पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची विधानसभा निवडणुकीची उमेदवार यादी बुधवारी जाहीर झाली मात्र, सदर यादीत पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याने उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यादीत नाव न आल्याने टिंगरे हे मुंबईत अजित पवार यांचे भेटीस तातडीने गेले. वडगाव शेरी मतदार संघात आपले जबरदस्त प्रस्थ तयार केल्यावर एक घटना त्यांना भोवली , पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून टिंगरे अडचणीत आलेत त्यामुळे त्याचा फायदा घेत भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांनी हा मतदार संघ भाजपला मिळावा म्हणून स्वतःची इच्छुक उमेदवारी घोषित केली . वडगाव शेरी मतदारसंघात खा.शरद पवार यांनी देखील वैयक्तिक लक्ष्य घातले असून माजी आमदार बापू पठारे व त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपमधून शरदचंद्र पवार गटात प्रवेश झाला आहे. पठारे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला महायुतीने जागा सोडाव्यात. आर.पी.आय.ची आग्रही मागणी
पुणे दि. २३ :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये एक ही जागा सोडली नाही. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हाच वाईट अनुभव विधान सभा निवडणूकीमध्ये देखील येताना दिसत आहे. भाजपा नेते महायुतीतील इतर घटक पक्षा सोबत गेली महिन्याभरापासून जागांच वाटाघाटी करत असताना रिपब्लिकन पक्षाला मात्र अक्षरशः ‘वाळीत टाकले’ सारखे केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीकडे वारंवार भेटून किमान ५ ते ६ जागा तरी सोडा असा आग्रह करीत आहेत पण भाजपा व इतर मित्र पक्ष याबाबत ब्रशब्द काढायला तयार नाहीत.
रिपब्लिकन पक्षाने मुंबईतील चेंबुर धारावी, अहमदनगरमध्ये श्रीरामपुर, उत्तर नागपुर, यवतमाळ, मधील डमर खेड, नांदेड मधील देगल्लूर, पुण्यातील पिंपरी चिंचवड, कॅन्टोमेंट मतदार संघ इ. मतदार संघाची मागणी केली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने पुणे लोकसभा मतदार संघात पूर्ण ताकती निशी काम केले आहे. त्यामुळे पुण्यातून किमान एक जागा वडगावशेरी, कॅन्टोमेंट या पैकी सोडावी अशी आमची आग्रही मागणी आहे. जागा वाटपाचा तीडा जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘महायुतीच्या’ प्रचारात सहभागी होवू नये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले हे पुढील आदेश देतील. असे सदर बैठकीमध्ये मांडण्यात आले. सदर बैठकीला शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, माजी उपमहापौर सुनिताताई वाडेकर, प्रदेश सदस्य अशोक कांबळे, अॅड. मंदारजो महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले, युवक अध्यक्ष विरेन साठे ,संदीप धांडोरे ,अविनाश कदम ,भारत भोसले ,जितेश दामोदरे .रोहित कांबळे उपस्थित होते.
मविआचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला,आनंद दिघेंच्या पुतण्याची मुख्यमंत्र्यांशी लढत
मुंबई-महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 65 उमेदवारांचे नाव जाहिर करण्यात आले आहेत.दहिसर विधानसभा जागेबाबत माजी आमदार विनोद घोसाळकर आणि सून तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांच्यात वाद.उद्धव ठाकरेंनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी रोखली आहे.महाविकास आघाडीच्या 85-85-85 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित 18 जागांवर चर्चा करणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणार आहे.
