Home Blog Page 651

साहित्य, साहित्यिक ही महाराष्ट्राची संस्कृती : उदय सामंत

मराठी साहित्ययात्री संमेलनाचा दिमाखात शुभारंभ
ढोल-ताशांचा गजर, राष्ट्रगीत-महाराष्ट्र गीताने दुमदुमले रेल्वेस्थानक

पुणे : बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. तसेच अनेक वाद देखील होऊ शकतात, पण सकारात्मक विचार करता वाद हे जीवंतपणाचेच लक्षण आहे, हे जाणवते. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 19) मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे उपस्थित होते.
सुरुवातीस शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकात चैतन्याची भावना निर्माण झाली होती. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचे या वेळी स्वागत करण्यात आले. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीकडे निघाली आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद साधला.
मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष शरद गोरे, कार्यवाह सचिन जामगे, मुख्य समन्वयक ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, निमंत्रक अक्षय बिक्कड उपस्थित होते.
उदय सामंत पुढे म्हणाले, साहित्यिकांच्या मागे उभे राहणे म्हणजे मराठी माणसाच्या मागे उभे राहणे आहे. आणि मराठी माणसामागे उभे राहणे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या पाठीशी असणे होय. विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले हे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करणारे आहेत. या महान व्यक्तिंविषयी वाईट उद्गार काढणे हा देशद्रोह आहे आणि या विरोधात अख्खा महाराष्ट्र-मराठी माणूस पेटून उठेल. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सातासमुद्रापलिकडे नेण्याचे मोठे कार्य घडत आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, मराठी भाषा साहित्य संमेलन हे साहित्य आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला दिलेली शौर्याची शिकवण पुढे नेणाऱ्या पराक्रमी सेनानी महादजी शिंदे यांना वंदन केले जात आहे. त्यांचे धैर्य, शौर्य व नेतृत्व मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. रेल्वेतील साहित्ययात्री संमेलन जगभरात प्रथमच घडत आहे, या विषयी संजय नहार व त्यांच्या सहकार्यांचे विशेष अभिनंदन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा अलौकिक होईल याची खात्री आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी केदारनाथ सिंह यांच्या ‌‘केदारनाथ सिंह की पचास कविताएं‌’ या कविता संग्रहाचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी मराठीत केलेल्या ‌‘सर्जनात्मक हस्तक्षेप‌’ या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री उदय सामंत आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या विषयी बोलताना सामंत म्हणाले, संगीत बर्वे यांनी खऱ्या अर्थाने मराठीपण जपत पुस्तकाचे प्रकाशन या साहित्ययात्री संमेलनाच्या निमित्ताने केले आहे, ही मराठी भाषेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद करण्यात आली असून ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या मराठी साहित्ययात्रर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व संयोजकांना याविषयीचे प्रमाणपत्र प्रदान केले.

‘आयसीएआय’ पुणे शाखेला दोन पारितोषिके

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) पुणे शाखेला २०२४ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल विभागीय स्तरावर दोन पारितोषिके मिळाले आहेत. सर्वोत्तम शाखा म्हणून पहिले, तर सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा म्हणून दुसरे पारितोषिक मिळाले आहे. दोन्ही पारितोषिके ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी व ‘विकासा’चे अध्यक्ष सीए प्रणव आपटे यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अंकित राठी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी ‘डब्ल्यूआयआरसी’चे उपाध्यक्ष सीए राहुल पारीख, सीए पिंकी केडिया, सीए गौतम लाठ, ‘विकासा’चे चेअरमन सीए पियुष चांडक, पुणे शाखेचे कार्यकारिणी सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए प्रितेश मुनोत, सीए हृषीकेश बडवे, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना घेऊन उपक्रम राबवले. प्लास्टिकचा वापर बंद केला. यासह सीए व विद्यार्थ्यांसाठी विविध आर्थिक विषयांसंदर्भात नवनवीन कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम, फॉरेन्सिक अकाउंटिंग, जीएसटीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. ‘अकाउंटिंग स्टॅंडर्ड डे’ साजरा करणारी पुणे शाखा देशातील एकमेव शाखा ठरली. या सर्व उपक्रमांत शाखेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यालयाच्या कार्यकारणीचे सभासद, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सभासद, पुणे शाखेच्या कार्यकारिणीचे सदस्य, पुण्यातील सर्व सभासद, व्याख्याते, विद्यार्थी, शाखेमधील सेवक इत्यादीचा महत्वाचा सहभाग मिळाला. सर्वांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले आहे.”

