ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे शनिवारी ‘परंपरा’ संगीत मैफलीचे आयोजन
पुणे : ऋत्विक फाऊंडेश फॉर परफॉर्मिंग आर्टस् आयोजित ‘परंपरा’ या मालिकेअंतर्गत पखवाज आणि बासरी वादनाची सुरेल मैफल रंगणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्, वेदभवन जवळ, कोथरूड येथे करण्यात आले आहे.
शिष्यांना आपल्या गुरुंसोबत मैफलींना जाण्याची संधी उपलब्ध होते; परंतु त्यांच्यासह सादरीकरणाची संधी क्वचितच मिळते. ‘परंपरा’ मैफलीअंतर्गत ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या माध्यमातून सुप्रसिद्ध पखवाज वादक सुखद मुंडे यांच्यासह त्यांच्या शिष्यांना तसेच सुप्रसिद्ध बासरी वादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या शिष्यांना एकाच मंचावर वादनाची संधी प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सुखद मुंडे यांच्यासह कृष्णा नवगिरे, हर्ष पाटील, मंगेश खैरनार आणि प्रदिप दराडे हे शिष्य पखवाज वादन करणार असून त्यांना संतोष घंटे संवादिनीवर साथ करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहडकर, लितेश जेठवा, मेहुल प्रजापती, तनय कामत, रिंगचड ब्रह्मा आणि रेणुका लिखिते बासरी वादन करणार आहेत. वादकांना महेशराज साळुंके तबलासाथ करणार आहेत.
सुखद मुंडे यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांचे वडिल सुप्रसिद्ध पखवाज वादक पं. माणिक मुंडे यांच्याकडून पखवाज व तबला वादनाची तालीम घेतलेली आहे. सुखद यांनी जगविख्यात गायक-वादकांना तसेच अनेक कथक नृत्याविष्कारांना पखवाजची साथ केली आहे. देश-विदेशात अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे वादन झाले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून पखवाज वादनात एम्.ए. पदवी प्राप्त केली आहे.
रूपक कुलकर्णी हे जगविख्यात बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पहिले गंडाबंध शिष्य आहेत. वडिल पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्यामुळे रूपक यांना संगीतात रुची निर्माण झाली. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांना धृपद व खयाल गायकीचेही मार्गदर्शन मिळाले आहे. पंडित रूपक कुलकर्णी यांनी देशविदेशात बासरी वादनाच्या अनेक मैफली गाजविल्या आहेत तसेच विविध संगीत महोत्सवांमध्ये बासरी वादन केले आहे. मधुर आलाप, मंत्रमुग्ध करणारी लयकारी आणि सर्जनशीलता हे रूपक कुलकर्णी यांच्या वादनाचे वैशिष्ट आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पखवाज, बासरी वादनाची रंगणार मैफल : गुरू-शिष्यांचे सहवादन
नृत्याच्या माध्यमातून विशेष मुलांचा परिवर्तनात्मक प्रवास
पुणे : कोणत्याही शारीरिक मर्यादा असल्या तरी प्रत्येक मुलाला व्यक्त होण्याचा हक्क आहे. या भावनेतून विशेष मुलांचा नृत्याविष्कार पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते अंतर्नाद आयोजित विशेष मुलांच्या नृत्यसादरीकरणाचे!
अंतर्नादतर्फे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात अंतर्नादच्या संचालिका, मानसोपचारतज्ज्ञ अश्विनी पाटील यांच्या पुढाकारातून डान्स ऑरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डाउन सिंड्रोम, ऑटिझम आणि विशेष मुलांना नृत्याद्वारे नवी उमेद मिळावी या हेतूने अंतर्नादच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. या नंतर देशभक्तीपर गीते तसेच प्रसिद्ध चित्रपट गीतांवर विशेष मुलांनी आत्मविश्वासने ठेका धरला. या नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. आपले मूल मंचावर आत्मविश्वासाने नृत्य सादर करताना पाहून पालकांचे डोळे पाणावले. विशेष मुलांबरोबरच त्यांचे पालक, थेरपिस्ट आणि समन्वयक देखील या नृत्य सादरीकरणात उत्साहाने सहभागी झाले.
