Home Blog Page 661

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, : पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे काल (दि. १२)झालेल्या बैठकीत दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी बैठकीत २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमान तळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नवीन शहर करताना रस्ते 18 मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, विकास योजना तयार करताना लागत असलेला कालावधी लक्षात घेता प्राधिकरणांनी विकास योजना दोन टप्प्यात करावी. पहिल्या टप्प्यात रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, विज पुरवठा, स्मशान भूमी, दफन भूमी आदींचा समावेश असावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करावा.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार आकृतीबंध मंजूर करून देण्यात आलेला आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पदभरती करून या नियुक्त्या नियमित करून घ्याव्यात. प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

विकास योजनेत रस्ते 18 मीटर रुंदीचे करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकास योजनांचे नियोजन करताना चांगल्या दर्जाची सल्लागार एजन्सी नियुक्त करावी. प्राधिकरणांनी भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत प्रकल्प कार्यान्वित करावे. पाण्याचे उपलब्धता बघूनच बांधकाम परवानगी देण्यात यावी.

मुख्यमंत्री म्हणाले, पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळ, दुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा. सुरुवातीला पुणे महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस दिल्या होत्या. या बसेसमुळे अत्यंत कमी दरात नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता आला. महामंडळांने प्राधिकरणाकडे ५०० बसेसची मागणी केली आहे. या बसेस सीएनजी असाव्यात. भविष्यात कुठल्याही प्रकारे व्यवस्थापनाचा प्रश्न येणार नाही, याची काळजी घ्यावी. पुणे राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी देण्याची कारवाई तातडीने पूर्ण करावी.

आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी- केजरीवाल यांना मैत्रीचा संदेश,म्हणाले निवडणुकांत EVM, मतांचा फ्रॉड

नवी दिल्ली-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे मनात आहे, ते सर्व स्पष्ट आहे. सत्ता येते,सत्ता जाते. मात्र नाते आणि मैत्री कायम राहायला हवी, हेच सांगण्यासाठी आम्ही राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य यांनी काल राहुल गांधी आणि आज केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणुकांत EVM, मतांचा फ्रॉड झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला .

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी मागील दहा वर्षात दिल्लीत जे काम केले, ते दिल्लीतील सर्व जनतेला माहिती आहे. मात्र, ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा हात आणि आशीर्वाद होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाचे आभार मानायला हवे. काल राहुल गांधी आणि आज अरविंद केजरीवाल यांच्याशी माझी चर्चा झाली. इंडिया गट बंधन असो किंवा आम्ही सर्व घटक पक्ष. आमची पुढची स्टेप काय असावी? यावर चर्चा होणे आवश्यक आहे. कारण आपली लोकशाही पारदर्शक राहिलेली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जनतेचा आणि माध्यमांचा आवाज आम्ही बुलंद करत राहणार आहोत. रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर ती देखील लढण्याची आमची तयारी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो. मात्र आमच्याकडून जे नाते आहे, जी मैत्री आहे, ती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. अनेक मतदारसंघात मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली. त्यावर विचार करणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जेव्हा आमच्या भेट होतात, त्यावेळी निवडणुकीचे निकाल यावर आमच्यात चर्चा होतच असते. याचा अभ्यास केल्यानंतर वाढलेले मतदार आणि शेवटच्या एका तासात झालेले मतदान, याच्या व्हिडिओ फुटेजवर बोलायला निवडणूक आयोग तयार नाही. याच पॅटर्न महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली सगळीकडे दिसून येत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हे देश हिताची मुद्दा आहे आणि त्यामुळेच आम्ही सर्व पक्ष एकत्र येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या विरोधात आम्ही लढत राहणार आहोत आणि धोरणात्मक बदल करत राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने देखील पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आदित्य ठाकरे यांनी पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताचे स्वागत केले आहे.

राजन साळवी यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण दिला हाती

मुंबई-राजन साळवी यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे हे आपले राजकीय गुरु असल्याचे राजन साळवी यांनी म्हंटले आहे. ठाणे येथील आनंद आश्रमात राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा कालच राजीनामा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब झाले होते.

राजन साळवी हे शिवसेनेचे विशेषतः मातोश्रीशी एकनिष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील विनायक राऊत यांचीच बाजू उचलून धरल्याने राजन साळवी यांचे मन दुखावले होते. यामुळेच त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.

राजन साळवी यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदे म्हणाले की, जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारे सरकार आहे घरी बसणारे नाही. हे रिजल्ट देणारे सरकार आहे फील्डमध्ये उतरून 24X7 काम करणारे सरकार आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री काळात एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प आम्ही सुरू केले, कल्याणकारी योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेत अनेक नेते येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदार शिंदे गटात गेले होते. यावेळी मोजके आमदारच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकनिष्ठेने उभे होते, यात राजन साळवी यांचा समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले होते. तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती.

प्रगत एरोस्पेस उत्पादनासाठी भारत फोर्ज आणि लिब्हेर आले एकत्र

बंगळुरू (भारत), 13 फेब्रुवारी 2025 – एरो इंडिया 2025 दरम्यान, भारत फोर्ज आणि लिब्हेर यांनी जागतिक एरोस्पेस उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या भागीदारीची घोषणा केली. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत, भारत फोर्ज आपल्या पुणे (भारत) मुख्यालयात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारणार असून, ती 2025 मध्ये कार्यान्वित होण्याची योजना आहे.

नवीन प्रकल्प अत्याधुनिक फोर्जिंग आणि मशिनिंग तंत्रज्ञानासह रिंग मिल असणार आहे, ज्याद्वारे लँडिंग गीयर घटकांसह उच्च-प्रेसिजन घटकांचे उत्पादन केले जाईल.

भारत फोर्ज लिमिटेडच्या नेतृत्वाखालील ही गुंतवणूक, लिब्हेर आणि त्याच्या जागतिक ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या समाधानांची पूर्तता करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.

भारत फोर्ज लिमिटेडचे एरोस्पेस सीईओ गुरू बिस्वाल म्हणाले कीलिब्हेरसोबतचे हे सहकार्य एरोस्पेस उत्पादन क्षेत्रातील नवकल्पना आणि उत्कृष्टतेबाबत आमच्या सामा वचनबद्धतेचा पुरावा आहेरिंग मिल आणि लँडिंग गीयर शिनिंग क्षमतांमधील आमच्या गुंतवणुकीमुळेअचूक अभियांत्रिकी घटक प्रदान करण्यावर आणि एरोस्पेस उद्योगासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर आमचा भर असल्याचे स्पष्ट होते.”

लिब्हेरएरोस्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन एसएएसचे चीफ कस्टमर ऑफिसर ॅलेक्स व्हिलँडर यांनी सांगितले कीही अत्याधुनिक प्रकल्प स्थापन करण्यासाठी भारत फोर्जसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहेया प्रगत तंत्रज्ञानांच्या एकत्रीकरणामुळे आम्हाला एरोस्पेस क्षेत्राच्या कठोर मानकांची पूर्तता करता येईल, तसेच आमची पुरवठा साखळी क्षमता मजबूत करता येईल.”

‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर

महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने ! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी! ‘स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. 

युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित रणरागिणी ताराराणी या नाटकाचा शुभारंभ येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे होणार आहे. चंद्रकांत सावंत हे या नाटकाचे मार्गदर्शक तर ब्रिगेडियर सुधीर सावंत हे रणरागिणी ताराराणी नाट्यनिर्मितीचे संकल्पक आहेत.  

“ताराराणींचा इतिहास हा जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला देदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा; या उद्देशाने आम्ही या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे,” असे सरस्वती एज्युकेशन सोसायटी व श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या रणरागिणी ताराराणी या नाटकात ५० कलाकारांची फ़ौज असणार आहे.

“नाटकात काम करायचं, या डेडिकेशनने नाटकातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. रंगमंचावर या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळा देखणा प्रयोग पहायला मिळणार आहे. जो रसिकांना वेगळा आनंद देईल,” असा विश्वास दिग्दर्शक विजय राणे यांनी व्यक्त केला.

“ऐतिहासिक संदर्भ घेत हा प्रेरणादायी लढा रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल,” असा विश्वास लेखक युवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

तनीषा वर्दे (ताराराणी), कृष्णा राजशेखर (येसूबाई), सिद्धी घैसास (जानकी), चेतन म्हस्के (शंभूराजे), अरुण पंदरकर (राजाराम), उमेश ठाकूर (संताजी/रामाजी/ मिरखान), ऋषिकेश जोशी (धनाजी), सुनील गोडसे (औरंगजेब), मोहिका गद्रे (चेन्नमा/झीनत), मुकुल देशमुख (जुल्फीकार) आदि कलाकारांच्या रणरागिणी ताराराणी या नाटकात भूमिका आहेत. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटी निर्मित,अद्वैत थिएटर्स प्रकाशित रणरागिणी ताराराणी नाटकाचे व्यवस्थापन हरी पाटणकर सांभाळत आहेत.

श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) मुंबई ही संस्था गेली ८२ वर्ष शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य अशा  विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या शिवजयंतीला रणरागिणी ताराराणी या नाटकाच्या  शुभारंभाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, येथे दुपारी ३.३० वा. रंगणार आहे.

“समाजसेवकांचे कार्य दीपस्तंभासारखे” – डॉ. माधवी वैद्य

पुणे: “कथा, कादंबऱ्या आणि कवितांमध्ये दुःख व्यक्त करता येते, पण तुम्ही जे दुःख जगता, ते वेगळेच असते. शोषित, पीडित आणि दुःखी व्यक्तींसाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजसेवकांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. माधवी वैद्य यांनी केले.

मानव्य संस्थेच्या संस्थापिका कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे पुरस्कार’ डॉ. इरा शहा (एम.डी. पेडियाट्रिक्स) आणि ‘कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कार’ स्वयंप्रेरित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांना प्रदान करण्यात आला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील नवलमल फिरोदिया सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे पुरस्काराच्या विजेत्यांना रुपये १५,००० रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, तर कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कारासाठी रुपये १०,००० रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्काराचे पहिले वर्ष होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. गिरीश कुलकर्णी, विनया देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, “दुसऱ्याच्या दुःखाचा शोध घेऊन त्यांच्या आयुष्यासाठी कार्य करणे हे सोपे काम नाही. स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पाडून तुम्ही समाजसेवेत झोकून देता, ही बाब प्रेरणादायी आहे. आमच्यात दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधण्याची क्षमता नाही; आम्ही फक्त संवेदना व्यक्त करू शकतो. विजयाताईंच्या कार्यातून माणसांमधील देवत्व पाहण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे समाजाने त्यांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे.”

सत्काराला उत्तर देताना डॉ. इरा शहा म्हणाल्या, “जीवन आनंदाने जगावे. भविष्याची चिंता करत राहिल्यास वर्तमानाचा आनंद घेता येत नाही. २००१ मध्ये मी वैद्यकीय क्षेत्रात कार्य सुरू केले. एड्सबाबत जनजागृती नव्हती, औषधे नव्हती, पण आज संशोधनामुळे हा आजार नियंत्रणात आला आहे. मात्र, समाज आजही एड्सग्रस्तांना स्वीकारायला तयार नाही, ही खंत आहे.”

संतोष पवार यांनी सांगितले, “हा पुरस्कार माझ्या कार्याला आणि संस्थेला मिळालेला सन्मान आहे. यामुळे आमच्या कार्याला नवे बळ मिळेल. स्वयंप्रेरित संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली २५ वर्षे एड्सग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी झटत आहोत. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण समाजाच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे जात आहोत.”

डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले, “विजयाताईंच्या कार्यामुळे आम्हाला नवी चेतना मिळते. मानव्य आणि स्नेहालय संस्था त्यांच्याच प्रेरणेने कार्यरत आहेत. त्यांच्या स्वप्नातील कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

अध्यक्षीय भाषणात शिरीष लवाटे म्हणाले, “मानव्य संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘माहेरवासिमाहेरवाशीणीनी’साठी ‘नवांकुर’ उपक्रम सुरू केला जाणार आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन ढवळे यांनी केले.

पुरस्कार विजेते आणि त्यांचे कार्य डॉ. इरा शहा – बी.जे. वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन, मुंबई येथे बाल संसर्गजन्य आजार आणि यकृत-गॅस्ट्रो विभागाच्या प्रमुख, तसेच नानावटी हॉस्पिटलमध्ये सल्लागार.

