पुणे -पुणे सराफ असोसिएशनची सर्वसाधारण सभा, व त्रैवार्षिक निवडणूक सभा संपन्न झाली. पुणे सराफ असोसिएशनला ९९ वर्षे पूर्ण होत असून असोसिएशन येत्या १ जानेवारीला १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यामुळे या सर्वसाधारण सभेला व निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. फत्तेचंद रांका (अध्यक्ष), अभय गाडगीळ (उपाध्यक्ष), अमृतलाल मांगीलाल सोळंकी (सचिव), राजेंद्र सोमनाथ वाईकर (सह सचिव) व कुमारपाल घिसुलाल सोळंकी (खजिनदार) या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
सन १९८७ ते २०२४, गेली ३७ वर्ष फतेचंद रांका संस्थेवर कार्यरत आहेत. सन १९८७ ते २०००, अशी १३ वर्ष संस्थेचे सचिव म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. सन २००० ते २०२४ या कालावधी करता अध्यक्ष या पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधी करता फत्तेचंद रांका अध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे सराफ असोसिएशनच्या ७०० पेक्षा अधिक सदस्यांमध्ये सलग ३७ वर्ष महत्त्वाच्या पदावर कार्य करणारे फत्तेचंद रांका एकमेव सदस्य ठरले आहेत.
सभेच्या सुरुवातीला हॉलमार्किंग, जीएसटी , पी.एम.एल.ए. व एच.यु.आय.डी. या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारचे मार्गदर्शन मुंबईचे प्रसिद्ध तज्ज्ञ सीए भावीन मेहता यांनी केले.सेमिनार नंतर सर्वसाधारण सभेचे पहिले सत्र सुरू झाले. सदस्यांना वेळोवेळी कायद्याची माहिती व्हावी म्हणून संस्थेतर्फे ‘सुवर्णपत्र’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. यावेळी प्रमुख पाहुणे संजय घोडावत (चेअरमन – संजय घोडावत ग्रुप) यांच्या हस्ते सुवर्णपत्राचे प्रकाशन करण्यात आले. संजय घोडावत यांनी तरुणांना व्यवसायामध्ये कशाप्रकारे यशस्वी व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी घोडावत यांच्या हस्ते गोविंद उर्फ अजित विश्वनाथ गाडगीळ यांना पुणे सराफ जीवन गौरव पुरस्कार – २०२४ प्रदान करण्यात आला. ५० वर्ष जुनी प्रगतीशील पेढी या विभागात दिलीप सोनिगरा ज्वेलर्स व श्रीपाद शंकर नगरकर सराफ यांना पुरस्कार देण्यात आले. योगेंद्र डी. अष्टेकर व विशाल गणेश वर्मा यांना प्रगतिशील तरूण सराफ व्यावसायिक पुरस्कार तर शिवेंद्र ज्वेलर्स व मनिष ज्वेलर्स यांना प्रगतीशील होलसेल व्यापारी या श्रेणीतील पुरस्काराने गौरवण्यात आले.