Home Blog Page 629

स्नेह ज्योती मानसिक आरोग्य मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत समुपदेशन उपलब्ध – मंजुश्री खर्डेकर

कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे – राजेश पांडे.

पुणे-स्नेहालय विश्वस्त संस्था आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेले “मोफत मार्गदर्शन केंद्र” हे अगदी योग्य वेळी सुरु करण्यात आले आहे, सध्या समाजात खूप अस्वस्थता आहे आणि अश्या वेळी कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे हे खूप महत्वाचे आहे असे भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.
आज त्यांच्या हस्ते जागतिक महिला दिन आणि सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत मानसिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन, वैयक्तिक व कुटुंब समुपदेशन,विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन,व्यसनमुक्ती,रस्त्यावरील स्क्रीझोफ्रेनिक मनोरुग्ण व्यक्तींसाठी मार्गदर्शन अश्या सर्व प्रकारच्या समुपदेशनासाठी च्या केंद्राचे उदघाट्न करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
दर गुरुवारी सकाळी 11 ते 4 कर्वेनगर येथील रमांबिका मंदिराजवळील शक्ती 98 चौकातील “दिव्यांग आधार केंद्र” येथे सौ. ज्योती एकबोटे ह्या मोफत मार्गदर्शन व समुपदेशन करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्यांना आपल्या भावना कुठे व्यक्त कराव्यात हे समजत नाही, त्यांच्या मानसिक कोंडमाऱ्यावर ह्या केंद्रात नक्कीच उपाय सापडेल असा विश्वास देखील सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.
याठिकाणी समुपदेशनासाठी येणाऱ्या सर्वांची माहिती गुप्त राखण्यात येते व त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडविल्या जातात असे ह्या केंद्राच्या संचालिका सौ. ज्योती एकबोटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,सौ.श्रीजा ठाकूर,गौरीताई करंजकर, डॉ. हिमांशू परांजपे, डॉ. कांचन परांजपे इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना डॉ.कांचन परांजपे यांनी तयार केलेली ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने भेट देण्यात आली.

लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे- रामदास आठवले

पुणे: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

आपल्या पुणे दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विरेन साठे  वसीम पैलवान, संदीप धांडोरे, रोहित कांबळे, हबीब सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर काहीसा ताण येत असला तरी देखील राज्य सरकारने तो ताण सहन करूनही लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन पाळावे, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालानुसार राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, येणाऱ्या काळात राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दावोस येथे विविध उद्योगांशी झालेल्या करारानुसार राज्यात 15 लाख 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही उपाययोजना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ राज्याच्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा करेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि सध्याच्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे चर्चा करून कोणताही निर्णय घेत असतात. त्यामुळे काही निर्णय रद्द केले असले तरी देखील त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा झालेली असणार आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वृत्त चुकीचे आहे, असा दावाही आठवले यांनी केला.

अनेक पक्षांचे सरकार चालविताना एकमेकांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर नाराज आहेत असा होत नाही. रिपब्लिकन पक्षामध्ये देखील मंत्रीपद न मिळाल्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र, महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे. विशेषत: पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनता वास्तव्य करीत आहे. त्यामुळे पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

पुण्यात भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे

पुणे रेल्वे स्थानकाजवळ आंबेडकर भवनच्या मागे दोन एकरचा भूखंड रिकामा आहे. या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, अशी आपली मागणी असून त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी मागितली जात असली तरी देखील रुग्णालयासाठी इतर जागा निवडण्यात यावी. आपला विरोध रुग्णालयाच्या उभारणीला नाही. रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, आंबेडकर भवन नजीकच्या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, असा आपला आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महागया येथील महाबोधी ट्रस्टमध्ये सन 1949 च्या कायद्यानुसार हिंदू धर्मातील काही जणांना प्रतिनिधित्व देण्याचा नियम आहे. मात्र, इतर कोणत्याही धार्मिक ट्रस्टमध्ये इतर धर्माच्या प्रतिनिधींचा समावेश केला जात नाही. त्याप्रमाणेच महाबोधी ट्रस्टही पूर्णपणे बौद्ध समाजातील विश्वस्तांकडे दिला जावा, अशी मागणी आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे. रिपब्लिकन पक्ष देखील 10 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील सर्व जिल्हे तालुके आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये या मागणीसाठी आंदोलन करणार आहे. या मागणीचे कोणीही राजकारण करण्याची गरज नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव विजय स्मारकासाठी दीडशे ते दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठीच्या प्रक्रियेने अद्याप वेग घेतलेला नाही. यासाठी देखील आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकाचा आराखडा जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय अधिकारी यांनी तयार करून तो लवकरात लवकर राज्य शासनाला सादर करावा, अशी सूचनाही आठवले यांनी केली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळा हिंदू मिल स्मारकात उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे या पुतळ्याचे काम करत असून या
कामासाठी 1हजार 89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दीड वर्षाच्या कालावधीत हा पुतळा पूर्णपणे तयार होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.

