Home Blog Page 615

मनसुख हिरेनची हत्या त्यांनीच घडवून आणली:अनिल देशमुखांचा थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप

मुंबई-देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना मनसुख हिरेनच्या हत्येची माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. हे दोघे काय करत असतात हे फडणवीस यांना माहीत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मानसुख हिरेन यांची हत्या झाल्यावर त्यांचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटत नाही तोपर्यंत त्याबाबत माहिती देता येत नाही. फडणवीस यांना एवढेही ज्ञान नाही याचे मला आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास आहे हे यातून दिसत असल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना एक प्रश्न विचारला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना माझा एकच प्रश्न आहे. मला माहीत आहे याचे उत्तर ते देणार नाहीत आणि तशी अपेक्षा देखील माझी नाही. मात्र त्यांना केवळ एकच सवाल आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार, हे अनिल देशमुख यांना माहीत होते की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणाबाबत सदनात मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आले होते आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावे. ते यावर बोलणार नाहीत. मात्र याचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

२४ तास पाणीपुरवठ्याच्या घोषणा करत जनतेची फसवणूक करणारांनी आम्हाला अक्कल शिकवू नये – आमदार महेशदादा लांडगे यांचा टोला

पिंपरी (दि.३० ऑक्टोबर २०२४) तत्कालीन आयुक्तपदी दिलीप बंड असताना व स्वतः अजित गव्हाणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविले त्यासाठी मीटर प्रमाणे पाणी देणे सुरू केले. मात्र खऱ्या अर्थाने भाजपनेच शहरवासीयांना २४ तास पाणी मिळावे या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन, कनेक्शन बदलणे, आंद्रा मधून शंभर एमएलडी पाणी, भामा आसखेड मधून २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी वेगाने सुरू असलेली कामे हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठ्यासाठी केवळ घोषणा केलेल्या नेत्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, असा टोला भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी हाणला आहे .
२४ तास पाण्याचे नियोजन फसले असल्याची टीका भोसरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. त्या पाठोपाठ खासदार निलेश लंके यांनी भोसरी मतदारसंघात गेल्या दहा वर्षात कोट्यावधीचा निधी आला, पण नागरिकांना पाण्यासाठी तहानलेले राहावे लागत असल्याची टीका केली होती. त्याला आमदार महेशदादा लांडगे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी चिंचवड महापालिकेत २४ तास पाणीपुरवठ्याची घोषणा करण्यात आली .त्यावेळी अजित गव्हाणे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याच कार्यकाळात थेट बंद नळाने पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने ही योजना फसली. महापालिकेला वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने मी स्वतः प्रयत्न केले. पिंपरी महापालिकेला नियंत्रित पाणी मिळते.पवना धरणातून ४७० एमएलडी पाणी मंजूर कोटा आहे. आंध्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी मिळवण्यात आम्हास यश आले .त्यामुळे भोसरी चिखली, च-होली, मोशी भागाला त्याचा फायदा होत आहे. भामा आसखेड मधून २०० एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे त्याचे काम सुरू आहे. पंपिंग, जॅकवेल, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे. येत्या दोन वर्षात तेही वाढीव पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे शहराला एकूण ८०० एमएलडी एवढे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्य पर्यायांचाही विचार केला जात आहे. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. केवळ गप्पा मारत नाही. भाजपाच्या सत्ता काळात अमृत योजनेअंतर्गत शहरातील पाईपलाईन तसेच कनेक्शन बदलले अनेक कामे करण्यात आली याची आठवणही आमदार लांडगे यांनी करून दिली आहे. कामे न करणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधी ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.

दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ तक्रारींची नोंद राज्यातील ६४ हजार मुली, महिला बेपत्ता -आरोग्य विभागात तब्बल २० हजार पदे रिक्त -रुग्णवाहिकांच्या खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा-

