Home Blog Page 652

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना

शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे आयोजन : सलग १४ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… ५१ रणशिगांची ललकारी… नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथकाचा रणगजर… सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीआण्णा मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने जेष्ठ विधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित होते. तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १३ वे वर्ष आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा ऐक्याचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे.
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिनींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युध्दकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, मंगेश शिळीमकर, गोपी पवार, समीर जाधवराव, प्रवीणभैय्या गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.
शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी
ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर हैलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली.
ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले असतात. शिवाजी महाराज म्हणले की आपसुकच आपण जय म्हणतो. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग १४ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. १९ फेब्रुवारीला विश्ववंदनीय शिवरायांचे आणि आमच्या गायकवाड स्वराज्यपरिवाराचे हे एक भावनिक नात निर्माण झाल आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभार ईशानने यावेळी मानले.
या हेलीकॅप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली ह्या स्मारकाचे अनावरण झाले होत. पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाचा ह्या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे.

मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुन लुटमार करणा-या टोळीतील कोथरूडच्या दोघांना अटक, दोघे फरार .

पुणे-मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चो-या करणा-या १९ ते २२ वयोगटातील तरुणांच्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य २ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.२४/१२/२०२४ रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील डी.पी. रोड येथे मॉर्निंग वॉक करीता आलेले फिर्यादी हे आयोध्या हॉटेल समोर आले असता त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन घेऊन मोटार सायकलवर उभ्या असलेल्या तिस-या साथीदारासह निघुन गेले बाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. २११/२०२४ मा.न्या.सं. कलम ३०९ (४),३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्याबाबत मॉर्निंग वॉकला जाणारे वेगवेगळ्या व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्ह्याची माहिती प्रसारीत झाल्याने मॉर्निंग वॉक करीता जाणारे नागरिकांचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस उप आयुक्त परी. ३ पुणे शहर संभाजी कदम व सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभागअजय परमार यांनी तपासा बाबत मार्गदर्शन करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरु करुन घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासुन यातील अनोळखी अनो आरोपीचा माग काढुन पोलीस अंमलदार पवार यांना गोपनीय बातमीदाराव्दारे सदरचा गुन्हा हा १) सुमित ऊर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजु आसवरे वय १९ वर्षे रा. किष्कीदानगर पाण्याचे टाकीजवळ, कोथरुड पुणे २) अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे वय-२२ वर्षे रा. किष्कींदानगर, कोथरुड पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने किष्कीदानगर, कोथरुड पुणे येथे सापळा रचुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे तपास करता त्यांनी त्यांचे इतर दोन फरार साथीदारांसह अशाच प्रकारे १) अलंकार पो.स्टे. गु.र.न. ३०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (५), १२६ (२), ३५१ (३),३(५) शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महा. पो. अधि. ३७(१) १३५ २) चतुःश्रृंगी पो. स्टे. पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३५/२०२५ भा.न्या.सं.कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरलेल्या दोन सोन्याच्या चेन एक सोन्याचे पेंडट, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल, एक तलवार असा एकुण २,८६,२५०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपीं कडुन शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरीचे अलंकार पोलीस स्टेशनकडील ०२ च चतुःश्रंगी पोलीस स्टेशनकडील ०१ असे ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत दोन फरार आरोपीचा शोध चालु आहे.
सदरची कामगीरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि.२ संभाजी कदम,सहा. पोलीस आयुक्त, सिहगड रोड विभाग अजय परमार, अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. अनिल माने यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, गणेश दिक्षीत,महेश निबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शंभवी माने, यांनी केली.

