पुणे–पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासावर आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली. परंतु आम्ही तत्परतेने भूमिका घेत मुलाचे आई-वडील डॉक्टर यांची चौकशी केली. मागील चार महिन्यापासून त्यांना जामीन मिळाला नसून ते कारागृहात आहेत. पोलिसांनी या घटनेतील मृतांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कायद्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे आम्ही सिद्ध केले. पण त्यानंतरही पुणे शहराचे नाव काहीजण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे केला .
याप्रसंगी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे,भीमराव तापकीर,अमित गोरखे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते. यावेळी विविध प्रकल्पाचे भूमिपूजन गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहराची लोकसंख्या ८० लाख सध्या असून ३३ पोलिस स्टेशन आहे. मागील काही काळात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नवीन पोलीस स्टेशन गरज होती तसेच काही पोलिस ठाण्यात दोन हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल होत होते. पुण्यात १३४१ सीसीटीव्ही कार्यरत होते. आता शासनाने आणखी १००७ सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूण दोन हजार ८८६ सीसीटीव्ही पुढील सहा महिन्यात कार्यरत होऊन पोलिस कार्यक्षमता वाढणार आहे. आगामी दोन वर्षात सहा मजली नवीन सुसज्ज पोलिस आयुक्तालय उभारणी करण्यात येणार आहे. पुणे पोलिस शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येईल.
महिला सुरक्षा सारखी गंभीर घटना पुणे शहरात नुकतीच घडली होती. ती उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एक आरोपी ताब्यात घेतलेल्या असून दोन जणांचा शोध सुरू आहे. सामूहिक बलात्कार गुन्हा 7 दिवसांत उघडकीस आणला आहे. ७०० पोलीस कर्मचारी सलग सात दिवस काम करत होते. सीसीटीव्ही आणि खबऱ्या यांचा वापर करून गुन्हा उघडकीस आणला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी घाट आणि दुर्गम परिसरात सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी लाईट, सीसीटीव्ही,पी ए सिस्टीम, व्हिजिबल पोलिसिंग आदी उपाययोजना करण्यात येणार आहे.