Home Blog Page 651

भरत नाट्य संशोधन मंदिराचे कार्य देवघरातील नंदादीपासारखे : विजय कुवळेकर

भरत नाट्य मंदिराच्या 130व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्करांचे वितरण
विजय कुवळेकर यांचा कै. गो. रा. जोशी स्मृती नाट्यसमीक्षक/अभ्यासक पुरस्काराने गौरव

पुणे : आयुष्यात तपश्चर्या, साधना, तयारीला पर्याय नसतो. अखंड अभ्यास त्यातून शिकत जाणे भरत नाट्य संशोधन मंदिराच्या परंपरेतून कळते. संस्थेचे कार्य देवघरातील नंदादीपाप्रमाणे शांत तेवत आहे. संस्थेमध्ये स्वत:भोवती आरत्या ओवाळण्याची कुणाचीच मानसिकता नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले. या वेळी कुवळेकर यांचा कै. गो. रा. जोशी स्मृती नाट्यसमीक्षक/अभ्यासक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत नाट्य करंडक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण आणि विविध पुरस्कारांचे वितरण आज (दि. 11) कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी ते बोलत होते. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन भरत नाट्य मंदिरात करण्यात आले होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह संजय डोळे, विश्वस्त रवींद्र खरे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई मंचावर होते.
कुवळेकर म्हणाले, भरत नाट्य संशोधन ही संस्था नाट्य-कला क्षेत्रात कार्यरत असूनही सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून करत असलेल्या कार्यामागे मुलभूत विचार आहे. संस्था पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी कायमच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरुबाबा महाराज औसेकर म्हणाले, आत्मचिंतनातून नवनवीन शोध लागतात. त्यासाठी तपस्या करावी लागते. ही प्रक्रिया भरत नाट्य संशोधन मंदिराने जपून ठेवावी. डिजिटल युगातही नाट्यक्षेत्र आणि कलेच्या क्षेत्रात संस्थेतर्फे संशोधन व्हावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय डोळे, अभय जबडे, रवींद्र खरे यांनी केले.

भरत नाट्य संशोधन मंदिराची स्थापना विजयादशमीच्या मुहुर्तावर झाली असून संस्थेने नृत्य-नाट्य-संगीत कलाप्रवासाची 130 वर्षे पूर्ण करून 131व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भरत नाट्य मंदिर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे मानकरी
कै. अप्पासाहेब ताम्हणकर स्मृती उत्कृष्ट नाट्य कलाकार – उदय थत्ते
कै. बबनराव गोखले स्मृती उत्कृष्ट संगीत वादक – मुकुंद कोंडे
कै. उदयसिंह पाटील स्मृती सर्वोकृष्ट बालकलाकार – सार्थक फडके
कै. गोपाळराव लिमये स्मृती संस्था कलाकार (नियोजन) – मुकुंद खामकर
गुणवंत संस्था कलाकार : भरत नाट्य मंदिर – अभिजित पोतनीस
कै. अवधूत घाटे स्मृती संस्था नाट्य कलाकार – डॉ. प्रचिती सुरू
कै. गो. रा. जोशी स्मृती तेजा काटदरे पुरस्कृत नाट्यसमीक्षक/अभ्यासक – विजय कुवळेकर
स्नेहवन आणि पालवी या संस्थांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भरत नाट्य मंदिरातर्फे आर्थिक मदत देण्यात आली तर पडद्यामागील कलाकारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणेच्या ‌‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी‌’ला भरत करंडक
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या भरत करंडक स्पर्धेत कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली असून संस्थेने सादर केलेल्या ‌‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी‌’ या एकांकिकेने भरत करंडक पटकाविला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या (बारामती) ‌‘पाटी‌’ या एकांकिकेला द्वितीय तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 11,111 एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणेच्या ‌‘एक दिन बीत जाएगा माटी के मोल‌’ला आणि दृष्टी, पुणेने सादर केलेल्या ‌‘नदीकाठचा प्रकार‌’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
लेखन : प्रथम – विनोद रत्ना (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – सई काटकर, वेदिका कुलकर्णी (11,111), उत्तेजनार्थ – निरज खेडकर, सुजल धडोती (एक दिन बित जाएगा माटी के मोल).
दिग्दर्शन : प्रथम – आदेश यादव, सुबोधन जोशी (पाटी), द्वितीय – श्रेयस इंदापूरकर (नदीकाठचा प्रकार), उत्तेजनार्थ – निरज खेडकर, सुजल धडोती (एक दिन बित जाएगा माटी के मोल).
अभिनय : पुरुष : प्रथम – सुजल बर्गे (पाटी), द्वितीय – अमेय राजमाने (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी).
लक्षवेधी अभिनय : समृद्धी कुलकर्णी (बस नं. 1532)
अभिनय : स्त्री : प्रथम – ऋतुजा बोठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – श्रद्धा रंगारी (पाटी).
नेपथ्य : प्रथम – ऋतुजा बोठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – प्रद्युम्न उमरीकर (11,111), उत्तेजनार्थ – श्रावणी धुमाळ, गौरव माळी (कैवारी).
प्रकाश योजना : प्रथम – अभिप्राय कामठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – आकांक्षा पन्हाळे (इंद्रायणी), उत्तेजनार्थ – वेदिका कुलकर्णी (11,111).
ध्वनीसंयोजन : प्रथम – मानस जोगळेकर (बस नं. 1532), द्वितीय – देवाशिष शिंदे (इंद्रायणी), उत्तेजनार्थ – श्रेयस शिराळकर, राजस शिंदे (एक दिन बित जाएगा माटी के मोल).
अभिनय उत्तेजनार्थ : विक्रांत बारगळे, प्रथमेश अंभोरे, गार्गी कथले, मिहिर माईणकर, निलय कात्रे, मयंक हिंगे, यश पत्की, इंद्रायणी दीक्षित, वृषाली घोडके, सोहम कुलकर्णी, क्षितिजा चिंदरकर, नयन अमराळे.
स्पर्धेचे संयोजन विश्वास पांगारकर आणि पुष्कर केळकर यांनी केले तर स्पर्धेचे परीक्षण चारुलता पाटणकर, अनुपमा कुलकर्णी, समीर हंपी यांनी केले. परीक्षकांच्या वतीने समिर हंपी यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल प्रा. राजेंद्र उत्तुरकर, अश्विनी थोरात यांनी जाहीर केला.