महिंद्रा लाइफस्पेसतर्फे मुंबईतील महालक्ष्मी येथे 1,650 कोटी रु. चा GDV असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा

मुंबई, 19 फेब्रुवारी 2024 – महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (MLDL) ने लिव्हिंगस्टोन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (LS) सोबत महालक्ष्मी येथील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पासाठी भागीदारी केली असून त्याचे एकूण विकास मूल्य (GDV) 1,650 कोटी रु. आहे.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमित कुमार सिन्हा म्हणाले, “ही विकास योजना महिंद्रा लाइफस्पेसच्या दक्षिण मुंबईच्या प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटमधील धोरणात्मक विस्ताराचे प्रतीक आहे. हा प्रकल्प मुंबईच्या नागरी नूतनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये अत्याधुनिक डिझाईन, शाश्वत घटक आणि प्रीमियम सुविधांचा समावेश असेल आणि त्यामुळे शहराच्या स्काय लाईनमध्ये भरीव बदल घडेल.”

उच्चभ्रू महालक्ष्मी भागात स्थित असलेला हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या परिसरांपैकी एका प्रमुख ठिकाणी आहे. या स्थानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या भागातून सगळीकडे जाण्यासाठी असलेली उत्कृष्ट कनेक्टीव्हीटी. दक्षिण मुंबईतील प्रमुख व्यावसायिक ठिकाणे, अत्यावश्यक सेवा आणि करमणुकीसाठीच्या ठिकाणांपर्यंत येथून सहजी जाता येऊ शकते.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक

पुणे : तब्बल ३५० वर्षांपूर्वी शेकडो वर्षाच्या गुलामगिरीत अडकलेला आपला देश, संस्कृती आणि समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुक्त केले. जिजाऊंनी शिवरायांसारखे आदर्श निर्माण केले. कोणत्याही एका धर्म आणि पंथांसाठी नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांसारखे आदर्श व्यक्ती हे राष्ट्र आणि समाजाचा पाया असतात. असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. 

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणातून मिरवणूकीला प्रारंभ झाला. यावेळी तब्बल १००० पेक्षा अधिक विद्यार्थी पांरपारिक वेशात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात,  सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, कमल व्यवहारे उपस्थित होते. 

पांडुरंग बलकवडे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मांध, अत्याचार आणि अन्यायाविरोधात लढा दिला. त्यांनी जगाला गनिमी कावा शिकवला. हजारोंच्या फौजांना अगदी थोड्या सैनिकांसोबत लढा देऊन पराभूत केले. कोणत्याही लोकशाही राष्ट्राला आजही आदर्श ठरतील असे राज्य शिवरायांनी स्थापन केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला. 

 छत्रपती शिवराय असलेला रथ मिरवणूकीत होता यासोबतच नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन मिरवणूकीत झाले.  श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी महिला सबलीकरण पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत आदी संदेश विद्यार्थ्यांनी दिले. 

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शिवजयंती जल्लोषात

पुणेः सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ ‘जय भवानी, जय शिवराय!’, ‘नमो पार्वती पते, हर…हर.. महादेव’… या घोषणांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमआयटी ‘एडीटी’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार, परीक्षा विभाग संचालक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.    याप्रसंगी, लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील नागरिक, ‘एमआयटी-एडीटी’चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील कविता व पोवाडा आणि पाहाडी आवाजातील शिवगर्जना यामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक नृत्य व मैदानी खेळांची प्रात्याक्षिके देखील दाखवण्यात आली. शिवरायांची पालखीसह मिरवणूक व त्यानंतर अश्वारूढी पुतळ्याला क्रेनद्वारे पुश्वहार अर्पण केल्यानंतर महाराजांची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.         यावेळी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, माझ्या ऑफिस मध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती पुढे नतमस्तक होऊन दिनक्रम सुरू करतो. कारण छत्रपती शिवराय हे उर्जेचा प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. आयुष्यात कितीही मोठ्या समस्या, संकटे आली तरी शिवचरित्र वाचल्यास त्यावर मार्ग सापडतो. त्यामुळे शिवराय आपल्यातच आहेत व ते आज ३९५ वर्षांचे झाले असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती असेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  
रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद-शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल २१६+ दात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या दोन्ही उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. ‘एमआयटी-एडीटी’च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी २०२५ ;

