Home Blog Page 594

स्काय गोल्ड चे पुण्यातील दुसरे शोरूम पिंपरी मध्ये सुरू

  • सुप्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे : स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रॅंडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय 7 वे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे सुरू करण्यात आले. पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या विस्ताराबद्दल आणि पिंपरीतील शोरूम बद्दल अधिक माहिती देताना स्काय गोल्ड चे एमडी अरविंद माळी म्हणाले, आमचे हे 7 वे शोरूम आहे, यापूर्वी आम्ही शारजा, दुबईसह केरळ मध्ये शाखा सुरू केलेल्या आहेत. पुण्यात हडपसर येथे महाराष्ट्रातील पहिले शोरूम सुरू झालेले आहे आज पुण्यातील दुसरे शोरूम कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे ग्राहकांच्या सेवेत कार्यान्वित होत आहे. हे भव्य शोरूम दीड हजारांहून अधिक स्क्वेअर फुट मध्ये बसलेले आहे. आमच्याकडे सोन्यासह डायमंडचे कलेक्शन अतिशय सुंदर आहे, लाइटवेट दागिन्यांतही आमच्याकडे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण डिझाईन देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे.

स्काय गोल्डचे रफीक पाराईल म्हणाले, आमच्याकडे शोरूम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर झीरो पर्सेंट मेकिंग चार्जेस ऑफर आहे, याशिवाय विविध खरेदीवर गोल्ड आणि सिल्वर कॉइन भेट देण्यात येणार आहे. याशिवाय उद्घाटनानिमित्त दोन प्रकारचे लकी ड्रॉ ठेवण्यात आले आहेत त्यापैकी एका मध्ये तर आमच्याकडे खरेदी करण्याचे सुद्धा बंधन नाही, आमच्या शोरूम ला भेट देणारे त्यात सहभागी होऊ शकतात. ग्राहकहिताला प्राधान्य देत आम्ही आमचा विस्तार करत आहोत.

मला तुझा गाभारा येथुन फार मोकळा दिसला. ..

श्रद्धा खानविलकर यांचा गझल प्रतिभा पुरस्काराने गौरव

करम प्रतिष्ठान, रंगत-संगत प्रतिष्ठानचा उपक्रम

पुणे :
क्षणाक्षणाला दृश्यांचा रंग जो वेगळा दिसला
केवळ जवळून बघणाऱ्याला त्यात सापळा दिसला
पुन्हा पायरीशी आल्यावर एक प्रचिती आली
मला तुझा गाभारा येथुन फार मोकळा दिसला

या भावपूर्ण ओळी सादर केल्या त्या गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित युवा गझलकारा श्रद्धा खानविलकर यांनी!

करम प्रतिष्ठान आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गझल प्रतिभा पुरस्काराने गझलकारा श्रद्धा खानविलकर (पनवेल) यांचा आज (दि. 10) सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी मनोगत व्यक्त करीत काही शेर आणि गझल ऐकविल्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, निरुपमा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत खानविलकर यांचा गौरव करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रद्धा खानविलकर पुढे म्हणाल्या, कलाकाराने आपण जोपासत असलेल्या कलेचे प्रामाणिक रसिक होणे आवश्यक आहे. कला ही नेहमीच आनंद देण्या-घेण्यासाठी असते. जे-जे मनाला भिडते, पटते ते सुंदर असते. अशा सुंदर गोष्टींना सोबत घेऊन जीवनप्रवास सुरू राहिला पाहिजे. लिखाणाच्या माध्यमातून अल्प काळात अनेक सुहृद जोडले गेले. सुरुवातीस गझल, कविता विरंगुळा म्हणून आवडत असे; छान वाटत असे. परंतु जस जसे गझलेचे तंत्र समजत गेले, मुशायरे ऐकत गेले त्यातून आनंद घेत माझी गझल परिपक्व होत गेली आणि तिचे गांभीर्य समजले. व्यवसायामुळे अनेक कुटुंबे जोडली गेली त्यातून त्यांचे जीवन उलगडत गेले आणि त्यांच्या अनुभवातून माझ्या गझलांना लिखित स्वरूप प्राप्त झाले.
स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले. सन्मानपत्र वाचन वैशाली माळी यांनी तर परियच माधुरी डोंगळीकर यांनी करून दिला. आभार भूषण कटककर यांनी मानले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे मराठी स्वरचित गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात नचिकेत जोशी, स्वाती यादव, रुपाली अवचरे, मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, योगेश काळे, डॉ. मंदार खरे, मीना शिंदे, स्मिता जोशी-जोहरे, प्रा. शैलजा किंकर, भालचंद्र कुलकर्णी, नूतन शेटे यांचा सहभाग होता. वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले तर मुक्ता भुजबले यांनी संयोजन केले.