संतोष पवार – संगमनेर येथे स्वयंप्रेरित संस्था स्थापन करून गरीब, गरजू व एचआयव्ही संसर्गित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व पुनर्वसन कार्य. ते व त्यांच्या पत्नीने गेली २५ वर्षे शाळेत राहून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाची जबाबदारी सांभाळली.

वातावरणातील आर्द्रतेपासून पाणी तयार करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने युनिट्स बसवले

·         दररोज 8,000 लीटर पिण्यायोग्य पाणी निर्मितीची या युनिट्सची उत्पादन क्षमता आहे

·         या उपक्रमाचा लाभ बेंगळुरूचेन्नईहैदराबाद आणि मुंबई येथील 4,200 कर्मचाऱ्यांना होतो

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने आपल्या उपक्रमांची शाश्वतता वाढविण्याच्या दृष्टीने वातावरणातील आर्द्रतेपासून पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे. वातावरणातील आर्द्रतेपासून दररोज 8,000 लीटर पिण्यायोग्य पाणी तयार करण्यासाठी बँकेने युनिट्स स्थापित केली आहेत, ज्यामुळे बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईतील प्रत्येकी एक आणि चेन्नईमध्ये दोन अशा पाच कार्यालयांतील 4,200 कर्मचाऱ्यांना फायदा झाला.

वातावरणातील आर्द्रतेचे रूपांतर 100% सूक्ष्मजंतूमुक्त, ताजे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यात करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे युनिट ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटर (AWGs) म्हणून ओळखले जातात. द्रवीभवनाने पाण्याच्या वाफेचे थेंबांमध्ये रूपांतर होते, आणि त्यानंतर शुद्धतेसाठी त्यांना अनेक चाचण्यांमधून जावे लागते. प्रक्रियेच्या शेवटी आवश्यक मिनरल्स त्यात जोडली जातात. AWGs संपूर्ण वर्षभर पाणी तयार करू शकतात कारण ते सभोवतालचे तापमान (18°C- 45°C) आणि सापेक्ष आर्द्रता (25%-100%) मध्ये कार्य करू शकतात.

आयसीआयसीआय बँकेचे ग्रुप चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर श्री. सौमेंद्र मट्टागजसिंग म्हणाले, “आम्ही आमचा व्यवसाय शाश्वत उपाय आणि जबाबदारीने पार पाडण्यासाठी तसेच आमच्या कामकाजामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत. वातावरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आमची रणनीती पर्यावरणीय कारभाराच्या 4R (रिड्युसरियूजरिसायकल आणि रिस्पॉन्सिबल डिस्पोजल) या तत्त्वानुसार आहे. वातावरणातील आर्द्रता ही पृथ्वीवरील सर्व नद्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर ताज्या पाण्याचा सोर्स आहे. या नूतनीकरणीय साधनाचा लाभ घेण्यासाठीपाण्याची वाफ पिण्याच्या पाण्यात रूपांतरित करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयात AWG स्थापित केली आहे. या उपक्रमामुळे वातावरणातील ओलाव्याचा चांगला वापर करण्याबरोबरच पॅकेज्ड  पाण्यावरील आपले अवलंबित्व कमी होते.”

ESG धोरणाच्या अंतर्गत ICICI बँक शाश्वततेसाठी उपक्रम राबवत आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2032 पर्यंत स्कोप 1 आणि स्कोप 2 उत्सर्जनामध्ये कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 4.95 दशलक्ष चौरस फुटांवर व्यापलेल्या बँकेच्या 180 हून अधिक साइट्स इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) प्रमाणित (31 मार्च 2024 पर्यंत) आहेत. बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बँकेचे सर्व्हिस सेंटर आर्थिक वर्ष 2024 मध्ये ‘नेट झिरो वेस्ट’ प्रमाणित म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेने आर्थिक वर्ष 2024 मध्ये तिचा अक्षय्य ऊर्जा वापर 75.73 दशलक्ष kWh एवढा चौपट केला. आर्थिक वर्ष 2022 पासून 3.7 दशलक्ष झाडे लावली आणि शाळा आणि जलकुंभांमध्ये दरवर्षी 25.8 अब्ज लीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली.

* स्कोप 1 उत्सर्जन हे थेट हरितगृह (GHG) उत्सर्जन आहे जे एखाद्या संस्थेच्या मालकीच्या किंवा नियंत्रित स्त्रोतांमधून होते.

* स्कोप 2 उत्सर्जन हे अप्रत्यक्ष GHG उत्सर्जन आहे जे वीज, स्टीम, उष्णता किंवा शीतलक खरेदीशी संबंधित आहे.

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स शुक्रवारपासून 

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे आयोजन

पुणे: विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस.आर.पी. एफ. मैदानावर दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया आणि प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष अभय छाजेड, क्रीडा संघ सदस्य समीक्षा वानवे, सनी गुंजाळ, ऋचा बाणकर, पायल जयस्वाल, प्रथम चांडक, कार्तिक हादके, नमन पारेख, आदित्य पवार, कर्ण तोरस्कर, कविता ताजने उपस्थित होते.

बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८ ते २३ या वयोगटातील सुमारे ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडू खेळणार आहेत. यामध्ये मुलांचे आणि मुलींचे एकूण ४३ संघ सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे आणि पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

स्पर्धेमध्ये पुण्यातील १४ वास्तुकला महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये  मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) , डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील  स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहेगाव (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.), अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (ए. सी. ओ. ए.),  डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), ब्रिक स्कूल ऑफ  आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.), आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) , भारती विद्यापीठ डीम्ड युनीव्हर्सिटी  कॉलेज ऑफ  आर्किटेक्चर (बी. व्ही. डी. यू.), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.),एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.),मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्विरॉन्मेंटल डिझाईन,डी.वाय.पी.सी.ई.टी. कोल्हापूर,श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.)आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मायरा मुतगीने एकल नृत्यामध्ये पटकावला प्रथम क्रमांक

पुणे:  अनास इंडिया द्वारे आयोजित अखिल भारतीय १६ व्या राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत नृत्य दर्पण या नृत्य प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूलची पाचवी ची विद्यार्थीनी मायरा मुतागीने प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राउत यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.
मायराच्या पायातील घंगरुचा आवाज आणि चेहर्‍यावरील सुंदर स्मित हास्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. नृत्यांगणा मायराचे घुंगरू आणि स्मित हास्य दोन्ही एकाच सुरात डोलत होते. ती आपल्या नृत्यातून सुंदर झंकार निर्माण करीत होती. सूर, लय, वेग, मुद्रा प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये तीची एक लय होती. उत्कृष्ट सादरीकरणाबरोबरच तीचे नृत्य एक अदभूत संयोजन आणि अभिव्यक्ती असून याच जोरावर तीने प्रथम क्रमांक पटकाविला. मायरा मुतागीने भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्य प्रकारातील कनिष्ठ वयोगटातील एकल नृत्यात भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिला सत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणूनही गौरविण्यात आले.
तीने शुभश्री राऊतराय यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याची तयारी केली होती.

लोकसंस्कृतीमध्ये तमाशाचे महत्व या विषयावर रंगला परिसंवाद.

0

श्री. छ. शाहु कला मंदिर येथे रसिकांची मोठी गर्दी

सातारा- आजच्या आधुनिक युगात देखील ढोलकी फडाचा तमाशा लोकांचे रंजन आणि उद्बोधन घडवीत आहे ढोलकी हलगीची सलामी, गाणं, मुजरा, गवळण, रंगबाजी, फारसा, वग हा तमाशाचा अविष्कार आजही कायम आहे लोकसंस्कृतीमध्ये तमाशा सारख्या रंजनपर लोककलेचे महत्व आढळ ध्रुव पदासारखे आहे. असे मत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे यांनी सातारा येथील ढोलकी फडाच्या तमाशा महोत्सवात नोंदविले.