सीए प्रणव आपटे म्हणाले, “भविष्यातील ‘सीए’समोर असणारी आव्हाने आणि संधी विचारात घेऊन वर्षभरात कार्यक्रमांची आखणी केली. पाठ्यक्रमाच्या अनुषंगाने वैविध्यपूर्ण उपक्रम, रक्तदान शिबीर, स्वच्छ भारत अभियान, क्रीडा स्पर्धा व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उद्योगांना भेटी, आर्टिकलशिप कशी करावी, याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रोत्साहनपर व्याख्याने झाली.”—————————–

शिवजन्मोत्सव स्वराज्यरथांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्वागत

पुणे -पुण्यनगरीत लाल महाल मार्गावर शिवजन्मोत्सवानिमित्त आलेल्या स्वराज्यरथांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित केलेल्या स्वागत कक्षाकडून स्वागत करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा १९ फेब्रुवारी रोजी जन्म दिवस हा देशभरासह महाराष्ट्रात पुण्यात शिवजयंती उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे गेली १३ वर्षांपासून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुकांमध्ये सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या स्वराज्यरथांचा सहभाग असतो. यामध्ये सहभागी असलेल्या स्वराज्यरथांचे स्वागत करत सरदारांच्या वारसदारांचा सन्मानपत्र, शाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवप्रेमीसाठी पाणी व्यवस्था व जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली होती. पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष श्री. आनंद दत्ताभाऊ सागरे यांनी अतिशय चांगल्याप्रकारे या स्वागत कक्ष उपक्रमाचे आयोजन केले होते.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक समीर शेख, व्यापारी वीरेंद्र किराड, सोशल मिडिया शीतल मेदने, अल्पसंख्याक महिला नूरजहाँ शेख, तृतीयपंथी सेल निर्जला गुरु गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसबा अध्यक्ष अजय दराडे, विधानसभा कार्याध्यक्ष राहुल तांबे,राहुल पायगुडे,विपुल म्हैसूरकर,महिला विधानसभा अध्यक्ष नीता गायकवाड, सुप्रिया कांबळे, विधानसभा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, सरचिटणीस दुष्यंत जाधव, संदीप गाडे, उपाध्यक्ष डिंपल इंगळे, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, संघटक सचिव विलास बहिरट, अतुल बहिरट, चिटणीस चेतन मोरे, संघटक सचिव रवींद्र कवडे, अय्याज शेख, युवती कार्याध्यक्ष लावण्या शिंदे, महिला संघटक सचिव सुनिता चव्हाण,महिला उपाध्यक्ष प्रीती डोंगरे, राधिका वाईकर,गौरी कोंडे, कविता राक्षे, सुनिता बडेकर,पद्मिनी ओस्वाल,विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, युवती कार्याध्यक्ष श्रेया तांबे,शाहरुख शेख,सुनीता कांबळे तसेच शिवप्रेमी लाल महाल परिसरात मोठ्या संख्येने जमले होते.

जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?:विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, छत्रपती संभाजीराजेंचा राहुल गांधींना सल्ला

पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर अभिवादन केले आहे. त्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अभिवादनच्या ऐवजी श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवजयंती दिनी ‘श्रद्धांजली’ असा उल्लेख केल्याने टीका केली जात आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?’ जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. त्यामुळे अशा वेळी ‘श्रद्धांजली’ हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते वारंवार अपमान करत आले आहेत. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आहे. हे तमाम शिवभक्तांचा अपमान आहे. हे चुकून झालेले नाही. हे त्यांची जीभ घसरलेली नाही, तर हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर त्यांनी माफी मागायला पाहिजे.

दरम्यान, यावर कॉंग्रेसकडून सारवासारव केली जात आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्वीटमुळे वाद उफळला असता, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ते म्हणाले, राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना काय म्हटले, तर माय हंबल ट्रिब्युट. म्हणजे मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्या मागचा भाव आहे. आता ‘ध’ चा ‘मा’ करून विनाकारण घाणरेडे राजकारण विरोधकांनी करू नये, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे महिला सुरक्षितता,अस्मिता आणि सन्मान कायम..

0

उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे छत्रपतींना कृतज्ञतापूर्वक वंदन..

मुंबई दिनांक- १९ फेब्रुवारी.
विधान भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गो-हे, आमदार राजेश विटेकर,सचिव जितेंद्र भोळे,सचिव विलास आठवले यांनी विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत जयघोष केला.यावेळी विधान भवन अधिकारी,कर्मचाऱ्यांनी महाराजांना वंदन केले.
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्यामुळे अस्मिता,वीरत्व,शौर्यत्व
त्व,देशभक्ती, धर्मभक्ती,त्याच बरोबर सगळ्या समूहाला नेतृत्व करत इतिहास घडविला आहे.शिवाजी महाराज यांनी सत्ता अन्याय,अत्याचाराचा मुकाबला केला ते पाहिल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्यामुळे नंतरच्या काळात मराठी साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहचले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सातत्याने परकिय आक्रमण रोखण्याचे काम केले तसे स्वधर्म देशहिताचा जागविण्याचे कामही केले. शिवाजी महाराजांमुळे महिलांच्या संदर्भात सुरक्षितता, अस्मिता, आणि सन्मान कायम राहिला आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यामध्ये फार मोठे योगदान होते अश्या शब्दात शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

अरेरे ..पुण्यात पोलिसांची अवस्था मोठी दयनीय..चार बेवड्यांनी एका पोलिसाला बदडले आणि पोलिसांनी साधी तक्रारही नाही घेतली…

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे..

पुणे-कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतत असताना सेनापती बापट मार्गावरील रत्ना रुग्णालयाच्या परिसरात चार बेवड्यांनी एका पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.पोलिस कर्मचारी चंद्रकांत जाधव यांना चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चंद्रकांत जाधव हे गुरुवारी दिनांक 13 रोजी मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मद्यप्राशन करत गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि त्याचा त्यांना राग आला. त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलिस नाहीस, त्यामुळे तु आम्हाला शिकवू नको, असे म्हणत चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

आरोपींनी तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला असे म्हणत डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका जाधव यांनी केली आणि मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. मात्र आरोपींनी त्यांचा मोबाईलही हिसकावला. गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाने चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्‍याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. ते सांगत असताना, सर्व प्रकार समोरील अधिकार्‍यांना ऐकू जात होता. तरी चौघे जाधव यांना मारहाण करत होते.जखमी झालेल्या चंद्रकांत जाधव यांनी हा प्रकार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात सांगितला व तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. मात्र येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी आता नको उद्या पाहू असे म्हणत वेळ मारून घेतला. तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली असता त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.दुसऱ्या दिवशी परत जाधव चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील अधिकार्‍यांना भेटून कैफियत मांडली. कोर्टाचे काम असल्याचे सांगून हे अधिकारी निघून गेले. जाधव तेथेच ताटकळत उभे होते. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना त्यांना भेटवण्यात आले, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातले. आरोपींना पकडून तुमच्यासमोर उभे करतो असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर तर पोलिसांची हद्दच झाली. त्यांनी आपल्या वजनदार माणसाचा वापर करत मारहाण झालेल्या जाधव यांना प्रकरण मिटवून घेण्याचा अजब सल्लाच दिला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे.. रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राहुल गांधींनी जयंतीदिवशी शिवरायांना वाहिली श्रद्धांजली अन भाजपने उठविली टीकेची झोड