नृत्य, गीत गायनाने दिव्यांग जवानांसोबत भाऊबीज साजरी

 सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी पॅराप्लेजिक सेंटर येथे भाऊबीजेचे आयोजन
पुणे : चाकांच्या खुर्चीवर आपले संपूर्ण आयुष्य धैर्याने जगणा-या तसेच अपंगत्वावर मात करून नव्याने सुरू झालेल्या आयुष्यात खंबीरपणे उभ्या असलेल्या सैनिकांसोबत आगळीवेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली. भारतमातेच्या जयघोषात बहिणींनी सैनिकांना ओवळून औक्षण करण्यासोबतच पेढ्याचा घास भरवतानाचे दृश्य मायेची अनुभूती देणारे होते.

सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसोबत भाऊबीजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, शिरीष मोहिते उपस्थित होते.  अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शकुंतला खटावकर यांनी जवानांशी संवाद साधून कृतज्ञता व्यक्त केली. 
वृंदा साठे अकादमीच्या नृत्यांगनांचे सादरीकरण आणि मनीषा निश्चल यांची देशभक्तीपर गीते यांनी कार्यक्रमात रंगत आणली. सुवर्णा बोडस, वृंदा साठे, रजनी सबनीस, हेमा गांधी, कल्याणी सराफ यांनी संयोजन केले. अपंग सैनिक पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. कर्नल मुखर्जी, कर्नल भार्गव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

आनंद सराफ म्हणाले,  सण-उत्सवांच्या माध्यमातून जवानांना आनंद देत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास देण्याकरिता उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. दिव्यांग सैनिकांना समाजासोबत जोडण्याचा हा प्रयत्न आहे. अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण-उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते, असेही त्यांनी सांगितले.

धानोरी तसेच पोरवाल रस्ता परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्याचा बापूसाहेब पठारेंचा निश्चय

धानोरी भागाचे चित्र आमूलाग्र बदलणार; पदयात्रेतून मतदारांशी संपर्क

पुणे :

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरी मतदार संघातील अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या धानोरी, पोरवाल रस्ता परिसरातील झंझावाती पदयात्रेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.धानोरी भैरवनाथ मंदिर- खालची वाडी – विठ्ठल मंदिर – बुद्ध विहार – सिद्धार्थ नगर – ब्रह्मकुमारी केंद्र – मुंजाबा वस्ती – गणपती चौक – स्वप्नील ट्रेडर्स – चौधरी नगर – टिंगरे बंगला – मुंजबा वस्ती – धनेश्वर शाळा असा या प्रचार पदयात्रेचा मार्ग होता.बापूसाहेब पठारे,महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,स्थानिक मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. तुतारीचा आवाज बुलंद करीत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जयजयकार करीत पदयात्रेला प्रारंभ झाला.युवती आणि महिलांनी बापूसाहेब पठारे यांचे औक्षण केले तर बापूसाहेब पठारे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले ,तरुणाईशी संवाद साधला.

वडगाव शेरी मतदार संघात पठारे यांनी पदयात्रांचा धडाका लावला असून मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढला आहे. मतदारांशी थेट संवाद आणि संपर्क साधत ते विजयाचा दावा बुलंद करीत आहेत.मतदारांना नावानिशी ओळखणारे उमेदवार म्हणून त्यांची ख्याती आहे.

मतदारांशी संवाद साधताना बापूसाहेब पठारे म्हणाले,’ मतदारसंघातील खास करून धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे.परिसरातील पाणी प्रश्न प्रामुख्याने हाती घेऊन सोडविणार आहे. संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार आहे . पोरवाल रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था करणार आहे. लोहगाव, धानोरीला जोडणाऱ्या आणि विकास आराखड्यातील रखडलेल्या पोरवाल रस्त्याच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करणार आहे. पोरवाल रस्ता चौकातील वाहतूक कोंडीचा यामुळे प्रश्न मिटणार आहे . या भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करून विकास करणार आहे. ‘

टिंगरे यांच्या नोटीस प्रकरणाने वडगाव शेरीत राजकीय धुरळा ! टिंगरे झाले चौफेर टीकेचे लक्ष्य!

पक्षनेत्यांसोबत सुप्रिया सुळे,सुरेंद्र पठारे यांचाही नोटीशीत उल्लेख

पुणे :पोर्षे कार अपघात प्रकरणी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टिकेचे लक्ष्य बनलेले आमदार सुनील टिंगरे हे टीका करणाऱ्या नेत्यांना बदनामीच्या कायदेशीर नोटीसा पाठविण्याच्या कृतीने पुन्हा टीकेचे धनी बनले आहेत.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील जाहीर सभामधून नोटीस प्रकरणाने राजकीय धुराळा उडाला आहे. 8 नोव्हेंबर रोजी येरवडा येथे जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयाला तोंड फोडले.’पोर्षे कार अपघात प्रकरणी टीका केल्यास कायदेशीर कारवाई करू, अशा नोटीसा शरद पवार यांना आली आहे. पवार साहेब ईडी च्या नोटीसना घाबरले नाहीत ते तुझ्या नोटीसला घाबरतील का? ‘ अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना ललकारले होते. त्या नंतर नोटीस प्रकरण हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दाच बनला. शरद पवार यांना कायदेशीर नोटीस ही बातमी राष्ट्रीय वृत्तपत्रात, वाहिन्यांवर गाजली. टिंगरे यांचा खुलासाही झळकला मात्र ते बचावात्मक पवित्र्यात दिसलें.