सातारा येथील श्री. छ.शाहु कला मंदिर येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित “लोकसंस्कृतीमध्ये तमाशा कलेचे महत्व”या लोककला परिसंवादानिमित्ताने राज्य सरकारने चर्चा घडवून आणली.
सदर परिसंवाद लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी लोकसाहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, लोककलेचे मार्गदर्शक आणि मंत्रालयाचे जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र शासनाने बहुजनांच्या या कलेची दखल घेतली आणि त्यासाठी मला योगदान देता आले हे अभिमानाची गोष्ट आहे. लोककलावंतांचे सर्व्हेक्षण सरकारने तातडीने करावा. अन त्यांना कलावंत म्हणून ओळखपत्र दयावे . असे विचार ज्येष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असताना ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य आणि लोककला यांचे योगदान मराठी भाषेच्या जडणघडणीत नजरेआड करून चालणार नाही, असे मत तमाशा आणि लोककलेचे अभ्यासक प्रभाकर होवाळ यांनी व्यक्त केले.

पोलीस स्फुर्तीसाठी तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम

पुणे- दगदगीच्या आणि धावपळीच्या आयुष्यातून विरंगुळा म्हणून किंवा थोडे थांबून पुन्हा स्फूर्ती मिळावी म्हणून पोलिसांसाठी पुनीत बालन ग्रुप ने तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन, इ. कर्तव्यावर तैनात असल्याने पोलीस अधिकारी/अंमलदार समवेत त्यांचे कुटूंबिय देखील ताणतणावामध्ये असतात मागील २०२४ हे वर्षे लोकसभा/विधानसभा निवडणुका विविध महत्वाचे बंदोबस्त, व्हिव्हिआयपी दौरे यामध्ये व्यस्त गेल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या कुटुंबियासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता यावेत व उत्साहाचे वातावरण मिळावे यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम दि.१५/०२/२०२५ रोजी सांय.०५/३० ते १०/०० वा.चे पर्यत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रायोजक पुनित बालन (पुनित बालन ग्रुप) हे आहेत.

तरंग-२०२५ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक,मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माधुरी मिसाळ,इतर मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर कार्यक्रमांतर्गत ‘अजय अतुल लाईव्ह’ संगीत रजनी हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आलेला असुन बॉलिवुड व मराठी सिने सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पुणे शहरातील सर्व शांतता कमिटी / मोहल्ला कमिटी सदस्य व इतर महत्वाचे व्यक्ती तसेच सर्व प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक व प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

खासदार सुनेत्रा पवार यांनी तीन हजार महिलांना उपलब्ध करून दिला रोजगार

0

मुंबई- महिला सक्षमीकरनासाठी एक पाऊल पुढे टाकत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजितदादा पवार यांनी जवळपास तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ लवकरच जगभर साजरा केला जाईल मोठ्या मोठ्या भाषणात आणि लेखात महिला सक्षमीकरणाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातील पण एक महिला महिलांसाठी काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारामती हाय-टेक्सटाईल्स पार्क असल्याचा दावा करण्यात येतो आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांअंतर्गत असलेल्या उमेद या कार्यालयामार्फत बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या कि,’ या प्रदर्शनात बारामती हाय-टेक्सटाईल्स या कंपनीचा माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला आहे या स्टॉल ला भेट दिली त्यावेळी महिलांना रोजगार देण्याबाबत सुरु असलेल्या या कामाची व्याप्ती समजली.