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षात पक्षासाठी चांगले काम केले. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार,
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात,
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अमित देशमुख, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी.एम. संदीप, कुणाल चौधरी, बी. व्ही. व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली, ”सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली, ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजपा सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसने विधानसभेला ४२ जागी विजय मिळवला तर २०१९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ४४ जागी विजयी झालो, २०२४ च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव आणू, असे वडेट्टीवार म्हणाले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करू व पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम करू. हर्षवर्धन सपकाळ हे कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध असतात. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदा-या दिल्या त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करून मोठे यश मिळवून दिले. मध्य प्रदेशातही त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. सर्वोदयी तत्वज्ञान, गांधी विचाराने ते काम करतात. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. राज्यातील गावागावात शिबीरे घेऊन विचाराचे वादळ उठवू आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नव्याने काँग्रेस संघटन उभे करू.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले, पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. अफवांना बळी फडू नका, लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री अमित देशमुख, वसंत पुरके, नसीम खान, वर्षा गायकवाड यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केले.

त्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. मणिभवनला भेट दिली व त्यांनतर दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच सिद्धीविनायक मंदीराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. दुपारी त्यांनी काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

शहराचे बजेट विधानभवनात करणे हा स्वातंत्र्यावर हल्ला

आयुक्तांनी हा बेकायदा कृत्याचा प्रयत्न हाणून पाडावा_स्थानिक स्वराज्य संस्थेवर अशा प्रकारचा घाला प्रथमच

पुणे- शहराचे बजेट नागरिकांच्या सूचना मागवून ,जनसभा बोलावून महापालिका आयुक्तांनी सादर करणे आवश्यक असताना ते भाजपच्या प्रभावाखाली विधानभवनात विशिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात सादर करणे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वातंत्र्यावर केलेला थेट हल्ला ठरणार असून हा प्रयत्न महापालिका आयुक्त यांनी हाणून पडला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी चे शरद पवार गटाचे नेते माजी महापौर प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.आणि अशा प्रकारे विधानभवनात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,.गजानन थरकुडे, वसंत मोरे,सचिन दोडके, अशोक हरणावळ,किशोर कांबळे व महाविकास आघाडीचे आदी मान्यवर उपस्थित होते.

या संदर्भात जगताप यांनी सांगितले कि,’ पुणे महानगरपालिकेने नियमानुसार शहरातील, समाविष्ट गावातील,विविध भागातील आवश्यकतेनुसार व शहरातील सर्व पक्षाच्या नागरी सूचनेनुसार अर्थसंकल्प केल्यास आमची काहीही हरकत नसेल पण भाजपाच्या प्रभावाखाली व मोठ मोठे बिल्डर्स यांच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प तयार झाल्यास उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू,याबाबत महाविकास आघाडीच्यावतीने पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.

१४ मार्च २०२१ रोजी पुणे महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मागील 3 वर्ष अर्थसंकल्प सादर करीत आहेत, त्यानुसार यावर्षीही आयुक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियमानुसार शहरातील विविध भागातील गरजेनुसार अत्यावश्यक बाबींची तरतूद होणे आवश्यक आहे.असे असताना मागील ४ दिवसांपूर्वी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर बजेट त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व माजी नगरसेवकांच्या मागण्या मान्य करीत आगामी बजेट आपल्या प्रभावाचे असणार आहे, अशा प्रकारची वक्तव्य केले. हे त्यांचे वक्तव्य धक्कादायक आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नियम व संकेत मोडणारे आहे असे आमचे मत आहे. पुणे महानगरपालिकेचे आगामी बजेट हे पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत तयार होत नसून पुणे विधानभवनात होत आहे, ही बेकायदेशीर कृती आहे हे आयुक्तांनी त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.