शरद पवार, उद्धव ठाकरे,काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना या नोटीसा टिंगरे यांनी वकिला मार्फत पाठवल्या आहेत.सुप्रिया सुळे, सुरेंद्र पठारे हे विविध माध्यमातून पोर्षे कार प्रकरणात टीका करीत असल्याचा उल्लेख याच नोटिशीत टिंगरे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वडगाव शेरीतील कार्यकर्त्यांनी या नोटीसा माध्यमाना उपलब्ध करून दिल्यावर टिंगरे हे पुन्हा टिकेचे धनी बनले. तसेच पोर्षे प्रकरणाचा पुन्हा धुराळा उडाला. दुसरीकडे पोलीस तपास, चौकशी च्या बातम्याही माध्यमातून झळकत असून प्रचाराचे इतर मुद्दे किमान पुणे आणि वडगाव शेरीत मागे पडल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांच्या पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार बापूसाहेब टिंगरे यांच्या पथ्थ्यावर ही परिस्थिती पडली आहे. आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमकपणे हा मुद्दा उचलताना दिसत आहेत.

शिरोळे यांनी खडकी भागात केलेल्या विकासकामांना नागरिकांची साथ

सिद्धार्थ शिरोळे यांनाच निवडून आणणार; खडकी परिसरातील नागरिकांचा निर्धार
पुणे, दि. १० नोव्हेंबर, २०२४ : जुन्या पुणे- मुंबई रस्त्याचे रुंदीकरण, खडकी- बोपखेल, बोपोडी – सांगवी यांना जोडणाऱ्या पुलाचे नव्याने बांधकाम, नदी सुधारणे अंतर्गत पाटील इस्टेट ते मुळा येथील नदीकाठचे सुशोभीकरण, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या टाळण्याकरीता नवीन ड्रेनेज लाईनचे हाती घेण्यात आलेले काम यांसारखी अनेक कामी मार्गी लावण्यासोबतच खास खडकी कॅन्टोन्मेंटमधील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून आणलेला १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी यांमुळे खडकी कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांचा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मोठा पाठींबा मिळत आहे. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार असलेल्या शिरोळे यांना मोठ्या फरकाने निवडून आणू असा निर्धार खडकी परिसरातील नागरीकांनी केला आहे.

विधानसभा प्रचाराच्या निमित्ताने नुकतेच शिरोळे यांच्या पदयात्रेचे आयोजन खडकी भागात करण्यात आले होते यावेळी राजीव गांधी चौपाटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राष्ट्रीय मित्र मंडळ, इंदिरा वसाहत, गवळी वाडा, दुर्गा वसाहत, पंकज मित्र मंडळ, इदगाह मैदान आणि राम मंदिर परिसरात शिरोळे यांनी पदयात्रा काढली होती. यावेळी या भागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरीकांनी शिरोळे यांची भेट घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले.  

 नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी मी कायमच त्यांच्या सोबत असतो आणि म्हणूनच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रश्न सोडविण्याला मी कायमच प्राधान्य दिले आहे असे सांगत शिरोळे म्हणाले, “विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपूल, पुणे मेट्रो, रस्त्यांचे रुंदीकरण, चाळीस दशलक्ष लिटर पाणी साठविले जाईल अशा आठ ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या, आरोग्य सेवेसाठी एम्स संस्थेची उभारणी अशा अनेक महत्त्वाच्या विकास कामांचा समावेश खडकी मतदार संघात आहे. हे सर्व काम करीत असताना सर्वसामान्य स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वाड्या वस्त्यांवर शंभराहून अधिक कार्यक्रमांचे केलेले आयोजन, वेळीवेळी घेतलेल्या बैठका, चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यामुळेच खडकी भागातील नागरिकांना दिलास मिळू शकला आहे.”

