भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालना; सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित
नवी दिल्ली : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.
महाराष्ट्राला या हस्तांतरणातून 11,255 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 31,962 कोटी रुपये, बिहारला 17,921 कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला 13,404 कोटी रुपये मिळाले आहेत.
हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, ज्यामुळे भांडवल खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.