आंतरजातीय विवाह केल्याप्रकरणी भोर येथील विक्रम गायकवाड या तरुणाची हत्या झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, हे कृत्य एकट्या दुकट्याचे नसून यात आणखी काही आरोपी सहभागी असावेत, असा आमचा संशय आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली असून त्यांनी कसून तपास करण्याचे आश्वासन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.

संघटना वाढीवर लक्ष केंद्रित

रिपब्लिकन पक्षाने संघटन बांधणी आणि वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने 9 एप्रिल रोजी लोणावळा येथे राज्यभरातील 800 ते 1000 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 18 मे रोजी सामाजिक सलोखा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात समाजातील सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे, असे आठवले म्हणाले. त्याचप्रमाणे ठाणे येथे एक जून रोजी पक्षाचे अधिवेशन होणार असून त्यात सुमारे एक लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला

महामानवांचा आव्हान करणारी आणि समाजात फूट पाडणारी वक्तव्य करणे अयोग्य असून त्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील आठवले यांनी केली. ‘कोण नामदेव ढसाळ,’ असा उन्मत्त सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.

मोदींना घालवणे राहुल गांधी यांना शक्य नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. महायुतीला राज्यात आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरात जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मोदी यांना हटविणे राहुल गांधी यांना शक्य होणार नाही. केंद्रात इंडी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी सपशेल तोंडघशी पडली आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान पदावर मोदी हेच विराजमान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिलांवर वाढणाऱ्या अत्याचार आणि अवमानाच्या प्रकरणांचा आठवले यांनी तीव्र निषेध केला.

भररस्त्यात लघुशंका_तरुणाची ओळख पटली, वडील म्हणाले,त्याचे कृत्य लज्जास्पद

आरोपी अल्पवयीन नाहीत, त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना, लवकरच ताब्यात घेऊ; पोलिसांची माहिती

पुणे-पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. गौरव आहुजा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते, त्याने रस्त्यावर नव्हे तर माझ्या तोंडावर लघवी केली आहे, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.या प्रकरणातील आरोपींवर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील व अश्लाघ्य वर्तन करणे, मोटार व्हेइकल कायद्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव म्हणाले.

गौरव आहुजाने पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएमडब्ल्यू कार थांबवून लघुशंका केली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संतापाची लाट पसरली आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिसांवरही टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारावर कार मालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मनोज आहुजा असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लघुशंका करणाऱ्या गौरवचे वडील आहेत. त्यांनी स्वतःच ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्त वाहिनी शी बोलताना आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात पुणे – नगर रोडवर भररस्त्यात लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, दोन मद्यधुंद अवस्थेतील तरुण रस्त्याच्या मधोमध आपली आलिशान कार उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करतो. यावेळी त्याने रस्त्यावरच महिलांसमोर अश्लील चाळे केल्याचेही निदर्शनास येत आहे. त्याच्या सोबत असणारा दुसरा तरुण कारच्या समोरच्या सिटवर बसला आहे. त्याच्या हातातही दारुची बाटली आहे. हे दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांना जाब विचारला असता ते भरधाव वेगात वाघोलीच्या दिशेने निघून गेले.

तो माझा मुलगा असल्याची लाज वाटतेमनोज आहुजा यांनी आपल्या मुलाच्या कृत्यावर तीव्र संतापही व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते. त्याने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. घटनेत वापरलेली कार माझ्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकरणी जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे त्यांनी म्हटले. मनोज आहुजा यांचा पुण्यात एक बार असल्याची माहितीही उजेडात आली आहे.

