पुणे-संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर प्रथमतः दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत असून या ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. आजवर त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची ही पोहोच पावती असून याबद्दल आज पुणे अर्बन सेलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद, यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा मा. खा. वंदनाताई चव्हाण, महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्बन सेलच्या सदस्या वृषाली ताई दाभोळकर यांच्या सूचनेतुन हा सन्मान संपन्न झाला. याच वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून प्रथमतः दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाची धुरा एक महिला साहित्यिका हाती घेत आहेत. ही नक्कीच अभिमानाची बाब असून याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो, असे सांगितले.
ज्यांच्या सहकार्यातून आज अर्बन सेलच्या सभासदांकरीता हा योग जुळून आला ते सुप्रसिद्ध साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी, महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव, पुणे शहर अर्बन सेलचे माजी अध्यक्ष नितीन कदम, पुणे शहर अर्बन सेलचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, पुणे शहर अर्बन सेलच्या सदस्या वृषाली ताई दाभोळकर, कसबा विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, कोथरूड विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष सचिन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.