नजीकच्या  भविष्यात खडकी रेंज हिल्स येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल. रेल्वे व महानगरपालिकेशी संवाद साधत या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्याचे ठरविले गेले असून यानुसार हा मार्ग सहावरून १८ मीटर करण्यात येणार आहे. यासोबतच पुणे रेल्वे स्थानकासोबत खडकी व शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचे देखील विस्तारीकरण करण्यात येईल. पुणे ते लोणावळा दरम्यान सध्याच्या दोन ऐवजी तीन ते चार मार्गिका करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली असून त्याचेही काम सुरु होईल. केंद्र व राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणारा अमृत भारत हा प्रकल्प झाल्यानंतर रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल तसेच लोकल रेल्वेच्या फेऱ्याही वाढतील अशी माहिती शिरोळे यांनी यावेळी दिली.

खडकी बोपोडी भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या परीसरात बंद झालेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असून सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेत सायबर सेलच्या माध्यमातून या संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी व उपाययोजना करण्याचा मुद्दा देखील विधानसभेत शिरोळे यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली- चंद्रकांतदादा पाटील

एआरएआय टेकडीवर येणाऱ्या नागरिकांशी संवाद

पुणे-पर्यावरण दिनाव्यतिरिक्त ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमांद्वारे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. त्याशिवाय माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगवली देखील. पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेकडीचा मुद्दा काढून संभ्रम निर्माण केला जात असल्याची भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज एआरएआय टेकडीवर जाऊन टेकडीवर येणाऱ्या संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडली.

ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमांद्वारे लोकचळवळ सुरू केली. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. याशिवाय गेल्या देवेंद्रजींच्या सरकार मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ही ‘हरित महाराष्ट्रा’साठी पाच वर्षे वृक्ष लागवडीचा संकल्प केला. त्यामधून ही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. मविआ सरकारने याची चौकशी लावली. त्यामधून महाराष्ट्राच्या विविध भागांत वृक्ष लागवड झाल्याचे निष्पन्न झाले.

ते पुढे म्हणाले की, यंदा माझा ६५ वा वाढदिवस संपन्न झाला. त्यामुळे मी कोथरुडसह सर्वत्र ६५ हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करुन; तो सत्यात उतरवला. कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर ६५०० वृक्षांची लागवड करुन त्याचे संवर्धन करत आहे. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, अशी भावना व्यक्त केले.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, अमोल डांगे, अनिता तलाठी, आशुतोष वैशंपायन, सुरेखा जगताप, दीपक पवार, अजय मारणे, रणजित हरपुडे, मधुरा वैशंपायन यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

कॉंग्रेस नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे काय ? कमल व्यवहारेंनी राजीनामा देऊन तुमच्यावरच कारवाई केलीय.. तुम्ही कसली त्यांच्यावर कारवाई करताय ?

पुणे- कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत कुरघोड्यांनी या पक्षाची वाताहत लावली आहे,केवळ गांधी नाव आणि गांधी घराण्याच्या कर्तुत्वावर, कॉंग्रेस पक्षाच्या योगदानावर उभ्या असलेल्या या पक्षाचा फायदा असंख्य नेत्यांनी घेऊन स्वार्थ साधला पण पक्षाचे काहीही भले केले नाही.पुण्यात दक्षिणेतला कॉंग्रेस पक्ष आता संपवला,पूर्वी पूर्वेचा संपवला,पश्चिमेकडचा संपवला आणि उत्तरेकडचाही संपवला अर्थात यात पक्षातील नेतेच नाही तर या पक्षाचे सहकारी पक्ष नेते शरद पवार, अजित पवार यांचाही प्रामुख्याने हात राहिला आहे.पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघ हा धड ना पूर्वेला येतो न धड पश्चिमेला न उत्तरेला न दक्षिणेला,म्हणूनच कदाचित येथे तो रमेश बागवे यांच्या शक्तीरूपाने टिकून असावा.मात्र तिथे त्यांना वंचित आघाडीचा सामना करून निवडणूक जिंकण्यासाठी कारकीर्द पणाला लावावी लागते.तेवढे सोडले तर आता शहरातला कॉंग्रेस पक्ष देखील संपण्याच्या बेतात आला आहे.भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघ, मुक्ता टिळक स्वर्गवासी झाल्यावर,गिरीश बापट रुग्णालयात पोहोचल्यावर दीपक मानकर, बागवे यांच्या मदतीने धंगेकर यांच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या ताब्यात आला आता हा मतदार संघ भाजपला पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे त्यासाठी केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार व्यूह रचना केली आहे.अर्थात शहराच्या एकूणच बाबतीत त्यांनी एका माजी खासदाराला वगळून चूक केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अन्यथा अन्य मतदार संघात त्यांना बाहेरून पंकजा मुडेंना आणण्याची गरज पडली नसती. काहीही असले तरी पुण्यात एकमेकांना सभेत,सभागृहात आणि जनतेच्या व्यासपीठावर सत्तेसाठी लढताना स्वतःचे अस्तित्व राखताना काही नेते कायमच ‘एकत्र फराळ खाऊ ‘ अशा कार्यक्रमात उपस्थिती लावतात हे सर्वांना ठाऊक आहे.तिथे पुण्याची संस्कृती या नावाखाली सारे झाडून एकत्र येत हास्यविनोद करत जो काही फराळ असेल त्यावर ताव मारताना दिसतात पण राजकारणात मात्र त्यांच्या कुरघोड्या प्रांतिक च काय पण राष्ट्रीय पक्षांची वाताहत लावण्याची प्रक्रिया देखील जोरातच सुरु असते .ज्यावरून यांची डबल ढोलकी जनतेसमोर आल्याशिवाय राहत नाही.