विशेष मुलांना मार्गदर्शन करणे पुरेसे नाही, तर या मुलांसाठी विविध उपक्रम आयोजित करणे गरजेचे असते. नृत्य हा त्यातील एक विशेष प्रकार. कार्यक्रमाचे आयोजन करताना सराव सत्रे, योग्य मंचाची निवड, वेशभूषा तसेच इतर व्यवस्था यासाठी योग्य ते नियोजन करावे लागते. जेव्हा ही मुले मंचावर आत्मविश्वासाने नृत्य सादर करतात, तेव्हा ती समाजाच्या दृष्टीकोनाला नवा आयाम देतात, असे अश्विनी पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा वझे आणि आदिती कुलकर्णी यांनी केले.
‘तळ्यातले आकाश’ कवितासंग्रह दीपाली दातार यांचा अमृतानुभव : हेमकिरण पत्की
पुणे – कवयित्री दीपाली दातार यांचा ‘तळ्यातले आकाश’ हा कवितासंग्रह म्हणजे त्यांचा अमृतानुभव आहे, असे मत ज्येष्ठ कवी, लेखक हेमकिरण पत्की यांनी व्यक्त केले. कवितालेखन केवळ स्वतः पुरते नसते. स्वतःसहित सर्वांनाच कविता उजळवत असते, हा अनुभव दातार यांच्या कविता देतात, असेही ते म्हणाले.
सृजनसंवाद प्रकाशनाच्या वतीने कवयित्री, लेखिका दीपाली दातार यांच्या ‘तळ्यातले आकाश’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्की बोलत होते. याप्रसंगी कवयित्री दीपाली दातार, ज्येष्ठ कवयित्री, लेखिका अंजली कुलकर्णी आणि प्रकाशक गीतेश शिंदे, मुकुंद दातार, अनिरुद्ध दडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
हेमकिरण पत्की म्हणाले,“शीर्षकापासूनच हा कवितासंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. कवयित्रीची सत्य, सौंदर्य आणि शिवत्वाची ओढ या कवितांमधून व्यक्त झाली आहे. कवयित्रीचे भावोत्कट स्फुरण संवेदनशीलपणे इथे प्रकट झाले आहे”.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, “कवयित्री दीपाली यांच्या आत्मशोधाची ही कविता आहे. जीवनजाणिवांचा, स्त्रीपणाचा, मानवी नातेसंबंधांचा, निसर्गाच्या रूपांचा आणि आत्मरूपाचा शोध घेण्याचा ध्यास या कविता व्यक्त करतात. हा शोध दीपाली यांची कविता सजगतेने, प्रगल्भतेने आणि तीव्रोत्कट पद्धतीने घेताना दिसते”.
मनोगत मांडताना दीपाली दातार म्हणाल्या, “हा माझा पहिलाच कवितासंग्रह आहे. माझ्या भाववृत्ती आणि जगणं यांची एकात्म अभिव्यक्ती कवितांमधून अभिव्यक्त झाली असावी. आध्यात्मिक धारणांचे आशयसूत्र असून, निसर्ग संवेदन, संवादाची ओढ यातून कलात्मक विकसनाला अवकाश मिळतो का, हे शोधण्याचा एक प्रयत्न आहे”.
प्रकाशक गीतेश शिंदे यांनी कलाकारांचे, लेखक, कवींचे सृजन रसिकांपर्यंत नेण्यामधील दुवा म्हणून काम करत असल्याचा उल्लेख केला. सर्जनशीलतेला कोंदण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचे मनोगत वाचून दाखवण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दीपाली दातार यांच्या ‘तळ्यातले आकाश’ या कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन अनिरुद्ध दडके, संजय गोखले आणि वृषाली पटवर्धन यांनी केले. श्रुती विश्वकर्मा मराठे यांनी काही कवितांचे गायन केले. व्हायोलीनची साथ अनुप कुलथे यांनी केली. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद दातार यांनी स्वागत केले.
शिवाजीनगर बसस्थानकाच्या बांधकामाच्या आढाव्यासाठीउद्या मंत्रालयात बैठक
पुणे : येथील शिवाजीनगर बसस्थानकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी उद्या (बुधवारी) सकाळी मंत्रालयात बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
ही बैठक उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या दालनात होणार असून, या बैठकीला आमदार शिरोळे यांच्यासह वित्त, परिवहन, नगरविकास खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, महामेट्रो, पुणे चे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित रहाणार आहेत.