सात हजार पेक्षा जास्त मुलींचे कोथरूडमध्ये महाकन्या पूजन संपन्न

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले कन्यापूजन

पुण्यात प्रथम पार पडला भव्य दिव्य कन्यापूजन सोहळा : राज्यात प्रथमच असा अद्वितीय सोहळा

पुणे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी ( दि. ११) करण्यात आले होते. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील कन्यापूजन सोहळ्याने उपस्थित भारावून गेले.

या सोहळ्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत: मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक पद्धतीने सात मुलींचे पूजन केले.यावेळी सहभागी मुलींचे डोळे पाणावून गेले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मुलींनी व त्यांच्या पालकांनी मोठे कौतुक केले.

यावेळी भाजपा कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, कुलदीप सावळेकर, प्रशांत हरसुले, सरचिटणीस अनुराधा एडके, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, गिरीश खत्री, दीपक पवार, बाळासाहेब टेमकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,अल्पना वर्पे, ॲड. वासंती जाधव, ॲड.‌ मिताली सावळेकर, स्वाती मारणे, अजय मारणे, प्राची बगाटे, अपर्णा लोणारे, कल्पना पुरंदरे, विद्या टेमकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न झाला.

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे. यानुसार या कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. केवळ कोथरूड भागातील नव्हे तर सर्व पुणे शहरातून या सोहळ्यासाठी मुलींनी व त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.

यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी, दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे अश्वासन उपस्थित संस्था ना दिले. तसेच १ नोव्हेंबर पासून १ हजार माता भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल अशी नोकरी दिली जाईल असे ही सांगितले. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी असून,लहान मुलींमध्ये ही रूपे दिसत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते.

ते पुढे म्हणाले की, नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री व अजितदादांनी महाबळेश्वर, कोल्हापूर अधिवेशनात दिलेला शब्द पाळला,पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्र्यांची घोषणा-एकनाथ शिंदें, देवेंद्र फडणवीस, अजितदादांचे आभार

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश-राजा माने

मुंबई, :- पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केली आहे.
संघटनेच्या भिलार-महाबळेश्वर ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला तसेच कनेरीमठ-कोल्हापूर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द पाळल्यास बद्दल राज्यभरातील पत्रकारांत आनंद व्यक्त होत आहे.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत होते.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रकारांची बाजू मांडली.