या नेहमीच्या राजकारण व्यतरिक्त हल्ली मात्र पुण्याच्या कॉंग्रेस पक्षात गेल्या वर्ष दीड वर्षापासून मोठी दुही तीही माजली आहे. हा पक्ष संपविण्याची सुपारीच जणू कुणी घेतली आहे कि षड्यंत्र रचले आहे ? अशी शंका यावी अशी स्थिती आहे. शिवाय केवळ पुण्यातून नव्हे तर राज्य पातळीवरील नेते हि यात सामील असावेत अशीही शंका घेण्यात आली तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे. कसब्यात कमल व्यवहारे,आणि भोकरे असे दोन उमेदवार उभे राहिल्याने कॉंग्रेसच्या धंगेकर यांचा पराभव निश्चित होईल असे अनेकांना वाटते आहे. आता त्यांचा पराभव होईल तर निवडून कोण येईल ? हा प्रश्न विचारला तर रासने असे नाव पुढे येते.म्हणजेच भाजपने हा किल्ला पुन्हा मिळविण्यासाठी व्यूह रचना केल्याचा जो दावा केला जातो तो याच आधारावर असावा अशी स्थिती आहे.

हा झाला कसब्याचा भाग पण कॉंग्रेस अंतर्गत नेमके चाललय तरी काय ? या निवडणुकीत शिवाजी नगर,पर्वती, आणि कसबा अशा तिन्ही मतदार संघातून कॉंग्रेसच्या मातब्बर उमेदवारांनी बंडखोरी केली,अर्थात याला बंडखोरी म्हणावे कि ‘न्याय का अधिकार ‘ मागणे म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.४०/ ४० वर्षे ज्यांनी पक्षात काढली त्या आबा बागुल,आणि कमल व्यवहारे यांना पक्षातून निलंबित केलंय असे म्हणतात .त्याबरोबर मनीष आनंद यांनाही केल्याचे सांगितले जातेय.मोठी गमतीची गोष्ट आहे.कमल व्यवहारे म्हणतात ,काँग्रेस पक्षाचा मी रीतसर राजीनामा दिला आहे, तरीही माझ्यावर का कारवाई करण्यात आली माहीत नाही. कारवाई करणाऱ्याला घटना माहिती नसेल, काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर 6 वर्ष निलंबनाची कारवाई केल्याची बातमी आल्यावर त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आबा बागुल यांचे मित्र मंडळी म्हणतात माझ्यापुढे ध्येय आहे,पर्वतीचा कायापालट करण्याचे..या मतदार संघाच्या बाहेर जावेसे वाटले नाही पाहिजे, एवढ्या सोयी सुविधा आणि अत्याधुनिक प्रकल्प राबविण्याची माझी इछ्या आहे. महापालिका स्तरावर ४० वर्षात मला जे जे काही करता येईल ते मी सत्ता असताना व नसताना देखील केलंय. आणि माझे नगरसेवक पदावर असतानाचे काम हीच माझी राजकीय शिदोरी आहे. आणि पक्ष निष्ठा देखील आहे. कामाचा बायोडाटा घ्या सर्वांचा, आणि माझा नंबर कुठे लागतो ते सांगा ? ४० / ४० वर्षे पक्षाचे काम केल्यानंतरही न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला नाही काय ?ज्याला न्याय डावलायचा आणि त्यालाच कारवाई चा बडगा दाखवायचा? तोही कुणी? काल आलेल्यांनी, न्याय डावलल्यानी..त्यांनी पक्षाचा विचार काही केलाय कि सर्वच चांगल्या नेत्यांना दुर्लक्षित करून पक्ष दुर्बल करायचे ठरवलेय याबात एकदा आत्मचिंतन व्हायला हवे.आता आबा जनतेच्या न्यायालयात आहेत तिथे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वांची धारणा आहे.

मनीष आनद यांचे समर्थक म्हणतात,कायम पडणाऱ्या उमेदवारांना पुन्हा पुन्हा पडण्यासाठी का उभे केले जातेय ? जरा इतर चेहऱ्यांना आपली ताकद अजमावू द्या.