महामेट्रो च्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक शासकीय दूध डेअरीच्या शेजारी हलविण्यात आले. महामेट्रोचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची गैरसोयही आता टाळली जायला हवी, याकरिता लवकरात लवकर शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागी उभे रहावे, यासाठी आमदार शिरोळे यांनी उपमुख्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेऊन, या कामात त्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली होती. मंत्रालयात संबंधित खात्यांचे सचिव आणि अधिकारी यांची बैठक घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक होणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.
राहुल सोलापूरकरवर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाइं (आठवले) ची मागणी
सोलापूरकरच्या घराबाहेर रिपाइं चे तीव्र आंदोलन
पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सोलापूरकर करत आहे. सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज सोलापूरकरच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शैलेन्द्र चव्हाण, असित गांगुर्डे, महेंद्र कांबळे, मंदार जोशी, बसवराज गायकवाड, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, विरेन साठे, शाम गायकवाड, नीलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, अविनाश कदम, अविनाश गायकवाड, उमेश कांबळे, आकाश बहुले, अप्पा वाडेकर,खंडू शिंदे, मिना गालटे, कोथरूड अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ, केशव पौळे, बाळासाहेब खंकाल, दीपक सगर, गंगाधर ओव्हाळ, दत्ता चव्हाण, अरविंद शिंदे, नीलेश आगळे, उज्वला सर्वगौड, अण्णा लोखंडे, विलास पाटोळे, बी. पी. शेजवळ, पासोटे मामा, शिवाजी कांबळे, बापू गोरे, महादेव खळगे, स्वप्नील जाधव, गोविंद साठे, नीलेश आगळे, रोहित कांबळे,रमेश तेलवडे यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, राहुल सोलापूरकर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. ज्या माणसाने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? यांची पूर्णपणे कल्पना आहे, तरीही हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा तत्काल दाखल करून त्याला अटक करावी.
शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, राहुल सोलापूरकरने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे. पोलिस आणि राज्य सरकारने त्याला पाठीशी घालू नये, त्याचे पोलिस संरक्षण त्वरित कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत त्याची रवानगी करावी.
सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी यशस्वी
महाराष्ट्रातील मुंबईबाहेरील पहिली मेटल स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी
पुणे – ११ फेब्रुवारी २०२५ – हार्ट अटॅक आलेल्या एका ७० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्णावर पुण्यातील डेक्कन जिमखाना इथल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुण्यातील पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी पार पडली. सह्याद्रि हॉस्पिटल्स, डेक्कन जिमखानाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या क्रांतिकारी प्रक्रियेमुळे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये एक लक्षणीय टप्पा गाठला गेला आहे.
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला या प्रक्रियेच्या तीन दिवस अगोदर हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता व त्याच्यावर औषधांच्या मदतीने सुरुवातीला उपचार सुरू होते. मात्र, या प्रकरणामध्ये डॉक्टरांना दोन प्रमुख आव्हाने समोर आली. पहिले म्हणजे आर्टरीमध्ये कॅल्शियमचा जाड थर जमा झाल्याने स्टेन्ट टाकण्याची प्रचलित प्रक्रिया पार पाडणे कठीण होते, आणि दुसरे आव्हान म्हणजे स्वत: रुग्ण स्टेन्ट टाकून घेण्यास फारसे राजी नव्हते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय टीमने लेझरच्या सहाय्याने करण्यात येण्यारी अँजिओप्लास्टी करण्याचा व त्याला औषध-वेष्टित फुग्याची (ड्रग-कोटेड बलून) जोड देण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे कायमस्वरूपी धातूचे स्टेन्ट बसविण्याची गरज न भासता आर्टरी मोकळी करण्यात यश आले.