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर २०२४-महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागांवरही भाजपानेच उमेदवार दिले असून या दोन्ही पक्षांना संपवण्याची भाजपाची ही सुरुवात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्ट आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून सरकारने दोन वर्ष महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, जाता जाता युती सरकारने भरमसाठ निर्णय जाहीर केले पण त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. भ्रष्टाचारी भाजपा युती सरकारला घालवण्याचा निर्धार जनतेने केला आहे. आता भाजपायुतीचे भ्रष्ट सरकार जाऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने दोन वर्षांचे प्रगती पुस्तक जाहीर केले पण या सरकारने महाराष्ट्राची प्रगती केलेली नाही तर केवळ युती सरकारमधील धोकेबाजांची प्रगती झालेली आहे आणि महाराष्ट्राची दुर्गती केली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, दोन वर्षात महिला अत्याचारांच्या ६७ हजार ३८१ प्रकरणांची नोंद झालेली आहे, दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ तक्रारींची नोंद झालेली आहे. राज्यातील ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपुरातून १३ हजार मुली महिला बेपत्ता आहेत. महिलांप्रमाणे शेतकरीही दर्लक्षित राहिला, या सरकारच्या काळात २० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत ही चिंतेची बाब आहे. एक रुपयात विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. भाजपा युती सरकारच्या काळात विमा कंपन्यांना ४ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून रुग्णवाहिकांच्या खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. आरोग्य विभागात तब्बल २० हजार पदे रिक्त आहेत. शिक्षण क्षेत्रातही अनागोंदी कारभार असून ४४ लाख मुलांना अजून गणवेशही मिळालेले नाहीत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या १४ हजार शाळा बंद करुन गरिब व मध्यमवर्गियांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तक शाळा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा अदानीला देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कितीही दावा करत असले तरी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातने पळवला. महाराष्ट्रातील ९ लाख कोटींचे प्रकल्प व १० लाख नोकऱ्या भाजपा युती सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मागील दोन वर्षात सर्वच क्षेत्राच महाराष्ट्राची अधोगती झालेली असताना भाजपा सरकारने कोणते प्रगती पुस्तक जाहीर केले, असा सवाल करत मुंबईकरांचे जगणे कठीण झाले आहे, कधी होर्डींगच्या खाली उभे राहिलेल्या लोकांचा बळी जातो तर कधी रेल्वेतून पडून मृत्यू होत आहेत. रेल्वेतून पडून दररोज ७ लोकांचे मृत्यू होतात आणि भाजपा बुलेट ट्रेनची चर्चा करते. रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे, हिट अँड रन मध्ये कधीही कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. मुंबईतील जमिनी विकल्या जात आहेत. महिलांच्या अत्याचारात महाराष्ट्राचा वरचा नंबर लागतो. महिला अत्याचार वाढत असताना शक्ती कायदा दोन वर्षापासून केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पडून आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, महात्मा ज्योतिबा फुले आयोग्य योजनेचे पैसे मिळत नाहीत, संजय गांधी निराधार योजनेतील पैसेही मिळत नाहीत. भाजपा युती सकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला असून या निवडणुकीत महाभ्रष्ट महायुतीचा सरकारचा पराभव करून महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास खा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष युती सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याने भाजपाच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील यांनी यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त आदी उपस्थित होते.

आडकर फौंडेशनचा कोमल पवार स्मृती पुरस्कार आरती देवगावकर यांना जाहीर

पुणे : आडकर फौंडेशन पुरस्कृत कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण समारंभ आणि ‌‘पुनर्जन्म‌’ या विषयावर कविसंमेलनाचे बुधवारी (दि. 6) आयोजन करण्यात आले आहे.
मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे काम करणाऱ्या आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असून पुरस्काराचे वितरण इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘पुनर्जन्म‌’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात जयंत भिडे, मीरा शिंदे, विजय सातपुते, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, साधना शेळके, विद्या सराफ, कांचन पडळकर, ऋचा कर्वे, प्रतिभा पवार, मिनाक्षी नवले, स्वाती सामक, प्रभा सोनवणे यांचा समावेश आहे, असे आडकर फौंडेशनच्या विश्वस्त मैथिली आडकर यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

‘दीप संध्ये’तून रसिकांनी अनुभवली शास्त्रीय- उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफल

 हॅपी कॉलनी फेडरेशनच्या वतीने आयोजित आणि देवगांवकर फाउंडेशन प्रस्तुत ‘दीप संध्या’ संगीत मैफल
पुणे :  ‘चदरिया झीनी रे झीनी’ या भक्तीगीतासह  ‘लागी कलेजवा कटार’ हे नाट्यगीत असे शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे गोडवे गाणारी भक्तीगीते व अभंग यांच्या एकत्रित सादरीकरणातून शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफल ‘दीप संध्ये’तून रसिकांनी अनुभवली.