एकूणच विधानसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सोनिया गांधींनी मिळणारे पंतप्रधानपद नाकरलंय,पदाच्यासाठी कधीही राजकरण न केलेला हा पक्ष ज्या पक्षाचे शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ यांचे नाव हे गांधी घराण्याचे आणि कॉंग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत म्हणून त्यांच्या हयातीत आणि नंतरही घेण्यात येते त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. मग त्यांचे पुत्र अशोक चव्हाण का पक्ष सोडून गेले ? गाडगीळ यांचे पुत्र अनंतराव का अक्षता टाकण्यापुरतेच कार्यकर्ते मानले जातात याचाही विचार नको का व्हायला ? कॉंग्रेस मुक्त भारत हि घोषणा जरी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केली असली तरी तिची सुरुवात कॉंग्रेस मधूनच कॉंग्रेसवाल्यांनीच या पूर्वीच सुरु केलेली आहे.जे स्वातंत्र्य काळातील पक्षाचे योगदान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बलिदान या साऱ्याचा फायदा लाटून गब्बर होऊन बसले आहेत अन्यथा कॉंग्रेसला पानिपत वर नेऊन ठेवण्याची भाषा देखील कोणी करू शकले नसते. एवढा मोठा आणि इतिहास लाभलेला हा पक्ष आहे. जो आता नामोहरम होताना कार्यकर्त्यांना दुर्दैवाने पाहावा लागतोआहे.

हडपसरमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रशांत जगताप यांच्यासाठी भव्य बाईक रॅली

पुणे: हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी भव्य बाईक रॅली काढली.पदयात्रेतून घरोघरी जाऊन भेटीगाठीचा धडाका लावलेल्या प्रशांत जगताप यांनी भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला. डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहभागाने प्रचाराची उत्सुकता शिगेला पोहोचली. डॉ. कोल्हे व उमेदवार प्रशांत जगताप यांनी हात उंचावत, तुतारी वाजवणारा माणूस दाखवत मतदारांना अभिवादन केले.या बाईक रॅलीमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर, मा.उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर, योगेश ससाणे, शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे, संदीप कोद्रे, पूजा कोद्रे, काँग्रेस हडपसर अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, अविनाश काळे, इम्रान शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “या संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे विकासाचे शिलेदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. पुण्याचे महापौर, तसेच शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. हडपसरच्या विकासाचे व्हिजन त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे हडपसरकरांनी प्रशांत जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे. हडपसरचा चेहरामोहरा बदलायचा असेल,तर प्रशांतदादांसारखे नेतृत्व गरजेचे आहे. विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत काय दिवे लावले, हे आपण पाहिले आहे. ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना आमदारकीची संधी दिली, त्यांच्याशी गद्दारी करून ते आज आपल्या विरोधात उभे आहेत. या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली असून, २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून प्रशांत जगताप यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन तुम्हा सर्व हडपसरवासियांना करतो.”प्रशांत जगताप म्हणाले, “लोकसभेला डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यात तुम्ही सर्व हडपसरकरांनी मोठी साथ दिलीत. या वेळी विधानसभेलाही आपण सर्व त्याच ताकदीने पाठीशी आहात, हे पाहून आनंद वाटतो. हडपसरला एक सुंदर, सुसंस्कृत शहर घडविण्याचा माझा प्रयत्न आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी तुम्ही मला द्यावीत. शरद पवारसाहेबांचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेऊन मला तुमच्यासाठी अनेक विकासकामे करायची आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांच्या एकत्रित प्रयत्नाने आणि मायबाप जनतेच्या मतदानरूपी आशीर्वादाने मला हडपसरचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास वाटतो.”

कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भारावलो!- चंद्रकांतदादा पाटील

हिंदू विरशैव लिंगायत समाज संघटनेने दिला चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा

पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून; ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो पाहून अतिशय भारावून गेलो आहे. कोथरूड मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. यावेळी हिंदू विरशैव लिंगायत समाजाच्या संघटनेने चंद्रकांतदादा पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आला.

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॉलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुतारवाडीतील भैरवनाथ मंदिर येथे भैरवनाथांचे दर्शन घेऊन रॉलीचा शुभारंभ झाला. तर सोमेश्वर मंदिरात रॅलीचा समारोप झाला. या संपूर्ण रॉलीदरम्यान ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने पाटील यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनीही औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपा- महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे; तो अभूतपूर्व आहे. गेल्या पाच वर्षांत जशी तुम्हा सर्वांची समर्पित होऊन सेवा केली; तशीच सेवा पुढील पाच वर्षांत ही करेन. निधीची कुठेही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.यावेळी हिंदू विरशैव लिंगायत समाजाने चंद्रकांतदादा पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, आबासाहेब सुतार, रोहन कोकाटे, सचिन दळवी, विवेक मेथा, शिवम सुतार, सुभाष भोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे, प्रमोद निम्हण, बालम सुतार, रोहिणी चिमटे, रिपाइंचे संतोष सुतार, भाजपा नेत्या वंदना सिंह, स्नेहल सुतार, कल्याणी टोकेकर, जागृती विचारे, सुरेखा वाबळे, प्रमोद कांबळे, उत्तम जाधव, विकास पाटील यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