या अँजिओप्लास्टी प्रक्रियेमध्ये एक्सिमर लेझर (Excimer laser) हे आर्टरीजच्या आत जमलेल्या कॅल्शियम आणि कोलेस्ट्रोलचे थर प्रभावीपणे दूर करणारे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले. यानंतर ड्रग-कोटेड बलूनचा वापर करण्यात आला, जो पारंपरिक स्टेन्स्ट्साठीचा एक अभिनव पर्याय आहे. कायमस्वरूपी इम्प्लान्ट बसविण्याऐवजी असा ड्रग-कोटेड बलून औषधाला आर्टरीपर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर तो काढून घेतला जातो व तिथे कोणत्याही धातूचा अंश उरत नाही.
सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांनी या प्रक्रियेचे तपशील व फायदे उलगडून सांगितले. “या प्रक्रियेचे प्रमुख फायदे म्हणजे यात धातूचे कायमस्वरूपी इम्प्लान्ट वापरले जात नाही. स्टेन्ट शरीरात कायमचे राहते व त्यातून रिस्टेनोसिस (आर्टरी पुन्हा अरुंद होणे)चा धोका उद्भवू शकतो. लेझरच्या सहाय्याने ही प्रक्रिया करण्याची पद्धत वापरल्याने ही चिंता दूर होते. त्याशिवाय यामुळे रुग्णाची तब्येत लवकर सुधारते. या रुग्णालय तर एका दिवसात घरी परतता आले, स्वतंत्रपणे चालता आले आणि लगेचच आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे सुरू करता आली. दुसऱ्या दिवसापर्यंत ते हिंडू-फिरू लागले, त्यांना आपणहून रेस्टरूमपर्यंत जाता आले त्यामुळे दुपारपर्यंत त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला.”
“हि प्रक्रिया मिनिमली इन्व्हेजिव्ह स्वरूपाच्या पारंपरिक स्टेन्टिंग पद्धतींना एक अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय म्हणून अतिशय चांगली आहे. पुण्यात पार पडलेली अशा प्रकारची पहिलीच प्रक्रिया यशस्वी झाल्याने इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातील एक नवे पर्व सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.” असे सह्याद्रि ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि मेडिकल डिरेक्टर डॉ. सुनील राव यावेळी म्हणाले.
या प्रक्रियेत वापरले गेलेले एक्सिमर लेझर हे तंत्रज्ञान कॅल्शियमयुक्त प्लाकचे अचूकतेने उच्छेदन करते. तसेच हा प्लाक प्रभावीपणे काढून टाकताना रुग्णास असणाऱ्या धोक्याचा प्रभाव देखील कमी करते. या तंत्रज्ञानाच्या जोडीला वापरले जाणारे ड्रग-कोटेड बलून्स निश्चित ठिकाणाला लक्ष्य करणारी उपचारपद्धती पुरवितात. यामुळे कायमस्वरूपी इम्प्लान्ट बसविण्याची गरज भासत नाही व रिस्टेनोसिसला रोखता येते. त्याशिवाय ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे, ज्यात लेझरवर अतिशय काटेकोरपणे नियंत्रण ठेवता येणे शक्य असते. तसेच ‘स्टेन्ट-ब्लॉकेज’ असलेल्या रुग्णांसाठीच सुद्धा ही प्रक्रिया एक उत्कृष्ट पर्याय आहे, कारण लेझर थेरपीमुळे आणखी एक स्टेन्ट बसविल्याशिवाय देखील अडथळा दूर करता येणे शक्य होते.
असे अनेक फायदे असल्याने लेझर-असिस्टेड, स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी भविष्यात एक सर्रास केली जाणारी प्रक्रिया बनेल व अनेक रुग्णांच्या बाबतीत पारंपरिक अँजिओप्लास्टीची जागा घेऊ शकेल अशी अपेक्षा आहे. ही प्रक्रिया केवळ कोरोनरी आर्टरी डिसीजेससाठीच नव्हे तर जिथे स्टेन्स्ट फारसे परिणामकारक ठरत नाही अशा तुलनेने छोट्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसवर उपाय करण्यासाठीही एक उपयुक्त पर्याय ठरू शकते.
