मुंबई-देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना मनसुख हिरेनच्या हत्येची माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. हे दोघे काय करत असतात हे फडणवीस यांना माहीत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत.
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मानसुख हिरेन यांची हत्या झाल्यावर त्यांचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटत नाही तोपर्यंत त्याबाबत माहिती देता येत नाही. फडणवीस यांना एवढेही ज्ञान नाही याचे मला आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास आहे हे यातून दिसत असल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना एक प्रश्न विचारला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना माझा एकच प्रश्न आहे. मला माहीत आहे याचे उत्तर ते देणार नाहीत आणि तशी अपेक्षा देखील माझी नाही. मात्र त्यांना केवळ एकच सवाल आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार, हे अनिल देशमुख यांना माहीत होते की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणाबाबत सदनात मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आले होते आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावे. ते यावर बोलणार नाहीत. मात्र याचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.