आरोपी तरुणी अल्पवयीन नाही – पोलिस-पुण्याचे पोलिस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, एक तरुण भर रस्त्यावर अश्लाघ्य वर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. संबंधित तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोपीचे नाव काय आहे? गाडी कोणाची होती? याची माहिती आमच्याकडे आहे. पण आरोपीला पकडण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मी त्यांची नावे उघड करत नाही.कारवाई पूर्ण झाल्यावर आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर याबद्दलची माहिती उघड केली जाईल. आरोपी व्यक्तीचे घर, त्यांचे काही नातेवाईक, पुण्याच्या बाहेरील त्यांची काही मित्रमंडळी यांच्याकडे त्यांचा शोध घेतला जात आहे. मुलांनी कुठे पार्टी केली होती का? याबद्दल माहिती मिळाली नाही, पण तपास केला जात आहे. आरोपी मुलांच्या आई-वडीलांशी संपर्क झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी टीम रवाना झाली आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे अल्पवयीन नाहीत, असे ते म्हणाले.

महिला दिनानिमीत्त महिला पोलीसाची भव्य बाईक रॅली

पुणे ८ मार्च –
बेटी बचाओ … बेटी पढाओ हा संदेश देत महिला दिनानिमीत्त महिला पोलीसांनी आज भव्य बाईक रॅली वानवडी येथून काढली .परिमंडळ ५ मधील २३२ महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ११६ मोटार सायकलींवर स्वार होऊन बाईक रॅलीमध्ये यथेच्छ सहभाग घेतला होता. सदर बाईक रॅलीस सिनेअभिनेता पुष्कर जोग, संगिता तरडे व प्राजक्ता गायकवाड यांनी महात्मा फुले सांस्कृतीक भवन, वानवडी येथे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली होती.

बेटी बचाओ … बेटी पढाओ या उपक्रमाला दिनांक २२/०१/२०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमीत्ताने ८ मार्च जागतिक महिला दिनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीसांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . त्या अनुषंगाने परिमंडळ ५ मधील महिला पोलीसांच्या वतीने दिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी १०/३० वाजता महात्मा फुले सांस्कृतीक भवन, वानवडी ते एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर असे महिला पोलीस बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.हि बाईक रॅली एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे समाप्त झाली .
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ५ मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावतीने करण्यात आले होते.

महिलांनी स्वतःच्या मानसिक व शारिरीक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे- पुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर

पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरीपदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान

पुणे : घर, संसार, करिअर सांभाळताना महिलांनी स्वतःचा स्वाभिमान देखील जपला पाहिजे.हे करीत असताना त्यांनी स्वतःच्या मानसिक व शारिरीक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे.महिला भावनिकरित्या कमजोर असतात असे नेहमी बोलले जाते, परंतु मला असे वाटते की महिला भावनिक असतात पण कमजोर नसतात. जागतिक महिला दिनाचा खरा उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे, असे मत पुणे विभागाच्या सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरी पदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी पुणे सह-धर्मदाय आयुक्त क्र. २ राहुल मामू सो, पुणे विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी महिला सशक्तीकरण वर मनोगत व्यक्त केले. तसेच, माईंड ट्रेनर संभाजी पिसाळ यांनी सर्वांना मानसिक तणाव कमी होण्याबाबत संदेश दिला.

यावेळी धर्मदाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी साधना जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या ११ नवोदित नोटरी पदी नियुक्त महिला वकिलांचा सन्मान-चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

संभाजी पिसाळ म्हणाले, दैनंदिन जीवनात काम करताना नेहमीच प्रत्येकाला ताण येत असतो. परंतु या ताणाचे रुपांतर तणावात होऊ नये, हा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. जरी हा ताण आला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर ताणामुळे निर्माण होणारी अवघड परिस्थिती टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.  

पीटीपीए चे अध्यक्ष ऍड. मोहन फडणीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ऍड. साधना बाजरे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. रोहिणी पवार यांनी केले, सचिव ऍड. गजानन गवई यांनी आभार मानले.

श्री स्वामी समर्थ पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा : वीरेंद्र किराड यांना यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार 

पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त १६ मार्च पर्यंत महानगरपालिकेजवळील  कॉंग्रेस भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे  यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ होईल. पालखी सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष आहे.

यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट पुणे चे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. १६ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित राहणार आहेत.

पालखी सोहळ्यात गुरुवार, दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता तुकाराम दैठणकर आणि हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी  भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता लुई ब्रेड अंध अपंग कल्याण संस्था ऑर्केस्ट्रा साई सातसूर परिवार सांस्कृतिक मंच यांचा ‘साई सातसुर’ हा कार्यक्रम होणार आहे.  तर १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता  मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक १६ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस ‘रक्तदान महायज्ञ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

श्री लकडी पूल विठ्ठल मंदिराच्या वतीने भजनी मंडळातील महिलांचा सन्मान

लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या सहकार्याने आयोजन  

पुणे : भजन हे केवळ भक्तिसंगीत नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. भजनी मंडळातील महिलांची भूमिका ही केवळ गायनापुरती मर्यादित नसून, त्या समाजाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात, अशी भावना व्यक्त करीत पेशवेकालीन श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या वतीने भजनी मंडळातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या सहकार्याने  टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  श्रीफळ, गुलाबपुष्प आणि साडीचोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. 

पासोड्या विठोबा मंदिराचे प्रमुख विश्वस्त रविंद्र फटाले यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, स्वप्निल काळभोर, विनोद मणियार, लायन्स क्लबचे बजरंग आकडे उपस्थित होते.

रोमा लांडे, दिलीप बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. अमर लांडे यांनी आभार मानले.

स्त्री जन्माचे स्वागत होणे ही फलश्रुती : खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या साहित्यकृतीच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृती घडत आहे. समाजाचा स्त्री जन्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होणे हे या कार्याचे फलित आहे, असे गौरवोद्गार भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काढले.

बेटी बचाओ अभियानाच्या प्रणेत्या आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया लिखित ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. 8) खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मानकन्हैय्या ट्रस्टतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, यशोवाणीच्या प्राची गुर्जर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा विमल बाफना, मानकन्हैय्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, कवी चंद्रकांत पालवे, भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर मंचावर होते. ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या ऑडिओ सीडीचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.

लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, मला लहानपणापासूनच लेखन, वाचनाची आवड होती. त्यासाठी घरात पोषक वातावरणही होते. आई ग्रंथपाल आणि वडिल पत्रकार असल्याने साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास व आशीर्वादही लाभला. यातून रुजलेले बीज चळवळ रूपाने लेखनात परावर्तीत झाले. आरोग्य पत्रिकेतून लिहिलेले अनेक लेख, कविता, नाटिका, स्त्रीविषयक कायद्यांची माहिती याचे पुस्तकात रुपांतर झाले. सासरी देखील या कार्याला प्रेरणा मिळत गेली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साहित्य शारदेच्या मंदिरात ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे हा माझ्यासाठी अमृतसिद्धी योग आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, सनातन भारतीय संस्कृतीत स्त्री जिद्दी, स्वतंत्र आणि ज्ञानवंत होती. तिला ब्रह्मचारिणी राहण्याचा, पती निवडण्याचा अधिकार होता. परंतु मध्ययुगात परकीय आक्रमणांमुळे सामाजिक व धार्मिक परिस्थिती स्त्री स्वातंत्र्यासाठी पोषक नव्हती. याविषयी साहित्यिकांनी संशोधन करून समाजाची आजची मानसिकता बदलण्यासाठी साहित्यकृतींची निर्मिती करावी.

डॉक्टर कुटुंबाकडून समाजभानाची जपणूक : प्रा. मिलिंद जोशी

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. सुधा कांकरिया यांनी या पुस्तकाच्या निर्मितीतून समाजमनाला सावरण्याचे काम केले आहे. आजच्या प्रगत, समृद्ध सामाजिक परिस्थितीत किळसवाणे वैचारिक दारिद्य्र असताना ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजमन बदलण्याचे मौलिक कार्य डॉ. सुधा कांकरिया करीत आहेत. कांकरिया कुटुंबियांनी फक्त नेत्रचिकित्सेच्या क्षेत्रात योगदान दिलेले नाही तर समाजाला वेगळी दृष्टी देण्याचेही कार्य केले आहे. समाज परिवर्तनासाठी शब्दांचे शस्त्र होऊन सामर्थ्यवान ठरणाऱ्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या डॉ. सुधा कांकरिया या सर्जनशील लेखिका आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. संवेदनशीलता बोथट होऊन अश्रू आटणे ही आजची सामाजिक विकृत मानसिकता झाली आहे. अशा काळात संवेदनशील मनाचे हे डॉक्टर कुटुंब समाजभान जागृत ठेवून कार्यरत आहेत.

डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याची लोकचळवळ झाली आहे, असे सुनिताराजे पवार यांनी सांगितले. दृष्टीहिन विद्यार्थ्यांना अवांतर वाचनातून बहुश्रुतता येण्यासाठी ओडिओ सीडीची निर्मिती केली आहे, असे यशोवाणीच्या प्राची गुर्जर यांनी सांगितले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास कुंदनऋषीजी महाराज साहेब, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, आदिती तटकरे, राम शिंदे, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन विमल बाफना, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी केले.

प्रास्ताविकपर स्वागत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. सुरुवातीस श्लोका वर्धमान कांकरिया हिने सरस्वती वंदना नृत्य सादर केले तर स्मीरा वर्धमान कांकरिया हिने डॉ. सुधा कांकरिया यांची ‌‘गोड मुलगी गोडुली‌’ ही कविता सादर केली. उपस्थितांचे स्वागत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन नेहा अभिजित यांनी केले तर आभार जयंत येलूलकर यांनी मानले.

“हा विषय केवळ एका तरुणाच्या उद्दाम वर्तनाचा नाही, तर समाजातील वाढत्या बेशिस्त वृत्तीचा, तातडीने कारवाई करणे गरजेचे”– डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील एका तरुणाचा उद्दामपणा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कठोर भूमिका; शहराच्या सुरक्षेसाठी मोहीम घेण्यासंदर्भात सूचना

पुणे, दि. ८ मार्च २०२५ : पुण्यात सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये एका तरुणाने मुख्य चौकात अश्लील हावभाव करत लघुशंका केल्याचे दिसत आहे. या प्रकारावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका गाडीतून उतरून मुख्य चौकात हा तरुण लघुशंका करतो. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी विरोध केला, तरीही त्याने उद्दामपणा केला. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रकरणी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत चालली आहे. पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे.”

त्या पुढे म्हणाल्या, “अशा घटना घडतात कारण काही पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरूण घालतात. हे थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, पोलीस आणि सरकारने एकत्रितपणे कठोर भूमिका घेतली पाहिजे.”

शहराच्या सुरक्षिततेसाठी मोहिम राबवण्यासंदर्भात सूचना

या घटनेतील तरुणाचा तपशील पोलिसांना मिळाला असून, लवकरच त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली. तसेच, पुणे शहरातील रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही मार्च महिन्यात कार्यान्वित होतील, मात्र पोलिसांना या घटनेचे फुटेज मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील वाढत्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना त्यांनी दिली. “राजकीय श्रेयवाद न खेळता सर्वांनी मिळून समाजात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. सरकारने पोलिसांना अधिक स्वायत्तता द्यावी आणि नागरिकांनीही जबाबदारीने वागावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

BMW रस्त्याच्या मधोमध थांबवून फुटपाथवर केली लघुशंका; VIDEO व्हायरल

पुणे-पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू घेण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यातील सिग्नलवरती गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केले आहे. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा. या विकृतांना ठेचून काढले पाहिजे, असे रुपाली ठोबरे यांनी म्हटले आहे.

पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार उभी करत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यात महिला दिनाच्या दिवशी भररस्त्यात असा श्रीमंत बापाच्या मुलाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.

मागील घटनेतून पुणे पोलिसांनी धडा घेतला नाही

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.

तासाभरात कारवाई करा- दमानिया

अंजली दमानिया म्हणाल्या की, पोलिसांनी तर सोडा लोकांनीही धडे घेतलेले नाही. लोकांना महाराष्ट्राची परिस्थिती दिसत आहे. हा मोठ्या गाडीतून उतरला आहे. काय बोलावे अशा लोकांना. त्यांच्यावर तासाभरात कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनी आता थोडेसे सक्रीय होण्याची गरज आहे. पोर्शेमध्ये जसा निबंध लिहण्यास सांगितले तसेच काहीसे याच्या बाबतीत होईल.

व्हिडिओ न करता चोप द्यावा- मोरे

वसंत मोरे म्हणाले की, स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला आहे. पोलिस यंत्रणेवर प्रयन चिन्ह उपस्थित होत आहे. ते चौकात गाड्या थांबवतात, काळ्या काचा, नंबर यासाठी थांबवणाऱ्या पोलिसांना हे दिसत नाही का? असा सवाल मोरेंनी केला आहे. पुणे शहराचे वातावरण खराब झाले आहे. पोलिस कुणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. प्रत्येकाला 31 मार्चचे टार्गेट आहे. त्यामुळे ह्याकडे कुणाचे लक्ष नाही. तिथल्या पोलिस चौकीचे कर्मचारी काय करता असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमच्यासमोर आले तर आम्ही त्यांना तिथेच राइट करू. लोकं व्हिडिओ करतात तसे न करता त्यांना तिथेच चोप दिला पाहिजे.

पोलिसांना दोष देणं योग्य नाही

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 40-50 गावे पुणे शहरात समाविष्ट झाली आहेत. पोलिसांची देखील ग्रामीण आणि शहरी भागातील संख्या कमी आहे, प्रत्येक गोष्टीचा दोष पोलिसांवर टाकणे योग्य नाही. त्या तरुणावर कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाईच्या सूचना मी सरकारला करणार आहे. गृह विभाग परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सर्वांनी मिळून या संदर्भात एक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

लोकांची विकृती वाढली- रुपाली पाटील

विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे. बीएमडब्ल्यू सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज आहे. यांना संस्कार नावाची गोष्टच नाही. एवढाच पैशांचा माज असेल, तर हॉटेलमध्ये जाऊ शकला असता, पाच रुपयांऐवजी शंभर रुपये देऊन लघुशंका केली असती, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स: वेबसाईट उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे-शनिवार दिनांक ८मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या वेबसाईटचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा.ॲड. अशोक पलांडे यांच्या शुभहस्ते झाले.त्यावेळी संस्थेच्या फायनान्स कंट्रोलर श्रीमती प्राजक्ता प्रधान,संस्था सदस्य श्री.मिलिंद कांबळे,प्रशालेच्या शालासमितीअध्यक्षा मा.डॉक्टर प्रीती अभ्यंकर, मुख्याध्यापिका श्रीमती दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता भोसले,पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती जज्जल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालकप्रतिनिधी , वर्गप्रतिनिधीविद्यार्थिनी उपस्थित होत्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फक्त मुलींसाठी असणाऱ्या अहिल्यादेवी प्रशालेत जागतिक महिलादिनी वेबसाईटचे उद्घाटन अतिशय औचित्यपूर्ण आहे.
शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटीसंचलित, ८६वर्ष विद्यादानाचा अनुभवसंपन्न वारसा लाभलेली ,इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावातही आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवलेली अग्रमानांकित मराठी माध्यमाची ही शाळा असून या वेबसाईटच्या माध्यमातून आधुनिकपद्धतीने तिची ओळख आता आपल्याला होणार आहे.

रमणबाग शाळेत महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सन्मान

उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत येताना जसं कौतुक झालं होतं तसंच आज शाळेत कौतुक झालं….परंतु आजचं कौतुक शेकडो मुलांच्या साक्षीनं होतं.. आम्हा शिक्षिकांच!

पुणे-महिला दिनाच्या औचित्याने रमणबागेच्या फरसबंद चौकात फुलांच्या पायघड्यांवरून शाला प्रमुख चारुता प्रभुदेसाई,पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर व अंजली गोरे, प्रमुख अतिथी मेघा नगरे,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिलांना व्यासपीठावर आणण्यात आले.
प्रत्येक महिलेचा पुरुष सहकारी शिक्षकाने आपुलकीने भेटवस्तू देऊन सत्कार केला….
प्रत्येकीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटून आले होते…
प्रशालेचे माजी विद्यार्थी निलेश गिरमे यांनी महिला शिक्षिकांसाठी भेटवस्तू दिल्या.
उपशालाप्रमुख जयंत टोले यांनी विद्यार्थ्यांना आई, आजी, बहिण यांचा सन्मान करण्याचे,त्यांच्या प्रति आपले प्रेम व भावना व्यक्त करायला सांगितले. प्रमुख अतिथी मेघा नगरे शालेय जीवनात शिक्षण संस्कार व जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन केले.रवींद्र सातपुते यांनी अतिथींचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले तर देवेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कर्तृत्ववान महिलांच्या स्मृतींना उजाळा देत नवीन मराठी शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

