Home Blog Page 649

बाबा सिद्दिकीच्या हत्येने गृहखात्याची लक्तरे वेशीवर

पुणे- महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय , गुन्हेगारी वाढलीय , महिला मुलांवरील अत्याचार वाढलेत या आरोपांना राज्य सरकारमधील गृह खात्याने कायमच हलक्यात घेतले , या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गुन्ह्याची उकल होणे महत्वाचे , गुन्हे तर वाढतच राहणार असे बोलत वाढत्या गुन्हेगारीचे एकप्रकारे समर्थनच चालविले . पण आता खुद्द सत्तेतील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगून सरकार याची जबाबदारी घेणार आहे कि नाही , असा प्रश्नच विचारू नये एवढी निलाजरी स्थिती सध्याच्या राजकारणात दिसते आहे. जेवढी कधीच नव्हती .विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड आणि भाजपा नेत्यांनी मौन पाळलेय,मात्र विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

शरद पवार

अतिशय धक्कादायक! मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी.

-सुप्रिया सुळे

बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबार अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतील बांद्रासारख्या ठिकाणी, त्यातही माजी राज्यमंत्र्यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीवर हा हल्ला होणं यातून राज्याची कायदा व सुव्यवस्थेची कोलमडलेली स्थिती कळते. मागील वर्षभर राज्यातील कायदा व सुव्यवस्था टांगणीला लागलेली आहे. प्रत्येक प्रसंगानंतर सत्ताधारी केवळ वेळ मारून नेत आहेत. पण हा हल्ला अत्यंत गंभीर असून याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटूंबियांना या संकट काळात सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मी एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला आहे. त्यांच्या अचानक जाण्याचे मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आ. झिशान सिद्दीकी व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना.

अशोक शंकरराव चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. एका ‘वाय’ सुरक्षाप्राप्त व्यक्तीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या होते तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय हा सवाल आहे. कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय दयनीय झालीय याचा ही घटना पुरावा आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या घटनेमुळे सिद्दिकी कुटुंबाला झालेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र आमदार @zeeshan_iyc यांच्यासोबत आहेत. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्राजक्त प्रसाद तनपुरे

बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

विधिमंडळातील सहकारी आणि सर्वसामान्यांचा नेता गमावला
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 12 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

फत्तेचंद रांका हेच पुणे सराफ असोसिएशनचे पुन्हा अध्यक्ष

पुणे -पुणे सराफ असोसिएशनची सर्वसाधारण सभा, व त्रैवार्षिक निवडणूक सभा संपन्न झाली. पुणे सराफ असोसिएशनला ९९ वर्षे पूर्ण होत असून असोसिएशन येत्या १ जानेवारीला १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यामुळे या सर्वसाधारण सभेला व निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. फत्तेचंद रांका (अध्यक्ष), अभय गाडगीळ (उपाध्यक्ष), अमृतलाल मांगीलाल सोळंकी (सचिव), राजेंद्र सोमनाथ वाईकर (सह सचिव) व कुमारपाल घिसुलाल सोळंकी (खजिनदार) या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

सन १९८७ ते २०२४, गेली ३७ वर्ष फतेचंद रांका संस्थेवर कार्यरत आहेत. सन १९८७ ते २०००, अशी १३ वर्ष संस्थेचे सचिव म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. सन २००० ते २०२४ या कालावधी करता अध्यक्ष या पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधी करता फत्तेचंद रांका अध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे सराफ असोसिएशनच्या ७०० पेक्षा अधिक सदस्यांमध्ये सलग ३७ वर्ष महत्त्वाच्या पदावर कार्य करणारे फत्तेचंद रांका एकमेव सदस्य ठरले आहेत.

सभेच्या सुरुवातीला हॉलमार्किंग, जीएसटी , पी.एम.एल.ए. व एच.यु.आय.डी. या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारचे मार्गदर्शन मुंबईचे प्रसिद्ध तज्ज्ञ सीए भावीन मेहता यांनी केले.सेमिनार नंतर सर्वसाधारण सभेचे पहिले सत्र सुरू झाले. सदस्यांना वेळोवेळी कायद्याची माहिती व्हावी म्हणून संस्थेतर्फे ‘सुवर्णपत्र’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. यावेळी प्रमुख पाहुणे संजय घोडावत (चेअरमन – संजय घोडावत ग्रुप) यांच्या हस्ते सुवर्णपत्राचे प्रकाशन करण्यात आले. संजय घोडावत यांनी तरुणांना व्यवसायामध्ये कशाप्रकारे यशस्वी व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी घोडावत यांच्या हस्ते गोविंद उर्फ अजित विश्वनाथ गाडगीळ यांना पुणे सराफ जीवन गौरव पुरस्कार – २०२४ प्रदान करण्यात आला. ५० वर्ष जुनी प्रगतीशील पेढी या विभागात दिलीप सोनिगरा ज्वेलर्स व श्रीपाद शंकर नगरकर सराफ यांना पुरस्कार देण्यात आले. योगेंद्र डी. अष्टेकर व विशाल गणेश वर्मा यांना प्रगतिशील तरूण सराफ व्यावसायिक पुरस्कार तर शिवेंद्र ज्वेलर्स व मनिष ज्वेलर्स यांना प्रगतीशील होलसेल व्यापारी या श्रेणीतील पुरस्काराने गौरवण्यात आले.

मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे-

मुंबई :- आपले सरकार आले तेव्हा हे सरकार १५ दिवसात पडेल, एका महिन्यात पडेल सहा महिन्यात पडेल, अशी टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून नाही तर ठासून आपण दोन वर्ष पूर्ण केली.कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिला.

आझाद मैदानावर शिंदेसेनेचा तिसरा दसरा मेळावा शनिवारी पार पडला. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. काही लोकांना हल्ली हिंदू शब्दाची ॲलर्जी झाली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणायला काही लोकांची जीभ कचरू लागली आहे, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपण शिकलो; पण नर्मदेतील गोटे कोरडेच राहिले, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

आपण सरकार बनवले नसते तर, सकाळ झाली मोरू उठला, मोरूने आंघोळ केली, मोरू परत झोपला हेच पहायला मिळाले असते, आज मोरू मला मुख्यमंत्री करा म्हणत गल्लोगल्ली फिरत आहे. लोकसभेत विरोधकांना चुकून एवढ्या जागा मिळाल्या. पण येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.

आणखी महामंडळे
आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्याला होलार समाजासाठी महामंडळ नसल्याचे सांगितले. होलार समाजासाठीही हे सरकार महामंडळ स्थापन करेल. गर्दीतून ‘वंजारींसाठी’ अशी घोषणा एकाने केल्यानंतर वंजारी समाजासाठीही महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

‘त्यांनी लावलेले स्पीड ब्रेकर उखडून टाकले’
पहिले अडीच वर्ष महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी या राज्यात सत्तेवर होती. सर्व प्रकल्पांना त्यांनी स्पीड ब्रेकर लावला. आम्ही हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि ज्या सरकारने ते टाकले होते त्या सरकारलाही उखडून टाकले.

‘माझी दाढी खुपते’
माझी दाढी त्यांना खुपते आहे. पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

मी जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र मोदी-शाह-अदानींचा होऊ देणार नाही

मुंबई : मी जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र मोदी-शाह-अदानींचा होऊ देणार नाही. तसेच राज्यातील महायुती सरकारने शेवटच्या दिवसात जनतेच्या मुळावर येणारे जे निर्णय घेतले ते आमचे सरकार येताच रद्द केले जातील, दोन महिने थांबा कोणालाही सोडणार नाही, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील पक्षाच्या दसरा मेळाव्यात दिला.

११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू. मुंबई महापालिकेच्या तीन लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. कंत्राटदारांच्या घश्यात पैसा टाकला जात आहे, त्यांची यादी घेऊन सत्ता येताच जेलमध्ये टाकू. सिमेंट रस्त्यांमध्ये खडी टाकणारे कोण याची चौकशी करणार. गावठाणांमधील अकृषक कर रद्द करण्याचा सरकारचा निर्णय शिंदेंनी मित्रांसाठी घेतला, दोन महिने थांबा, आमचे सरकार येऊ द्या, असे सगळे निर्णय रद्द करू असे ते म्हणाले.

यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच भाषण झाले. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे व्यासपीठासमोर बसले होते.

शिंदेच्या एन्काऊन्टरचे समर्थन
बदलापूरमधील शिंदे एन्काऊन्टरचे उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले. अशा नराधामाला गोळ्या घातल्याच पाहिजे. आनंद दिघे असते तर त्यांनी तेच केले असते पण या एन्काऊन्टरच्या आड पुरावे नष्ट करून कोणाला पाठीशी घातले जात असेल तर त्याचाही उलगडा झाला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांची मंदिरे
-आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यात येतील असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. जे शिवरायंच्या मंदिरांना विरोध करतील त्यांना महाराष्ट्र बघून घेईल.
-शिवरायांची मंदिरे बांधायची नाहीत तर मोदींची बांधायची का? जय श्रीरामपेक्षाही मोठ्याने आम्ही ‘जय शिवराय’ म्हणणार. महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले, तरीही त्यांना शिवराय मत मिळवायचे यंत्र वाटते, अशी टीका त्यांनी केली.
-आपले सरकार येताच धारावी पुनर्विकासाचे टेंडर रद्द करू असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

हिऱ्यांच्या किमती ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या,-हिरे बाजारात ५० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी मंदी