“एक नवी वाट निर्माण करणारी ही प्रक्रिया अँजिओप्लास्टीच्या उपचारांची संकल्पनाच बदलून टाकणारी आहे. कायमस्वरूपी स्टेन्ट्स बसविण्याविषयी साशंक असणाऱ्या रुग्णांना किंवा गुंतागुंतीचे कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांना आता अधिक चांगल्या परिणामांची व धोका कमी करण्याची हमी देणारा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. पुण्यातील पहिल्या लेझर-असिस्टेट, स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टीला मिळालेले यश कार्डिअॅक उपचारांच्या एका नव्या युगाच्या आरंभाचा संकेत आहे. भविष्यात या पद्धतीचा सर्वदूर स्वीकार होईल, अशी आपली अपेक्षा आहे.” डॉ. पळशीकर पुढे म्हणाले.
सह्याद्रि हॉस्पिटल असाधारण कार्डिअॅक उपचारांसाठी व रुग्णांना सर्वोत्तम परिणाम मिळवून देण्याऱ्या नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञानांना उपचारांत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि त्यायोगे जपलेल्या रुग्ण बांधिलकीसाठी प्रख्यात आहे.
‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 11 :- पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे, याचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात आज उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ऋषीराज सावंत अपहरण नाट्यावरुन मोठ्या भावाचे आवाहन, प्रकरणावर पडदा टाका,राजकारण करू नका
पुणे-ऋषीराज सावंत अपहरण नाट्यावरुन,’हा वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय आहे. विरोधकांनी राजकारण राजकारणाच्या पद्धतीने चालावे. कोणावरही अशी वेळ येऊ नये मात्र येऊ शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. यावर कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न पत्रकार बांधव किंवा राजकारण्यांनी करु नये, असे आवाहन ऋषीराजचा मोठा भाऊ गिरीराज तानाजी सावंत यांनी केले आहे. या प्रकरणावर पडदा टाकायला हवा, असे देखील गिरीराज सावंत यांनी म्हटले आहे.
वडिलांच्या भीतीपोटी ऋषीराज सावंत याने बँकॉकच्या दौऱ्याविषयी सांगितले नाही, अशा शब्दात शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी अपहरण नाट्यासंदर्भातील सर्व हकिगत सांगितली. आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. एक आई – वडील म्हणून सर्वांनाच मुले असतील. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा टाकायला हवा, असे देखील गिरीराज सावंत यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले होते. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात होते. पुणे पोलिसांनी घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवल्यानंतर अखेर ऋषीराज सावंत बँकॉकला जात असल्याचे समोर आले. या सर्व घटनेत पोलिस यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर गिरीराज सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या संदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना तानाजी सावंत यांचे मोठे सुपुत्र आणि ऋषीराज सावंत यांचे मोठे बंधू गिरीराज सावंत म्हणाले की, दोनच दिवसापूर्वी ऋषीराज हा दुबई दौरा कडून आला होता. त्यामुळे लगेचच बँकॉकला कशाला जातो? असा प्रश्न कुटुंबाकडून उपस्थित होईल. वडिल लगेचच आपल्याला जाऊ देणार नाही. आणि बँकाँकला जाणेही महत्त्वाचे होते. त्यामुळे तो कोणालाही न सांगता मित्रांसोबत बँकॉकला चालला होता. आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. एक आई – वडील म्हणून सर्वांनाच मुले असतील. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई दि.११ : सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३ टक्के इतकी आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता, त्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना, शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्री यासाठीच्या एकंदरीत ५ टक्के निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या ९५ टक्के निधीमधून १९ टक्के निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी राखून ठेवण्यात येतो.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री.पवार यांनी दि.०५ फेब्रुवारी, २०२५ च्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ आराखडा बैठकीत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कमाल १ टक्का पर्यंत निधी राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने नियोजन विभागाने सोमवारी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
“जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)” अंतर्गत “दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व कल्याण” या करीता राखून ठेवावयाच्या एक टक्का निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरीता त्यासंबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभाग, वित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील अशी माहितीही,उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.
पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल.
माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार.
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २५
पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बीएमसी अधिकारी, पोलीस, बिल्डरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
जयभीम नगरमध्ये मागील २५ ते ३० वर्षांपासून जवळफास 650 मागासवर्गीय परिवार राहत होते. तेथे राहणाऱ्या मुलांचे शिक्षण तेथेच आजूबाजूच्या शाळा, महाविद्यालयामध्ये सुरू असताना भर पावसात बीएमसी एस विभागाचे अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विकासक हिरानंदानी आणि स्थानिक आमदारांनी हातमिळवणी करून 650 परिवारांना बेघर केले. त्यानंतर बिल्डर निरंजन हिरानंदानी यांनी आपल्या गुंडांचा वापर करून रातोरात तेथे चारही बाजूला पत्रे लावून सहा एकर (24000 sq. meter) जागेचा ताबा घेतला. बेघर झालेले 650 मागासवर्गीय परिवार निवारा नसल्यामुळे आजूबाजूच्या फुटपाथवर उघड्यावर रहात आहेत.
माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो. आरिफ नसीम खान यांनी या बेघर झालेल्या सर्व रहिवाशांना सोबत घेऊन राज्याचे तत्कालीन महामहीम राज्यपाल रमेश बैस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे झालेल्या घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एका पिडीताने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सह पोलिस आयुक्त (गुन्हे) व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली SIT गठित करून अहवाल मागविला होता. SIT ने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला व त्या अहवालामध्ये नियमबाह्य कारवाई झाल्याचे सिद्ध झाले. SIT ने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने SIT ला सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने फिर्यादीने पुन्हा न्यायालयात दाद मागीतल्यावर SIT क्राइम ब्रँच मार्फत मनपाचे उपायुक्त बिरादर, मनपा एस विभाग सहायक पालिका आयुक्त कसगीकर, मनपा अधिकारी आमिष बागडे, पंकज तसेच पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे, पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोनवणे आणि हिरानंदानी बिल्डर्सचे संजय पांडे, अर्जून व इतर लोकांवर 10 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ११:- पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन वाहने येत्या १५ दिवसांत सोडवून घ्यावी.
या कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्यापैकीच 19 वाहनांच्या प्रकरणांमध्ये कार्यालयाशी संपर्क केलेला नाही तसेच वाहन सोडवून घेण्याबाबत हक्कही सांगितलेला नाही. अशा वाहनांची यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने अशा वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल.
अधिक माहितीकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच www.mstcindia.co.in किंवा www.eacution.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून माहिती घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा.
पुणे दि. 11 : आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, सोशल मिडिया , ई-मेल व क्लाउड या सेवांच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्ह्यांचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूक राहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगार निरनिराळे मार्ग शोधात आहेत. फिशिंग , डाटा चोरी, बँकिंग फ्रौड , सोशल मिडिया अकाऊंट हॅकींग, सायबर बुलीयिंग, सेक्सॉर्टेशन यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत सामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सायबर सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरक्षित इंटरनेट दिवस (Safer Internet Day) साजरा केला जातो. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ), पुणे यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
NIC च्या वतीने जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, श्रीमती अश्विनी करमरकर आपल्या मनोगतात म्हणाल्या भारत सरकार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सायबर सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल ( www.cybercrime.gov.in), इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि स्टे सेफ ऑनलाईन ( www.staysafeonline.in) यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना मदत केली जाते. सायबर गुन्हे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे साधन बनले आहेत. त्यामुळे सुरक्षित इंटरनेट वापरासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. शासन व कायदा अंमलबजावणी यंत्रणेसोबतच सामान्य नागरिकांनीही सतर्क राहून ह्या गुन्ह्यांना आळा घालावा असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेस, विविध शाखांचे उपजिल्हाधिकारी , तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते.
निधी वितरणाबाबत संभ्रम न बाळगण्याचे महाज्योतीचे विद्यार्थ्यांना आवाहन
पुणे, दि. ११ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये शासनाने पात्र विद्यार्थ्यांना ५०% दराने अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता प्रदान केलेली होती.
तदनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पीएच.डी. अधिछात्रवृत्ती-२०२३ मधील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजुर करण्यास सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्याकरिता अंदाजित एकूण १२६.१४ कोटी निधी लागणार आहे.