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण

भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालना; सणासुदीच्या काळात  भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित

नवी दिल्ली : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.

महाराष्ट्राला या हस्तांतरणातून 11,255 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 31,962 कोटी रुपये, बिहारला 17,921 कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला 13,404 कोटी रुपये मिळाले आहेत.

हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, ज्यामुळे भांडवल खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.

महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड दि. ११ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. ही घटना महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी असून आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार सर्वश्री श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार सर्वश्री गणेश नाईक,  प्रशांत ठाकूर, महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह डॉ. इकबाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  C295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते.

यावेळी माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे.
“मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच सिडको ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील असा विश्वास श्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प – उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस

नवी मुंबई विमानतळाच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दरवर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.

पुणे पोलीसदलाचे बळ वाढविण्यासाठी ७२० कोटीच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पुणे:- राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. पॉक्सोच्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रग्सच्या केसेसही बाहेर येऊ लागल्या आहेत. समाजात गुन्हेगारी प्रवूत्ती आहे. तोपर्यंत गुन्हे घडत राहतील.पण गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिकतेचे सहाय्य करणे गरजेचे होते त्यासाठी आपण आज काही प्रक्लापांना प्रारंभ केला आहे तसेच पोलिसांनी महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता करूच नये तसेच अमली पदार्थ गुन्ह्यात जर कोणी पोलीस आढळला तर बडतर्फ केले जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत मंजूर झालेल्या नवीन सात पोलिस ठाण्यांचे उदघाटन शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.पुणे शहरात ०७ नवीन पोलीस ठाणे (आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी) निर्मिती व ८१६ नवीन पद निर्मिती करणे
पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी नवीन २८८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेकामी रुपये ४३३.४४ कोटीचा निधी देणे .
पोलीस आयक्त कार्यालय नवीन इमारतीचे उभारणीकरीता प्रशासकीय मान्यतेसह निधी रक्कम रुपये १९३ कोटीचा निधी देणे .
बंडगार्डन पोलीस ठाण्याकरीता नवीन इमारतीचे उभारणीकरीता प्रशासकीय मान्यतेसह निधी रक्कम २९ कोटी रुपये निधी देणे अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, पुणे हे अर्थव्यवस्थाचे इंजिन आहे, प्रचंड वेगाने नागरीकरण होणारे शहर आहे. शहरात आव्हाने वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पोलीस आस्थापना बाबतीत 1960 साली निर्णय झाला. जवळपास 63 वर्षांनी नवीन आकृती बंध तयार केला. नवीन पोलीस ठाणे आम्ही तयार करत नव्हतो. 2014 पासून ते मी काम केले. पुण्यात हा मोठा रेकॉर्ड आहे की 7 पोलीस ठाणे उद्घाटन केली आहेत. गुणात्मक पोलिसिंग आपण करतो आहोत. सीसीटीव्ही फेज 2 उद्घाटन करतो आहे. आपण सेफ शहरासाठी काम केले आहे. नवीन कॅमेरे लागल्याने फायदा होणार आहे.

सायबर सुरक्षा आता महाराष्ट्र मध्ये अत्याधुनिक मशीन बसवले आहेत. त्यामुळे विविध सायबर गुन्हे उघडकीस येणार आहे. आरोपी पकडण्यासाठी खूप तंत्रज्ञान वापरावे लागले. तुम्ही जर फीड दिला तर व्यक्ती सापडू शकेल, सायबर सेंटरमध्ये तयार केली आहे. सर्व कॅमेरे एकत्रीकरण करणे गरजेचे आहे. ड्रोन कॅमेरे देखील आता वापरले जाणार आहेत. ब्लॅक स्पॉट वर नाईट व्हिजन कॅमेरा लावता येतील त्यासाठी प्रयत्न करायला हवा. वाहतूक खूप असून पुण्याला ऍडिशनल सिपी, एक डीसीपी देणार आहे. पुणे- पिंपरी चिंचवड मध्येही पोलीस आयुक्तालय वेगाने तयार करणार. 40 हजार पोलीस भरती झाली आहे, माझ्या काळात सर्वात जास्त भरती केली. त्यामुळे पोलिसांमध्ये कमतरता राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलिस ठाणी शुकवारपासून सुरू होत आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, चतुःशृंगी, लोणीकाळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर तसेच पुणे ग्रामीणमधील हवेली या दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ही नवीन पोलिस ठाणी सुरू होत आहेत.

