिप, देशी गाईंसाठी गौचिप (GAUCHIP) आणि म्हशींसाठी महिषचिप (MAHISHCHIP), जीनोटाइपिंग सेवांसोबत विकसित करण्यात आली आहे.  जीनोमिक निवडीच्या अंमलबजावणीमुळे, धष्टपुष्ट आणि उच्च-गुणवत्तेचे बैल लहान वयातच कामासाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकतात.

यासोबतच, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 19 मेगावॅट क्षमतेच्या पाच सौर उद्यानांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचाही गौरव केला.

महाराष्ट्राचा उत्कर्ष पुणेवार इंडिया नंबर 1. तर नैतिक वर्मा दुसऱ्या क्रमांकावर

जम्मू येथे संपन्न झालेल्या 36व्या सब जुनियर राष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष पुणेवार याने आपला सहकारी नैतिक वर्मा याचा अंतिम फेरीत 21 – 19, 21 -18 असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेचे एकेरीतील विजेतेपद मिळवले. त्याआधी उपांत्य फेरीत उत्कर्ष पुणेवार याने तमिळनाडूच्या पी. बाला दर्शन  याचा 21- 13 , 21 -14 असा सरळ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर नैतिक वर्मा याने केरळच्या अदियांद टी याचा 21 – 7 ,21- 9 असा सरळ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. याबरोबरच मुलांच्या सांघिक स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा 3-0 असे हरवून ब्राॅझ पदक पटकावले. मुलींच्या दुहेरीत ईशीका मिश्रा व अंकीता बोंबाटे यांनी चतुर्थ क्रमांकावर तसेच मिश्र दुहेरी मध्येही कृष्णा चिलेवार व आस्था मिश्रा या जोडीने तामिळनाडूच्या एस.अंबुसेलवन व आर.सुदार यांचा 21-17, 21-15 असा पराभव करून ब्रांझ पदक पटकावले.संघाचे व्यवस्थापक चंद्रकांत पिंपळे .यशवंत वेदपाठक तसेच प्रशिक्षक महेश पोहेरवार व सौ.स्नेहा खोंड यांचे व संघाचे सचिव  महाराष्ट्र टेनीक्वाईट असोसिएशन श्री.अनिल वरपे यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री सेवालाल जी महाराज यांना अर्पण केली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी त्यांना अभिवादन केले. श्री सेवालाल जी महाराज हे समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :

“जय सेवालाल! संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी  आज अभिवादन केले. समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांची शिकवण सेवेचे महत्त्व अधोरेखित करत आली आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

X या समाज माध्यमावरील चित्रफीत संदेशात पंतप्रधानांनी लिहिले :

“वाशिममध्ये, बंजारा संस्कृतीत विशेष स्थान असलेल्या नगारा वादनाचा आज स्वतः अनुभव घेतला.  आगामी काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.”

इंडिगोने सुरू केले पुणे-भोपाळ उड्डाण

27 ऑक्टोबर 2024 पासून या मार्गांवर उड्डाणांची संख्या वाढवणार: पुणे-इंदूर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर

पुणे ५ ऑक्टोबर २०२४: इंडिगो या भारतातील पसंतीच्या एअरलाइनने पुणे आणि भोपाळ यांना जोडणारा नवीन मार्ग सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. या नवीन मार्गामुळे पर्यटना बरोबरच या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळेल. २७ ऑक्टोबर २०२४ पासून दररोज या मार्गावर उड्डाण सुरू होईल. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या भागात राहणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.

या व्यतिरिक्त, पुणे-इंदूर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर या मार्गांवर, इंडिगो दिवाळीच्या आधीच म्हणजे २७ ऑक्टोबर २०२४ पासून आपल्या उड्डाणांची संख्या देखील वाढवणार आहे. या उड्डाणांचा उपयोग पुण्याहून आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना तर होईलच, शिवाय देशातील नवीन जागांवर फिरण्यासाठीची आकर्षक संधी मिळेल.

ग्लोबल सेल्स, इंडिगोचे प्रमुख श्री. विनय मल्होत्रा म्हणाले, “27 ऑक्टोबरपासून भोपाळ आणि पुणे या शहरांमध्ये दररोज थेट उड्डाणे सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ही नवीन उड्डाणे सोयीस्कर समयी असतील आणि ती दोन प्रांतांना जोडण्याचे महत्त्वाचे काम करतील. भारतातील आघाडीची विमान सेवा म्हणून आम्ही व्यवसाय तसेच पर्यटनासाठी नवनवीन मार्गांवर उड्डाणे सुरू करून विशेषतः सणासुदीच्या मोसमातील वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे वचन पाळण्याबाबत कटिबद्ध आहोत. आमच्या व्यापक ६ ई नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही भारतात आणि भारताच्या बाहेर सुरक्षित, किफायतशिर आणि वेळ पाळणारी सेवा व त्रासमुक्त प्रवास ऑफर करण्याची परंपरा चालू ठेवली आहे.”

‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ किंवा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील एक गजबजलेले शहर आहे. येथील शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक वारसा ही पुण्याची ओळख असून . पुणे हे आयटी आणि व्यवसायांचे हब आहे, त्यामुळे देशभरातून व्यावसायिक येथे आकर्षित होत असतात. भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगाचे देखील पुणे हे मोठे केंद्र आहे. भोपाळ ही मध्य प्रदेशाची राजधानी असून इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा संगम येथे झालेला दिसतो. ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये अनेक सुंदर तलाव आणि हिरवीगार उद्याने आहेत. सांस्कृतिक वैविध्याच्या बाबतीत भोपाळ समृद्ध आहे. येथे ताज-उल्-मस्जिद आणि भारत भवन सारखे अप्रतिम वास्तूकलेचे नमुने बघायला मिळतात.

उड्डाणांचे वेळापत्रक:
उड्डाण क्र. उड्डाणाचे आरंभ स्थान गंतव्यस्थान फ्रिक्वेन्सी शुभारंभ निर्गमन आगमन
6E 258 पुणे भोपाळ दररोज 27 ऑक्टोबर 2024 1:00 2:35
6E 257 भोपाळ पुणे दररोज 27 ऑक्टोबर 2024 3:05 4:50