मुंबई- लोकसभेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी जयंतीदिवशी ट्विटर अर्थात X वरून शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे भांडवल करत भाजपने टीकेची झोड उठविली आहे आणि नव्याच वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी यांच्याकडून महापुरुषांचा सतत अपमान सुरू असल्याचा आरोप करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या. मात्र शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला आहे.

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.भाजपकडून माफीची मागणी…

महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली वाहतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

औरंग्याच्या पिलावळाकडून अजून दुसरी काय अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जगभरात एक वर्ग आहे. त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लख करता! राहुल गांधींनी देशाची, जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक व्हावे. राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही, तर त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे.

शिवरायांचा मालवणमधील पुतळा कोसळून अवमान केल्याबद्दल मोदी-फडणवीस केंव्हा माफी मागणार?

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी २५
शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंती निमित्त ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केलेल्या ट्विटमध्येही नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली असेच लिहिलेले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी राजकारण करू नये. मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. भाजपाच्या सरकारनेच हा पुतळा उभारला आणि अवघ्या आठ महिन्यात तो कोसळला आणि महाराजांचा अवमान केला, कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या पण अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही. अरबी समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपुजनही करण्यात आले पण अद्याप या स्मारकाची एक विटही रचलेली नाही, त्याबद्दल भाजपा माफी कधी मागणार, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

भाजपाच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महाराजांचा अपमान केला पण त्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना जराही शरम वाटत नाही, माफी मागत नाहीत आणि राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा वापर करतात अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असेही अतुल लोंढे म्हणाले.

भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

गड-किल्ले आपली प्रेरणा व अस्मिता, पर्यटनाच्या नावाखाली गड, किल्ल्यांवर बार, पब सुरु करु नका.

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करु, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांविरोधातही अनेक प्रवृत्ती काम करत होत्या, त्यांच्या राज्याभिषेकालाही विरोध केला होता, त्याच प्रवृत्ती आजही आहेत. शिवाजी महाराज यांची लढाई राज्यव्यवस्था व तत्कालीन अर्थव्यवस्थे विरोधातही होती तशाच पद्धतीने आज सत्ता ही मूठभर लोकांच्यासाठी राबवली जात आहे. धर्मव्यवस्थेतही मूठभर लोक आम्हीच सर्वेसर्वा असे माननारे आहेत, या प्रवृत्तींच्या विरोधात आम्हाला लढावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे व त्यांनी दिलेल्या सामाजिक दर्शनाच्या माध्यमातूनच वाटचाल करू असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवावा ही शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत, हे आपले स्पिरीट आहे, आपला संस्कार आहे. या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

गड किल्याच्या विषयावर बोलताना सपकाळ म्हणाले की, गड किल्ले आपल्या अस्मितेचे विषय आहेत, सत्तेत येण्यासाठी लाडकी बहिण योजनेकडे वारेमाप पैसा वळवला जाऊ शकतो तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गड किल्ल्याकडेही पहावे, त्याचे खाजगीकरण करु नये, पर्यटकांच्यासाठी म्हणून गड, किल्ल्यावर बार, पब सुरु करु नयेत असेही ते म्हणाले.

डान्सबार संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे. डान्सबार बंद करत असताना सामाजिक पार्श्वभूमी व केस स्टडी करण्यात आल्या होत्या, या डान्स बारमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्थ झाली, काहींनी शेती विकून डान्स बार मध्ये पैसे उधळले हे पाहूनच डान्सबार बंदी करण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला होता. डान्सबार सारख्या विकृत्तीला चालना देऊ नये, काँग्रेसचा त्याला विरोध असेल असेही सपकाळ म्हणाले.