शासकीय तंत्रनिकेतने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात सामंजस्य करार

मुंबई,दि.११ केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतने,अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
नवी दिल्ली, रेल भवन येथे आज रेल्वे, सूचना व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी तंत्र शिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळचे संचालक, डॉ. प्रमोद नाईक, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. मदन मोहन त्रिपाठी, महासंचालक, एन आय इ एल आय टी (NIELIT), श्री. अभिषेक सिंग, मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, महाराष्ट्र राज्याला औद्योगिक वारसा लाभलेला आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता केंद्र सरकारच्या सहाय्याने हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य आहे. महाराष्ट्रात यशस्वीरीत्या अंमलबजावणी करुन पुढे देशभरात हा उपक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, या उपक्रमाचा शासकीय तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकरीता सेंटर ऑफ एक्सलन्स ही संकल्पना कार्यान्वित करणे हा मुख्य उद्देश असून या सेंटर मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाही सुसंगत असल्याचे सांगितले.
ईया सामंजस्य कराराच्या अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज इंडस्ट्री ४.०, 3 डी प्रिंटिंग अँड अलाईड टेक्नॉलॉजी फॉर कपॅसिटी ट्रेनिंग अँड आर अँड डी सेंटर्स (Artificial Intelligence (AI), Robotics, Internet of Things (IoT), Industry 4.0, 3D Printing and Allied Technologies for capacity training and R&D centers) या क्षेत्रांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यातील शासकीय तंत्रनिकेतने व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तंत्र शिक्षणाचे बळकटीकरण, ज्ञानाची प्रगती आणि नवकल्पनांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येतील. या उपक्रमासाठी लागणारे आर्थिक सहाय्य भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व इतर शासकीय प्राधिकरणे यांच्याकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण प्राप्त होऊन उद्योगसमुहांना तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल व रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील, याकरीता डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व डॉ. प्रमोद नाईक, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा-शासन निर्णय जाहीर


पुणे : महाराष्ट्र सरकार तर्फेनव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर गोसेवा क्षेत्रात विविध प्रकारचे उल्लेखनीय कार्य व शासन निर्णय देखील झाले. नुकतेच, शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

शेखर मुंदडा म्हणाले, दिवसेंदिवस देशी गाईच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. विसाव्या पशुगणनेमध्ये देशी गोवंशीय पशुधनाची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान टिकून राहण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती यामुळे देशी गोवंशीय पशुधनाचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशी गोवंशीय संगोपन करणाऱ्या गोशाळेतील प्रत्येक देशी गोवंशसाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत ८२८ गोशाळा असून त्यामध्ये एक लाख २३ हजार ३८९ पशुधन आहे. यामधील देशी गोवंशाच्या पोषणासाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. गो सदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था यांसह एक वर्षाचा गोसंगोपनाचा अनुभव असलेल्या संस्थांना बळकट करण्यासाठी आणि देशी गो संगोपनासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले, देशी गोमातेला भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून महत्व आहे. आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा, पद्धती पंचगव्य उपचार पद्धती, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन देशी गाईला राज्यमाता घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच या देशी गाईंची जबाबदारी देखील शासनाने घेतली असून नोंदणीकृत गोशाळांमधील प्रत्येक देशी गोवंशाला प्रतिदिन पन्नास रुपये पोषणासाठी दिले जाणार आहेत. जेणेकरुन  गोवंशीय पशुधनात वाढ होईल. गोवर्धन गोवंश योजने अंतर्गत १५ ते २५ लाख रुपये प्रत्येक तालुक्यात एक असे ३२४ तालुक्यात दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय वसतिगृहांचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण

पुणे, दि. ११: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील ४४ वसतिगृहांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण सोहळा बुधवारी (९ ऑक्टोबर) संपन्न झाला.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे हा सोहळा आयोजित करण्यात आला. पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहांचा उद्‌‌घाटन सोहळा टी.एस.एस.एम भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय नऱ्हे येथे पार पडला. या सोहळ्यास विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, इतर बहुजन कल्याण पुणेचे सहाय्यक संचालक विशाल लोंढे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश हिंगे आदी उपस्थित होते.

या घटकातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे शासकीय वसतिगृहे सुरु करण्यासाठी शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे. याअंतर्गत नऱ्हे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून येथे १०० मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच १०० मुलींच्या क्षमतेचे वसतिगृहदेखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे श्री. लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

सेवानिवृत्तीवेतन धारकांना आयकर गुंतवणुकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. ११: पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीवेतन धारकांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आयकराच्या गणनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या गुंतवणुक, बचतीची कागदपत्रे तसेच पॅनकार्डची सत्यप्रत 20 नोव्हेंबर 2024 सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सेवानिवृत्ती धारकांमध्ये भा.प्र.से., भा.पो.से., भा.प.से. व माजी आमदारांचाही समावेश आहे. नवीन कर प्रणालीनुसार वय वर्ष ६० पर्यंत तसेच 60 वर्षापेक्षा अधिक असलेल्या निवृत्तीवेतनधारकांचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास तर जुन्या कर प्रणालीनुसार 5 लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न आयकर पात्र आहे.

आयकर पात्र उत्पन्न असलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी आयकर कायदा १९६१ चे कलम ८० सी, ८० सीसीसी, ८० डी, ८० जी या नुसार गुंतवणूक व बचत केली असल्यास त्यासंबंधित कागदपत्रे, सत्यप्रत व पॅनकार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष येऊन किंवा to.pune@zillamhakosh.in या इमेल वर सादर करावीत. संबधीत तारखेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास निवृत्तीवेतनातून आयकराची हप्त्यांमध्ये कपात करून घेण्यात येईल, असे सहाय्यक संचालक, निवृत्तीवेतन, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

काहींचा पुण्याचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न:पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरोप

पुणे–पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासावर आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली. परंतु आम्ही तत्परतेने भूमिका घेत मुलाचे आई-वडील डॉक्टर यांची चौकशी केली. मागील चार महिन्यापासून त्यांना जामीन मिळाला नसून ते कारागृहात आहेत. पोलिसांनी या घटनेतील मृतांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कायद्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे आम्ही सिद्ध केले. पण त्यानंतरही पुणे शहराचे नाव काहीजण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे केला .

याप्रसंगी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे,भीमराव तापकीर,अमित गोरखे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते. यावेळी विविध प्रकल्पाचे भूमिपूजन गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहराची लोकसंख्या ८० लाख सध्या असून ३३ पोलिस स्टेशन आहे. मागील काही काळात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नवीन पोलीस स्टेशन गरज होती तसेच काही पोलिस ठाण्यात दोन हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल होत होते. पुण्यात १३४१ सीसीटीव्ही कार्यरत होते. आता शासनाने आणखी १००७ सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूण दोन हजार ८८६ सीसीटीव्ही पुढील सहा महिन्यात कार्यरत होऊन पोलिस कार्यक्षमता वाढणार आहे. आगामी दोन वर्षात सहा मजली नवीन सुसज्ज पोलिस आयुक्तालय उभारणी करण्यात येणार आहे. पुणे पोलिस शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येईल.

महिला सुरक्षा सारखी गंभीर घटना पुणे शहरात नुकतीच घडली होती. ती उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एक आरोपी ताब्यात घेतलेल्या असून दोन जणांचा शोध सुरू आहे. सामूहिक बलात्कार गुन्हा 7 दिवसांत उघडकीस आणला आहे. ७०० पोलीस कर्मचारी सलग सात दिवस काम करत होते. सीसीटीव्ही आणि खबऱ्या यांचा वापर करून गुन्हा उघडकीस आणला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी घाट आणि दुर्गम परिसरात सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी लाईट, सीसीटीव्ही,पी ए सिस्टीम, व्हिजिबल पोलिसिंग आदी उपाययोजना करण्यात येणार आहे.

दस-याला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी व रावणदहन कार्यक्रम 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात दस-याच्या दिवशी शनिवारी (दि.१२) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. सकाळपासून भाविकांना सोन्याची साडी परिधान केलेले देवीचे विलोभनीय रुप पाहण्याची व दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच रात्री ९.३० वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी दिली. 
उत्सवाच्या आयोजनात ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लदद्ड आदींनी सक्रिय सहभाग घेतला आहे. 
शनिवारी रात्री ९.३० वाजता होणा-या रावण दहन कार्यक्रमात महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या या स्त्रियांविषयी असलेलेल्या समस्यांसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष महिला अत्याचाररुपी रावण दहनाचा कार्यक्रम पुणेकरांना पाहता येणार आहे. याशिवाय उत्सवात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण याविषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता मंदिरात होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम देखील होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने दस-यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

भारतीय नागरिक व सैन्यदल हे एक कुटुंब -एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान
पुणे : भारतीय सैन्यदलात कोणालाही काहीही झाले तरी देखील केवळ सैनिकच नाहीत, तर संपूर्ण देश विसरत नाहीत. सामान्य नागरिक हे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी काही ना काही करतात. त्यामुळे भारतीय नागरिक व सैन्यदल हे एक कुटुंब आहे, असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात सैन्यदलातील जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी कर्नल वसंत बल्लेवार, मेजर मोहन बजाज, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, शिवा मंत्री आदी उपस्थित होते. 
कर्नल वसंत बल्लेवार म्हणाले, समाजातून मिळणारा सामान्यांचा पाठिंबा आणि सहकार्य यामुळे आम्हा सैनिकांचे मनोबल वाढते. तसेच देशासाठी लढण्याची क्षमता वाढते. भारताची सेना ही वेगळी आहे कारण सामान्य भारतीय हे आमच्या पाठीशी आहेत. 
प्रास्ताविकात प्रविण चोरबेले म्हणाले, प्रत्येक जण सण आनंदाने साजरे करतो. त्यामागील कारण म्हणजे आपले सैनिक सीमेवर रक्षणार्थ उभे आहेत, त्यामुळे आपण हा आनंदोत्सव साजरा करू शकतो. भारतीय जवान सशक्त आहेत, त्यामुळे भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. त्यांच्या कुटुंबियांकडे आपण लक्ष देणे व त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. वीरमाता व वीरपत्नींनी देखील मनोगत व्यक्त केले.

छायाचित्र समाजाचा आरसा असते-डाॅ.सुधाकर चव्हाण

‘एमआयटी एटीडी’त भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणेः कुठलीही कला समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे त्या आहेत, तसे दर्शन घडवत असते. त्यामुळे, छायाचित्र आणि चित्रकलेच्या माध्यमातून कलाकार समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असतो. अगदी तसेच आज विद्याद्यार्थ्यांची छायचित्रे पाहूण सदर ठिकाणांचा प्रत्यक्ष फेरफटका मारून आल्यासारखे वाटले, असे मत ज्येष्ठ भारतीय पारंपारिक कला विद्वान डाॅ.सुधाकर चव्हाण यांनी मांडले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन अँड अप्लाइड आर्टस् अभ्यासक्रमाअंतर्गत इंडियन ट्रेडिशनल स्टडीज(आयटीएस) या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या चित्रकला व छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. ज्योती ढाकणे-कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव,  विभागाचे अधिष्ठाता डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, प्रा.तुषार पंके, शिलकुमार कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. स्कूल ऑफ फाईन अँड अप्लाइड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध ठिकाणी जाऊन भारतीय पारंपरिक कला शिकण्याचा, तसेच जवळून अनुभवण्याचा नुकताच आस्वाद घेतला. यामध्ये मुख्यतः भुज-गुजरात, भिलवाडा- राजस्थान, खजुराहो – मध्यप्रदेश  ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांचे अभ्यासवर्ग आयोजित केले गेले होते. विद्यार्थ्यांनी भुज कच्छ येथे केलेले रोगन कला, लिपन कला, लेदर कला, पोटरी कला, अजरक प्रिंट, भिलवाडा येथे केलेले फड कला आणि तसेच खजुराहो येथील मंदिरांचे प्रत्यक्ष केलेले वेगवेगळ्या माध्यमातील चित्रण यांचा अंतर्भाव या प्रदर्शनात करण्यात आला होता. १५० पेक्षा जास्त सहभागी विद्यार्थ्यांनी मिळून २५० पेक्षा रेखाटलेल्या चित्रांच्या या सुंदर प्रदर्शनाला विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यामुळे, पुणे शहरातील कला रसिकांसाठी लवकरच मध्यवर्ती भागात या प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. 

