स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
पुणे-नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या गदिमांचे देखणे स्मारक व्हावे; ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आयुक्तांना दिले.यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, युवराज देशमुख, गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, भाजपा प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोथरूड मधील महात्मा सोसायटीजवळ गदिमांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाला गती मिळावी; यासाठी नामदार पाटील यांनी जानेवारी २०२३ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला होता. तसेच सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे स्मारकाच्या पुढील टप्प्याचेही काम मार्गी लागावे; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुन्हा स्मारकाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला.
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे जगभरातील १५ कोटी मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्यांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आधुनिक वाल्मिकी महाकवी गदिमांच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊन; देखणे स्मारक व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे महापालिकेने स्मारकाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास स्मारकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु,” अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली.