पुणे, दि. २३: आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार पिंपरी विधानसभा मतदार संघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दापोडी येथील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयातील दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी शरद पाटील, माध्यम कक्ष समन्वयक विजय भोजने, सहायक समन्वय अधिकारी बालाजी गिते, स्वीप समन्वय अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , आनंदवन वसाहतीमधील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मोठ्या गृहनिर्माण संस्था, शॉपिंग मॉल, उद्याने, ज्येष्ठ नागरिक संघ, दिव्यांग संस्था, शासकीय तसेच खाजगी आस्थापना यांच्यासह विविध वाहतूक संस्थांच्या ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे, असे स्वीपचे नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले.
निवडणूक प्रशासनामार्फत दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर स्थापित करण्यात येणार आहे, तसेच त्यांना ये-जा करणे सोईस्कर व्हावे यासाठी मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, मदतनीस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दिव्यांगांकरिता सक्षम ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, कर्णबधिरांसाठी दुभाषक हेल्पलाईनची सेवा उपलब्ध असेल असे दिव्यांग कक्षाचे सहायक नोडल अधिकारी बालाजी गिते यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून आम्ही कुष्ठरोग वसाहतीमध्ये रहात असून आम्ही प्रत्येक निवडणूकीत उत्साहाने सहभागी होतो. आनंदवनमध्ये १५० पेक्षा जास्त घरे असून ३५० हून अधिक मतदार आहेत. निवडणूक विभागाकडून प्रत्येक निवडणूकीत आम्हाला निवडणूक प्रशासनाकडून व्हील चेअर, मदतनीस तसेच मतदान केंद्रावर सहकार्य मिळत असल्याचे वसाहतीमधील मतदार सुरेखा दोडमणी यांनी सांगितले.
आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे, धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.