ही बाब नव्याने उद्भवलेली असल्याने व मंजूर कृती आराखड्याच्या बाहेरील असल्याने या निधीची मागणी ही महाज्योती कार्यालयाने पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
तसेच योजनेकरिता शासनाने पात्र ठरवलेल्या म्हणजेच २५ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रक्कम अदा करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने संशोधन प्रगती अहवाल मागविण्यात आलेले असून अहवाल प्राप्त होताच तपासून अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तरी निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महाज्योतीचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंचा समावेश:आधी डावलल्यानंतर आता वाईल्ड कार्ड एन्ट्री, मंत्रिमंडळ बैठकीत नियमात बदल
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियम २०१९ मध्ये दुरूस्ती
मुंबई- महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री समितीचे सदस्य मंत्री व अशासकीय सदस्य यांचे नामनिर्देशन करतील.
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम, २०१९ च्या नियम ३ मध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना निश्चित करण्यात आली आहे. ही रचना सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली. या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि नऊ सदस्य असतील. त्यामध्ये मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील. तर अन्य पदसिद्ध सदस्य पदाकरिता मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. तसेच अध्यक्ष आपत्ती जोखीम कमी करण्याचे ज्ञान आणि अनुभव असलेल्या व्यक्तींना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करतील. याशिवाय राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा या समितीत समावेश राहील.
यापूर्वी या प्राधिकरणाची रचना अशी होती, मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष, मंत्री (महसूल), मंत्री (वित्त), मंत्री (गृह), मंत्री (मदत व पुनर्वसन), मंत्री (सार्वजनिक आरोग्य) हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. याशिवाय अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले आपत्ती धोके कमी करण्याचे ज्ञान व अनुभव असलेले तीन अशासकीय सदस्य आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
राज्यातील आपत्तीच्या काळात ही समिती अत्यंत महत्त्वाची मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रातील व्यवस्थापन समितीचे प्रमुख झाले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांना यातून डावलल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीच्या मंत्र्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले. परंतु, आपत्तील व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नगर विकास खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची भूमिका कायम महत्त्वाची असते. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते. तरीही एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून दूर ठेवल्यामुळे महायुतीत वाद निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय झाला आहे.
‘जनाई-शिरसाई’ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी 438 कोटी;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामतीसह पुरंदर तालुक्यातील 14 हजार हेक्टर क्षेत्राला होणार लाभ
मुंबई, दि. 11 :- पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागासाठी लाभदायी असणाऱ्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरित करण्यासाठी 438 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाला आज मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. या योजनेमुळे दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील एकूण 14 हजार 80 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेसाठी ही मान्यता मिळाली आहे.
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरण करण्याच्या कामासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत विस्तार व सुधारणा अंतर्गत 438 कोटी 48 लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 94 किमी अंतरावर वरवंड तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून 8 हजार 350 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. या योजनेत एकूण 18 तलाव समाविष्ट असून, सध्या 13 तलाव पाण्याने भरले जात आहेत.
शिरसाई उपसा सिंचन योजनेंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 138 किमी अंतरावर शिर्सुफळ तलावात पाणी सोडले जाते. तेथून उपसा करून 5 हजार 730 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेत 47 तलावांचा समावेश आहे, त्यापैकी 32 तलाव पाण्याने भरले जात आहेत. नलिका प्रणालीमुळे भूसंपादनाची गरज राहत नाही. तसेच मशागतीस कोणताही अडथळा येत नाही. नलिका वितरणाद्वारे समन्यायी पाण्याचे वाटप करणे सुलभ होते. नलिका वितरण प्रणालीचा देखभाल दुरुस्ती व परिचलनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो. डोंगर उतारावरील, खोल खोदाईतील व काळ्या मातीतील कालव्यांवर तुलनेने देखभाल-दुरूस्तीचा खर्च जास्त राहतो. खडकवासला प्रकल्पातून सदर योजनेस पाणी मिळते तरी सदर योजना बंदिस्त नलिकेमध्ये रूपांतरीत केल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर होणार आहे. तसेच पाण्याची बचत होऊन पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यामुळे खडकवासला प्रकल्पावरील येणारा ताण कमी होणार आहे.
दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील आवर्षणग्रस्त भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रीमंडळाने या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे, ही योजना तिन्ही तालुक्यातील 14 हजार 80 हेक्टर अवर्षणग्रस्त क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे.