सुरत-हिरे बाजारात ५० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी मंदी आली सुरतमध्ये ८ हजार छोटे-मोठे कारखाने हिऱ्यांना पैलू पाडतात आणि पॉलिश करतात. यापैकी बहुतेक कारखाने सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सुमारे १५ लाख लोकांना रोजगार देणारा हिऱ्यांचा व्यवसाय मंदीचा सामना करत आहे.भारतातील एकूण हिऱ्यांपैकी ३० ते ४०% हिऱ्यांची अमेरिकेत निर्यात होते. सध्या मंदीमुळे अमेरिकन लॅबग्रोन हिरे विकत घेत आहेत. मात्र अमेरिकन बाजार सुधारल्यानंतर नैसर्गिक हिऱ्यांची मागणी पुन्हा वाढेल, असा हिरे व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.हिरे बाजारात काही कारणांमुळे मंदी आली आहे. युक्रेन-रशिया आणि हमास-इस्रायल यांच्यात पश्चिम आशियात पहिले युद्ध झाले. दुसरे म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील मंदीचे सावट. मंदीमुळे तयार हिऱ्यांची मागणी कमी झाली त्यामुळे तयार हिऱ्यांच्या किमतीही गेल्या ३ वर्षांत सरासरी ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत, तर दुसरीकडे रफ हिऱ्यांच्या किमतीही २५% ने घसरल्या आहेत. त्यामुळे कट आणि पॉलिश करणाऱ्या कंपन्यांना १० % नुकसान होत आहे. नैसर्गिक हिऱ्यांना मागणी होती, पण त्या तुलनेत लॅबग्रोन स्वस्त होते. त्यामुळे लोक लॅबग्रोनकडे वळले. अशा प्रकारे लॅबग्रोनने नॅचरल डायमंडचा हिस्सा हिसकावला आहे.
गेल्या दोन वर्षांत हिऱ्याच्या किमती ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत. यामध्ये तयार हिऱ्यांची किंमत ३ वर्षांत ३५% कमी झाली आहे. म्हणजेच एकेकाळी १ लाख किमतीवाल्या हिऱ्याची किंमत घटून ६५-७० हजार झाली आहे. कच्च्या हिऱ्यांच्या किमती २५% पर्यंत घसरल्या आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना १०% पर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोक आता गुंतवणुकीसाठी हिरे कमी घेत आहेत. गेल्या पन्नास वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे की, हिऱ्यांच्या व्यवसायात सलग दोन वर्षे मंदी आली. मंदीमुळे जी-७ देशांनी रशियन हिऱ्यांवर बंदी घातली होती तसेच चिनी लोकांनी हिऱ्यांऐवजी सोने दागिन्यांची खरेदी सुरू केली.

प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल युद्धाचा परिणाम हिऱ्यांच्या व्यवसायावरही झाला आहे. जगात पैलू पाडलेले आणि पॉलिश केलेल्या १० पैकी ९ हिरे सुरतमध्ये बनतात. सुरतमध्ये तयार झालेला असा हिरा सुरत आणि मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात होतो.

रशिया-युक्रेन युद्ध, हमास, लेबनॉनमधील युद्ध परिस्थितीमुळे अमेरिकेसह बाजारात मंदीचे सावट आहे. ज्याचा परिणाम सुरत आणि मुंबईसह देशातील हिरे उद्योगावर झाला आहे. २०२१-२२ मध्ये, जेव्हा कोरोनाच्या काळात सर्व उद्योग बंद होते तेव्हा हिरे उद्योगाने इतिहासात सर्वाधिक १.८० लाख कोटी रुपयांच्या हिऱ्यांची निर्यात केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या


मुंबई:
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला. १५ दिवसांपूर्वी त्यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तीन अज्ञात व्यक्तींकडून हा गोळीबार झाला होता. पोलिसांकडून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. हा गोळीबार पूर्वनियोजित प्लॅन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे

बाबा सिद्दीकी यांनी जवळपास 48 वर्ष काँग्रेस पक्षात काम केलं. इतकच नव्हे तर ते सलग तीन वेळा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत. इतकच नव्हे तर बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचीही बरीच चर्चा असते. बॉलिवुडमधले मोठ मोठे सेलिब्रेटी हे बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात.

बाबा सिद्दीकी यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री म्हणुन खातीदेखील सांभाळली आहेत.
बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.

एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र नासवला:देवेंद्र फडणवीस यांनी माणसांत माणूस आणि जातीत जात ठेवली नाही, सुषमा अंधारे यांचा घणाघात

दादर -शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले असून, देवेंद्र फडणवीस यांनी माणसांत माणूस आणि जातीत जात ठेवली नाही, असे त्या म्हणाल्यात.