अहिंसाच जगाला शांतीचा मार्ग दाखवेल प्रसिद्ध लेखक प्रा.शेफी किडवई यांचे विचार
प्रा. डॉ. सदानंद मोरे लिखित नेक निहाद सो नेक निहायत या उर्दु काव्य संग्रहाचे प्रकाशन
पुणे दि. २३ ऑक्टोबर ः”सृष्टीवर ज्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसा केली आहे त्यांनाच हिरो समझल्या जात आहे. परंतू या सर्व गोष्टींना तिलांजली देऊन सर्वाना दूर राहणे गरजेचे असून पुस्तकांच्या जगात वावरणे महत्वाचे आहे. अहिंसाच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकते आणि त्यातूनच शांतीचे विश्व निर्माण करावयाचे आहे.” असे विचार प्रसिद्ध लेखक प्रा.शेफी किडवई यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि समर्थ मिडिया सेंटरतर्फे लेखक प्रा. डॉ. सदानंद मोरे लिखित नेक निहाद सो नेक निहायत या उर्दु काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मौलाना डॉ. सय्यद कल्बे राशिद रिजवी व लेखक डॉ. सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रकाशक मनिषा बाठे व प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
प्रा.शेफी किडवई म्हणाले,”सृष्टीवर मोठ्या प्रमाणात हिंसा वाढतांना दिसत आहे. या काळामध्ये लेखकाने उर्दु कवितेच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे कार्य केले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, कबिर सारख्या संतांची विचार धारा कवितेमध्ये मांडली आहे. कविंने परिवर्तनकारी हदय स्पर्शी कविता लिहिल्या आहेत.”
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,” समाजात धार्मिक सलोखा निर्माण होणे गजरेचे आहे. हे अधिक दृढ व्हावे या विचार संचनातून उर्दु मध्ये लेखन केले आहे. कवितेतून अंतरधर्मीय सुसंवाद साधण्याचा समाजाला प्रभावी विचार देण्याचा प्रयत्न केला. मानवी विकास व एकात्मते साठी हा अट्टाहास आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, ” मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे सूत्र लक्षात ठेऊन जीवन व्यतीत करावे. या उर्दु पुस्तकाच्या माध्यमातून कवि ने धर्माचा खरा अर्थ मांडला आहे. लेखकाने मानवतेचा मार्ग दाखविणारी कविता लिहून हिंदी साहित्यात आपले बहुमूल्य योगदान दिले आहेत.”
मौलाना डॉ. सय्यद कल्बे राशिद रिजवी म्हणाले,”भाषेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकसूत्रात बांधू शकतो. या संवेदनाला उर्दुच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य होऊ शकते. चांगला व्यक्ती जगाला चांगूलपण देणारा असतो. कवि आणि शायर हे साहित्याच्या माध्यमातूनच समाजाला नवी दृष्टी देऊ शकतात.”
प्रा.राहुल विश्वनाथ कराड यांनी पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी सांगितले. तसेच डॉ. कराड यांनी विश्वशांतीची जी ज्योत पेटविली आहे ती पुढे नेण्याचे काम या विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाईल.
स्वागत पर भाषण प्रा.धिरज सिंग व प्रास्ताविक मनिषा बाठे यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. शालिनी टोंपे व आभार प्रा. मिलिंद पात्रे यांनी केले.
महिला संघटनांकडुन आपत्ती बचाव आणि मदत कार्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया (SOP) तयार करणे आवश्यक – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
बीजिंग+30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेला केले संबोधित
मुंबई दि.२२: आज दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅशनल अलायन्स ऑफ वुमन (NAWO)यांच्यावतीने दिल्ली येथे बीजिंग +30 राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपत्ती आणि बचाव कार्याकरिता क्लायमेट जस्टिस याविषयावर विचार मांडले.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, आज महिला राजकारण, समाजकारण, प्रशासन यामध्ये उच्च पदे भूषवताना दिसत आहेत. परंतु महिलांच्या विकासाची जी प्राथमिकता आहे तिला अद्यापही पाहिजे तेवढा न्याय दिला जात नसल्याचे दिसते, मात्र ज्या अधिकाऱ्यांना शाश्वत विकासाची उद्दिष्टे माहिती आहेत तेच त्याचा समावेश करताना दिसत आहेत.
एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्या ठिकाणी जी मदत दिली जाते त्यामध्ये कशाप्रकारे भेदभाव होतो हे सर्वांना माहीत आहे. आपत्तीग्रस्त भागातील अनेक महिलांना त्यांच्या लहान मुलांमुळे धावपळ करता येत नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, लातूर, उस्मानाबाद येथील विधवा महिलांनी त्यांच्या लहान मुलांमुळे पुन्हा लग्न केले नाही, तर त्या भागात असलेले जवळपास १० हजार विधुर पुरुषांनी पुन्हा लग्न केल्याचे चित्र समोर आले आहे. यामध्ये त्यांनी १८,१९ वयाच्या मुलीसोबत विवाह केल्याने त्या मुलींना कमी वयातच वैधव्य येत असून यातून पुन्हा विधवा महिलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे समाजात लिंगसमानतेवर काम होणे आवश्यक असून महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करणे महत्वाचे आहे. यासर्व विषयाबाबत संयुक्त राष्ट्र संघासोबत देखील यासंदर्भात अनेकदा सल्लामसलत करण्यात आली आहे मात्र त्यांचे याबाबत असलेल्या सूचनांमध्ये आपल्याला बदल करावा लागेल .आपत्ती दरम्यान आपल्याला नव्यानेमहिला संधटनातर्फे बचाव आणि मदत कार्यासाठी, महिलांसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली प्रक्रिया (SOP) तयार करावी लागेल.
तसेच दुष्काळ, गारपीट, वीज कोसळणे, जोराचा वारा यांसारख्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान जी आर्थिक मदत केली जाते8 त्यामध्ये एक समानता नसते. फक्त आर्थिक मदत पुरेशी नाही. त्यांचे समुपदेशन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक आहे. या खेरीज जिल्हा नियोजन समितीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला नियोजन समिती ची निर्मिती करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि ५०% सामाजिक संस्थांचा सहभाग असला पाहिजे. यातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या त्या जिल्ह्यातील समस्या आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपायोजना यावर निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षपदी स्त्री की पुरुष असा भेद नसावा तर व्यक्ती लायक आहे की नाही बघितले जावे : डॉ. तारा भवाळकर
मसाप, साहित्य महामंडळ, सरहदतर्फे पहिला जाहीर सत्कार
संस्कार, वाचन, अचारणातून मराठी भाषा जपली जावी : डॉ. तारा भवाळकर
पुणे : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही. अध्यक्षपदासाठी व्यक्ती लायक आहे की नाही हे बघितले गेले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले. मराठी भाषा ही सजीव, जैविक संस्था आहे. संस्कार, वाचन, आचरण, लिखाणातून मराठी भाषा जपली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भवाळकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई आणि सरहद, पुणे यांच्यातर्फे बुधवारी (दि. 23) जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. भवाळकर बोलत होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते डॉ. भवाळकर यांचा सत्कार करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरहदचे संजय नहार व्यासपीठावर होते.
पुण्याशी असलेले नाते उलगडताना स्नेहातून माणसे जोडली जातात असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, अर्धकृषीनिष्ठ कुटुंबात जन्म झालेल्या माझा बिगरीपासून पी. एचडी. पर्यंत लौकिकार्थाने पुण्याशी संबंध आहे. पुण्यातील शनिवार, नारायण आणि सदाशिवपेठ हे माझे संचार क्षेत्र होते. शालेय शिक्षण पुण्यात तर पुढील शिक्षण महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाले. नोकरी करून शिक्षण घेत असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बहिस्थ विद्यार्थिनीच राहिले. जिज्ञासेपोटी संपूर्ण भारतात मी अनेक गोष्टी धुंडाळत राहिले. त्यामुळे साहित्य गोळा करावे लागले नाही तर ते सहजतेने मिळत गेले. त्यातूनच लोकसंस्कृती, ग्राम, नागर, अतिनागर अशा सर्व प्रकारच्या संस्कृतींची ओळख झाली. पदे राहत नाहीत परंतु माणसे जोडली जातात अशा विचारातून रंगमंच, अभिनय, संस्था, संस्था स्थापना, विद्यार्थी कार्य, परिसंवाद, चर्चासत्र अशा सर्व क्षेत्रात कार्यरत राहिले. जसेच्या तसे स्वीकारण्याचा स्वभाव नसल्याने माझी वाटचाल ‘अवडक-चवडक’ स्वरूपाची झाली.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महाराष्ट्राला ज्ञानकोशकार केतकर, राजवाडे, धर्मानंद कोसंबी, डॉ. रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत अशी व्रतस्थ ज्ञानोपासकांची परंपरा लाभली आहे. त्या मालिकेत डॉ. तारा भवाळकर यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक धनाचा सामाजिक-सांस्कृतिक अन्वयार्थ लावताना उमाळा आणि गहिवराच्या पलिकडे जाऊन त्यांनी जी अतिशय तर्कशुद्ध मांडणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला वेगळे परिमाण लाभले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोशात लोकसंस्कृतीच्या कामाचे अतिथी संपादकपद डॉ. भवाळकर यांना दिले होते, हा डॉ. भवाळकर आणि जोशी यांना जोडणारा ज्ञाननिर्मितीचा धागा आहे.