कल्याणमधील ६५ अनधिकृत इमारतींच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई अदानीच्या व बिल्डरच्या घशात घालण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र सुरुच आहे. हजारो एकर शासकीय जमीन देऊनही त्यांची भूख भागत नाही म्हणून ते आता सर्वसामान्यांची घरेही गिळत आहेत. कल्याणमधील हजारो लोकांना रस्त्यावर यावे लागणे हे शासन प्रशासनाचा निर्ढावलेपणा आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत कष्टकरी, नोकरदार व झोपडट्टीतील लोकांच्या अधिकाराचे हनन होता कामा नये ही काँग्रेसची भूमिका आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, रामकिसन ओझा आदी उपस्थित होते.

रंगावलीतून साकारले शिवचरित्र

श्री गजानन मंडळातर्फे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा : श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन च्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शन
पुणे : राजमाता जिजाऊंचे तुळजाभवानी मातेला साकडे… शिवबांचा जन्म… शिवरायांचे पहिले सूर्यदर्शन… शिवरायांचे शस्त्र शिक्षण… अफजल खान वध… बाजीप्रभूंचे शौर्य… भक्ती शक्ती संगम अशा विविध रंगावलीतून कलाकारांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी शिवचरित्र साकारले. पुण्यात पहिल्यांदाच रंगावलीतून शिवचरित्र साकारण्यात आले आहे.


लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, अध्यक्ष राकेश गाडे, हर्षद पाचंगे, महेश जाधव, स्वप्निल पगारिया, शुभम जैन, सारंग भिरंगी, अमेय गाडे, ओमकार भोसले, प्रतीक जाधव, आकाश पाचंगे, निनाद पाचंगे, मयूर भिरंगी, प्रितेश चव्हाण उपस्थित होते.
स्वराज्याची शपथ, रांझ्याच्या पाटलाला कठोर शिक्षा, सुरत स्वारी, पुरंदरचा तह, जिजाऊंना सती जाण्यापासून रोखण्याचा प्रसंग, आग्रा दरबारातील सिंहगर्जना, आग्र्याहून गरुडभरारी, गड आला पण सिंह गेला, आरमाराचे बळकटीकरण, समर्थ रामदास आणि शिवराय, शिवराज्याभिषेक या कथा प्रसंगावर रांगोळ्या पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
पाण्यावरील आणि पाण्याखालील रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी यांसह ३ डी रांगोळी अशा विविध माध्यमातील रांगोळी पाहण्याची संधी प्रदर्शनात मिळत आहे. दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत दिवसभर पुणेकरांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवात मेघना झुझम यांचा माँसाहेब जिजाऊ व मी तुमची सावित्रीबाई फुले या विषयावर एकपात्री प्रयोग झाला. लेखक व शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे शिवरायांचे राष्ट्रीयत्व या विषयावर व्याख्यान देखील झाले.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी- मुख्यमंत्री

पुणे, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक वेगाने व्हावे यासाठीही राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, नानासाहेब जाधव, रविंद्र वंजारवाडकर, शिवसृष्टीचे जगदीश कदम, विनय सहस्त्रबुद्धे, अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम लढवय्ये, उत्तम योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते उत्तम प्रशासक होते. महिलांचा सन्मान आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम शिवरायांनी केले. ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा आग्रह धरुन मराठीचा वापर चालू केला. त्याचे पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली शिवरायांनी तयार केली, असे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे २१ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाने शिवसृष्टीला ‘मेगा टूरिझम’ म्हणून दर्जा दिला असता तरी पर्यटन केंद्र म्हणून भेट देण्यापेक्षा प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यावी. शिवसृष्टीमध्ये ३६ मिनीटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आले आहे असे सांगून ते म्हणाले, देशामध्ये सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पहायला मिळते. किल्ल्यांची रचना, पाण्याच व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, किल्ल्याच्या संरक्षणासाठीची अभेद्य व्यवस्था ते करायचे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी नामांकन केले आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भातील सादरीकरण सांस्कृतिक विभागामार्फत युनेस्को येथे लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा म्हणून युनेस्कोही स्विकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवरायांचे वेगवेगळे पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. शिवसृष्टी उभारणं हे एक राष्ट्र कार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी शिवसृष्टी येथील स्वराज्य, स्वभाषा व स्वधर्म या त्रिसुत्रीवर आधारित दालन, गंगासागर व भवानी मातेच्या मंदीराला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रायगड किल्ल्यावरुन आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागर मध्ये अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाटा एआयएने विम्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी पुण्यामध्ये ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ उपक्रमाचे केले आयोजन