पुणे:शनिवार दिनांक ८/०३/२०२३ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ.अनन्या बिबवे प्राचार्य मॉडर्न कॉलेज पुणे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तसेच शाळेतील थोर महिलांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींचे परीक्षण करण्यासाठी मा.सायली गोडबोले (लेखिका) व मा. सुवर्णा बोडस (व्हाईस ओव्हर कलाकार )तसेच साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.पियुष शहा उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. मा.मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व महिलांचा सन्मान फक्त आजच्या दिवशी न करता सतत त्यांचा सन्मान करा असे सांगितले.मीनल कचरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची माहिती सांगितली.
राजमाता जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई, सावित्री बाई फुले,डॉक्टर आनंदीबाई जोशी, प्रतिभाताई पाटील, बहिणाबाई चौधरी, संतोष यादव , सिंधुताई सपकाळ सुधा मूर्ती, मादाम कामा ,महाराणी ताराबाई ,रमाबाई रानडे, संत मीराबाई ,मनू भाकर, कॅप्टन लक्ष्मी सहगल,सरोजिनी नायडू, यांसारख्या थोर महिलांच्या वेशभूषा शाळेतील विद्यार्थिनींनी करून त्यांनी स्वगत व्यक्त केले. या विद्यार्थिनींमधून प्रथम पाच क्रमांक निवडून त्यांना साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे बक्षीसे देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.अनन्या बिबवे यांनी विद्यार्थ्यांना सर्व महिलांना सन्मान द्या आणि तो एक दिवस न देता शहाण्यासारखे आयुष्यभर मोठ्या माणसांचा मुख्य म्हणजे स्त्रियांचा सन्मान करा असा संदेश दिला. तसेच साने गुरुजी कथामाला तर्फे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. त्याचबरोबर भालभा करंडक स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.स्वाती यादव यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा पाखरे यांनी अतिथी परिचय करून दिला. सौ.योगिता भावकर यांनी आभाराचे काम केले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा
तिकोने, धनंजय तळपे यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसच्या सद्भावना पद यात्रेला मस्साजोग येथून सुरुवात

