Home Blog Page 662

जनतेचा अंकुश कायमस्वरूपी असला पाहिजे: निखिल वागळे

भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान गांधी भवन येथे झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जांबुवंत मनोहर, रोहन गायकवाड यांनी स्वागत केले.

अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, संदीप गव्हाणे, डॉॅ. प्रवीण सप्तर्षी,श्रीराम टेकाळे, प्रसाद झावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

निखिल वागळे म्हणाले,’ लोकसभा निवडणुकीवेळी निर्भय बनो सभेत जाताना आमच्यावर हल्ला झाला आणि आज शांततेत व्याख्यान होत आहे. हा वातावरणातील फरक आहे. गेल्या आठ महिन्यात त्या हल्ल्याचा तपास झाला नाही. महाराष्ट्राला परखड विचार मांडण्याची परंपरा आहे. पोलीस सरकारच्या संगनमताने काम करतात, हे दुर्दैवी आहे. संविधान जेंव्हा जेव्हा चुकीच्या हातात पडले तेंव्हा असे हल्ले झालेले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी बोलावे लागते. या देशातील सर्व समावेशकता, धर्म निरपेक्षता टिकली पाहिजे. निराशावादी असून चालणार नाही. जनतेचा दबाव संपल्याचे जाणवत आहे. लोकप्रतिनिधी नीट काम करण्यासाठीं दबाव गट असणे आवश्यक आहे.

हुकूमशाही पध्दतीने चालणारे सरकार नको हा मतदारांचा संदेश लोकसभा निवडणुकीत दिसून आला. जनतेचा अंकुश कायमस्वरूपी असला पाहिजे. त्या निकालाने लोकशाही टिकण्याची आशा पल्लवीत झाली आहे. पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढता कामा नये. सर्वोच्च संस्थां बद्दल आदर कायम राहील, याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या कृतीतून आदर मिळवला पाहिजे. पुढे देशभर पक्षांतर कायदा मोडला गेला तर त्याला सर्वोच्च न्यायालय आणि चंद्रचूड जबाबदार असणार आहेत. बेकायदेशीर सरकार त्यांनी २ वर्षे कसे चालू दिले. उमर खालिदला का जामीन मिळत नाही. आदिवासी, मुस्लीम, दलित, महिला यांचा सहभाग वाढणार नसेल तर लोकशाही टिकणार कशी ? महिलांना पैसे दिले म्हणून त्या मत विकतील असे समजणें हा महिलांचा अपमान आहे.

हरयाणा, जम्मू काश्मीर मध्ये एक पक्ष, एक झेंडा, एक नेता अशी पद्धती चालू देणार नाही, हा संदेश या निवडणुकीतून पुढे येणार नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे, एवढेच जनतेचे म्हणणे आहे. दहा वर्षात वातावरण विषारी झाले, कहर झाला होता. जम्मू काश्मीर मध्ये लोकशाहीचे हनन झाले होते. काश्मीर मध्ये राज्यपाल नियुक्त ५ आमदार का निवडले गेले आहेत, त्यांना विधी मंडळात मतदानाचा अधिकार का दिला आहे ? हे लोकशाही विरोधी आणि घटना विरोधी आहे. शेतकरी आंदोलन देशविरोधी आहे, असा प्रचार सत्ताधाऱ्यानी करणे चुकीची गोष्ट होती, असेही निखिल वागळे यांनी सांगितले.

राजकीय, सामाजिक अभिसरणाचे काम निवडणुकीतून झाले पाहिजे.महाराष्ट्रात दलित, मुस्लीम, आदिवासी साठी महाविकास आघाडीने योगदान दिले पाहिजे.या आघाडीला महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. लोकशाहीत मॉब लिंचिंग होता कामा नये,अल्पसंख्य लोकशाहीत सुरक्षित राहिले पाहिजेत. प्रसाद असो किंवा अन्य कारणाने तेढ निर्माण होता कामा नये. गेले १० महिने महाराष्ट्रात दंगल पेटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. राज्याचे गृहमंत्री दंगलीला प्रोत्साहन

देणारी भाषा वापरतात.ते गृहमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. पुण्यात कोयता गँग वाढते आहे, बलात्कार वाढत आहे.ते या गृहमंत्र्यांना रोखता येत नाही, असाही आरोप वागळे यांनी केला.भीमा कोरेगाव सारखी कट कारस्थाने पुन्हा होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षिय समारोप केला. ते म्हणाले, ‘लोकशाहीचे बीज टिकवून ठेवले पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. फॅसिझम पुढे जाता कामा नये.उत्सवातून हल्ली व्याख्याने आयोजित केली जात नाहीत.ते बंद होऊन विचार मारले जात आहेत, आणि वाद्यांचा आवाज मोठा केला जात आहेत.विचारांची परंपरा गांधी सप्ताहच्या निमित्ताने पुढे सुरु राहत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे’.

पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका

पुणे-

घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप लालित्यपूर्ण पदन्यास सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे वन्स
मोअरचे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात पुणे
नवरात्रौ महोत्सवात रविवारी दुपारी  १२ पासून सलग १२ तासांचा‘लावणी धमाका’श्री गणेश कला-क्रीडा
रंगमंच येथे आयोजित केला गेला. ‘महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज‘लावणी महोत्सव’पुणे
नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३० वर्षांपूर्वी  सुरू केला. गेली ३० वर्षे  त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड
मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो’, असे
भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी
उद्घाटनप्रसंगी काढले.
 
विक्रमी लावणी महोत्सवात लावणी कलावंत माया शिंदे, सोनम जाधव (छत्तीस नखरेवाली‌) , खुशी शिंदे,
शबनम पुणेकर (ओरिजनल जल्लोष अप्सरांचा‌) , पूनम कुडाळकर, काव्या (तुमच्यासाठी कायपण‌),
शलाका पुणेकर, सोनाल शिंदे (कैरी मी पाडाची) , श्रुती मुंबईकर, मेनका औंधकर  (चंद्रकला) अशा अनेक
लावणी कलावंताच्या  ग्रुप सह त्यांच्या १०० सहकार्‍यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर
करुन प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
 
महोत्सवाची सुरुवात ’३६ नखरेवली’ ग्रुपने गणेश वंदना सादर करून केली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी
आपला नृत्यविष्कार दाखवून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. श्री गणेश कला क्रीडा
रंगमंच दुपारी १२ पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व
नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता.
 
 ‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी
पाडाची….’,  ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला
वेडा पिसा’ ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा…’, ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती…’, ‘तुझ्या
उसाला लागेल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
 
‘विचार काय आहे तुमचा पाहूनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी…’,
‘सांगना कशी दिसते मी नऊवारी साडीत…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आंबा तोतापुरी’,  ’,  ‘चंद्रा’
चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा अशा एकाहून एक
सरस’ अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ
घातली.

याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’, ‘सोडा सोडा राया नाद खुळा…’ या लावणीने वन्समोअरची दाद
मिळवली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा
आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यासह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, ‘नटरंग उभा…’, या
‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
 
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून
लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका ऊर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या
सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या
पुढ्यात बसले मी..’,  ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या
 लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
 
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम
कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग 12 तास नृत्यांगणांनी आपली लावणी सादर करून
प्रेक्षकांची मने जिंकली.
 
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला
महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. यावेळी पुणे
नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे,  रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर,
मुख्य संयोजक अमित बागुल,  आदी पदाधिकारी व मान्यवर  उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत चालू राहिला.
लावणी रसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.

डॉ. शर्वरी इनामदार ठरल्या स्ट्रॉंग वुमन ऑफ कॉमनवेल्थ 

दुहेरी सुवर्णपदकासह स्ट्रॉंग वुमन किताब : दक्षिण आफ्रिका येथील कॉमनवेल्थ पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा
पुणे: पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७ किलो एम १ महिला गटामध्ये दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स म्हटला जाणारा ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणजेच ‘स्ट्राँग वुमन ऑफ कॉमनवेल्थ’  हा मानाचा किताबही त्यांनी पटकावला.

दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे कॉमनवेल्थ पावरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा पार पडल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेल्स, न्यूझीलंड, कॅनडा, साउथ आफ्रिका, श्रीलंका देशांमधील २०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक प्रकारात ७७.५  किलो तर इक्विप्ड प्रकारात ९७.५ किलो वजन उचलले. एकाच दिवशी सकाळी वजन देऊन स्पर्धा खेळून त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा वजन देऊन स्पर्धा खेळणे असे मोठे आव्हान त्यांनी पेलले.

मंगोलिया येथे दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मलेशिया येथील एशियन चॅम्पियनशिप व आता दक्षिण आफ्रिका येथील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप त्यांनी  गाजवली.

गुरुसोबत शिष्याची देखील रजत पदकाची कामगिरी – डॉ. शर्वरी इनामदार यांची शिष्य सुप्रिया पांडुरंग सुपेकर हिने ५२ किलो ज्युनिअर महिला गटामध्ये क्लासिक प्रकारात ५० किलो वजन उचलत चुरशीच्या स्पर्धेत रजत पदकाची कमाई केली. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या यशासाठी या गुरु -शिष्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोघीजणी बिबवेवाडी च्या कोडब्रेकर जिम मध्ये सराव करतात. त्यांना डॉ. वैभव इनामदार, ॲड. रवींद्र कुमार यादव आणि संजय सरदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

भरतनाटयम् मधून स्त्री शक्तीने दिला महिला सबलीकरणाचा संदेश

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजन ; विविध कंपन्यांमधील एचआर महिलांचा सन्मान


पुणे : श्री सरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली मातेसमोर भरतनाटयम् हा शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करीत स्त्री शक्तीने महिला सबलीकरणाचा संदेश दिला. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात राधिका पारकर आणि ग्रुप तर्फे भरतनाटयम् नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये राधीका पारकर यांसह एकूण ९ कलाकारांनी सहभाग घेतला. महिला सबलीकरणाविषयी समाजात जनजागृती व्हावी, याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात भरतनाटयम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध कंपन्यांमधील एचआर महिलांचा सन्मान देखील झाला. 
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकारातून देवीसमोर महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. तसेच उद्योग क्षेत्रात आज महिला मोठया प्रमाणात कार्यरत आहेत आणि विविध कंपन्यांमध्ये महत्वाचा एचआर सारख्या पदावर देखील कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान देखील मंदिरात करण्यात आला. या महिलांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली.

* साहित्य क्षेत्रातील लेखिकांचा सन्मान सोहळा सोमवारी (दि.७)
साहित्य क्षेत्रातील माधुरी तळवलकर, ज्योती देशमुख, डॉ.श्रुती पानसे, अ‍ॅड. आकांक्षा पुराणिक, संगीता पुराणिक, नीला कदम, इंदुमती जोंधळे, सुनीताराजे पवार, अश्विनी साने, नताशा शर्मा या लेखिकांचा सन्मान सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणा-या कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील मान्यवर व ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध बालवडकर यांनी दंड थोपटले..जाहीर मेळाव्यातून..

कोथरूडमध्ये केले जोरदार शक्तिप्रदर्शन

पुणे-ज्यांच्यासाठी तन मन धन लावून काम केले. पाच वर्ष ज्यांच्या पुढे मागे राहिलो. त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला. पण या नेत्यांना जेव्हा एखादा कार्यकर्ता आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे असे कळते. तेव्हा हेच नेते आपल्याला धमकी देतात. तिकीट तुम्हालाच मिळणार आहे. निदान एखादा कार्यकर्ता इच्छुक आहे. तेवढे तरी राहू द्या. असे म्हणण्या इतपत या नेत्यांचे मन मोठे नसेल तर मग जनता जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी असताना कशाची भीती मनात ठेवायची असे म्हणत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये दंड थोपटले. 40 हजारहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रविवारी (दि.6) जनआशिर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेण्यात आला. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 40 हजार हून अधिक नागरिकांना दिवाळीनिमित्त सरंजाम वाटप करण्यात आले.

या जाहीर मेळाव्यात बालवडकर म्हणाले, नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीमध्ये मी पक्षाचे काम करण्यासाठी नागरिकांमध्ये जात होतो. त्यावेळी नागरिकांनी माझ्याकडे एक मागणी केली की, आता आपल्याला पुढे गेले पाहिजे. जसे जसे मी नागरिकांशी संवाद साधत होतो. त्या त्या वेळी नागरिक माझ्याकडे हीच मागणी करत होते. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांची सोडवणूक मी करू शकतो असे नागरिकांना वाटत होते. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त होणे साहजिक होते. पुढे जाऊन कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होऊ लागली की, आता आपण पुढे गेले पाहिजे. गेली दहा वर्ष मी पक्षाचे काम करत आहे. पक्षाची ध्येयधोरणे, योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचे रान केले आहे. हे पक्षाला देखील माहित आहे l.जोपर्यंत मी नेत्यांचे काम करत होतो. त्यांच्या मागेपुढे करत होतो. तोपर्यंत माझ्याबद्दल त्यांना कुठलाही आकस नव्हता. पण ज्यावेळी नागरिकांची मागणी, कार्यकर्त्यांचा रेटा वाढू लागला. अशावेळी नागरिकांना बांधील राहून मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली. जसा मी इच्छुक झालो. तसा माझ्याबद्दल नेत्यांना आकस वाढला. माझ्या कार्यक्रमांना पक्षाच्या नेत्यांनी येणे टाळले. कार्यकर्त्यांनाही माझ्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये अशा धमक्या देण्यात येऊ लागल्या. याही पुढे जाऊन मला पक्षातून काढून टाकण्याची धमकी दिली. पक्षावर माझा विश्वास आहे. परंतु नेत्यांना जर त्यांचा स्वार्थ कळत असेल तर एखाद्या कार्यकर्त्यांनी स्वार्थी झाले तर त्याच्याबद्दल लगेच कारवाई पक्ष करणार का असा माझा सवाल आहे.

बालवडकर पुढे म्हणाले की आजच्या कार्यक्रमातून मी पक्षाला फक्त एवढेच सांगत आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही.पक्षाने माझा विचार करावा मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असून पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली तर मग मला वेगळा विचार या जनतेसाठी घ्यावा लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जनता जनार्दन पाठीशी; मला भीती कोणाची

अमोल बालवडकर म्हणाले पाच सहा महिन्यापूर्वी माझ्या मनात देखील नव्हते की मला आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मात्र जनतेने माझ्या मनात हे बीज पेरले आहे. जनतेचा पाठिंबा मला मिळत आहे. जनता जनार्दन माझ्या पाठीशी असताना मला कोणाच्या धमकीला घाबरायची गरज नाही. मला त्यामुळे काही फरकही पडत नाही. जनता माझी पाठीराखी आहे. त्यामुळे माझे कोणीच वाकडे करू शकत नाही.

बालवडकर यांच्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा
कार्यक्रमाला कोणीही येत नाही म्हणून अमोल बालवडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मतदार संघातील घरकाम करणारे,वडापाव विकणारे,कामगार,कष्टकरी,तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान केला. मतदार संघातील नागरिक हेच माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत असेही बालवडकर यावेळी म्हणाले. बालवडकर यांनी मेळाव्यासाठी जमवलेली गर्दी आणि नागरिकांचा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याची चर्चा मात्र कोथरूड परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे.

ATS गुजरातने बंद कारखान्यावर टाकला छापा,1800 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

भोपाळ-मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 1800 कोटी रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ATS गुजरात सोबत शनिवारी अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी, रा. भोपाळ, मध्य प्रदेश,सन्याल बने, रा, नाशिक, महाराष्ट्र अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत .

भोपाळजवळील एका कारखान्यातून ही औषधे जप्त करण्यात आली आहेत. कटारा हिल्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बागरोडा गावातील औद्योगिक परिसरात हा कारखाना आहे.

कारखान्यात मेफेड्रोन (एमडी) या औषधाची निर्मिती करण्याचे काम सुरू होते.DSP, ATS गुजरात S.L. चौधरी म्हणाले – भोपाळ येथील अमित चतुर्वेदी आणि नाशिक, महाराष्ट्रातील सन्याल बने हे भोपाळच्या बागरोडा औद्योगिक परिसरात कारखान्याच्या नावाखाली मेफेड्रोन (MD) अंमली पदार्थाचे बेकायदेशीर उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुजरात एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.5 ऑक्टोबर रोजी छापा टाकण्यात आला होता. या वेळी येथे अंमली पदार्थ मेफेड्रोन (एमडी) तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उघड झाले. सुमारे 5 हजार किलो कच्चा माल आणि तो बनवण्यासाठी वापरलेली उपकरणेही सापडली आहेत. यामध्ये ग्राइंडर, मोटर्स, ग्लास फ्लास्क, हीटर आणि इतर उपकरणे समाविष्ट आहेत. पुढील तपासासाठी हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कारखान्यात झडती घेतली असता एकूण 907.09 किलो मेफेड्रोन (घन आणि द्रव अशा दोन्ही स्वरूपात) आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत 1814.18 कोटी रुपये आहे.
आरोपी अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी याने 6 महिन्यांपूर्वी कारखाना भाड्याने घेतला होता. एमडी ड्रग्ज तयार करण्याचे काम येथे केले जात होते. दररोज सुमारे 25 किलो एमडी बनवले जात असल्याचे सांगितले जात आहे.गुजरातमधील सुरत येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संबंध आढळून आल्यानंतर भोपाळमध्ये कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक सान्याल बने हा दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. एका गुन्ह्यात गेल्या 5 वर्षांपासून तो मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंद होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो आरोपी अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदीच्या संपर्कात आला. सान्याल ड्रग्जचा पुरवठा पाहत असे.गुजरात एटीएस आणि एनसीबीने शनिवारी भोपाळ कारखान्यावर छापा टाकून आरोपी अमित प्रकाशचंद्र चतुर्वेदी आणि सन्याल बने यांना अटक केली.

ही मस्ती घरी दाखवायची; तुमच्या दोन्ही हातांवर खून, सुप्रिया सुळेंचा आमदार टिंगरेंवर थेट आरोप

पुणे-तुम्ही खुनी आहात. रक्त बदलण्याचं पाप तुम्ही केलं. असा थेट आरोप करत पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर थेट टीका केली आहे.लोहगाव येथील श्री संत तुकाराम महाराज चौक येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या .

त्या म्हणाल्या ,’ तुमच्या दोन्ही हातावर खून आहे. पोर्शे कार आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? असा प्रश्न उपस्थित करत जे दोन जीव गेले त्यांच्या आईचे अश्रू कोण पुसणार? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्र तुमच्याकडे उत्तर मागतोय. मी तुमच्याकडं उत्तर मागत आहे. घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही असंही सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. तसंच, त्या दोन जिवांच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. अशी लोक वगडाव शेरीला लोकप्रतिनिधी हवे आहेत का ? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियनचे उपाध्यक्षपदी नामदेव शिरगावकर‌

पुणे-

कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियन (CTU) निवडणुकीत भारत तायक्वांदोचे अध्यक्ष श्री. नामदेव शिरगावकर यांची आशिया खंडासाठी उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आज भारत तायक्वांदोने महत्त्वपूर्ण यश संपादन केले. चुनचेऑन वर्ल्ड तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप 2024 दरम्यान झालेल्या या निवडणुकीत श्री. शिरगावकर यांनी एकतर्फी एका बाजूने लढतीत पाकिस्तानच्या संघटकांचा पराभव करत निर्णायक विजय मिळवला.

जागतिक तायक्वांदो मंचावर भारतीय प्रतिनिधित्वाचा नवा आदर्श घालून CTU च्या उपाध्यक्षपदी निवडून येण्याची ही महत्त्वपूर्ण विजयाची पहिलीच वेळ आहे.

नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

  • अध्यक्ष: केई हा (कॅनडा)
  • उपाध्यक्ष आशिया: नामदेव शिरगावकर (भारत)
  • उपाध्यक्ष आफ्रिका खंड: सुलेमान सुंबा (केनिया)
  • कॅरिबियनचे उपाध्यक्ष: हेंडरसन टर्टन
  • युरोपचे उपाध्यक्ष: अण्णा वासालो
  • ऑस्ट्रेलियाचे उपाध्यक्ष: जीन कफौरी
  • परिषद सदस्य: अहमद वसीम (पाकिस्तान), फ्रेडरिक (घाना)

निवडीनंतर बोलताना श्री. शिरगावकर म्हणाले, “कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियनमध्ये आशियाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडून आल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून भारतीय तायक्वांदोचा सामूहिक विजय आहे. कॉमनवेल्थ संघटनेमध्ये तायक्वांदो खेळाची वाढ करण्यासाठी CTU सोबत आम्ही सर्वस्व पणाला लावून काम करण्यास तयार आहोत. “

आपल्या देशात कॉमनवेल्थ संस्कृतीचा प्रभाव लक्षणीय आहे.त्याच्या निवडीमुळे भारतातील तायक्वांदोसाठी एका नवीन युगाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे, CTU मधील त्यांच्या नेतृत्व आणि प्रतिनिधित्वासह, भारत तायक्वांदोचे उद्दिष्ट या खेळाचा प्रसार वाढवणे आणि देशभरातील खेळाडूंसाठी अधिक संधी निर्माण करणे हे राहणार आहे.

या ऐतिहासिक कामगिरीकडे भारतातील तायक्वांदोसाठी ‘गेम चेंजर’ म्हणून पाहिले जात असून त्यामुळे या क्रीडा प्रकाराच्यख उज्ज्वल भविष्याचे संकेत देत आहे.

खोटे बोलून इतिहासाचे विद्रूपीकरण करणे हीच भाजपची कार्यपद्धती

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२४
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर राहुल गांधी यांनी आयर्न लेडी इंदिरा गांधींच्या नावाने राजकारणात महिला सशक्तीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. इंदिरा गांधी फेलोशिपअंतर्गत महिला सशक्तीकरणासाठी ‘शक्ती अभियान’ सुरु करण्यात आले असून महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात आजपासून सुरु होत आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
टिळक भवन येथे ‘शक्ती अभियानाचा’ शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुरु केलेल्या शक्ती अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रदेश काँग्रेस हे अभियान मोठ्या ताकदीने राबवणार आहे. या अभियानात महाराष्ट्रातील आयेशा खान, अनुष्का वानखडे, रोहिणी धोत्रे, विजया दुर्धवळे, मीना धोदडे यांनी सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. हे अभियान जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर राबवले जाणार आहे. महिला नेतृत्व पुढे आले पाहिजे यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक आणले त्यावेळी याच भाजपाने त्याला विरोध केला होता पण मोदी सरकारने ते विधेयक पुन्हा आणले असता काँग्रेसने मात्र त्याला पाठिंबा दिला. पण मोदी सरकारने फक्त विधेयक मंजूर केले आरक्षणाची अंमलबाजवणी केली नाही कधी करणार ते ही सांगितले नाही काँग्रेस पक्ष मात्र सरकार आल्याबरोबर महिला आरक्षणाची अंमलबजावणी करेल.
मालवणातील राजकोट घटनेबद्दल फडणवीस केव्हा माफी मागणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरुंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या लिखाणाचा मुद्दा उपस्थित करुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तरुंगात शिक्षा भोगत असताना जे लिखाण केले त्याची नंतर माहिती घेऊन दुरुस्ती केली व माफी सुद्धा मागितली. भाजपा शिवाजी महाराजांचा वापर केवळ मते मिळवण्यासाठी करत असतो. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कोसळून अवमान केला, कोट्यवधी शिवप्रेमींच्या मनाला वेदना झाल्या पण अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, फडणवीस केंव्हा माफी मागणार? ते स्पष्ट करावे.
भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच मान्य नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी याच पेशवाईवृत्तीने विरोध केला होता आणि आजही त्याच पेशवाई विचाराचे राज्य महाराष्ट्रातही आहे. शिवाजी महाराजांचे विचार हीच प्रवृत्ती संपवत आहे. २०१९ मध्ये स्वयंभू विश्वगुरु, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन करण्यात आले, त्याचे काय झाले? याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी खरे कधी बोलतात का? ते तर सातत्याने खोटेच बोलतात. फोडाफोडीचे राजकारण तर भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी स्वतःच करत आहेत. पण आरोप मात्र काँग्रेसवर करत आहेत. मोदींचा काँग्रेसवरचा आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा आहे. भाजपा व मोदी हे गांधी-नेहरु कुटुंबाला शिव्या देण्याचेच काम करत असतात. ११ वर्षात मोदींनी काय केले ते सांगावे? असेही नाना पटोले म्हणाले.
हरियाणा व जम्मू काश्मीरच्या ‘एक्झीट पोल’वर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीवेळीच परिवर्तनाची भूमिका घेतली ते मतपेटीतून दिसले आहेच, विधानसभेला यापेक्षा चांगले परिणाम दिसतील. खोक्याचे असंवैधानिक सरकार उखडून टाकण्याची जनतेची मानसिकता आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरपेक्षा चांगले परिणाम महाराष्ट्र विधानसभेला दिसतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
ड्रगच्या काळ्या धंद्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ड्रग माफिया ललित पाटील हा भाजपा सरकारचाच माणूस आहे, त्याच्या विरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. नाशिकच्या पोलिसांनी त्याला अटक केली नाही तर मुंबई पोलिसांनी अटक केली होती पण ससून हॉस्पिटलमध्ये त्याला फाईव्हस्टार सुविधा देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राला ड्रग हब बनवून तरुण पीढी बरबाद करण्याचे पाप भाजपा सरकार करत आहे, असेही पटोले म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वजाहत मिर्झा, शक्ति अभियानाचे राष्ट्रीय संयोजक, अॅड. संदीप पाटील ढवळे, महाराष्ट्र समन्वय अॅड. फ्रिडा निकोलस, अॅड. दीपक तलवार, अॅड. गौरी छाबरिया आदी उपस्थित होते.

विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलन संपन्न

पुणे-राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन रविवार, दि.६ ऑक्टोबर रोजी कर्वेनगर परिसरात आयोजित केले होते.

सर्वप्रथम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये ,महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या पुतळ्यास राष्ट्र सेवा समितीच्या पदाधिकार्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन,ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर
अग्रभागी दंडगण,त्यामागून खुल्या जीपमध्ये भगवा ध्वज, घोषगण आणि त्यामागून गणवेशातील सेविकाअसा पथसंचलनास प्रारंभ झाला.
कर्वे नगरातील नागरी वस्त्यांमधून जाणाऱ्या या पथ संचलनात साडपाचशे संपूर्ण गणवेशधारी सेविकांनी सहभाग घेतला. यात सर्व वयोगटातील महिला असून बाल आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींचा संचलनात, घोषवादनात आणि संचलन पाहण्यासाठीही मोठ्या संख्याने असलेला सहभाग लक्षणीय होता. महिलांचे एकंदरीत तीन घोष होते. यामध्ये वंशी / वेणु दल ( बासरी), आनकदल(साईडड्रम)आणि तालवाद्य म्हणजे झल्लरी( सिंबल), त्रिभुज(ट्रॅन्गल) आणि पणव(बेस ड्रम) यांचा समावेश होता.
शिस्तबद्ध आणि अतिशय सुंदर अशा या पथसंचलनाचे नागरिकांनी खूप उत्साहाने मोठ्या संख्येने चौकाचौकात उपस्थित राहून स्वागत केले. विविध मंडळांतर्फे भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, ध्वजाचे औक्षण करुन, फुलांची उधळण करुन, देशभक्तीपर गाणी गाऊन आणि घोषणा देऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
पुन्हा कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर संचलनाचा समारोप झाला.समारोप प्रसंगी गणवेशातील एकूण साडेसहाशे सेविका आणि दोनशे नागरिक मैदानावर उपस्थित होते.
राष्ट्र सेविका समिती, संभाजीभाग, पुणे, कार्यवाहिका अनघा जोशी यांनी कार्यक्रमास सहाय्य करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
या उत्सवास राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख पूनम शर्मा , प. महाराष्ट्र प्रांत कार्यवाहिका शैलाताई देशपांडे,अर्चना चांदोरकर पुणे महानगर शारीरिक शिक्षण प्रमुख व संभाजी भाग कार्यकारिणी,यांची उपस्थिती होती.
तसेच पुण्याचे मंत्री आणि अनेक माजी नगरसेवकांनी आवर्जून उपस्थित राहून समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड

साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आज झाली घोषणा

पुणे- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी नक्की कोणाची निवड होते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतांना महामंडळाच्या आज पुण्यात मसाप मध्ये झालेल्या बैठकीत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले .

महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधिंची आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक झाली त्यावेळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . यावेळी झालेल्या बैठकित
तारखा निश्चित करणे आणि कार्यक्रमांच्या रूपरेषे बाबतही चर्चा करण्यात आली . अखिल भारतीय साहित्य महामंडळाची शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर आणि रविवार दिनांक ६ ऑक्टोबर अशी दोन दिवसीय बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना होती.
बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . या सर्व संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी झालेल्या नावांच्या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली . त्यानंतर भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत होती.
यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. महामंडळाची बैठक टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाली . शनिवारच्या बैठकीत संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा, ग्रंथ दालनाचे नियोजन आदींवर चर्चा करण्यात आली आणि आजच्या बैठकीत ही रूपरेषा अंतिम करून संमेलनाध्यक्षांची निवड घोषीत करण्यात आली .

नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचे मत; ‘ब्रह्मसखी’तर्फे ब्राह्मण उपवधू-वरांचा ‘प्रत्यक्ष संवाद’

पुणे: “केवळ सौंदर्य, चांगले वेतन किंवा श्रीमंती नव्हे, तर नात्यांमधील विश्वास, सुसंस्कृतपणा आणि एकत्र कुटुंबपद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक असते. एकमेकांना सांभाळून घेत, मने जुळली, तर पती-पत्नीचे नाते घट्ट होते. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करत नाते, करिअर फुलवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,” असे मत युरोकूल हॉस्पिटलच्या संचालिका, प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
\ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधुवर मंडळातर्फे खास उपवधू-वरांसाठी ‘प्रत्यक्ष संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्वेनगर येथील घरकुल लाॅन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी व ‘देणे समाजाचे’ संस्थेच्या प्रमुख वीणा गोखले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ‘ब्रह्मसखी’च्या संचालिका नंदिनी ओपलकर, गीता सराफ, ज्योती कानोले, तृप्ती कुलकर्णी उपस्थित होत्या. ३५० मुले व १४० मुली असे ४९० विवाहेच्छूक वधू-वर यामध्ये सहभागी झाले होते.


डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या, “विवाहावेळी सांसारिक जीवनाच्या कल्पना स्पष्ट असाव्यात. योग्य वयात विवाह, अपत्य आणि त्यांचे नेटके संगोपन व्हायला हवे. अलीकडे मूल होऊ न देण्याचे, घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून, ही चिंतेची बाब आहे. सासू-सासऱ्यांना आईवडिलांप्रमाणे मानून त्यांच्या मनात जागा केली, तर संसार सुखाचा होतो. घरात आजी-आजोबा असतील, तर कुटुंब सुखी राहते. सुखदुःखात आपली माणसे उपयोगी येतात. त्यामुळे वेगळे राहण्याचा विचार करू नये.”

वीणा गोखले म्हणाल्या, “ब्रम्हसखी समाजासाठी काम करतेय याचा आनंद आहे. तरुण वयातील मुलामुलींचे विवाह होणे अवघड होत चालले आहे. अशावेळी लग्नाळू मुलामुलींना समोरासमोर आणून आपला जीवनसाथी निवडण्याची संधी देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. लग्नानंतर दोघांनीही घरात ‘सपोर्ट सिस्टीम’ उभारावी. उतारवयात ‘शेअरिंग, केअरिंग’साठी अनेकांना जोडीदार हवा असतो. तेव्हा पन्नाशीनंतरच्या एकल लोकांसाठीही पुढाकार घ्यावा.”

नंदिनी ओपळकर म्हणाल्या, “वधू-वरांसाठी ब्रह्मसखीच्या वतीने वैविध्यपूर्ण उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे राबविले जात आहेत. ‘प्रत्यक्ष संवाद’ सारख्या उपक्रमातून इच्छूक मुलामुलींना परस्पर संवादाची व त्यातून जोडीदार निवडण्याची संधी मिळेल.” अस्मिता पांडे यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती कुलकर्णी आणि ज्योती कानोले यांनी स्वागत केले. गीता सराफ यांनी आभार मानले.
लग्नाळूंना सुखावणारा प्रत्यक्ष संवाद
सनई-सतारीचा मधुर नाद… वयोगटानुसार बसलेले उपवधू-वर… त्यांच्यात चाललेला प्रत्यक्ष संवाद… आपल्या आवडीनिवडींची, अपेक्षांची केलेली चर्चा… त्यातून एकमेकांची झालेली पसंती… सख्याला सखी अन सखीला सखा मिळण्याचा हा अनोखा उपक्रम रविवारी पुण्यात अनुभवायला मिळाला. ब्रह्मसखीच्या प्रत्यक्ष संवाद कार्यक्रमात लग्नाळू मुलामुलींचा हा माहोल सुखावणारा होता.