पुणे, 19 फेब्रुवारी 2025:  टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स या भारतातील एका आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपनीने पुण्यामध्ये ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ या उपक्रमाचे आयोजन करून जीवनांचे रक्षण करण्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याच्या कंपनीच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा हा एक भाग आहे.

टाटा एआयएने आयोजित केलेल्या एक रोडशोमध्ये २८० सल्लागार, लीडर्स आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर वॉकथॉनचे आयोजन करून विम्याविषयी जागरूकता वाढवण्याचा संदेश दिला गेला. ‘सर्व भारतीयांसाठी विमा’ ही घोषणा देत सहभागींनी वॉकथॉन पूर्ण केली.  टाटा एआयएच्या चार शाखांमध्ये चार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये १२६ पिशव्या रक्त जमा झाले. ५० पेक्षा जास्त कर्मचारी आणि सल्लागारांनी पुणे स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंडला भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप केले. १८० कर्मचारी आणि सल्लागारांनी निवारा ओल्ड इज होमला भेट दिली, तिथे खुर्च्या, धान्य, साखर व इतर वाणसामान दान केले.

टाटा एआयएचे प्रोप्रायटरी बिझनेसचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री अमित दवे यांनी सांगितले, जीवन विमा लोकांना, समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना हवी असलेली आर्थिक सुरक्षा पुरवतो. त्यामुळे जीवन विम्याविषयी जागरूकता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. टाटा एआयए आपल्या ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ उपक्रमातून भारतीयांसाठी आर्थिक समावेश आणि आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देत आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना विमा सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये १ लाख जीवने सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी टाटा एआयए अथक प्रयत्नशील राहील.”

‘प्लेज टू प्रोटेक्ट’ मोहिमेंतर्गत टाटा एआयएने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांच्या भारतभरातील ५९९ शाखा व १.४३ लाख एजंट्स व कर्मचारी यामध्ये सहभागी होत आहेत. रोडशो, जॉगर्स पार्कमधील ऍक्टिव्हिटीज, गृहसंकुलांमधील विविध कार्यक्रम, आरोग्य शिबिरे यांचा त्यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर संपर्क साधण्याबरोबरीनेच ही कंपनी स्थानिक स्वयंसेवी संस्था, पंचायत आणि स्वयंसहायता समूहांच्या सहयोगाने ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील लोकांना विम्याविषयी माहिती देईल.

टाटा एआयएच्या ५५० पेक्षा जास्त शाखांनी ही मोहीम आधीच सुरु केली आहे, यामध्ये ७०,००० एजंट्स, कर्मचारी आणि ग्राहक सहभागी झाले आहेत.

विम्याबरोबरीनेच, ‘जागृती’ या आपल्या आर्थिक साक्षरता उपक्रमामार्फत टाटा एआयए आर्थिक सक्षमतेला देखील प्रोत्साहन देत आहे. यामध्ये टाटा एआयएचे कर्मचारी वंचित समुदायांना अत्यावश्यक आर्थिक उपाययोजनांची, साधनांची माहिती देतात. एक संरचनाबध्द प्रशिक्षण मोड्यूल हिंदी, इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध करवून देण्यात आले आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या नेटवर्कमधील कमीत कमी चार व्यक्तींना आत्मविश्वास मिळवून द्यावा जेणेकरून त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यात मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे. ३३०० पेक्षा जास्त टाटा एआयए कर्मचाऱ्यांनी याआधीच या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे.

