पुणे :मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान राबविण्यात येत असून ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांच्या गृहभेटी घेतल्या जाणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पात्र मतदारांची अचूक नोंदणी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
खडकवासला निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येत असून तहसीलदार अर्चना निकम यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे. तसेच सचिन आखाडे, किशोर पाटील आणि अंकुश गुरव हे अधिकारी क्षेत्रीय पातळीवरील कामकाज आणि पुनरीक्षण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
नागरिकांनी गृहभेटीपूर्वी शक्य असल्यास voters.eci.gov.in संकेतस्थळ अथवा ECINet App वर जाऊन स्वतःचा किंवा आई-वडिलांचा मागील विशेष पुनरीक्षणातील तपशील तपासून ठेवावा. गृहभेटीदरम्यान बीएलओकडून देण्यात येणारा गणना अर्ज आवश्यक माहिती भरून, स्वाक्षरी करून एक प्रत बीएलओकडे जमा करावी व पोचसह दुसरी प्रत स्वतःकडे ठेवावी.
मागील पुनरीक्षणात नाव नसल्यास जन्माचा दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासनाकडील जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, कर्मचारी अथवा निवृत्तीवेतन ओळखपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. आधार कार्डदेखील ओळख पुरावा म्हणून स्वीकारले जाणार आहे.
“कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही” या उद्दिष्टाने नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून पुनरीक्षण प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० उपलब्ध आहे.