हॅपी कॉलनी फेडरेशनच्या वतीने आयोजित आणि देवगांवकर फाउंडेशन प्रस्तुत ‘दीप संध्या’ संगीत मैफलीचे आयोजन कोथरूड मधील हॅपी कॉलनी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी देवगांवकर फाउंडेशनचे मंदार देवगांवकर, अमृता देवगांवकर आदी उपस्थित होते.

करण देवगांवकर यांनी कार्यक्रमात गायन केले. त्यांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), कौशिक केळकर (तबला), आकाश तुपे (पखवाज), गंधार निसळ (टाळ)  यांनी साथसंगत केली. वसुधा कुलकर्णी यांनी निवेदन केले.

‘महादेव महेश्वर’ या राग भूपाळी मधील बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘लागी कलेजवा कटार’ या कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गीताच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कृष्णाअर्जुन युद्ध या नाटकातील पद ‘सुहास्य तुझे मनास मोही’ या गीताने शास्त्रीय गायकीचा आनंद रसिकांना दिला. अनुप जलोटा यांचे गाजलेले भक्ती गीत आणि संत कबीर यांनी आयुष्याला चादरीची उपमा देऊन रचलेले ‘चदरिया झीनी रे झीनी’ या गीताच्या सादरीकरणाने श्रोते भक्तीरसात न्हाऊन निघाले.

बा.भ.बोरकर यांनी रचलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी’ पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात गाजलेले ‘बाजे रे मुरलिया बाजे रे’ या गीतांचे सादरीकरण करून आपल्या गायकीने करण देवगांवकर यांनी रसिकांची मने जिंकली. विठू माऊलीचा गजर करीत ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ या भक्ती गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाने वेगळी उंची गाठली.

भाजपचे 148, काँग्रेसचे 102 उमेदवार:एकनाथ शिंदेंचे 80,अजितदादांचे 53; उद्धव ठाकरेंचे 89 तर शरद पवार गटाचे 87 उमेदवार मैदानात


मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्याने आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे यावेळी 6 मोठे पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळेच बंडखोरांची संख्या अधिक आहे. राज्यात जवळपास सर्वच जागांवर बंडखोर उभे आहेत.आता सर्वांच्या नजरा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेकडे (४ नोव्हेंबर) लागल्या आहेत. त्यानंतर लढत कशी असेल ते स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. शेवटच्या दिवशी 4 हजार 996 जणांनी अर्ज भरले.

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही महायुती आणि एमव्हीएने जागावाटपाचा फॉर्म्युला उघड केला नाही. उमेदवारांवर नजर टाकल्यास, महायुतीमध्ये 148 उमेदवारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, तर MVA मध्ये 103 उमेदवारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे.दोन्ही पक्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी जागांवर लढत आहेत. गेल्या वेळी भाजपने 164 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते तर काँग्रेसने 147 जागांवर आपले उमेदवार दिले होते.

याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 80, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस 53, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 89, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 87 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना (संयुक्त) आणि राष्ट्रवादी (संयुक्त) प्रत्येकी 124 जागांवर लढले होते.महायुतीने यावेळी आपल्या मित्र पक्षांसाठी 5 जागा सोडल्या आहेत. दुसरीकडे, MVA चे छोटे मित्र 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या 2 आणि एमव्हीएच्या 3 जागांवर अजूनही परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

‘वंदे मातरम्‌‍ 150‌’ : अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम शुक्रवारी

पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150वे वर्षे सुरू होत असल्याच्या निमित्ताने ‌‘वंदे मातरम्‌‍ 150‌’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वंदे मारतम्‌‍चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
‌‘वंदे मातरम्‌‍‌’च्या निर्मितीचे 150वे वर्ष दि. 7 नोव्हेंबर रोजी सुरू होत असल्याने जन्मदा प्रतिष्ठान निर्मित, मल्हार प्रॉडक्शन प्रकाशित आणि ग्राहक पेठ आयोजित ‌‘वंदे मातरम्‌‍ 150‌’ हा अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ निर्मितीच्या 150व्या वर्षानिमित्ताने भारतीय इतिहास संकलक समिती, पुणे विभागातर्फे येत्या वर्षात पुण्यासह महाराष्ट्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ‌‘वंदे मातरम्‌‍ 150‌’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन वंदे मातरम्‌‍‍चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांचे असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. ‌‘वंदे मातरम्‌‍‌’च्या निर्मितीचा इतिहास आणि 150 वर्षातील ‌‘वंदे मातरम्‌‍‌’ संदर्भातील ठळक नोंदी दृकश्राव्य माध्यमातून पाहता येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोफत प्रवेशिका भरत नाट्य मंदिर आणि ग्राहक पेठ, टिळक रोड येथे उपलब्ध आहेत.