गावठी दारूचे आगर:लोणी काळभोरमध्ये दारू भट्टीवर कारवाई:१२ लाखाचा माल पकडला;हातभट्टीकिंग मुकेश कर्णावत पळाला

पुणे-लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्टीचे आगर बनलेल्या भागातील एका दारू भट्टीवर छापा मारून पोलिसांनी सुमारे १२ लाखाचा ऐवज हस्तगत केला . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१८/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे स्टाफ असे कोंबिंग ऑपरेशन करत असताना स.पो.नि.मदन कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओढयाचे बाजुला रामदरा रोड येथील मोकळा रोड परिसरात इसम नामे मुकेश कर्णावत हा हातभट्टीची गावठी दारू तयार करत असले बाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुशंगाने लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव व स्टाफसह शोध घेतला असता खालील नमुद मुददेमाल मिळुन आला मात्र मुकेश कर्णावत अंधाराचा फायदा घेवुन जंगलात पळून गेला. सदर ठिकाणी १५०० लिटर तयार दारू १०० रु प्रति लिटर प्रमाणे एकूण १,५०,०००/- रू.ची तसेच २०,००० लिटर रसायन ५० रुपये प्रति लिटर प्रमाणे असे एकूण १०,००,०००/-रू. चे तसेच सदर ठिकाणी दारू करण्याचे साहित्य मोटार, ड्रम, एअर ब्लोअर, सरपण व इतर साहित्य असे एकुण ११,६०,०००/- रू.चा माल मिळून आला असून सदर बाबत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपी विरुद्ध लोणी काळभोर पो.स्टे.गु.र. नं.९८/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) (क) (ई) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचे कडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे,सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पो.स्टे. कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव, गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलास अमंलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलास अमंलदार सातपुते, वनवे, वीर, योगेश पाटील, शिरगिरे यांनी केली आहे.

पुरावे दिले तरीही धनंजय मुंडे यांच्यावर अपेक्षित कारवाई का नाही ? अंजली दमानियांचा सवाल

मुंबई-मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अपेक्षित कारवाई केली जात नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी कसे घोटाळे केले आहेत यावर पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत या हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही. मी सुरुवातीला कराड आणि मुंडे यांचा कसा संबंध आहे हे मी दाखवले. कराड आणि धनंजय मुंडे हे कंपन्यांमध्ये एकत्र कसे आहेत ते मी दाखवले, त्यांचे आर्थिक व्यवहार असो, मिळालेला नफा असो, दहशत असो मग ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मी दाखवले राज्याच्या मंत्र्याला राज्याच्या कंपनीकडून थेट नफा मिळत आहे. बॅलन्स शिटच्या बॅलन्स शिट भरले जात आहेत. त्यानंतर मी कृषी घोटाळा बाहेर काढला, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, कृषी घोटाळ्यात मी दाखवले की 80-90 रुपयांचे नॅनो युरियाला 220 रुपयांनी खरेदी केली गेली. या सगळ्या गोष्टींचे डीटेल्स दिले. त्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल मागवल्या देखील आणि त्याचा इनव्हॉईस मी ट्विट केला. तर त्याचा जर आपण क्रम पहिला तर 4 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि 5 तारखेला मी या बॉटल मागवल्या आणि त्यानंतर 7 तारखेला कंपनीकडून बंदी घालण्यात आली आणि असे सांगण्यात आले आहे की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफकोचे प्रॉडक्ट विकू शकत नाही. धनंजय मुंडे यांचे पीए जोशी म्हणून आहेत कोणीतरी त्यांनी सगळ्या माध्यमांना पाठवून दिले की इफकोचे प्रॉडक्ट विकता येत नाही असे जाहीर केले. मात्र अनेक वेबसाइटवरून प्रॉडक्ट विकले जातात.