महिलांना कायम रोजगार मिळावा त्यांच्या हाताला काम मिळावे या हेतूने बारामतीत आपल्या माध्यमातून जवळपास मागील पंधरा वर्षापासून विविध कामे सुरु आहेत. बारामती येथील एमआयडीसी मध्ये हजारो महिलांना प्राधान्याने काम दिली जात आहेत.याच भागात मागील पंधरा वर्षांपूर्वी बारामती हाय-टेक्सटाईल्स लिमिटेड हा प्रकल्प केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या एस.आय.टि.पी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात गारमेंट्स’ची सोळा युनिट चालू करण्यात आलेली आहेत यामध्ये प्रसिद्ध कॉटन किंग तसेच पेपरमिंट अशा अनेक नामाकिंत कंपन्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील जवळपास तीन हजारापेक्षा जास्तीच्या महिलांना या पार्क मधील विविध कंपन्यातुन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि या सर्व कंपन्याच्या माध्यमातून जवळपास प्रत्यक्ष अप्रतेक्ष असा पाच हजार महिलांना कायमचा रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला सक्षमीकरणसाठी खऱ्या अर्थाने उचलले हे एक पाऊल असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय वाहिनी नेहमीच अग्रेसर असतात. महिलांच्या उपजत गुणांना वाव दिला तर कोणतीही महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होते या विश्वासाने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांच्या हाताला काम दिले तर उत्कृष्ट निर्मिती होऊ शकते या विश्वासाने बारामती या टेक्स्टाईल्स कंपन्यांनी दाखवून दिले आहे. आज अनके नामांकित कंपन्यांमध्ये महिलांना काम दिले जात आहे त्यांच्या राहत्या गावापासून कारखाण्यापर्यंत सुरक्षित ने आण करण्याची जबाबदारी देखील या कंपंन्यांवर देण्यात आली आहे. गावाजवळ रोजगार मिळाल्याने महिला आर्थिक स्वावलंबी बनल्या आहेत.निसर्ग संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने आदरणीय वहिनींच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया हि सामाजिक संस्था देखील चालवली जाते. ज्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.वृक्षलागवड हा त्यातील प्रमुख उपक्रम आहे. काटेवाडी हे गाव ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर आहे तसेच हे गाव निसर्ग संवर्धनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वृक्ष प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बारामती आणि आजूबाजूची गावे झाडांनी हिरवीगर्द झाली आहेत याचे श्रेय देखील सुनेत्रावहिणी यांनाच जाते.केवळ रोजगार निर्मितीत नाही तर आरोग्य क्षेत्रात देखील हजारो लोकांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया बारामती करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व प्रसिद्धी पासून दूर राहून अनेक लोक उपयोगी जनसेवेसाठी अखंड काम वहिनींच्या माध्यमातून सुरुच आहेत. यातील अनेक कामे वाखाणण्याजोगी आहेत.समाजातील प्रत्येक महिला स्वावलंबी सुरक्षित आणि रोजगारक्षम झाली पाहिजे यासाठी खासदार सुनेत्रा वाहिनी पवार यांनी सुरु केलेले हे काम राज्यासाठी दिशादर्शक आणि महिला सक्षमीकरणासाठी पुढचे पाऊल ठरेल असा विश्वास आहे.

सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे, १२ फेब्रुवारी: पुण्यातील लोकप्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने १५ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत “सुपर सनी विक” या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे आणि या स्पर्धांचे मुख्य समन्वयक प्रताप जाधव यांनी सांगितले की गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीचा संदेश समाजामध्ये देण्यासाठी, तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे या उद्देशाने या स्पर्धा होणार असल्याचे समन्वयक उमेश वाघ यांनी सांगितले.
या सप्ताहात पुणे व पिंपरी चिंचवड शहरास जोडणारी, व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन, रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक संघटनेच्या मान्यतेने व सहकार्याने रविवार, २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेले पुणे शहर व औद्योगिक क्रांतीचे प्रतिनिधित्व करणारे पिंपरी चिंचवड यांच्यातील सहकार्य व सामंजस्यचा दुवा दर्शवणारी ही स्पर्धा असेल.
ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी प्रकारात होणार आहे. महाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये २५,००० हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉन मधील सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, पदक, ई टायमिंग प्रशस्तिपत्रक, वैद्यकीय सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ५,५५,५५५ रुपयांची पारितोषिक देण्यात येताल. या स्पर्धेची तांत्रिक नियोजन यश रायकर पाहणार आहेत. इच्छुक स्पर्धकांना या स्पर्धेची नांव नोंदणी दि. १४ फेब्रुवारीपर्यंत www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर करता येईल.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मा. देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा शनिवार, १५ फेब्रुवारी आणि रविवार १६ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. युवा खेळाडूंना प्रोत्सहण देण्याच्या सनी विनायक निम्हण यांच्या धोरणानुसार होणा-या या स्पर्धेत एकूण ७०,५५५ रुपयांची बक्षिसे, प्रशिस्तपत्र आणि विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक सामना जिंकणा-या संघास रुपये १००० आणि हरणा-या संघास रुपये ५०० रुपये उत्तेजनार्थ देण्यात येणार असून या स्पर्धेचे हे आकर्षण ठरले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

