मसाप, साहित्य महामंडळ, सरहदतर्फे पहिला जाहीर सत्कार
संस्कार, वाचन, अचारणातून मराठी भाषा जपली जावी : डॉ. तारा भवाळकर
पुणे : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही. अध्यक्षपदासाठी व्यक्ती लायक आहे की नाही हे बघितले गेले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले. मराठी भाषा ही सजीव, जैविक संस्था आहे. संस्कार, वाचन, आचरण, लिखाणातून मराठी भाषा जपली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भवाळकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई आणि सरहद, पुणे यांच्यातर्फे बुधवारी (दि. 23) जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. भवाळकर बोलत होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते डॉ. भवाळकर यांचा सत्कार करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरहदचे संजय नहार व्यासपीठावर होते.
पुण्याशी असलेले नाते उलगडताना स्नेहातून माणसे जोडली जातात असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, अर्धकृषीनिष्ठ कुटुंबात जन्म झालेल्या माझा बिगरीपासून पी. एचडी. पर्यंत लौकिकार्थाने पुण्याशी संबंध आहे. पुण्यातील शनिवार, नारायण आणि सदाशिवपेठ हे माझे संचार क्षेत्र होते. शालेय शिक्षण पुण्यात तर पुढील शिक्षण महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाले. नोकरी करून शिक्षण घेत असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बहिस्थ विद्यार्थिनीच राहिले. जिज्ञासेपोटी संपूर्ण भारतात मी अनेक गोष्टी धुंडाळत राहिले. त्यामुळे साहित्य गोळा करावे लागले नाही तर ते सहजतेने मिळत गेले. त्यातूनच लोकसंस्कृती, ग्राम, नागर, अतिनागर अशा सर्व प्रकारच्या संस्कृतींची ओळख झाली. पदे राहत नाहीत परंतु माणसे जोडली जातात अशा विचारातून रंगमंच, अभिनय, संस्था, संस्था स्थापना, विद्यार्थी कार्य, परिसंवाद, चर्चासत्र अशा सर्व क्षेत्रात कार्यरत राहिले. जसेच्या तसे स्वीकारण्याचा स्वभाव नसल्याने माझी वाटचाल ‘अवडक-चवडक’ स्वरूपाची झाली.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महाराष्ट्राला ज्ञानकोशकार केतकर, राजवाडे, धर्मानंद कोसंबी, डॉ. रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत अशी व्रतस्थ ज्ञानोपासकांची परंपरा लाभली आहे. त्या मालिकेत डॉ. तारा भवाळकर यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक धनाचा सामाजिक-सांस्कृतिक अन्वयार्थ लावताना उमाळा आणि गहिवराच्या पलिकडे जाऊन त्यांनी जी अतिशय तर्कशुद्ध मांडणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला वेगळे परिमाण लाभले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोशात लोकसंस्कृतीच्या कामाचे अतिथी संपादकपद डॉ. भवाळकर यांना दिले होते, हा डॉ. भवाळकर आणि जोशी यांना जोडणारा ज्ञाननिर्मितीचा धागा आहे.
अध्यक्षपदावरू बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, डॉ. तारा भवाळकर यांचे लेखन वाचकांच्या जाणिवा विस्तृत करणारे आहे. गुणवत्तेच्या आधारावर त्या संमेलनाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या आहेत याचा विशेष आनंद आहे. डॉ. तारा भवाळकर यांचे लिखाण शूद्रातील अतिशूद्र आणि स्त्रीयांपर्यंत पोहोचले आहे. त्या महात्मा फुले यांचा समर्थ वारसा पुढे चालवत आहेत.
डॉ. उषा तांबे यांनी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया विस्तृतपणे मांडली. प्रास्ताविकपर स्वागत सुनीताराजे पवार यांनी केले.
संजय नहार म्हणाले, लोकसाहित्य आणि संस्कृती या विषयी बोलताना शांता शेळके, अरुणा ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर आठवताताच. त्यांचे लोकसाहित्य महाराष्ट्राच्या परंपरेचे द्योतक आहे. दिल्ली येथे होणारे संमेलन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शक आहे. मराठीचा उष:काल दिल्लीत करायचा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ‘हे मराठी बाहू.. झुंजत राहू’ या संमेलन गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले तर आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले.
मसापत दिवाळीपूर्वीच दिवाळी
डॉ. तारा भवाळकर यांचे महाराष्ट्र साहित्य परिषदेत फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. बासरीचे सुरेल स्वर आणि चौघड्याच्या निनादात डॉ. भवाळकर यांचे परिषदेच्या आवारात सुवासिनींनी औक्षण केले. सभागृहातील सत्कार सोहळ्यादरम्यान फुलांचा वर्षाव करून अध्यक्षपदी झालेल्या निवडीचा आनंद व्यक्त करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सुहृदांच्या उपस्थितीत मसापमध्ये जणू दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली.