पुणे-‘दमा दम मस्त कलंदर’, ‘ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही’, ‘ तारीफ तेरी निकली है दिल से’, ‘दूल्हे का सहारा’, ‘ कजरा मोहब्बत वाला’ ‘परदा है परदा’ प्रत्येकाच्या मनाच्या ठाव घेणाऱ्या या प्रसिद्ध कव्वाली गायकांनी सादर करून श्रोत्यांनी टाळीची थाप तर वाहवाची दाद देत पुणे नवरात्रौ महोत्सवात कव्वालीचा कार्यक्रमाला रंगत आली. आपल्या आवाजाची मोहिनी श्रोत्यावर घातली. प्रसिद्ध शेरोशायरीने प्रेमाचे, विरहाचे दाखले देत कव्वालीच्या कार्यक्रमला जल्लोष निर्माण झाला.
३०व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘जुनून’ (फिल्मी कव्वाली का करिश्मा व मुजरा ) यात गायक विवेक पांडे, रफी हबीब व गायिका भाग्यश्री बंगारे, राजेश्वरी पवार यांनी कव्वाली व मुजरा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. श्रोत्यांच्या वन्समोर, शिट्या व टाळ्यांनी रंगमंच दणाणून गेला. निवेदक संदीप पंचवाटकर यांच्या शेरोशायरीला श्रोत्यांची वाहवाहची दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या प्रतिमेला नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल व कलाकारांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
‘शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दर पे’ ही कव्वाली सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘दिल चीज क्या है’, ‘मेरे रश्के कमर’, ‘झुमका गिरा रे’, ‘चांद जैसा रंग है तेरा’, ‘हाय अगर दुश्मन’, ‘लंबी जुदाई’, ‘यारी है इमान’, ‘सलामे इश्क’, ‘तेरी दिवानी’, ‘झूम बराबर’, ‘हमे तो लूट लिया’, ‘तुम तो ठहरें परदेसी’ या प्रसिद्ध कव्वाली सादर करून वन्स मोर व टाळ्यांची दाद घेतली.
‘दमा दम मस्त कलंदर’, ‘ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही’ यां कव्वालीला शिट्ट्या टाळ्याची दाद, सुरात सुर मिसळून व नृत्याचा ठेका धरून श्रोत्यांनी कव्वालीचा आनंद लुटला.
‘पाकिजा’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘इन्हीं लोगो ने दुपट्टा मेरा’, ही कव्वाली ढोलकी आणि घुंगरू सांगिताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘हमें तो लूट लिया हुस्न वालों ने काले काले बालोने…’, ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे…’, ‘आज जवानी पर इतरानेवाले कल पछतायेगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा…’ या कव्वालीला टाळ्यांची दाद देत मनमुराद कार्यक्रमाचा आनंद श्रोत्यांनी लुटला.
उत्तरोत्तर रंगणा-या या मैफीलीत एकदम जोश आला, जेव्हा त्यांनी ‘दमा दम मस्त कलंदर’ ही कव्वाली गायला सुरूवात केली. पूर्ण सभागृहात ही मैफल सुरू असताना मग ‘वाह! वाह! क्या बात है’, ‘आह’ असे शब्द वारंवार ऐकायला मिळत होते.
कव्वालीच्या कार्यक्रमाला गोविंद कुडाळकर- तबला, हर्षल गणबोटे- ढोलक, असिफ इनामदार – रिदम मशीन, हार्दिक रावल- गिटार तर सईद खान यांची कीबोर्डवर साथसंगत लाभली. पुणे नवरात्र महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी गायक व कलाकारांचा व मान्यवरांचा सत्कार केला. तसेच यावेळी क्रीडा स्केटिंग स्पर्धेतील विजेत्या वैदही सरवदे व रोलर स्पर्धेतील ऋतिका सरवदे यांचा सन्मान करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार, डॉ. सतीश देसाई, अनिल गोरे, अंकलकोटे पाटील, काका धर्मावत, कोहिनूर ग्रुपचे राजेश गोयल यांच्यासह महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.