पुणे :पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांचा निर्घुण खून करणार्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.
राहुल दत्तात्रय खुडे (वय ४०), सचिन दत्तात्रय खुडे (वय ३४) आणि सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी (वय २७, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाळासाहेब रणदिवे व आरोपी यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. व्हॉटसअॅप ग्रुपवर रणदिवे यांनी टाकलेल्या मेसेजवरुन वाद निर्माण झाला होता. रणदिवे हे मार्केटयार्डमधील सावित्री हॉटेलचे समोरील शेडमध्ये चहा पित बसले असताना आरोपी धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना दुसर्या दिवशी सकाळी यांचा मृत्यु झाला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना बातमी मिळाली की, आरोपी हे कात्रज घाटाचे दिशेने साताराकडे जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी कात्रज घाटात सापळा रचून तिघांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.