‘राजकारणाची दिशा बदलणे आता मतदारांच्या हातात’- काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात

३० वा पुणे नवरात्रौ महोत्सवात थोरात यांना ‘महर्षी’ पुरस्कार प्रदा

पुणे – ‘राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही. ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे’, असे प्रतिपादन काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे केले. ‘सध्या इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केले जात आहे, की त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीही आपली पातळी कमी करावी, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
समाजात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुणे नवरात्रौ महोत्सवात देण्यात येणाऱ्या ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यंदा महर्षी पुरस्काराने थोरात यांना गौरवण्यात आले. पुणे नवरात्रौ महोत्सवात ५ ऑक्टोबर रोजी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. माजी आमदार व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. ज्येष्ठ वात्रटिकाकार व कवी रामदास फुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे आणि सिनेअभिनेते सुनील बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देवीच्या मूर्तीचे सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, पुष्पहार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  
थोरात पुढे म्हणाले, ‘राजकारण, समाजकारणाची पार्श्वभूमी घरातच होती. पुण्यात शिकलो. वकील झालो. पुण्याने मला आत्मविश्वास आणि संधी दिली. माझ्या कारकिर्दीत पुण्याचे मोठे योगदान आहे. महर्षी पुरस्काराने ज्यांना गौरविण्यात आले आहे, त्या महान लोकांच्या यादीत माझे नाव पाहून मला आश्चर्य वाटले, असेही थोरात म्हणाले. कल्पक उपक्रम हे आबा बागुल यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना पुढील संधी मिळावी, असे मलाही वाटते, असा उल्लेख थोरात यांनी केला.
उल्हास पवार यांनी बाळासाहेब थोरात यांनी घराण्याचा वारसा सर्वार्थाने जपत पुढे नेल्याचे सांगितले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी, सहकार अशा अनेक क्षेत्रांत बाळासाहेबांनी आदर्श निर्माण केले आहेत. विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून जाणे, हा विक्रम त्यांच्या नावावर आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना रामदास फुटाणे म्हणाले, ‘ बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वात सुसंस्कृतपणा आणि विनम्रता यांचा दुर्मिळ संगम आहे. आबा बागुल यांनी योग्य वेळी अतिशय योग्य व्यक्तीला महर्षी पुरस्कार प्रदान केला आहे.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी प्रास्ताविकात महर्षी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी भारतरत्न पं भीमसेन जोशी, सुशीलकुमार शिंदे, पं हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. विजय भटकर, पं. किशोरी अमोणकर,  बिशप डाबरे, नृत्यगुरू शमा भाटे, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, शोभना रानडे अशा अनेकांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. अभिनेते सुनील बर्वे यांनीही मनोगत मांडले.
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
घनश्याम सावंत यांनी आभार मानले.

एस. एन. बी. पी. आयोजित स्वरयज्ञ महोत्सवाला सुरुवात

कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे : उस्ताद रईस बाले खान यांचे बहारदार सतार वादन आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल गायनाने स्वरयज्ञ महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
येरवडा परिसरातील प्रतिष्ठित एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेला दोन दिवसीय स्वरयज्ञ महोत्सव महाविद्यालयातील सरस्वती हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर, प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, संचालिका देवयानी भोसले, ऋतुजा भोसले, जयश्री व्यंकटरमण, प्राचार्या रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांच्या गायन-वादनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध रचनांद्वारे पूरिया धनाश्री रागाचे सादरीकरण केले.
त्यानंतर उस्ताद रईस बाले खान यांनी आपल्या सतार वादनाची सुरुवात यमन रागाने केली. ‌‘जबसे बलम परदेस‌’ ही मिश्र पहाडीतील धून सतारीवर सादर करताना वादनाबरोबर गायनाची झलक दर्शवून रईस बाले खान यांनी रसिकांची मने जिंकली. सतारीवर लीलया फिरणारी बोटे आणि त्यातून उमटलेले झंकार रसिकांना स्तिमित करून गेले. मुक्ता रास्ते यांनी समर्पक तबलासाथ केली.
मैफलीच्या उत्तरार्धात किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे दमदार गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग दुर्गाने केली. ‌‘तू रस कान्हा रे‌’, ‌‘चतर सुखदा बालमवा‌’ या बंदिशी सादर केल्या. दुर्गोत्सवाचे निमित्त साधून ‌‘दुर्गे भवानी चामुंडेश्वरी शक्तीदायिनी भक्तसहायिनी‌’ ही पूरिया धनाश्रीमधील स्वरचित दुर्गास्तुती पंडित मेवुंडी यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर आदीशक्तीचे रूप दर्शविणारी ‌‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी‌’ ही रचना ऐकविली. संत तुकाराम महाराज रचित ‌‘पोटा पुरते देई विठ्ठला लई नाही मागणे देवा‌’ हा अभंग रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. राघवेंद्रस्वामी रचित ‌‘संगीत प्रियमंगळ‌’, तसेच संत पुरंदरदास रचित सुप्रसिद्ध ‌‘लक्ष्मी बारम्मा‌’ या रचना उपस्थितांना विशेष भावल्या. पंडित मेवुंडी यांनी मैफलीची सांगता भैरवी रागातील ‌‘शारदा विद्यादायिनी दयानिधी‌’ या देवीस्तुतीपर रचनेने केली. त्यांना विनायक गुरव (तबला), शुभम शिंदे (पखवाज), तुषार केळकर, (संवादिनी), ललित मेवुंडी (सहगायन), योगिनी ढगे, अबोली सेवेकर (तानपुरा) तर माऊली टाकळकर (टाळ) यांनी सुरेल साथ केली.
वयाच्या 98व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचा डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. रवींद्र घांगुर्डे म्हणाले, एस. एन. बी. पी. संस्थेतर्फे पुस्तकी अभ्यासाबरोबरच कलेच्या शिक्षणासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. संस्कारक्षम विद्यार्थी घडल्यास चांगला समाज निर्माण होतो. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सांगीतिक वातावरण निर्माण होत असून स्वरांचे नंदनवन फुलविले जात आहे, ही मोलाची कामगिरी आहे.