स्केटिंग अस्सोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने व सहकार्याने रविवार, १६ फेब्रुवारी रोजी हॉटेल शिवांजली पाषाण समोरील रोड, सूस येथे रोलर स्केटिंग च्या रोड रेस स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन जिल्हा असोसिएशनचे सचिव मा. अशोक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून ह्या स्पर्धा ६ वर्षाखालील , ६ ते ८ वर्षे, ८ ते १० वर्षे , १० ते १२ वर्षे , १२ ते १४ वर्षे व १४ वर्षावरील मुले आणि मुलींसाठी घेण्यात येणार आहेत. क्वाड , इनलाइन , रेक्रिएशनल इनलाईन ह्या प्रकारात ह्या स्पर्धा घेण्यात येतील. तसेच विशेष मुले आणि मुलींसाठी विशेष वेगळी स्पर्धा घेण्यात असल्याची माहीती समन्वयक उमेश वाघ यांनी दिली.
विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चँम्पियनशिप २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४०० कराटेपट्टूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेनसेई संतोष पवार यांनी दिली. मुले व मुलींसाठी या स्पर्धा २३ फेब्रुवारी रोजी लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी येथे होणार आहेत. या स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ वर्षाखालील आणि १४ वर्षावरील मुले व मुलींसाठी होतील.
सोमेश्वर चषक २०२५ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. द लाईफ स्पोर्टस्, सोमेश्वर वाडी, पाषाण येथे या स्पर्धा ११, १३, १५, १७ वर्षे वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील. तर वरीष्ठ गटात पुरुष व महिलांसाठी दुहेरीच्या स्पर्धा रंगणार आहेत. मंत्रेशी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत असून विजेत्यांना रोख पारितोषीकांसह सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.
याशिवाय स्वच्छ भारत या विषयावर १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे आहे. इयत्ता १ ली आणि २ री, इयत्ता ३री, ४थी आणि ५वी व इयत्ता ६ वी , ७वी आणि ८वी अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. मा. अमित मुरकुटे यांनी या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली असून एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी, आनंदबन क्लब, औंध, कै. संजय निम्हण ग्राम संस्कृती उद्यान, पाषाण आणि राणी लक्ष्मी गार्डन, खडकी येथे चित्रकला स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग निश्चित केला असून प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र, मेडल देण्यात येणार आहेत तर विजेत्यांना विविध स्वरुपात बक्षिसे देण्यात येतील.

मराठा उद्योजकांचे ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ पुण्यात संपन्न

महाराष्ट्रातून ३०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग ; मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे आयोजन
पुणे : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे मराठा उद्योजकांचे ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ चे आयोजन पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील ३०० हून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला. व्यवसाय हा समाजामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकतो, यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे, ही धारणा ठेवून परिषदेचे आयोजन करण्यात आले.  

कार्यक्रमात यशस्वी व उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण,  भारती मुरकुटे, ऋतुजा मोरे, किशोर जगताप, गौरव मोरे, देवेंद्र कानवडे, रोहित माने, चैत्राली कोंढरे, रेश्मा थोपटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात  ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ च्या विषेशांकाचे प्रकाशन झाले.

बांधकाम, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि शिक्षण व व्यावसायिक सेवा क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील दिग्गज व नामवंत उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. तसेच यातून देशांतर्गत व्यवसायवृद्धी व्हावी, हा यामागील उद्देश होता.

अरुण निम्हण म्हणाले, सन २०१४ साली या असोसिएशनची स्थापना झाली असून. देशाच्या विकासासाठी उद्योगांचा विकास होणे गरजेचे आहे, ही धारणा ठेवून हा एकत्रीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा समाजातील उद्योजकांनी इतर संस्थांसोबत संलग्न होत कशा प्रकारे व्यवसायवृद्धी करता येईल, हे पाहणे देखील गरजेचे आहे. व्यवसायात अनेक आव्हाने असून एकमेकांच्या सोबतीने पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला GBS आजाराचे गांर्भीय नाही: नाना पटोले

आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे?

मुंबई, दि. १२ फेब्रुवारी २५
राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. काल मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाय योजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्यावे लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.

जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाय योजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते पण जीबीएस सारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.