मस्साजोग/मुंबई, दि. ८ मार्च २०२५

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या क्रूरतेने, अमानुषपणे ही हत्या करण्यात आली ते पाहून समाजाला चिंतन करावे लागेल. महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, या महापुरुषांचा गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांच्याराख्या महान संताचा वारसा लाभलेला आहे. संतोष देशमुख यांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे. ही लढाई एकट्या देशमुख कुटुंबाची नाही तर सर्वांना ही लढाई लढावी लागणार आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, क्रुरता नष्ट व्हावी, मानवता व सद्भाव वाढावा हा संकल्प घेऊन ही सद्भावना पद यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी सकाळी स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मस्सोजोग येथून सद्भावना यात्रेची सुरुवात केली. यावेळी सद्भावना यात्रेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या बलिदानातून आपण काय शिकणार आहोत की नाही? एका प्रवृत्तीच्या विरोधात लढताना त्यांचा बळी गेला आहे आणि ही प्रवृत्ती नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलला पाहिजे. सद्भावना ही आपल्या भारताच्या डीएनएमध्ये आहे, संविधानात आहे व आम्ही या विचाराचे पाईक आहोत. घटना घडल्यापासून देशमुख कटुंबियांचा तोल ढललेला नाही, त्यांनी विवेकपूर्ण विचार मांडला आहे. गुन्हेगारांना जात, धर्म नसतो, तो गुन्हेगार असतो, या प्रवृत्तीच्या मागे कोण आहे, याचा उहापोह होत आहे मात्र ही सद्भावना जनतेपुढे घेऊन गेले पाहिजे.
सद्भावनेच्या विरोधात तोडाफोडा, भय, द्वेष, मत्सर, जाती धर्माला एकमेकाविरोधात लढण्यास लावणाऱ्या प्रवृती आहेत, अशा प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो. संस्कृती रक्षणाच्या माध्यमातून ही पदयात्रा आहे. देशमुख परिवाराच्या संघर्षासोबत आम्ही आहोत. संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये तसेच हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. या बलिदानातून आपण धडा शिकला पाहिजे, पैशाच्या हव्यासातून अशा हत्या होऊ नयेत असेही सपकाळ म्हणाले.
जातीभेद मिटवूया मानवता जपूया अशा घोषणा देत हजारोंच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हिमाचलच्या प्रभारी रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, नांदेडचे खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे,ज्येष्ठ अर्थतज्ञ एम. एच. देसरडा, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील युवा नेते अजिंक्य पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, अमर खानापूरे, दादासाहेब मुंडे, भगवानगडाचे विश्वस्त आणि जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह प्रदेश काँग्रेस व बीड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते महिला तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो नागरिक सद्भावना रॅलीत सहभागी झाले होते.
मस्साजोग येथून सुरु झालेली पदयात्रा पुढे उत्तरेश्वर पिंप्री फाटा, पिंपळगाव फाटा, सांगवी, सारणी, रेणु पेट्रोल पंप, बरड, नांदूरफाटा, येळंबघाट, चाकरवाडी फाटा, नेकनूर असा प्रवास करत रात्रीचा मुक्काम नेकनूर येथे करेल. उद्या रविवार दि.९ मार्च रोजी पुन्हा या पदयात्रेची सुरुवात होऊन बीड शहरात सद्भावना मेळाव्याने यात्रेची सांगता होईल.

जिल्हा इंटरस्कूल शूटिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची उत्कृष्ट कामगिरी

१४ पदकेः ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांवर कोरले नाव

पुणे ८ मार्च: शिरूर येथील शूटिंग स्पोर्टस क्लब मध्ये झालेल्या स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रतिभावना नेमबाजांनी अविश्वसनीय १४ पदकांवर नाव कोरले आहे. त्यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच अंडर १४ मुलीमध्ये स्वरा गुरूवाले, आणि अंडर १९ मुलीमध्ये कंगन सिंग व अंडर १७ मुलांमध्ये अर्थव सिंह भादोरिया यांनी एअर पिस्तूल प्रकारातील यश धक्कादायक आहे. यांनी अनुक्रमे 327/400, 325/400 व 371/400 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले.
ध्रुव ग्लोबल स्कूल ला मिळालेल्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी सर्वांन शुभेच्छा दिल्या.
नेमबाजी स्पर्धेत अंडर १४ पीपी sight एअर रायफल मध्ये हर्षवर्धन शर्मा (रौप्य), विहान पाटील (कांस्य) तर अंडर १७ पीप Sight एअर रायफल मध्ये कुशान पांडे (रौप्य), तनिष कन्सारा (कांस्य) पदकावर नाव कोरले. तसेच अंडर १४ एअर पिस्तूल मध्ये आदित्य गोडसे (रौप्य) व अर्णव चवन (कांस्य) आणि अंडर १७ एअर पिस्तूल मध्ये अर्थव सिंह भादोरिया (सुवर्ण) व शौर्या डुलकर (रौप्य) यांनी पदकावर शिक्कामोर्तब केला.
अंडर १९ एअर पिस्तूल मध्ये प्रमत झा (कांस्य) व अंडर १४ एअर पिस्तूल मुलीमध्ये स्वरा गुरूवाले (सुवर्ण) व शौर्या थोरवे (रौप्य), अंडर १७ एअर पिस्तूल मुलीमध्ये अनन्या मिस्त्री (रौप्य) आणि अंडर १९ एअर पिस्तूल मुलीमध्ये कंगन सिंग (सुवर्ण पदक) व त्रिशा सावंत (रौप्य) यांनी पदक मिळविले.
या खेळाडूंना प्रशिक्षक अश्विनी गुंजाल, सोनाली परेराव, संध्या फडतर यांनी प्रशिक्षण दिले. या खेळाडूंना सहाय्यक क्रीडा समन्वयक रोहित पाटील आणि क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय काठे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.