शुद्ध धैवतातील ललत उलगडला प्रभातस्वरमध्ये

रागसंगीतावर आधारित प्रभातस्वर मैफलीत पंडित सुहास व्यास यांचे गायन
प्रभातस्वर मैफलीमध्ये पंडित सुहास व्यास यांचे सुश्राव्य गायन
अनवट प्रभातकालीन रागांची रसिकांना प्रभातस्वरमध्ये अनुभूती

पुणे : ग्वाल्हेर घराण्यातील शुद्ध धैवतामध्ये मारवा थाटात गायल्या जाणाऱ्या राग ललतमधील ‌‘मोरे घर आवे मोरा पिया तो कर हूँ मै आनंद बधाई‌’ आणि ‌‘भावंदा यारदा जोबता, दूजे नजर नही आंदावे‌’ या विलंबित एकतालातील दोन पारंपरिक बंदिशी रसिकांना ऐकायला मिळाल्या हे आजच्या प्रभातस्वर मैफलीचे वैशिष्ट्य! रागसंगीतावर आधारित या मैफलीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले.

स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफल रविवारी (दि. 6) डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या प्रांगणात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजित करण्यात आली होती. पंडित सुहास व्यास यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), आनंद बेंद्रे, आदित्य व्यास (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि गायक पंडित सुहास व्यास यांच्या मैफलीचे प्रभातस्वरमध्ये आयोजन करण्यात आले होते.

पंडित व्यास यांनी ललत या प्रभातकालीन रागाचे वैशिष्ट्य उलगडताना, आजच्या काळात गायला जाणारा ललत हा कोमल धैवतात गायला जातो परंतु ग्वाल्हेर घराण्यात परंपरेनुसार हाच ललत राग शुद्ध धैवताचा वापर करून गायला जात असे आवर्जून नमूद करून मैफलीची सुरुवात केली. ललतमधील बंदिशींनंतर पंडित व्यास यांनी राग भूपाल तोडी सादर केला. पंडित सी. आर. व्यास यांनी त्यांचे पहिले गुरू राजारामबुवा पराडकर यांची गुरूमहती वर्णन करताना रचलेली रूपक तालातील ‌‘तोरे गुन गाऊँ ध्यान समाऊँ‌’ ही बंदिश ऐकविली. त्यानंतर द्रुत तीन तालात ‌‘कैसे रिझाऊँ अब मनको‌’ ही जुन्या काळातील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित बबनराव मांजरेकर रचित बंदिश ऐकवताना गुरूसाठी तळमळ असलेल्या शिष्याच्या मनाची अवस्था दर्शविली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित सुहास व्यास यांनी राग देवगिरी बिलावलमधील पंडित अण्णासाहेब हळदणकर यांची ताल तिलवाडातील ‌‘या बना ब्याहान आया, नीके बनीके कारन सीस सेरा झुलाया‌’ ही रचना ऐकवून मैफलीची सांगता राग जोगियामधील पंडित सी.आर. व्यास यांनी आपले गुरू पंडित जगन्नाथबुवा यांचे वर्णन करणारी ‌‘हुं न कर छोडो‌’ सादर करून केली.

कलाकार व्युत्पन्नतेच्या अवस्थेत आला की, परिपक्व होऊ लागतो असे सांगून पंडित सुहास व्यास यांनी गायन शिकण्यातील विविध टप्पे युवा पिढीला समजावून सांगितले. आजच्या काळात गायन शिकताना रियाजाचा पुरेसा अवलंब केला जात नाही ज्यायोगे विद्यार्थ्याला ज्ञान मिळते परंतु तो उत्तम कलाकार म्हणून घडू शकत नाही. उत्तम गुरू विद्यार्थ्यामध्ये विश्वास निर्माण करतो, आपल्या शिष्याला पुढे आणतो असे सांगून पंडित व्यास म्हणाले, कलेच्या क्षेत्रात गुरूमहिमा महत्त्वाचा ठरतो कारण गुरू नेहमीच शिष्यातील सुप्त गुण हेरून त्याला मार्गदर्शन करतात. पंडित व्यास यांच्याशी प्रसिद्ध निवेदिका शैला मुकुंद यांनी संवाद साधला.
‌‘प्रभातस्वर‌’च्या आयोजनाविषयी माहिती देताना अपर्णा केळकर म्हणाल्या, रागसंगीताचा वारसा जपला जावा या हेतूने मैफलीचे आयोजन करण्यात येत आहे.
कलाकारांचा सत्कार पंडित अरविंदकुमार आझाद, श्रीराम शिंत्रे, श्याम तानवडे, मकरंद केळकर यांनी केला. तर सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.