रागसंगीतावर आधारित प्रभातस्वर मैफलीत पंडित सुहास व्यास यांचे गायन
प्रभातस्वर मैफलीमध्ये पंडित सुहास व्यास यांचे सुश्राव्य गायन
अनवट प्रभातकालीन रागांची रसिकांना प्रभातस्वरमध्ये अनुभूती
पुणे : ग्वाल्हेर घराण्यातील शुद्ध धैवतामध्ये मारवा थाटात गायल्या जाणाऱ्या राग ललतमधील ‘मोरे घर आवे मोरा पिया तो कर हूँ मै आनंद बधाई’ आणि ‘भावंदा यारदा जोबता, दूजे नजर नही आंदावे’ या विलंबित एकतालातील दोन पारंपरिक बंदिशी रसिकांना ऐकायला मिळाल्या हे आजच्या प्रभातस्वर मैफलीचे वैशिष्ट्य! रागसंगीतावर आधारित या मैफलीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले.
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफल रविवारी (दि. 6) डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या प्रांगणात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजित करण्यात आली होती. पंडित सुहास व्यास यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), आनंद बेंद्रे, आदित्य व्यास (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि गायक पंडित सुहास व्यास यांच्या मैफलीचे प्रभातस्वरमध्ये आयोजन करण्यात आले होते.
पंडित व्यास यांनी ललत या प्रभातकालीन रागाचे वैशिष्ट्य उलगडताना, आजच्या काळात गायला जाणारा ललत हा कोमल धैवतात गायला जातो परंतु ग्वाल्हेर घराण्यात परंपरेनुसार हाच ललत राग शुद्ध धैवताचा वापर करून गायला जात असे आवर्जून नमूद करून मैफलीची सुरुवात केली. ललतमधील बंदिशींनंतर पंडित व्यास यांनी राग भूपाल तोडी सादर केला. पंडित सी. आर. व्यास यांनी त्यांचे पहिले गुरू राजारामबुवा पराडकर यांची गुरूमहती वर्णन करताना रचलेली रूपक तालातील ‘तोरे गुन गाऊँ ध्यान समाऊँ’ ही बंदिश ऐकविली. त्यानंतर द्रुत तीन तालात ‘कैसे रिझाऊँ अब मनको’ ही जुन्या काळातील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित बबनराव मांजरेकर रचित बंदिश ऐकवताना गुरूसाठी तळमळ असलेल्या शिष्याच्या मनाची अवस्था दर्शविली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित सुहास व्यास यांनी राग देवगिरी बिलावलमधील पंडित अण्णासाहेब हळदणकर यांची ताल तिलवाडातील ‘या बना ब्याहान आया, नीके बनीके कारन सीस सेरा झुलाया’ ही रचना ऐकवून मैफलीची सांगता राग जोगियामधील पंडित सी.आर. व्यास यांनी आपले गुरू पंडित जगन्नाथबुवा यांचे वर्णन करणारी ‘हुं न कर छोडो’ सादर करून केली.
कलाकार व्युत्पन्नतेच्या अवस्थेत आला की, परिपक्व होऊ लागतो असे सांगून पंडित सुहास व्यास यांनी गायन शिकण्यातील विविध टप्पे युवा पिढीला समजावून सांगितले. आजच्या काळात गायन शिकताना रियाजाचा पुरेसा अवलंब केला जात नाही ज्यायोगे विद्यार्थ्याला ज्ञान मिळते परंतु तो उत्तम कलाकार म्हणून घडू शकत नाही. उत्तम गुरू विद्यार्थ्यामध्ये विश्वास निर्माण करतो, आपल्या शिष्याला पुढे आणतो असे सांगून पंडित व्यास म्हणाले, कलेच्या क्षेत्रात गुरूमहिमा महत्त्वाचा ठरतो कारण गुरू नेहमीच शिष्यातील सुप्त गुण हेरून त्याला मार्गदर्शन करतात. पंडित व्यास यांच्याशी प्रसिद्ध निवेदिका शैला मुकुंद यांनी संवाद साधला.
‘प्रभातस्वर’च्या आयोजनाविषयी माहिती देताना अपर्णा केळकर म्हणाल्या, रागसंगीताचा वारसा जपला जावा या हेतूने मैफलीचे आयोजन करण्यात येत आहे.
कलाकारांचा सत्कार पंडित अरविंदकुमार आझाद, श्रीराम शिंत्रे, श्याम तानवडे, मकरंद केळकर यांनी केला. तर सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.