इफकोचे घोटाळे अनेकवेळा झाले आहेत. तसेच एक सीबीआयचा एफआयआर देखील आहे. किती मोठ्या प्रमाणात इफकोमध्ये भ्रष्टाचार होतात, तेथील अधिकारी कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात याचे डेटेल्स मी दिले आहेत. धनंजय मुंडे तर काय काय करतात यावर मला आता बोलावे वाटत नाही.

कृषी घोटाळा नंबर 2 मध्ये धनंजय मुंडे कुठल्याही पद्धतीने वाचत नाहीत. हे एक पत्र आहे या पत्रावर तारीख नाही. मंत्री लिहितात पण तारीख लिहिलेली नाही. या पत्रात लिहिले आहे की दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारात ठेवलेल्या मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो, याचे हे धडधडीत उदाहरण आहे. मी या दोन्ही तारखांच्या बैठकांचे अटॅचमेंट पाठवले आहेत. कुठेही निर्णय झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय. महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनूदेशनमधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी, मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेलाच नाहीये. किती खोटे आहे हे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित, एकतर हे काही उत्पादित करत नाहीत. त्यांनी एक टेक्नॉलजी डेवलप केली होती आणि ती टेक्नॉलजी त्यांनी ट्रान्सफर केली होती. पंजाबराव देशमुख विद्यापीठाला त्याची रॉयलटी आहे, बाकी काही नाही. पण हे काय लिहितात, पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासननिर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे एमईआरडीसी आणि पीडीकेव्ही अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असे हे लिहितात. आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून यांची कारवाई तातडीने म्हणजे आजच करा, असे हे लिहितात.

18 ऑक्टोबरला जीआर काढण्यात आला त्यात त्यांनी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि हे जे 200 कोटी होते जे मी जेव्हा घोटाळा काढला होता तेव्हा मी म्हटले होते की 200 कोटीचे बॅटरी, पंप आणि सोलार लाईट घेतले होते, ते वेगळे असे हे दोन्ही सॅन्कशन या जीआरमधून करण्यात आले होते. पण हे कधी नव्हतेच. दोन्ही कॅबिनेट बैठकी बघा, त्यात बॅटरीबद्दल एक शब्दही बोलण्यात आला नाही.

धनंजय मुंडे खोटे बोलून हे असे पत्र पाठवतात शासन मान्यता असल्याचे खोटे सांगून जीआर मिळवतात आणि ते करून घेत आहेत. इतकी जर यांची लिमिट होत असेल तर त्यांना कुठल्याच मंत्री पदावर कधीही बसता कामा नये, यांची तितकी पात्रताच नाही. कारण इतका भ्रष्ट माणूस मंत्रिमंडळाचे निर्णय झाले आहेत असे दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री कधीही नाही झाला पाहिजे, कृषिमंत्री तर कधीच नाही, अशी माझी थेट मागणी आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी आता तरी कारवाई करावी.

पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणतात, आता माझी पत्रकार परिषद झाल्यावर ते लगेच पत्रकार परिषद घेऊन काहीही बोलतील. आता माझी त्यांना विनंती आहे की तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते कागदोपत्री बोला. 23 तारखेच्या कॅबिनेट बैठकीचे मिनिट्स मांडा, 30 तारखेच्या बैठकीचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा हा निर्णय कोणत्या कॅबिनेट बैठकीमध्ये आणि कधी झाला होता. तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले आहे 23 आणि 30 दोन्हीमध्ये हा निर्णय झालेला नाही.

राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीनेसातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले  नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत
येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माॅं जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे;  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.  याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे.गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडा, आग्र्याला देखील दिवाण-ए- आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे ते म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने
किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करुया, शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल, असे श्री. पवार म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.