सुषमा अंधारे आपल्या भाषणात म्हणाल्या, आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक महत्त्वाचा मेळावा झाला. त्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजील द्वेष संपवण्याची भाषा केली. त्यांनी देश बलशाली करण्यावर भर दिला. दुर्बल घटकांना सोबत घेण्याची सूचना केली. पण त्यांना खरेच द्वेषबुद्धी संपवण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी तो सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा.

कारण, फडणवीस यांनी या राज्यात माणसांत माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. त्यांनी राज्यात द्वेषाचे राजकारण पसरवले. यासाठी त्यांनी कोकणातील बाजारातून रद्दबातल झालेली चिल्लर पाळली आहे. त्यांनी ही चाराणे – बाराण्याची चिल्लर बाजारात आणली. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचून त्यांना आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा असल्याचे ठणकावून सांगावे.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, कोकणातील ही चिल्लर अगोदर हिंदू – मुस्लिम करत होती. पण या दोन्ही समाजांनी कमालीचा संयम दाखवून त्यांच्या विद्वेषाला व लव्ह जिहादला कवडीची किंमत दिली नाही. मग भाजपने दुसरा खेळ सुरू केला. हिंदू-मुस्लिम कार्ड चालत नसल्यामुळे त्यांनी आता मराठा – ओबीसी कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे ते राज्यातील गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने यावर विचार करावा.

कालपर्यंत आपण सर्वजण एकत्र राहत होतो. पण आज या लोकांनी आपल्यात द्वेष पसरवला. आज तेच शिंदे व फडणवीस आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ते असे का करत आहेत? लोकांनी महागाई, बेरोजगारी आदी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांनी हे राजकारण सुरू केले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यांत खूपत असल्याचा आरोप करतात. पण ही योजना आमच्या डोळ्यांत खुपण्याचे काहीच कारण नाही. फडणवीसांनी या योजनेंतर्गत दिले जाणारे 1500 रुपये नागपूरचा बंगला विकून दिले नाहीत. ते पैसे जनतेचेच आहेत. शिंदे सरकारने ते फक्त महिलांना देण्याचे काम केले. सरकार याकामी केवळ पोस्टमनचे काम करत आहे. त्यामुळे त्यांनी या योजनेचे श्रेय घेण्याचे काम करू नये.

महायुती सरकारच्या नेत्यांना भाऊ – बहिणीच्या नात्यांची समज नाही. त्यांच्या बोलघेवड्या आमदारांनाही त्याची जाण नाही. भाऊ बहिणीला पैसे देतो तेव्हा त्याचे बॅनर लावत नाही. हे लोक आपली बहीण व तिच्या गरिबीची थट्टा करत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र आहेत. काँग्रेसने आरक्षणाची मर्यादा वाढवली. तेव्हा 1960 साली भाजपचे अस्तित्वही नव्हते. त्यानंतर 1970 मध्ये पुन्हा एकदा राजकीय आरक्षणात वाढ करण्यात आली. त्यानंतरही फडणवीस भाजपने आरक्षण वाढवल्याचा दावा करतात. त्यामुळे ते फेक नरेटिव्हचे महानिर्मिती केंद्र असल्याचे स्पष्ट होते, असेही सुषमा अंधारे यावेळी फडणवीसांवर घणाघात करताना म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांना राज्यातील एकही आंदोलन सांभाळता आले नाही. त्यांनी राज्यात दंगली घडवून आणल्या. त्यांनी महाराष्ट्र नासवण्याचे काम केले. आज तेच आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. 10 वर्षांपूर्वी इंदू मिलचे भूमिपूजन केले. पण त्याची एकही वीट उभी केली नाही. शिवरायांचे स्मारकही अद्याप उभे राहिले नाही.

PWD सार्वजनिक बांधकाम विभागात अडीच हजार कोटीच्या कामांची घाई

पुणे-आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या कामांच्या निविदांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसह इमारतीच्या विकासकामांसाठी सुमारे दोन ते अडीच हजार कोटींच्या कामांना बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.