अध्यक्षपदावरू बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, डॉ. तारा भवाळकर यांचे लेखन वाचकांच्या जाणिवा विस्तृत करणारे आहे. गुणवत्तेच्या आधारावर त्या संमेलनाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या आहेत याचा विशेष आनंद आहे. डॉ. तारा भवाळकर यांचे लिखाण शूद्रातील अतिशूद्र आणि स्त्रीयांपर्यंत पोहोचले आहे. त्या महात्मा फुले यांचा समर्थ वारसा पुढे चालवत आहेत.
डॉ. उषा तांबे यांनी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया विस्तृतपणे मांडली. प्रास्ताविकपर स्वागत सुनीताराजे पवार यांनी केले.
संजय नहार म्हणाले, लोकसाहित्य आणि संस्कृती या विषयी बोलताना शांता शेळके, अरुणा ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर आठवताताच. त्यांचे लोकसाहित्य महाराष्ट्राच्या परंपरेचे द्योतक आहे. दिल्ली येथे होणारे संमेलन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शक आहे. मराठीचा उष:काल दिल्लीत करायचा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ‘हे मराठी बाहू.. झुंजत राहू’ या संमेलन गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले तर आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले.
मसापत दिवाळीपूर्वीच दिवाळी
डॉ. तारा भवाळकर यांचे महाराष्ट्र साहित्य परिषदेत फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. बासरीचे सुरेल स्वर आणि चौघड्याच्या निनादात डॉ. भवाळकर यांचे परिषदेच्या आवारात सुवासिनींनी औक्षण केले. सभागृहातील सत्कार सोहळ्यादरम्यान फुलांचा वर्षाव करून अध्यक्षपदी झालेल्या निवडीचा आनंद व्यक्त करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सुहृदांच्या उपस्थितीत मसापमध्ये जणू दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली.
विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार – संदीप खर्डेकर.
पुणे–नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट, क्रिएटिव्ह फाउंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले.आज शाळेला आवश्यक असलेली कपाटे भेट देत आहोत मात्र लवकरच विपरीत परिस्थितीत असूनही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.

भोर जवळील करंदी आणि वाढाणे गावांच्या मध्ये असलेल्या येसाजी कंक माध्यमिक विद्यालयात नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट, क्रिएटिव्ह फाउंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने शालेय साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी खर्डेकर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके,मुख्याध्यापिका भारती खटाटे, शिक्षक सोपान शिंदे, प्रतिष्ठान चे संदीप मोकाटे, किरण उभे, मिलिंद सातपुते, नवनाथ शिंदे,नवनाथ तनपुरे इ उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर व बुटांची गरज असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका भारती खटाटे व शिक्षक सोपान शिंदे यांनी सांगितले.
ज्यांना खरी गरज आहे अश्यांचा शोध घेऊन त्यांच्या पर्यंत आवश्यक ती मदत पोहोचविण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन सतत प्रयत्नशील असते असे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
येथील शिक्षक ही रोज 25 किमी प्रवास करून शिकवायला येतात याचे महत्व ओळखा आणि आयुष्यात यशस्वी होऊन आपल्या शिक्षकांना गुरुदक्षिणा द्या असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी वेगळ्या वाटा चोखाळा आणि शिक्षण अर्धवट सोडू नका, तुम्हाला जी मदत लागेल ती नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन नक्कीच करेल असेही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
कोथरूड नवरात्र उत्सवाच्या वेळी विविध सामाजिक संस्थांना मदत करणार असल्याचे आम्ही जाहीर केले होते त्यानुसार ही मदत देत आहोत असे कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके म्हणाले.