पुणे नवरात्रौ महोत्सवात कव्वालीचा जल्लोष

पुणे-‘दमा दम मस्त कलंदर’, ‘ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही’, ‘ तारीफ तेरी निकली है दिल से’, ‘दूल्हे का सहारा’, ‘ कजरा मोहब्बत वाला’ ‘परदा है परदा’ प्रत्येकाच्या मनाच्या ठाव घेणाऱ्या या प्रसिद्ध कव्वाली गायकांनी सादर करून श्रोत्यांनी टाळीची थाप तर वाहवाची दाद देत पुणे नवरात्रौ महोत्सवात कव्वालीचा कार्यक्रमाला रंगत आली. आपल्या आवाजाची मोहिनी श्रोत्यावर घातली. प्रसिद्ध शेरोशायरीने प्रेमाचे, विरहाचे दाखले देत कव्वालीच्या कार्यक्रमला जल्लोष निर्माण झाला.

       ३०व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे  ‘जुनून’ (फिल्मी कव्वाली का करिश्मा व मुजरा ) यात गायक विवेक पांडे, रफी हबीब व गायिका भाग्यश्री बंगारे, राजेश्वरी पवार यांनी  कव्वाली व मुजरा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. श्रोत्यांच्या वन्समोर, शिट्या व टाळ्यांनी रंगमंच दणाणून गेला. निवेदक संदीप पंचवाटकर यांच्या शेरोशायरीला श्रोत्यांची वाहवाहची दाद मिळाली.

   कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या प्रतिमेला नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल व कलाकारांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

        ‘शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दर पे’ ही कव्वाली सादर करून  कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘दिल चीज क्या है’,  ‘मेरे रश्के कमर’, ‘झुमका गिरा रे’, ‘चांद जैसा रंग है तेरा’, ‘हाय अगर दुश्मन’, ‘लंबी जुदाई’, ‘यारी है इमान’, ‘सलामे इश्क’, ‘तेरी दिवानी’, ‘झूम बराबर’, ‘हमे तो लूट लिया’, ‘तुम तो ठहरें परदेसी’ या प्रसिद्ध  कव्वाली सादर करून वन्स मोर व टाळ्यांची दाद घेतली.

     ‘दमा दम मस्त कलंदर’, ‘ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही’ यां कव्वालीला शिट्ट्या टाळ्याची दाद, सुरात सुर मिसळून व नृत्याचा ठेका धरून श्रोत्यांनी कव्वालीचा आनंद लुटला.

     ‘पाकिजा’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘इन्हीं लोगो ने दुपट्टा मेरा’, ही कव्वाली ढोलकी आणि घुंगरू सांगिताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘हमें तो लूट लिया हुस्न वालों ने काले काले बालोने…’, ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे…’, ‘आज जवानी पर इतरानेवाले कल पछतायेगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा…’ या कव्वालीला टाळ्यांची दाद देत मनमुराद कार्यक्रमाचा आनंद श्रोत्यांनी लुटला.

      उत्तरोत्तर रंगणा-या या मैफीलीत एकदम जोश आला, जेव्हा त्यांनी ‘दमा दम मस्त कलंदर’ ही कव्वाली गायला सुरूवात केली. पूर्ण सभागृहात ही मैफल सुरू असताना मग ‘वाह! वाह! क्या बात है’, ‘आह’ असे शब्द वारंवार ऐकायला मिळत होते.

     कव्वालीच्या कार्यक्रमाला गोविंद कुडाळकर- तबला, हर्षल गणबोटे- ढोलक, असिफ इनामदार – रिदम मशीन, हार्दिक रावल- गिटार तर सईद खान यांची कीबोर्डवर साथसंगत लाभली. पुणे नवरात्र महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

    नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी गायक व कलाकारांचा व मान्यवरांचा सत्कार केला.  तसेच यावेळी क्रीडा  स्केटिंग स्पर्धेतील विजेत्या वैदही सरवदे व रोलर स्पर्धेतील ऋतिका सरवदे यांचा सन्मान करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार, डॉ. सतीश देसाई, अनिल गोरे, अंकलकोटे  पाटील, काका धर्मावत, कोहिनूर ग्रुपचे राजेश गोयल यांच्यासह  महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.