श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजन ; विविध कंपन्यांमधील एचआर महिलांचा सन्मान

पुणे : श्री सरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली मातेसमोर भरतनाटयम् हा शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करीत स्त्री शक्तीने महिला सबलीकरणाचा संदेश दिला. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात राधिका पारकर आणि ग्रुप तर्फे भरतनाटयम् नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये राधीका पारकर यांसह एकूण ९ कलाकारांनी सहभाग घेतला. महिला सबलीकरणाविषयी समाजात जनजागृती व्हावी, याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात भरतनाटयम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध कंपन्यांमधील एचआर महिलांचा सन्मान देखील झाला.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकारातून देवीसमोर महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. तसेच उद्योग क्षेत्रात आज महिला मोठया प्रमाणात कार्यरत आहेत आणि विविध कंपन्यांमध्ये महत्वाचा एचआर सारख्या पदावर देखील कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान देखील मंदिरात करण्यात आला. या महिलांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली.
* साहित्य क्षेत्रातील लेखिकांचा सन्मान सोहळा सोमवारी (दि.७)
साहित्य क्षेत्रातील माधुरी तळवलकर, ज्योती देशमुख, डॉ.श्रुती पानसे, अॅड. आकांक्षा पुराणिक, संगीता पुराणिक, नीला कदम, इंदुमती जोंधळे, सुनीताराजे पवार, अश्विनी साने, नताशा शर्मा या लेखिकांचा सन्मान सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणा-या कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील मान्यवर व ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.