येथील विध्यार्थ्यांना लागणारे स्वेटर व बूट ही लवकरच उपलब्ध करू असे नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मनोज हिंगोरानी यांनी स्पष्ट केले
‘तारा’ अखंड चमकत राहो… डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान
पुणे-संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर प्रथमतः दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत असून या ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. आजवर त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची ही पोहोच पावती असून याबद्दल आज पुणे अर्बन सेलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद, यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा मा. खा. वंदनाताई चव्हाण, महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्बन सेलच्या सदस्या वृषाली ताई दाभोळकर यांच्या सूचनेतुन हा सन्मान संपन्न झाला. याच वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून प्रथमतः दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाची धुरा एक महिला साहित्यिका हाती घेत आहेत. ही नक्कीच अभिमानाची बाब असून याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो, असे सांगितले.
ज्यांच्या सहकार्यातून आज अर्बन सेलच्या सभासदांकरीता हा योग जुळून आला ते सुप्रसिद्ध साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी, महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव, पुणे शहर अर्बन सेलचे माजी अध्यक्ष नितीन कदम, पुणे शहर अर्बन सेलचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, पुणे शहर अर्बन सेलच्या सदस्या वृषाली ताई दाभोळकर, कसबा विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, कोथरूड विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष सचिन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी.६५ उमेदवार जाहीर
पुणे- महाविकास आघाडीचे रडगाणे थांबत नसताना आता उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे .शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये हि यादी जाहीर केली आहे.




ठाकरे गटाकडून यांना मिळाले एबी फॉर्म
- सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
- वसंत गिते(नाशिक मध्य)
- आदित्य ठाकरे, वरळी
- अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
- एकनाथ पवार (लोहा कंधार)
- राजन साळवी, राजापूर लांजा
- संजय पोतनीस, कलिना
- सुनील प्रभू, दिंडोशी
- के पी पाटील, राधानगरी विधानसभा
- बाळ माने, रत्नागिरी विधानसभा
- उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
- अमर पाटील, सोलापूर दक्षिण
- गणेश धात्रक, नांदगाव
- दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला
- राजन विचारे, ठाणे शहर
- दीपेश म्हात्रे, डोंबिवली
- कैलास पाटील, धाराशिव
- मनोहर भोईर, उरण
- महेश सावंत, माहीम
- श्रद्धा जाधव, वडाळा
- पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
- नितीन देशमुख – बाळापूर
- किशनचंद तनवाणी – छत्रपती संभाजी नगर मध्ये
- छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे
- प्रविणा मोरजकर, कुर्ला
- एम के मढवी, ऐरोली
- भास्कर जाधव, गुहागर
- वैभव नाईक, कुडाळ
- वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी*
- कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत*
- सिल्लोड मतदारसंघ – सुरेश बनकर
- राहुल पाटील – परभणी
- शंकरराव गडाख -नेवासा
- सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
- सुनील राऊत – विक्रोळी
- रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम
- उन्मेश पाटील – चाळीसगाव
- स्नेहल जगताप – महाड
- ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
- केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी
महावितरणमध्ये ‘रिदम ऑफ पीस’मधून सूर बने हमारा!