संत मुक्ताबाई यांचे चरित्र उलगडणारा ‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ कार्यक्रम शनिवारी

पुणे : दिवाळीच्या प्रकाशपर्वाचे निमित्त साधून प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक पंडित हेमंत पेंडसे यांनी संत मुक्ताबाई यांचे चरित्र उलगडून दाखविणाऱ्या ‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ या आगळ्या वेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुभारंभाचा प्रयोग दिवाळी पाडव्याला अर्थात शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेशेजारील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला अनमोल आणि अमोघ अशी संत परंपरा लाभली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच संस्कारमूल्य जपणारी एक तरी पणती आपणही लावावी या उद्देशाने संत मुक्ताबाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनाच्या धाटणीतून संतांचा जीवनपट उलगडून काही संत रचना तर काही भक्तीगीते या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत, अशी माहिती पंडित हेमंत पेंडसे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पंडित हेमंत पेंडसे आणि ज्यांची ख्याती चौफेर पसरली आहे अशा कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे प्रमुख सूत्रधार आहेत. पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, मेहेर परळीकर रचना सादर करणार आहेत. तर अमित वेणू, कौस्तुभ परांजपे, अजित किंबहुने, उद्धव गोळे हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, दि. ३०: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे २ डिसेंबर २०२४ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५९ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी (युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५९ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व परिशिष्ठांची प्रत पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

चंद्रकांतदादांची कोथरूडमध्ये प्रचारात आघाडी

सोसायट्यांशी संपर्क ; नागरिकांशी संवादमतदारांना हवा २४ तास उपलब्ध असणारा आमदार

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी-महायुतीचेउमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. कोथरूड परिसरातील सोसायट्यांमध्ये संपर्क साधून आणि तेथील मतदारांशी संवाद साधून चंद्रकांतदादा हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तर त्यांनी मुसंडी मारली आहे. कोथरूडमध्ये विरोधी पक्षांतर्फे कोण उमेदवार, हे निश्चित होण्यापूर्वीच चंद्रकांतदादांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पदयात्रेद्वारे अनेक ठिकाणी पोहोचले. चंद्रकांतदादांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत गर्दी पाहता कोथरूडमधून त्यांचा विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल, असे सांगण्यात येत होते . ‘आरंभ है प्रचंड’ असे म्हणतच त्यांचे अनेक कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी

चंद्रकांतदादांच्या पदयात्रांचा किंवा प्रचाराचा महत्वाचा सूर असा राहिला कि फिरताना , बोलताना सोसायट्यांच्या समस्या समजावून घेणे सोडविल्या गेलेल्या समस्या आणि , त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक अजूनही सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे. उरलेल्या समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार ते व्यक्त करताना दिसत आहे. नागरिकांशी संवाद साधत असतानाच या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटून चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात त्यांनी कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पौड रस्ता या परिसरातील सोसायट्यांना त्यांनी भेट देण्यासाठी जोमात सुरुवात केली आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत दादांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. याउलट विरोधकांतर्फे कोण, हा घोळ आणि चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरूच होते. उमेदवार शोधणे, त्याला सक्रिय करणे ही विरोधकांची मोठी मोहीम ठळकपणे दिसून आली. हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे राहणार आणि चंद्रकांतदादा हेच उमेदवार असणार, हे आधीच ठरल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचे सूत्र आधीच निश्चित झाले होते आणि त्यानुरूप प्रचाराला सुरुवातही झाली आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराचे त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, झटून कामाला लागले असून अतिशय सूक्ष्म नियोजन, प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम यांची आखणी झाली आहे. त्याप्रमाणे गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल या मतदारसंघात अतिशय आपुलकी असून २४ तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला हवा आहे, असे मत कोथरूडकर व्यक्त करताना दिसतात. आधी प्रदेशाध्यक्ष असताना किंवा नंतर मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही चंद्रकांत दादा केव्हाही उपलब्ध असल्याची भावना, त्याचप्रमाणे संकटकाळी धावून जाणारा आमचा नेता असल्याचे अनेक जण बोलून दाखवतात. सुशिक्षित, उच्चभ्रू त्याचप्रमाणे काही गोरगरीब जनतेचा बनलेला हा मतदारसंघ असून गेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरही चंद्रकांतदादांनी मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्क ठेवला असल्यामुळे त्यांचे स्वागत ‘आपल्या घरातील उमेदवार’ असल्यासारखे सर्वत्र होत आहे, हाच त्यांचा ‘कोथरूड पॅटर्न’ त्यांना विजयश्रीकडे घेऊन जाणार असल्याची भावना मतदार बोलून दाखवत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या परिसरातील व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणाऱ्या चंद्रकांत दादांबद्दल आदर आहेच. पण वृद्ध नागरिकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्याप्रमाणे केलेल्या योजनादेखील नागरिक उत्साहाने आणि आपलेपणाने बोलून दाखवत आहेत. गेल्या आठवड्याभरात चंद्रकांत दादांनी कोथरूड परिसरातील गाठीभेटींमध्ये प्रामुख्याने पक्षांतर्गत असंतुष्टांच्या भेटी, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, जाहिरात क्षेत्रातील बुजूर्ग, अध्यात्मिक संस्था, प्रख्यात व्यावसायिक, कलाक्षेत्रातील दिग्गज यांच्याशी संपर्क साधला आणि सर्वत्र त्यांचे आपुलकीने स्वागत झाले. कोथरूडमध्ये एकूणच चंद्रकांतदादांचा दांडगा व्यासंग त्यांना नक्कीच यशस्वी करून जाणार असल्याचे बोललं जात आहे.

पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम -७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य

पुणे पिंपरी-चिंचवड मधून हजारो भाविक संत निरंकारी समागमाचा आनंद घेणार
पुणे , ३० ऑक्टोबर, २०२४:
            सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा ७७वा वार्षिक संत समागम १६,१७ व १८ नोव्हेंबर, २०२४ ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की या संत समागमाची भव्यता ही केवळ त्याच्या क्षेत्रफळाने अधोरेखित होत नाही, तर त्याचे इंगित याठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तगणांच्या भावनेमध्ये साठलेले आहे. निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि बंधनांच्या पलीकडे जाऊन सकळजन मर्यादेत राहून प्रेम आणि सौहार्दपूर्ण भावाने सेवा, सिमरण आणि सत्संग करतात. हे त्याच संदेशाचे अनुसरण आहे जो समस्त संतांनी, गुरु-पीरांनी वेळोवेळी दिलेला आहे.
            या तीन दिवसीय संत समागमामध्ये भक्तिच्या अनेक पैलुंवर गीत, विचार आणि कविता आदि माध्यमातून भक्तगण आपले शुभ भाव प्रकट करतील. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरुपी अमूल्य उपहाराचा देखील सर्वांना लाभ होणार आहे. यावर्षी सतगुरु माताजींनी समागमाचा विषय दिलेला आहे – ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ (विस्तार, असीम की ओर).
            निरंकारी संत समागम प्रभावशाली आणि सुरळीतपणे आयोजित करण्यासाठी निरंकारी मिशनचे भक्त व सेवादार देशाच्या कानाकोपऱ्यातून काही महिने अगोदरपासून येऊन आपल्या निष्काम सेवा समर्पित करत समागमाच्या पूर्वतयारी मध्ये आपले योगदान देत राहतात. समागम सेवांचे हे दृश्य स्वयमेव अत्यंत प्रेरणादायी आणि मनोहर असते. यावर्षीही हेच दिसून आले, की सकाळपासूनच सेवांना सुरवात केली जाते ज्यामध्ये सर्व वयोगटातील नर-नारी सहभागी होऊन अनेक प्रकारच्या सेवा करत आहेत. सेवादार भक्तांच्या हातामध्ये मातीची घमेली असतात आणि मुखामध्ये भक्तीभावनेने ओतप्रोत मधुर गीतांचे गायन होत असते. कुठे जमीन समतल केली जात आहे तर कुठे तंबू उभारले जात आहेत. सेवादल वर्दी मध्ये अनेक नौजवान बंधु-भगिनी आपापल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मैदानावर विविध सेवांमध्ये व्यग्र आहेत. लंगर, कॅन्टीन, प्रकाशन यांसारख्या अनेक सुविधा व्यवस्थितपणे चालू आहेत ज्यांचे स्वरूप नजिकच्या दिवसांत आणखी विशाल होत जाणार आहे. सेवा करणाऱ्या या भक्तांच्या आनंदाची पराकाष्ठा तेव्हा पहायला मिळते जेव्हा सेवा करत असताना त्यांना आपल्या सद्गुरुंचे दर्शन होते. त्या क्षणी भक्तगणांची हृदये आनंदाचे झोके घेऊ लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात. याच स्वर्गीय दृश्याची ते वर्षभर प्रतीक्षा करत असतात.
            संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समागमाचे समन्वयक श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी सांगितले, की सर्व संतांच्या निवासाची, भोजनाची, स्वच्छता गृहांची, आरोग्याची, सुरक्षेची, आगमन-प्रस्थानाची व इतर सर्व मूलभूत सुविधांची तयारी केली जात आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभत आहे. समागमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व वैधानिक पैलू लक्षात घेऊन सारी व्यवस्था करण्यात येत आहे. थोड्याच दिवसांत हे आध्यात्मिक स्थळ ‘भक्तीच्या नगरी’चे रूप धारण करेल जिथे जगभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येऊन सहभागी होतील. मानवतेच्या या महासंगमामध्ये समस्त धर्म-प्रेमी बंधु-भगिनींचे हार्दिक स्वागत आहे.