बहुजन विरोधी कॉंग्रेस नेतृत्वाला धडा शिकवण्याची वेळ-डॉ.हुलगेश चलवादी 

उदित राज च्या वक्तव्याचा जाहिर निषेध 

पुणे:-

देशातील बहुजनांचा विरोध करण्याचे कार्य कॉंग्रेस सुरूवातीपासून करीत आली आहे. कॉंग्रेस मध्ये गेलेला प्रत्येक व्यक्ती त्यामुळे बहुजनविरोधी मानसिकतेने ग्रासलेला आहे. उदित राज सारख्या व्यक्तीने उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहीलेल्या, बहुजनांचा आधारस्तंभ, देशाच्या आयरन लेडी सुश्री बहन मायावती जीं बद्दल केलेले वक्तव्य कॉंग्रेसची बहुजनांविरोधी मानसिकता दाखवणारी असल्याचे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज,मंगळवारी (दि.१८) व्यक्त केले.बहुजन विरोधी कॉंग्रेस नेतृत्वाला आता वैचारिक आंदोलनातून धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी केले. त्यांनी उदित राज यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना तसेच त्यांच्या मृत्यूनंतर कोट्यवधी शोषित-पीडित, दलित, बहुजनांचा आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या मानवतावादी संषर्घाचा इतर पक्षासह विशेषत: कॉंग्रेसने प्रत्येक स्तरावर तिरस्कार केला आहे. कॉंग्रेस कधीही बहुजनांच्या विचाराधारेवर आणि ध्येयधोरणावर खरी उतरू शकणार नाही, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आणि निवडणुकीच्या राजकारणासाठी कॉंग्रेसने ‘जय बापू, जय भीम, जय मंडल, जय संविधान’ अशा नावावर कितीही कार्यक्रम केले तरी डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या मोहात पडणार नाही, असे मत सुश्री बहन मायावती जी यांनी व्यक्त केले असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

आंबेडकरी जनता जागरूक तसेच सतर्क असून ते स्वत:च्या पायावर उभे राहयासाठी संघर्षरत आहेत.पंरतु, काही पक्षबदलू, संधीसाधू आणि स्वार्थी दलित लोक त्यांच्या ‘आकां’ना खुश करण्यासाठी काहीही वक्तव्य करीत आहेत. त्यांच्यापासून बहुजन समाजाला सतर्क राहण्याची गरज आहे. असे वक्तव्य आणि लोकांना गांर्भियाने घेण्याची आवश्यकता नाही. ही मंडळी सामाजिक परिर्वतनाच्या आंदोलनापासून अनभिज्ञ आहेत, असे मत व्यक्त करीत मायावती जी यांनी त्यांच्या विरोधातील वक्तव्याचा समाचार घेतल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

‘ऑनर किलिंग’ घटनांमध्ये फाशीची, ‘मोका’अंतर्गत तपासाची तरतूद करा-डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी;

भोर, पुणे: बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास दडपणे हे निंदाजनक आहे. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा मोका कायद्याअंतर्गत करण्याची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी भोर येथील मूकमोर्चा आंदोलनात व्यक्त केली.
विक्रम गायकवाड यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावे. तसेच या गुन्ह्याचा तपास ऑनर किलिंगअंतर्गत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड, जेष्ठ नेते वसंत साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबवंत मनोहर, नागेश भेसले आदी मान्यवर उपस्थित होते.

भोर येथील धम्मभूमी येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बिराजदार, पोलीस उपअधीक्षक व माननीय तहसीलदार यांच्याकडे मोर्चेकऱ्यांनी कुटुंबीयांच्या व मान्यवरांच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चेकरांच्या व कुटुंबीयांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार यांनी स्पष्ट केले.

“ग्रामीण भागातील दलित जनता एकटी नसून, त्यांच्यासोबत शहर व राज्यातील आंबेडकरी समाज बांधव आहेत, हा विश्वास देण्यासाठी आजचा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल व ते राज्यव्यापी राहील,” असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी दिला.

“ऑनरकिलिंगच्या घटना राज्यभर वाढत आहेत. त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असताना सरकार हेतूता दुर्लक्ष करत आहे. तसेच दलित व बौध्दांच्या हत्याकांडांवेळी न्यायासाठी आंबेडकरी समुदायाला आंदोलन करावे लागते, हा कायद्याचा मोठा पराभव आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करुन त्यांना शिक्षा मिळेपर्यंत हा लढा सुरु राहील,” अशी भुमिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.

फिर्यादी विठ्ठल गायकवाड यांनी कुटुंबाच्या वतीने समाजाकडे न्यायाच्या अपेक्षेची मागणी केली. मोर्चामध्ये उपस्थित पुणे शहर पुणे जिल्हा मुंबई व विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली असून या तात्काळ सुधारणा न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन पुणे व मुंबई येथे घेण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी प्रास्ताविक प्रविण ओव्हाळ यांनी तर सुत्र संचलन रोहीदास जाधव यांनी केले. भोर येथील आंबेडकरी चळवळीतील प्रविण ओव्हाळ, रोहिदास जाधव, बाळासाहेब अडसुळ, नवनाथ गायकवाड यांनी मोर्चाचे आयोजन केले.

महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष

पुणे- महानगरपालिकेत ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती गठीत केली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ
नागरिक लोकशाही दिन देखील साजरा केला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

पुणे शहरात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक हे महानगरपालिकेमार्फत प्रदान करत असलेल्या दैनंदिन नागरी सुख सुविधाबाबत उदभवणाऱ्या समस्यांविषयी तक्रारी तसेच नाविन्यपुर्ण उपाय योजना व गाऱ्हाणी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे मांडत असतात. या तक्रारींचे निराकरण करणे, तसचे सुचविलेली कामे यांची दखल घेणेचे अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीने ‘पुणे महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती व लोकशाही दिन चे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या करिता अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या कामकाजावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे नियंत्रण राहील.

अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, समितीच्या विहीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना ( अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन करणे, संबंधित विभागाशी तक्रारींच्या अनुषंगाने समन्वय करणे, विभागप्रमुख / खातेप्रमुख यांना अवगत करणे, वर्ग केलेल्या तक्रार अर्जाचे व केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे, तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर संबंधित विभागामार्फत अर्जदारास समपक व समाधानकारक उत्तर देणे इ.) करण्यात याव्यात. किरकोळ स्वरुपाच्या तक्रारींबाबत विभागांशी समन्वय करून शक्यतो सत्वर निराकरण करण्याबाबत भर देण्यात यावा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) हे ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समितिच्या व लोकशाही दिनाचे कामकाजावर नियंत्रण ठेवतील. नियुक्त समितीने या बाबतचा कामकाज वस्तुनिष्ठ अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे मार्फत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेकडे दर १५ दिवसांनी अवलोकनार्थ सादर करायचा आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत.

– अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा

मिलींद मधुकर करमरकर, उप अभियंता अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) कार्यालय : अध्यक्ष

असंग रामदास पाटील, उप समाज विकास अधिकारी : सदस्य

अस्मिता कुलकर्णी, प्रशासन अधिकारी : सदस्य सचिव

दिपक एकनाथ फणसे, उप अधिक्षक : सदस्य

तेजस पाटील ठरला देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी

आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्यावतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तेजस पाटीलने प्रथम क्रमांक पटकावित देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी ठरला आहे. तर यश पाटील यांनी द्वितीय तर चैतन्य कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सभागृहात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेचे उद्घाटनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण समारंभ टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते झाले.  यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात,  सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित होते. या स्पर्धेचे हे तृतीय वर्ष होते.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १११११, द्वितीय क्रमांकाला ७७७७, तृतीय क्रमांकाला ५५५५ आणि  उत्तेजनार्थ क्रमांकाना प्रत्येकी ११११  रोख तसेच करंडक आणि  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या यश पाटील याने द्वितीय तर गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या चैतन्य कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या चैतन्य बावधाने, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या भक्ती धावले, सप महाविद्यालयाच्या रमेश कचरे, बी जे एस महाविद्यालयाच्या गोविंद भांड, स्वराज महाविद्यालयाच्या उत्कर्षा शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.