पुणे, दि. २३ ऑक्टोबर २०२४: अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करताना दैनंदिन एकसुरीपणा कमी व्हावा आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमध्ये परस्पर संवाद व सामंजस्य वाढावा व्हावे यासाठी रास्तापेठ येथे ‘रिदम ऑफ पीस’चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावितरणच्या सुमारे १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध वाद्यांतून तालांची निर्मिती करीत एक लय व एक सूर साधत ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’ची प्रचिती दिली तसेच या उपक्रमाला मोठ्या आनंदात व उत्साहात प्रतिसाद दिला.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एज्यूहोप फोरमच्या सहकार्याने रास्तापेठ इमारतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘रिदम ऑफ पीस’चे आयोजन करण्यात आले. सायंकाळी झालेल्या तासाभराच्या उपक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. अनिल घोगरे, श्री. संजीव नेहते, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, समीर इलेक्ट्रो सिस्टीमचे श्री. समीर देवधर तसेच अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र सहभागी झाले होते. ढोलकी व इतर तालवाद्यांतून सर्वांनी श्री. गणेश बोज्जी यांच्या दिग्दर्शनात विविध तालांची निर्मिती करण्याचा आनंद लुटला. संगीताचा गंध नसताना विविध वाद्यांतून परस्पर सामंजस्याने एक ताल, एक लय व एक सूर निर्माण होऊ शकतो हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला व हास्यकल्लोळात या उपक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, ‘महावितरणमध्ये दैनंदिन विविध कामांना वेग देण्यासाठी सांघिक कामगिरीला पर्याय नाही. अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचा परस्पर संवाद, सहकार्य व सामंजस्य महत्वाचे आहे. ग्राहकसेवेसाठी २४ तास सज्ज राहावे लागत असल्याने मानसिक संतुलन देखील आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचारी ही महावितरणची संपत्ती आहे. महावितरणने आजवर जी प्रगती केली आहे त्यात सांघिक कामगिरीचा मोठा वाटा आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.
या उपक्रमाचे समन्वयक श्री. समीर देवधर यांनी सांगितले की, यश-अपयश हाताळण्यासाठी मानसिक संतुलन राखणे अतिशय गरजेचे आहे. भावनिक स्थैर्य व तणावमुक्त जीवनशैली हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७ हजार शालेय विद्यार्थ्यांना ‘रिदम ऑफ पीस’मध्ये सहभागी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजनासाठी सहसमन्वयक म्हणून ‘एज्यूहोप’च्या साक्षी तांबे, वाद्यांच्या विविध तालनिर्मितीसाठी शुभम कुरवरे, शंकर काळे, सिद्धांत हिंगमिरे व साहील भिडे यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले. या उपक्रमात कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, विजेंद्र मुळे, रवींद्र बुंदेले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे आदींसह महिला-पुरुष अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कुष्ठरोग वसाहतीमध्ये मतदान जनजागृती
पुणे, दि. २३: आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार पिंपरी विधानसभा मतदार संघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दापोडी येथील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयातील दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी शरद पाटील, माध्यम कक्ष समन्वयक विजय भोजने, सहायक समन्वय अधिकारी बालाजी गिते, स्वीप समन्वय अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , आनंदवन वसाहतीमधील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मोठ्या गृहनिर्माण संस्था, शॉपिंग मॉल, उद्याने, ज्येष्ठ नागरिक संघ, दिव्यांग संस्था, शासकीय तसेच खाजगी आस्थापना यांच्यासह विविध वाहतूक संस्थांच्या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे, असे स्वीपचे नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले.
निवडणूक प्रशासनामार्फत दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर स्थापित करण्यात येणार आहे, तसेच त्यांना ये-जा करणे सोईस्कर व्हावे यासाठी मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, मदतनीस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दिव्यांगांकरिता सक्षम ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, कर्णबधिरांसाठी दुभाषक हेल्पलाईनची सेवा उपलब्ध असेल असे दिव्यांग कक्षाचे सहायक नोडल अधिकारी बालाजी गिते यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून आम्ही कुष्ठरोग वसाहतीमध्ये रहात असून आम्ही प्रत्येक निवडणूकीत उत्साहाने सहभागी होतो. आनंदवनमध्ये १५० पेक्षा जास्त घरे असून ३५० हून अधिक मतदार आहेत. निवडणूक विभागाकडून प्रत्येक निवडणूकीत आम्हाला निवडणूक प्रशासनाकडून व्हील चेअर, मदतनीस तसेच मतदान केंद्रावर सहकार्य मिळत असल्याचे वसाहतीमधील मतदार सुरेखा दोडमणी यांनी सांगितले.
आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे, धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
मातोश्रीवर यादी जाहीर होण्याआधीच 11 जणांना एबी फॉर्मचे वाटप
मुंबई- महाविकास आघाडीतील पक्षांकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर होण्याआधीच 11 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले. मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असून या 11 जणांची उमेदवादी निश्चित झाल्याची चर्चा आहे. यामध्ये माहीम मतदारसंघासाठी महेश सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य येथील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी झाली असून नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाल्यामुळे ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर, वसंत गिते, अद्वय हिरे, एकनाथ पवार, के पी पाटील, बाळा माने, अनुराधा नागवडे, गणेश धात्रक, उदेश पाटेकर, अमर पाटील, दीपक आबा साळुंखे पाटील यांना एबी फॉर्म दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित
पुणे, दि. २३: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाचा टोल फ्री क्रमांक १९५० असा आहे.
या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यासोबतच तक्रारी स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीकरीता तात्काळ पाठविण्यात येते. या कक्षाकडे दूरध्वनीद्वारे नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदार यादीत नावनोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा
पुणे, दि.23: भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू यांनी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे, सर्व विधानसभा मतदार संघांसाठी नियुक्त सहायक खर्च निरीक्षक, खर्चविषयक सहायक समन्वयक अधिकारी, यांच्यासह सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उमेश कुमार म्हणाले, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवाव्यात. अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे. जिल्हा नियत्रंण कक्षात येणाऱ्या तक्रारी दैनंदिन निकाली काढून अहवाल सादर करावेत. सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
श्री. बाबू म्हणाले, खर्च संवेदनशील मतदार संघांमध्ये एक भरारी पथक (एफएसटी), व एक स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) वाढवावे. या सर्व पथकांचे तीन पाळीमध्ये काम होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत, मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. दिवसे म्हणाले.
डॉ. दिवसे यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील कामकाजाबाबतचा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केला.
खर्च निरीक्षकांनी जिल्हा नियत्रंण कक्ष, सी- व्हिजिल आणि निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन कक्षातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यानी कक्षातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
0000
शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारनियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; सेवा पुस्तकातही होणार नोंद
पुणे, दि.23: पुणे विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून याचे पालन सर्व संबधितांनी करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. नियमभंग करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करुन त्यांच्या सेवा पुस्तकातही कारवाईची नोंद घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.
यासंबंधीचे परिपत्रक डॉ. पुलकुंडवार यांनी जारी केले आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालविणाऱ्या तसेच दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतूदींचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा, १९८९ (शिस्त व अपील) मधील नियम ३ (१) च्या पोटनियम १८ व कलम १९ मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही कायद्याच्या, नियमांच्या, विनियमांच्या आणि प्रस्थापित प्रथेच्या विरुद्ध आहे किंवा असू शकते असे कोणतेही कृत्य करता येणार नाही असे नमूद आहे. त्यांचे कर्तव्य पार पाडताना शिस्त राखील आणि त्याला यथोचितरित्या कळविण्यात आलेल्या कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास जबाबदार असेल अशी तरतूद असून ती सर्वांना बंधनकारक आहे.
हेल्मेटचा वापर न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) मधील तरतुदीनुसार संबंधित कार्यालय प्रमुखांनी शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यामार्फत दंड वसूलीची कार्यवाही करावी. तसेच याची नोंद मूळ सेवापुस्तकात घेण्याची कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
जीवन अमूल्य असून प्रत्येक जीव वाचवणे महत्वाचे आहे हे तत्त्व लक्षात घेवून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्ते अपघात कमी होण्याच्यादृष्टीने स्वतःपासून सुरुवात करावी तसेच या यानुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना म्हणून हेल्मेट वापरावे असे आवाहन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पुणे शहर तसेच जिल्हा व विभागातील रस्ते अपघात व पर्यायाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये निश्चित घट होऊ शकते असे निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करावा, त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट वापराची सक्ती करावी व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी, अशा सक्त सूचना न्यायमूती श्री. सप्रे यांनी दिल्या आहेत, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
