अर्नेस्ट अँड यंग( ई वाय) कंपनीच्या पुणे कार्यालयातील एका 26 वर्षे वयाच्या ॲना नावाच्या चार्टर्ड अकाउंटंट मुलीने आत्महत्या केली. तिच्या आईने कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर तक्रार केली असून कामाच्या अतिताणामुळेच ही आत्महत्या झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत असलेल्या विविध समस्यांचा घेतलेला हा वेध.
भारतात सध्या चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रामध्ये “बिग फोर” म्हणजे डेलॉईट, प्राईस वॉटर हाऊस कूपर्स,लंडन स्थित अर्नेस्ट अँड यंग व नेदरलँड मधील केपीएमजी या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय काही अन्य मोठ्या कंपन्या असून तेथे अक्षरशः लाखो चार्टर्ड अकाउंटंट, अन्य व्यावसायिक काम करीत आहेत. चार महिन्यापूर्वी अर्नेस्ट अँड यंग ( ई अँड वाय) या ख्यातनाम चार्टर्ड अकाउंटंट कंपनीमध्ये एका तरुण मुलीने कामाच्या अतिताणा पोटी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेबाबत त्या मुलीची आई अनिता अगस्ती यांनी कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर आरोप केलेले आहेत. किंबहुना याची दखल राज्य शासनाच्या कामगार विभागाने घेतली असून या कंपनीच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत थेट चौकशी सुरू केलेली आहे.
पुण्यासारख्या शहरात घडलेली ही घटना ही केवळ पहिलीच घटना नाही तर आज जगभरातील अनेक देशांमध्ये तरुण व्यावसायिकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. जपानमध्ये 2023 मध्ये 2900 तरुणांनी अती कामापोटी आत्महत्या केलेल्या होत्या. जपानी भाषेत त्याला ‘करोशी’ असे संबोधले गेले होते. भारतासह जगभरातील सर्व खाजगी किंवा अन्य व्यावसायिक कंपन्यांचे उद्दिष्ट केवळ प्रचंड नफा मिळवणे असल्यामुळे त्या सातत्याने कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करत राहतात. याचा परिणाम त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर आणि सुख स्वास्थ्यावर होतो हे यामागचे कारण आहे. दोन वर्षांपूर्वी भारतातील अशा आत्महत्यांचे प्रमाण 11 हजाराच्या घरात होते. आणि याला जबाबदार आहे ते कंपन्यांमध्ये असलेल्या नफेखोरी या हिंसक कार्य संस्कृतीचे धोरण. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक कंपनीला अस्तित्व टिकवण्यासाठी खर्चामध्ये कपात करणे, कार्यक्षमता वाढवणे व त्याचप्रमाणे उत्पादकतेत वाढ करणे हे अपरिहार्य आहे. याचा परिणाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत राहतो. प्रत्येक कंपनी अवास्तव कामाच्या अपेक्षांचे ओझे कर्मचाऱ्यांवर सातत्याने लादत असते. त्यामुळे दररोजच्या आठ तासाच्या ऐवजी 12 ते 16 तास काम करावे लागते. हे काम करत असताना कर्मचारी सातत्याने प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत राहतात. कदाचित या कर्मचाऱ्यांना उत्तम वेतनही मिळत असते परंतु केवळ पैसे मिळाल्याने समाधान लाभत नाही कारण त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे जवळजवळ बिघडलेले असते. एक प्रकारची ही गजबजलेल्या ‘कामाची’ संस्कृती तरुणाईवर मोठा आघात करत आहे. कामामध्ये असणारी व्यस्तता हानिकारक ठरते असेही लक्षात आलेले आहे. अनेक कंपन्या सातत्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून उत्पादकतेची जास्तीत जास्त अपेक्षा करत राहतात आणि हे करताना या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार कुठेही केला जात नाही. अर्थात हा सर्व प्रकार काही नव्याने घडतोय असे नाही. जगभरात सर्वत्र नवनवीन तंत्रज्ञान, पैसा, कायदा यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत राहिल्याने केवळ सतत कार्यरत राहिल्याने या कंपन्यांचे प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांची काही कार्यक्षमता असते परंतु त्याला सातत्याने जादा पैशाचे आमिष दाखवले जाते आणि या साऱ्या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा किंवा शारीरिक क्षमतेचा कोठेही विचार केला जात नाही आणि अखेर त्याची परिणीती असह्य ताणामध्ये होते. यातूनच कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणारी सततची चिंता,सतत उदास असणे किंवा चिडचिड करणे आणि नैराश्याच्या गर्तेत जाण्यामध्ये होते. त्यातूनच हे आत्महत्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर गेलेले दिसते.