१० वर्षे सत्तेत राहुनही ‘वोट जिहाद, कटेंगे-बटेंगे’ सारख्या धृवीकरणाचा आघार घेणे हा भाजपच्या ‘कर्म-दारिद्रयाचा’ प्रत्यय – गोपाळ तिवारी

पुणे-देश व राज्य वाढत्या कर्जाच्या खाईत जाण्या पासून रोखण्यातील अपयश, वाढती महागाई व बेरोजगारी रोखण्यातील अपयश, सामाजिक सलोखा व सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेतील अपयश व भ्रष्टाचारातील उच्चांक या सर्व बाबींमुळेच भाजप’ला विधानसभा निवडणुक लढवणे पराकोटीचे जड जात असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
पराभवाच्या सर्व्हे रिपोर्ट मुळे, निवडणुक आयोगावर दबावातुन, ४ राज्यांच्या निवडणुका देखील एकत्र घेऊ शकले नाहीत ही वास्तवता भाजपच्या पराभवाच्या मानसिकतेचे दर्शन देते.
बजेट मघील तरतुदीं अभावी, प्रशासकीय अभिप्राय व्यतिरिक्त व शासकीय ‘जीआर’ शिवाय सवंग प्रसिध्दीचे राजकीय निर्णय घेऊन व सरकारी खर्चाने जाहीरातींचा भडीमार करून देखील, ‘जनतेचे लोकमत’ आपल्याकडे वळत नसल्याचे सर्व्हेक्षणा द्वारे लक्षांत आल्यावर, मोदी – शहा – फडणवीसांच्या आधुनिक भाजपला, १० वर्षे सत्तेत राहुनही ‘कटेंगे-बटेंगे वा वोट जिहाद’ सारख्या धार्मिक धृवीकरणाचा, संविधानीक प्रजासत्ताक देशात निरर्थक आघार घेणे, हा भाजपच्या ‘कर्म-दारिद्रयाचा’ प्रत्यय असल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात केली.

सुप्रिया सुळे आणि नेते..उमेदवार सचिन दोडकेंसाठी बाळा धनकवडेंच्या घरी ..

पुणे- गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना जोरदार लढत देणाऱ्या राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांच्या साठी मतदारांच्या ऐवजी आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरी फिरण्याची वेळ खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आल्याची टीका सिंहगड भाजपने केली आहे .२ दिवसापूर्वी सुप्रिया सुळे आणी विशाल तांबे व अंकुश काकडे यांनी धनकवडी येथील माजी नगरसेवक यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली . धनकवडे हे भाजपचे भीमराव तापकीर यांचे विरोधक असून त्यांनी या मतदार संघात विद्यमान आमदारांशी जोरदार लढत दिल्याचे सांगण्यात येते . या पास्र्ह्वभूमीवर आणि ५ वर्षात सातत्याने केलेल्या जनसंपर्काच्या बळावर धनकवडे यांनी पक्षाकडे या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली होती पण त्यांना ती देण्यात आली नाही . दोडके हे गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झाल्यावर त्यांचा जन संपर्क कमी झाला आणि नेत्यांच्या मागे पुढे वावरणे जास्त दिसले असा कार्यकत्यांचा दावा नेते विसरले आणि पुन्हा दोडके यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यात नाराजीचा सूर दिसून आला . एकीकडे प्रचार करत असताना हा नाराजीचा सूर लपून राहिला नाही आणि दुसरीकडे मयुरेश वांजळे यांची उमेदवारी या पार्श्वभूमीवर दोडके यांच्या पुढे सुप्रिया सुळे यांची मदत घेण्यावाचून पर्याय राहिला नसल्याने आता नाराजांच्या घरी सुप्रिया सुळे जाऊ लागल्याचे दिसून येत आहे.

फुटलेला अजितदादा गट, फुटलेली शिवसेना आणि आता पक्षांतर्गत पेच या सर्व गोष्टी पाहता खडकवासला मतदार संघाच्या लढतीत विद्यमान आमदारांना फाईट करणे आता गेल्या निवडणुकी एवढे सोपे न राहिल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

खालील प्रश्नांमुळे कार्यकर्ते आहेत चिंतेत …

दोडके यांना विचारले जाणारे प्रश्न –

५ वर्षात नेमके आपण केले काय ?

महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकास कामे सांगा ?

आरोग्य विषयक केलेल्या नागरी मदतीचा आढावा सांगा ?

आपण बांधकाम व्यावसायिक आहात तर हा व्यवसाय आपण जाहीर केला आहे काय ?