संजय चाकणे म्हणाले, महाराष्ट्राला वक्तृत्वाची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळक, केशवराव जेथे यांसारख्या अनेक वक्त्यांनी महाराष्ट्र गाजवला. या वक्तृत्वामुळेच मुंबई सह महाराष्ट्र मिळाला. बोलणे सोपे असते परंतु काय बोलावे हे अवघड आहे. त्यासाठी वाचन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

दिपाली आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमित गोगावले यांनी आभार मानले.

एमपीएफ ‘संविद २०२५’ दोन दिवसीय परिषद पुण्यात

 महेश प्रोफेशनल फोरम तर्फे आयोजन ; देशभरातून मान्यवरांची उपस्थिती ; मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग ; विनामूल्य प्रवेश
पुणे : महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या महेश प्रोफेशनल फोरमच्या वतीने न्याती प्रस्तुत संविद २०२५ परिषद आणि मेगा एक्स्पो चे आयोजन दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावरील वर्धमान लॉन्स येथे करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार असून मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग असणार आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा श्रुती करनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला सीए समीर लढ्ढा, कांतीलाल बदले, अतुल नावंदर, आशिष जाजू,  निहार लढ्ढा, रोहित मोहता, प्रिती मालपाणी, प्रितेश मणियार, महेश बागल आदी उपस्थित होते. 
संविद २०२५ परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी न्याती ग्रुपचे नितीन न्याती, भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सामाजिक उद्योजकता आणि महिला सबलीकरण या दोन विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्योजकता आणि नेटवर्किंग बाबत देखील परिसंवाद होतील.
रविवार, दि. २३ रोजी ‘व्यापार सेतू’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ३०० हून अधिक उद्योजक सहभागी होणार आहेत. उद्योजकता विकास याबाबत यामध्ये चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होणार आहे. उद्योजकता विकासातून राष्ट्रप्रगती साधण्याकरिता हे महत्वाचे पाऊल असून मेगा एक्स्पोमध्ये  सेवा, अर्थ, कर्ज, बांधकाम, फर्निचर, किरकोळ विक्री आणि ज्वेलरी सह विविध क्षेत्रातील उद्योगांचा सहभाग असणार आहे. दोन दिवसीय परिषदेला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

एटीएम कार्ड बदलून 21 ज्येष्ठांची फसवणूक:म्हैसूरच्या भामट्याला पकडले,13.90 लाखांचा मुद्देमाल आणि166 एटीएम कार्ड्स सापडली

पुणे-पुणे पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथील राजू प्रल्हाद कुलकर्णी (५४) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आणि १६६ एटीएम कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करुन कुलकर्णी त्यांचे एटीएम कार्ड चोरायचा. त्यांच्याकडून पिन नंबर जाणून घ्यायचा. त्यानंतर कुलकर्णी एटीएममधून पैसे निघत नाही, असे सांगून ज्येष्ठांना त्याच्याकडील बाद झालेले एटीएम कार्ड द्यायचा. ज्येष्ठांकडील एटीएम कार्ड चोरुन तो पसार व्हायचा. एटीएम कार्डचा गैरवापर करुन तो पैसे काढून घ्यायचा, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजवे चौकात २ फेब्रुवारी रोजी एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात आरोपी कुलकर्णीने ज्येष्ठाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कुलकर्णी कर्नाटकात पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयु्क्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, संतोष शेरखाने, नितीन बाबर, सागर मोरे यांनी ही कामगिरी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. निवृ्त्ती वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होत असल्याने कुलकर्णी शहरातील वेगवेगळ्या भागातील एटीएम केंद्रांबाहेर पाळत ठेवायचा. ज्येष्ठ नागरिक एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तो त्यांच्या पाठाेपाठ एटीएममध्ये शिरायचा. हातचलाखी करुन तो त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठांना द्यायचा. ज्येष्ठांकडील कार्ड घेऊन तो त्यांच्या खात्यातून पैसे चोरायचा. गुन्हा केल्यानंतर तो कर्नाटकात पसार व्हायचा.आरोपी राजू कुलकर्णी याने एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली. त्याने विश्रामबाग, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरुड, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सहकारनगर, तसेच आळंदी परिसरात फसवणुकीचे १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. कुलकर्णी याने फसवणुकीतून मिळालेल्या पैसे मैत्रिणीसाेबत मौजमजा करण्यासाठी खर्च केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.

संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही?:माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचा सवाल

औरंगजेबावर वाद होण्याची शक्यता
मुंबई-माजी क्रिकेटपटू तथा सुप्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी छावा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवला नाही? असा खडा सवाल केला आहे. त्याने यासंबंधीच्या आपल्या पोस्टमध्ये मोगल बादशहा औरंगजेबाचा उल्लेख केल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई व अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. समालोचक आकाश चोप्रा यांनी हा चित्रपट नुकताच पाहिला. त्यानंतर एका पोस्टद्वारे त्यांनी उपरोक्त सवाल केला. त्यावर सोशल मीडियात गरमागरम चर्चा रंगली आहे.

आकाश चोप्रा आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, मी छावा चित्रपट पाहिला. शौर्य व अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखवताना ज्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन झाले, त्यावरून मला काही प्रश्न पडलेत. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवण्यात आला नाही? त्यांचा इतिहासाच नाही, तर त्यांचा साधा उल्लेखही कुठे नाही. आपल्याला केवळ अकबर कसा मोठा व न्यायप्रिय राजा होता हेच शिकवले गेले. राजधानी दिल्लीतील एका रस्त्याचे नाव औरंगजेब आहे. हे सर्व का व कसे घडले?

छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर:अभिनेता कमाल खानचे वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुख्यमंत्र्यांनी दिल्या मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचनाजिथे अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई होणारच

मुंबई–छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकीपीडियावर वादग्रस्त व चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावली गेली आहेत. तसेच तो वादग्रस्त व चुकीचा मजकूर विकीपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकीपीडियाला माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते, मात्र त्यांनीच अशी चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

यात आणखी भर म्हणजे देशद्रोही फेम अभिनेता कमाल खानने देखील छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा चुकीचा मजकूर शेअर केला आहे. हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा त्याने केला आहे. यामुळे आणखी वाद पेटला आहे. या सर्वांची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सायबर विभागाच्या आयजींना विकीपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विकीपीडियावर अशा प्रकारचे लिखाण राहणे चुकीचे आहे. विकीपीडिया भारतातून चालत नाही. तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. पण ऐतिहासिक घटना, व्यक्तींबद्दल असे लिहिले जाऊ नये यासाठी नियमावली तयार करा, असे विकीपीडियाला सांगण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. पण त्याला एक सीमा आहे. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्तीवर घाला घालू शकत नाही. जिथे अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई होणारच. यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारसोबतही चर्चा करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अभिनेता कमाल खान याने अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटावर देखील टीका केली आहे. चित्रपटाचे समीक्षण लिहिताना कमाल खानने दहा पैकी एकच रेटिंग दिले आहे. विकीपीडियावर देखील अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिन करणे असल्याचे बोलले जात आहे. विकिपीडियाने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली नाराजीदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यामध्ये, वर्षानुवर्षे बरेच काही लिहिले गेले, चुकीचे मजकूर जोडले गेले आणि त्याचेच प्रतिबिंब म्हणजे आता ही विकिपिडियावर दिसणारी माहिती आहे. सर्व मुद्दे, आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यानंतर बलिदान अधोरेखित करणे हे चालूच आहे आणि तेच पुन्हा अत्यंत दुर्दैवीपणे पाहायला मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने लवकरात लवकर यासंदर्भातील सूचना जारी करत जनमानसाच्या भावनांचा आदर करावा अशीही मागणी केली.