मान्यता मिळालेला निधी
■ रस्त्यांच्या १६७ कामांसाठी १२५२ कोटी
■ प्रत्यक्ष ११९ कामांचे ४९७ कोटी रुपयांचे कार्यादेश
■ शहर, जिल्ह्यातील इमारतींसाठी ९६१ कोटी ४९ लाख रुपये
■ ५९ पैकी केवळ १९ कामांसाठी ३१७ कोटी नऊ लाख रुपयांचे कार्यादेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, बांधकाम विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन कार्यालयात प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देणे, निविदा काढणे, कार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यासाठी घाई सुरू आहे. या सर्व विभागात ठेकेदारांची गर्दी वाढली आहे. बांधकाम विभागात पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पाईपलाइन, बसस्थानक थांबा, जिमचे साहित्य, सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे याशिवाय अन्य विकास कामांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते, इमारतींच्या कामांसाठी सुमारे अडीच हजार कोटीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामध्ये रस्त्यांच्या १६७ कामांच्या १२५२ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यापैकी ४९७ कोटींच्या ११९ कामांचे कार्यादेश दिले आहेत. तर ७५५ कोटींच्या ४८ कामांचे कार्यादेश अद्याप देण्यात आले नाहीत.
शहर आणि जिल्ह्यातील इमारतींची ५९ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी ९६१ कोटी ४९ लाखांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. ५९ पैकी केवळ १९ कामांच्या ३१७ कोटी नऊ लाख रुपयांचे कार्यदिश विभागाने दिले आहेत. मात्र, एकूण मान्यतेच्या तुलनेत प्रत्यक्षात २५५ कोटींचीच तरतूद राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे ४० कामांच्या ६४४ कोटींच्या कामांना अद्याप कार्यादेश देण्यात आले नाहीत. एकूण रस्ते आणि इमारतीच्या २२१३ कोटी ४९ लाखांच्या खर्चासाठी केवळ ३३१ कोटींची अर्थात सुमारे १५ टक्क्यांची अत्यल्प तरतूद करण्यात आली आहे,’ अशी माहिती येथे समजली आहे.

एकाच दिवसात ४०० कोटी रुपयांच्या २२० प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता

पुणे-विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. तसेच, नवीन कामांना मंजुरी देता येत नाही. सुरू असलेली कामे निधीअभावी बंद पडू नये, यासाठी निधी मंजूर करून काम करण्याचे आदेश (कार्यादेश) काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडते. विधानसभेची आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीची ही शेवटीची बैठक होती. त्याचा परिणाम प्रशासकराज असलेल्या महापालिकेवरदेखील पहायला मिळत आहे. आचारसंहिता लागण्याआधी जसे राज्य शासनाने हजारो कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली. तसाच प्रकार महापालिकेमध्ये पाहायला मिळाला. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकाच दिवसात तब्बल ४०० कोटी रुपयांच्या २२० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.हे प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी चांगलीच झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी (दि. १०) एका मागून एक प्रस्ताव दाखल होत होते. या प्रस्तावांवर चर्चा होणे अपेक्षित असताना विनाचर्चा मान्यता देण्यात आले.

महापालिकेत बैठक सुरू असताना ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. प्रशासकराज सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढी गर्दी पहायला मिळाली.महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिकेचे प्रमुख प्रशासकपददेखील आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक झाली. ही बैठक सुरू होईपर्यंत विविध कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी येत होते. या प्रस्तावामध्ये मलनिस्सारण, देखभाल आणि दुरूस्ती, रस्ते, पाणी पुरवठा, समाविष्ट गावांमधील विविध प्रकारची विकास कामे यांचा समावेश होता. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर २२० पेक्षा अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आले होते. शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विषयांना स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी दाखल करून त्यांना मान्यता देण्यात येते. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर महत्वाचे विषय आणले, तर त्याची चर्चा होते. या चर्चेला बगल देण्यासाठी या आयत्या वेळीचा विषय, या नियमाचा चांगलाच फायदा घेण्यात आला. या व्यतिरिक्त स्थायी समितीसमोर ऐनवेळी काही प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या या बैठकीत एकूण ४०० कोटींच्या २२० हुन अधिक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या स्थायी समितीने उद्यान, पथ, पाणी पुरवठा यांच्यासह इतर विभाग आणि समाविष्ट गावांमधील विविध विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. महापालिका प्रशासनाकडून गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ९० कोटींच्या १६० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही महापालिका प्रशासनाने स्थायी समितीची बैठक घेत अधिकाधिक प्रस्तावांना मान्यता देण्याचा झपाटा सुरूच ठेवल्याचे चित्र आहे.

गर्दीत दागीने चोरणारे ५ भामटे पकडले साडेसात लाखाचे दागिने हस्तगत

पुणे- पीएमपी बसमध्ये तसेच गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली

पीएमपीएमएल. बस मध्ये तसेच गणेश उत्सवा दरम्यान गर्दीचा फायदा घेवुन, भावीकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीचा शोध घेवुन, त्यांना अटक करण्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर येथील प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे यांना व तपास पथकातील पोलीस अमंलदार यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सुचना दिल्यानंतर पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, व तपास पथकातील पोलीस अमंलदार त्यांचे बातमीदारा मार्फत तपास करीत होतो.
दिनांक ०८/१०/२०२४ रोजी तपासादरम्यान पोलीस अमंलदार गजानन सोनुने व प्रविण पासलकर यांचे बातमी वरुन,
सुर्या हॉस्पीटल समोरील पी.एम.टी. बसस्थानक, कसबा पेठ पुणे येथुन तपास पथकातील पोलीस स्टाफचे मदतीने पाठलाग करुन, आरोपी इसम नामे १) विकी कृष्णा माने, वय १९ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा पुणे २) राज कृष्णा माने, वय २३ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा पुणे ३) कृष्णा रमेश माने, वय ४४ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा पुणे ४) सुधीर नागनाथ जाधव, वय ४६ वर्षे, रा. साऊथ इंडियन हायस्कुल शास्त्रीनगर घर नं. ७६८, अंबरनाथ वेस्ट जि. ठाणे ५) संतोष शरण्णाप्पा जाधव, वय ४० वर्षे, रा. घुलेनगर लेन नं.२ वरद हॉस्पीटल समोर मांजरी बुगा पुणे. यांना अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा व फरासखाना पोलीस स्टेशन कडील तीन गुन्हे असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आणुन १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळुन ७,३४,०६४/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, पुणे शहर श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, पुणे श्रीमती नुतन पवार, यांचे

मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पो.स्टे. पुणे श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौज मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, गजानन सोनुने, नितीन
तेलंगे, महेश राठोड, संदिप कांबळे, प्रविण पासलकर, नितीन जाधव, तानाजी नागरे, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, वसिम शेख, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, यांनी केलेली आहे.

११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे शहर पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या ७ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. काल दि. ११ रोजी रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियुक्ती आदेश काढले आहेत.

१. शरद आसाराम झिने – गुन्हे पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ ते वपोनि आंबेगाव पोलीस ठाणे

२. अतुल मुरलीधर भोस – गुन्हे पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड ते वपोनि नांदेडसिटी पोलीस ठाणे

३. महेश गुंडाप्पा बोळकोटगी – वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे ते वपोनि बाणेर पोलीस ठाणे

४. विजयानंद पद्माकर पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी ते वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे

५. संजय गुंडाप्पा चव्हाण – वपोनि चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि खराडी पोलीस ठाणे
६. अनिल शिवाजी माने – गुन्हे पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि चंदननगर पोलीस ठाणे

७. पंडित हणमंतराव रेजितवाड – वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे ते वपोनि वाघोली पोलीस ठाणे

८. सर्जेराव शामराव कुंभार – गुन्हे पोलीस निरीक्षक विमानतळ ते वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे

९. श्रीमती मंगल शामराव मोंढवे – वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वपोनि फुरसुंगी पोलीस ठाणे

१०. शंकर भिकू साळुंखे – गुन्हे पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे
११ मानसिंग संभाजी पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे ते वपोनि काळेपडल पोलीस ठाणे

तसेच मुंबई येथून बदलीने आलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली पुढील प्रमाणे

१. राहुल वीरसिंग गौड – गुन्हे पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे

२. अमर नामदेव काळंगे – गुन्हे पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे

३. राजेंद्र भाऊराव पन्हाळे – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी पोलीस ठाणे

तणावमुक्त आनंदी कार्यसंस्कृती जपण्याची गरज!

अर्नेस्ट अँड यंग( ई वाय) कंपनीच्या पुणे कार्यालयातील एका 26 वर्षे वयाच्या ॲना नावाच्या चार्टर्ड अकाउंटंट मुलीने आत्महत्या केली. तिच्या आईने कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर तक्रार केली असून कामाच्या अतिताणामुळेच ही आत्महत्या झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत असलेल्या विविध समस्यांचा घेतलेला हा वेध.

भारतात सध्या चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रामध्ये “बिग फोर” म्हणजे डेलॉईट, प्राईस वॉटर हाऊस कूपर्स,लंडन स्थित अर्नेस्ट अँड यंग व नेदरलँड मधील केपीएमजी या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय काही अन्य मोठ्या कंपन्या असून तेथे अक्षरशः लाखो चार्टर्ड अकाउंटंट, अन्य व्यावसायिक काम करीत आहेत. चार महिन्यापूर्वी अर्नेस्ट अँड यंग ( ई अँड वाय) या ख्यातनाम चार्टर्ड अकाउंटंट कंपनीमध्ये एका तरुण मुलीने कामाच्या अतिताणा पोटी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेबाबत त्या मुलीची आई अनिता अगस्ती यांनी कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर आरोप केलेले आहेत. किंबहुना याची दखल राज्य शासनाच्या कामगार विभागाने घेतली असून या कंपनीच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत थेट चौकशी सुरू केलेली आहे.