उत्तुंग भिंतींच्या मागे होते अशी ‘दिवाळी पहाट’

पुणे-दिवाळी सणानिमित्त “दिवाळी पहाट” कार्यक्रम कारागृह विभागाचे “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रिद वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने कारागृह प्रशासनामार्फत विविध सण उत्सव, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम बंद्यांसाठी आयोजित करण्यात येतात. त्यानुसार OSHONIC VISION FOR THE BLIND WELFARE SOICEITY संस्थेमार्फत येरवडा मध्यवती कारागृहात बंद्यांकरीता दिवाळी सणानिमित्त “दिवाळी पहाट” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सुनिल वेदपाठक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री एस. डी. हंगे, लेफटनंट कर्नल (नि), श्री मधुकरराव कोकाटे माजी एम.पी.एस.सी चेअरम, डॉ. उमाकांत दांगड माजी महसूल आयुक्त, डॉ. बाबासाहेब जाधव, माजी विशेष अधिकारी महाराष्ट्र शासन, श्री मधुकररावजी पाटील निवृत्त सचिव, सा.बा.विभाग, डॉ. ज्ञानदेव निलवर्णा, कंट्रोलर ऑफ एक्जामिनेशन्स. एम. आय.टी विद्यापीठ पुणे, डॉ. भुजाडी, डॉ. भाऊसाहेब जाधव, श्री दत्तात्रय तापकीर, श्री जी. एस. पाटील, श्री कुणाल भाटिया, उपस्थित होते.
सदर “दिवाळी पहाट” कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते भावेश भाटीया यांनी बंद्यांना “घनगोर अंधारातून उगवत्या सूर्याकडे इंगीत करत मार्ग दाखवित प्रोत्साहित केले.” तसेच “अंधारातून प्रकाशाकडे व समस्येतून समाधानाकडे वाटचाल” या विषयावर मार्गदर्शन केले.
उपक्रम प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संल्पनेतून व श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.
कार्यक्रम यशस्वी आयोजनाठीसुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे श्रीमती. पी. पी. कदम, अति. अधीक्षक, डॉ. भाईदास ढोले उपअधीक्षक, श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री व्ही. आर. ईनामदार तुरुंगांधिकारी श्रेणी-१, श्री एस टी खिलारे तुरुंगाधिकारी श्रेणी-१, श्री पी बी उकरंडे तुरुंगाधिकारी श्रेणी-१, श्री. सो आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्री व्ही. के. खराडे सुभेदार व कारागृह अधिकारी/ कर्मचारी तसेच OSHONIC VISION FOR THE BLIND WELFARE SOICEITY संस्थेचे प्रमुख संयोजक श्री गणेश बाबर, श्री पी.सी बागमार, श्री पी.एस जोगदंड यांनी कामकाज पाहीले.

बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी साठी महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाकडून अर्ज दाखल

पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोबर २०२४) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन रविवारी प्रमुख कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी ओव्हाळ यांना पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत एबी फॉर्म देऊन त्याची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ओव्हाळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मंगळवारी सकाळी ओव्हाळ यांनी पिंपरी एच. ए. कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा जोतीराव फुले स्मारक, अहिल्याबाई होळकर पुतळा, चिंचवड स्टेशन येथील विर लव्हूजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके पुतळा, निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आकुर्डी येथील खंडोबा देवस्थान येथे दर्शन करून शंभर घोडेस्वारांसह दिमाखात रॅलीला सुरुवात केली. आकुर्डी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे रॅलीचा समारोप करून निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे, विनोद कांबळे, सचिन सकाटे, राजाभाऊ वावरे, निशाताई ओव्हाळ, अभिजित भालेराव, सतिश राठोड, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
शंभर घोडेस्वरांसह पहिल्या दिवशी काढलेल्या रॅलीत महिला व तरुण मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते.
संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण तसेच बहुजन व मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली भूमिका आणि त्याला महाराष्ट्रात मिळत असणारा प्रतिसाद पाहता बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांसमोर पहिल्या दिवसांपासून तगडे आव्हान उभे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीनुसार आपण काम करणार आहोत. तसेच तरुणांच्या हातात हत्यार नाही तर हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी काम करणार असल्याचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दुबईतील चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे: दुबई येथे होणाऱ्या चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करणार आहेत. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली या संस्थांच्या वतीने येत्या ७ व ८ नोव्हेंबर २०२४ रोजी या संमेलनाचे दुबई येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन, आदिवासी, मुस्लिम, बालसाहित्य संमेलन अशा एकूण ५३ संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषविले आहे, तर ४१ पेक्षा अधिक संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. यासह डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ७६ ग्रंथ प्रकाशित झाले असून, महाराष्ट्रातील विविध प्रवाहातील लेखकांच्या ४५२ पुस्तकांना प्रस्तावना दिल्या आहेत. अशा समग्र साहित्यिकाच्या हस्ते चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणे, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे डॉ. खोब्रागडे यांनी नमूद केले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “विश्व स्तरावर होत असलेला साहित्याचा जागर भारताच्या बंधुभावाची ओळख करून देणारा आहे. कंबोडिया, थायलंड येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर आता दुबईतील आंबेडकरवादी संमेलनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले, याचा आनंद वाटतो. विवेकाची, चांगुलपणाच्या बेरजेची माझी भूमिका असून, जागतिक स्तरावर ती अधिक प्रभावीपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहील.”

जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भोर – भोर राजगड वेल्हा विधानसभा मतदार संघामधून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.भोर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मांडेकरांच्या रॅलीला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, पीडिसीसी बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, मा उपसभापती सारीका मांडेकर, मा नगरसेवक सुषमा निम्हण, मा.युवक अध्यक्ष सागर साखरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ हगवणे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चंदाताई केदारी,केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, राजेंद्र सोनवणे,,पांडुरंग निगडे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे,मा नगरसेवक प्रमोद निम्हण, श्रीकांत कदम, नंदूशेठ भोईर, गणपत जगताप, हरिदास कोकाटे, शिवाजी ढेबे,विक्रम बोडके, संग्राम निगडे, मुळशी तालुका युवक अद्यक्ष सुशिल हगवणे,मुळशी तालुका अद्यक्ष अंकुश मोरे, माऊली साठे आदी उपस्थित होतें.यावेळी माध्यमांशी बोलताना मांडेकर म्हणाले की, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. आज महायुतीची उमेदवारी जरी मला मिळालेली आहे. मी महायुतीच्या उमेदवारीसाठी जे जे इच्छुक पदाधिकारी होते त्या सर्वांची भेट घेणार आहे. आम्ही सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.त्याच विश्वासाने या निवडणुकीला मी सामोरा जाणार आहे. भोर राजगड मुळशीतील जनतेला परिवर्तन हवे आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या भागात परिवर्तन होणार आहे. त्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्याही मतभेदाचे संभ्रमाचे वातावरण नसल्याचे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.