या सर्व पार्श्वभूमीवर नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची भूमिका कंपन्या वरवर घेत असल्या तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे हे नाकारता येणार नाही. जो कर्मचारी कामावर सतत आनंदाने काम करत असतो त्याच्याकडून निश्चितच उत्पादकता जास्त चांगल्या प्रकारे मिळते हे प्रत्येक कंपनीला, त्यांच्या व्यवस्थापनाला माहित असते. मात्र जेथे कर्मचाऱ्यांना काम करताना सातत्याने दबाव किंवा ताणाखाली किंवा काही उद्दिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र दबाव राहतो तेथे उत्पादकता बाजूला राहून कार्यक्षमता कमी होते. याचाच विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व मानसिकतेवर होत राहतो. त्यामुळेच अनेक कंपन्यांमध्ये कामाचे तास सुद्धा अत्यंत लवचिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो. काही नवीन उपक्रम हाती घेऊन कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि एकाच वेळेला कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि त्याचे काम यांचा समतोल साधण्याचा विचार अलीकडे केला जात आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्या किंवा विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या वित्तसेवा विषयक कंपन्यांमध्ये याबाबत सतत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात. परंतु प्रत्येक कंपनीनेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कामाचे फेरमुल्यांकन करण्याची निश्चित वेळ आलेली आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये खेळाच्या सुविधा तसेच उपहारगृह किंवा मनोरंजनाच्या सुविधा दिल्या जातात. एक प्रकारे कर्मचाऱ्यांना मानसिक दृष्ट्या समाधान चांगल्या प्रकारे कसे लाभेल याचे प्रयत्न केले जातात परंतु दुसरीकडे त्यांच्याकडून व्यवस्थापनाने सातत्याने केलेल्या अपेक्षांमध्ये वाढ होत जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना हा समतोल साधणे जमत नाही. यासाठी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास हे अत्यंत प्रमाणित केले पाहिजेत. शारीरिक कष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आठ तासांची कामाची शिफ्ट किंवा पाळी असते. मात्र ज्यांना मानसिक किंवा बौद्धिक कष्ट होणार असतात त्यांना सहा तासापेक्षा जास्त काम करणे हे त्रासदायक ठरते. प्रसारमाध्यमा सारख्या क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची शिफ्ट ही आठ तासांच्या ऐवजी सहा तासांची त्यासाठीच केलेली आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रत्येक कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची सातत्याने काळजी घेऊन त्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्याची निश्चित गरज आहे. ज्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी शिकत असताना प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थितपणे शिकेलच असे नसते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमता असते. त्यांच्यासाठी समुपदेशनासारखे प्रयत्न करून शिक्षणाची गोडी लावता येते. त्याच धर्तीवर अनेक कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांच्या मानसिक समुपदेशनाचा उपक्रम हाती घेतला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यातून त्याची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवली जाईल किंवा मनाचे स्वास्थ्य त्याला लाभून त्याच्या कामात कशी सुधारणा होईल यासाठी सर्व कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ताणतणावाचे व्यवस्थापन हा आज परवलीचा शब्द झाला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा किती उपयोग होतो आहे हे प्रत्येक कंपनीने पाहण्याची वेळ आली आहे. कंपनीची उत्पादकता आणि त्यांना मिळणारा नफा याची गणिते बदलण्याची आवश्यकता आहे. जर प्रत्येक कर्मचारी आनंदी आणि समाधानी असेल तरच त्याच्या हातून कार्यक्षमपणे काम केले जाऊ शकते हे निश्चित. समतोल आणि शाश्वत कार्य संस्कृती हा या सगळ्याचा गाभा आहे. त्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक कंपनीने यावर जाणीवपूर्वक काम केले तर नजीकच्या भविष्यकाळात हे आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल यात शंका नाही. यामुळेच कंपन्या व कर्मचारी या दोघांनी दोन्ही घटकांनी एकत्र येऊन काही ठोस पावले उचलून वाजवी कामाचा ताण व तास यातून परिपूर्ण आरोग्य व आयुष्य यांची सांगड घातली पाहिजे असे वाटते.
लेखक:प्रा नंदकुमार काकिर्डे
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)