पुण्यासारख्या शहरात घडलेली ही घटना ही केवळ पहिलीच घटना नाही तर आज जगभरातील अनेक देशांमध्ये तरुण व्यावसायिकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. जपानमध्ये 2023 मध्ये 2900 तरुणांनी अती कामापोटी आत्महत्या केलेल्या होत्या. जपानी भाषेत त्याला ‘करोशी’ असे संबोधले गेले होते. भारतासह जगभरातील सर्व खाजगी किंवा अन्य व्यावसायिक कंपन्यांचे उद्दिष्ट केवळ प्रचंड नफा मिळवणे असल्यामुळे त्या सातत्याने कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करत राहतात. याचा परिणाम त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर आणि सुख स्वास्थ्यावर होतो हे यामागचे कारण आहे. दोन वर्षांपूर्वी भारतातील अशा आत्महत्यांचे प्रमाण 11 हजाराच्या घरात होते. आणि याला जबाबदार आहे ते कंपन्यांमध्ये असलेल्या नफेखोरी या हिंसक कार्य संस्कृतीचे धोरण. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक कंपनीला अस्तित्व टिकवण्यासाठी खर्चामध्ये कपात करणे, कार्यक्षमता वाढवणे व त्याचप्रमाणे उत्पादकतेत वाढ करणे हे अपरिहार्य आहे. याचा परिणाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत राहतो. प्रत्येक कंपनी अवास्तव कामाच्या अपेक्षांचे ओझे कर्मचाऱ्यांवर सातत्याने लादत असते. त्यामुळे दररोजच्या आठ तासाच्या ऐवजी 12 ते 16 तास काम करावे लागते. हे काम करत असताना कर्मचारी सातत्याने प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत राहतात. कदाचित या कर्मचाऱ्यांना उत्तम वेतनही मिळत असते परंतु केवळ पैसे मिळाल्याने समाधान लाभत नाही कारण त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे जवळजवळ बिघडलेले असते. एक प्रकारची ही गजबजलेल्या ‘कामाची’ संस्कृती तरुणाईवर मोठा आघात करत आहे. कामामध्ये असणारी व्यस्तता हानिकारक ठरते असेही लक्षात आलेले आहे. अनेक कंपन्या सातत्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून उत्पादकतेची जास्तीत जास्त अपेक्षा करत राहतात आणि हे करताना या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार कुठेही केला जात नाही. अर्थात हा सर्व प्रकार काही नव्याने घडतोय असे नाही. जगभरात सर्वत्र नवनवीन तंत्रज्ञान, पैसा, कायदा यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत राहिल्याने केवळ सतत कार्यरत राहिल्याने या कंपन्यांचे प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांची काही कार्यक्षमता असते परंतु त्याला सातत्याने जादा पैशाचे आमिष दाखवले जाते आणि या साऱ्या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा किंवा शारीरिक क्षमतेचा कोठेही विचार केला जात नाही आणि अखेर त्याची परिणीती असह्य ताणामध्ये होते. यातूनच कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणारी सततची चिंता,सतत उदास असणे किंवा चिडचिड करणे आणि नैराश्याच्या गर्तेत जाण्यामध्ये होते. त्यातूनच हे आत्महत्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर गेलेले दिसते.

या सर्व पार्श्वभूमीवर नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची भूमिका कंपन्या वरवर घेत असल्या तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे हे नाकारता येणार नाही. जो कर्मचारी कामावर सतत आनंदाने काम करत असतो त्याच्याकडून निश्चितच उत्पादकता जास्त चांगल्या प्रकारे मिळते हे प्रत्येक कंपनीला, त्यांच्या व्यवस्थापनाला माहित असते. मात्र जेथे कर्मचाऱ्यांना काम करताना सातत्याने दबाव किंवा ताणाखाली किंवा काही उद्दिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र दबाव राहतो तेथे उत्पादकता बाजूला राहून कार्यक्षमता कमी होते. याचाच विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व मानसिकतेवर होत राहतो. त्यामुळेच अनेक कंपन्यांमध्ये कामाचे तास सुद्धा अत्यंत लवचिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो. काही नवीन उपक्रम हाती घेऊन कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि एकाच वेळेला कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि त्याचे काम यांचा समतोल साधण्याचा विचार अलीकडे केला जात आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्या किंवा विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या वित्तसेवा विषयक कंपन्यांमध्ये याबाबत सतत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात. परंतु प्रत्येक कंपनीनेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कामाचे फेरमुल्यांकन करण्याची निश्चित वेळ आलेली आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये खेळाच्या सुविधा तसेच उपहारगृह किंवा मनोरंजनाच्या सुविधा दिल्या जातात. एक प्रकारे कर्मचाऱ्यांना मानसिक दृष्ट्या समाधान चांगल्या प्रकारे कसे लाभेल याचे प्रयत्न केले जातात परंतु दुसरीकडे त्यांच्याकडून व्यवस्थापनाने सातत्याने केलेल्या अपेक्षांमध्ये वाढ होत जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना हा समतोल साधणे जमत नाही. यासाठी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास हे अत्यंत प्रमाणित केले पाहिजेत. शारीरिक कष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आठ तासांची कामाची शिफ्ट किंवा पाळी असते. मात्र ज्यांना मानसिक किंवा बौद्धिक कष्ट होणार असतात त्यांना सहा तासापेक्षा जास्त काम करणे हे त्रासदायक ठरते. प्रसारमाध्यमा सारख्या क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची शिफ्ट ही आठ तासांच्या ऐवजी सहा तासांची त्यासाठीच केलेली आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रत्येक कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची सातत्याने काळजी घेऊन त्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्याची निश्चित गरज आहे. ज्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी शिकत असताना प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थितपणे शिकेलच असे नसते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमता असते. त्यांच्यासाठी समुपदेशनासारखे प्रयत्न करून शिक्षणाची गोडी लावता येते. त्याच धर्तीवर अनेक कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांच्या मानसिक समुपदेशनाचा उपक्रम हाती घेतला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यातून त्याची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवली जाईल किंवा मनाचे स्वास्थ्य त्याला लाभून त्याच्या कामात कशी सुधारणा होईल यासाठी सर्व कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ताणतणावाचे व्यवस्थापन हा आज परवलीचा शब्द झाला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा किती उपयोग होतो आहे हे प्रत्येक कंपनीने पाहण्याची वेळ आली आहे. कंपनीची उत्पादकता आणि त्यांना मिळणारा नफा याची गणिते बदलण्याची आवश्यकता आहे. जर प्रत्येक कर्मचारी आनंदी आणि समाधानी असेल तरच त्याच्या हातून कार्यक्षमपणे काम केले जाऊ शकते हे निश्चित. समतोल आणि शाश्वत कार्य संस्कृती हा या सगळ्याचा गाभा आहे. त्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक कंपनीने यावर जाणीवपूर्वक काम केले तर नजीकच्या भविष्यकाळात हे आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल यात शंका नाही. यामुळेच कंपन्या व कर्मचारी या दोघांनी दोन्ही घटकांनी एकत्र येऊन काही ठोस पावले उचलून वाजवी कामाचा ताण व तास यातून परिपूर्ण आरोग्य व आयुष्य यांची सांगड घातली पाहिजे असे वाटते.

लेखक:प्रा नंदकुमार काकिर्डे
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी सह तिघांना कात्रज घाटात सापळा रचून पकडले -रणदिवेच्या हत्येचा २४ तासात उलगडा

पुणे :पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांचा निर्घुण खून करणार्‍या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.
राहुल दत्तात्रय खुडे (वय ४०), सचिन दत्तात्रय खुडे (वय ३४) आणि सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी (वय २७, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाळासाहेब रणदिवे व आरोपी यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर रणदिवे यांनी टाकलेल्या मेसेजवरुन वाद निर्माण झाला होता. रणदिवे हे मार्केटयार्डमधील सावित्री हॉटेलचे समोरील शेडमध्ये चहा पित बसले असताना आरोपी धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना दुसर्‍या दिवशी सकाळी यांचा मृत्यु झाला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना बातमी मिळाली की, आरोपी हे कात्रज घाटाचे दिशेने साताराकडे जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी कात्रज घाटात सापळा रचून तिघांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.

पुण्यातून अपहरण आणि ५ कोटीची खंडणी-कर्नाटकात गुन्हेगार पकडून अपहृतांची सुटका -पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : घराची पुजा करायची आहे, असे आमिष दाखवून पुजारी व त्यांचे शिष्य यांना विजापूरला घेऊन जाऊन डांबून ठेवून ५ कोटींची खंडणी मागणार्‍या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. रामु अप्पाराम बळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, जि. सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०, रा. त्रिकुंडी ता. जत, जि. सांगली), हर्षद सुरेश पाटील (वय २२, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.आरोपी हे फिर्यादी यांचे घरी २९ सप्टेबर रोजी आले. फिर्यादीचा मुलाला भेटून विजापूर येथे घराची पुजा करायची आहे, असे आमिष दाखविले. कर्नाटक येथे पुजारी व त्यांचे सोबतचे शिष्य यांना घेऊन गेले. पिस्तुल व हत्यारांचा धाक दाखवून अपहरण करुन ५ कोटींच्या खंडणीसाठी त्यांना डांबुन ठेवले होते.या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाला आरोपींनी पुजारी व त्यांचे शिष्यांना कर्नाटकामधील सिंधनूर जवळ डांबून ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार सुमीत ताकपेरे, जोतीष काळे यांचे पथक रवाना झाले. सिंधनूर येथे पोहचल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी केले असता आरोपींनी पुजारी व त्यांचे शिष्यांना एका निर्जन ठिकाणी असलेल्या रुममध्ये डांबुन ठेवले होते. पोलिसांना पाहून आरोपी पळून जात होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिबवेवाडी पोलिसांनी हत्यारासह ताब्यात घेतले. पुजारी व त्यांच्या ३ शिष्यांची सुटका केली. तसेच आरोपींनी आणखी ४ शिष्याना दुसरीकडे डांबून ठेवले होते. त्यांचीही सुटका केली. अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले, विशाल जाधव, नितीन कातुर्डे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.