मुंबई- महाविकास आघाडीतील पक्षांकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर होण्याआधीच 11 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले. मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असून या 11 जणांची उमेदवादी निश्चित झाल्याची चर्चा आहे. यामध्ये माहीम मतदारसंघासाठी महेश सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य येथील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी झाली असून नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाल्यामुळे ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर, वसंत गिते, अद्वय हिरे, एकनाथ पवार, के पी पाटील, बाळा माने, अनुराधा नागवडे, गणेश धात्रक, उदेश पाटेकर, अमर पाटील, दीपक आबा साळुंखे पाटील यांना एबी फॉर्म दिले आहेत.