वाहतुकीची कोंडी आणि पार्किंग ची समस्या निर्माण करणाऱ्या बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी नेमके काय केले ?

आपल्या भागातील पूरस्थिती रोखण्यासाठी काय केले ? किती नाल्यांवर बांधकामे झाली ?आणि किती नाले गायब झाले ?

नवले पुला नजीकची अपघाते कमी व्हावीत यासाठी आपल्या स्तरावर , महापालिकेच्या माध्यमातून काय कामे केलीत ?

कोथरूड मतदार संघात आपली किती बांधकाम प्रक्ल्पे प्रलंबित आहेत ? आणि पूर्ण झालीत .यामध्ये आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या लोकांसाठी किती सदनिका राखीव ठेऊन त्या योग्य व्यक्तींनाच दिल्यात ?

लाडकी बहिण योजनेच फायदा महिलांना मिळावा म्हणून किती महिलांना मदत कली ?

आयुष्यमान भारत चे कार्ड किती नागरिकांना मिळवून दिले ?

फडणवीस आजच्या युगातील जनरल डायर : रोहीत पवार यांची टीका

पठारे यांना एक लाखाचे मताधिक्य द्या :रोहित पवार यांचे आवाहन

वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडणार :आमदार रोहित पवार

पुणे:वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांcच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी आमदार रोहित पवार यांच्या तुफानी प्रचार पदयात्रेने आणि जाहीर सभेने राजकीय वातावरण ढवळून काढले.

पठारे यांनी आपल्या प्रचारात जोरदार गती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ८ नोव्हेंबर च्या सभेपाठोपाठ दि. ९ नोव्हेंबर रोजी लोहगाव परिसरात आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले .’उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील आणि वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडविला जाईल’,असे उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले. पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा झाली आणि आमदार पवार यांनी आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतला.

रोहित पवार म्हणाले,’काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात विकास होत होता.तो भाजपने थांबवला.येणाऱ्या कंपन्या दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी गुजरात मध्ये हलवल्या.त्यामुळे इथल्या होतकरू तरुणाईवर अन्याय झाला.१५ लाख युवा दरवर्षी नोकरी,रोजगार शोधत फिरत असतो.हे पाहून शांत बसू नका,लढायला हवे.बुथवर लक्ष द्या.आपले सरकार येत आहे,६० हजार कोटींचा भ्रष्टाचार उकरून काढू.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात मलिदा खाऊन पुतळा पडणार असेल, तर हे पाप कोणाचे ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.

‘फडणवीस हे सर्वात खोटे बोलणारे नेते आहेत.ते महाराष्ट्र्राचा फसवत आहेत.ते आजच्या युगातील जनरल डायर आहेत.ते अभिमन्यू नाहीत. ते तरुणांना,महिलांना न्याय देऊ शकले नाहीत. चक्रव्यूहातून सोडवू शकले नाहीत. या चक्रव्यूहातून फक्त शरद पवार हेच सोडवू शकतात.सामान्य जनता हीच त्यांची ऊर्जा आहेत . महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी ते लढत आहेत. १७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. गुजरातशाही इथे येऊ देणार नाही. सभेची वीज घालविणाऱ्याची वीज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घालवू . विरोधकांचे आम्ही बारा वाजवू.’असाही घणाघात रोहित पवार यांनी केला.

‘रामकृष्ण हरी,वाजवू तुतारी ‘,’शरद पवार साहेबआगे बढो’.’महाविकास आघाडी आगे बढो ‘ अशा घोषणा त्यांनी उपस्थित समुदायाला द्यायला लावल्या,त्याला अर्थातच प्रचंड प्रतिसाद मिळाला.

भीमराव तापकीरांच्या रॅलीत अभिनेता,खासदार रवी किशनने आणली प्रचंड बहार

उत्तर भारतीयांचा खडकवासला मतदारसंघातील भाजप महायुती उमेदवार भीमराव अण्णा तापकीर यांना जाहीर पाठिंबा!

पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार भीमराव अण्णा तापकीर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या भव्य प्रचार रॅलीने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार रॅलीत उत्तर भारतीय समाजाने भीमराव अण्णा तापकीर यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

रॅलीतील ठळक मुद्दे:

  1. भव्य पदयात्रा आणि जनतेशी थेट संवाद:
    खडकवासला मतदारसंघातील उत्तमनगर, शिवणे, आणि परिसरातील नागरिकांसोबत थेट गाठीभेटी घेत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर विकासकामांचा आढावा सादर करत जनतेशी थेट संवाद साधण्यात आला.
  2. उत्तर भारतीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा:
    रॅलीत उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. या समाजाने भीमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.
  3. महायुती सरकारचा विकासाचा धडाका:
    रॅलीदरम्यान महायुती सरकारच्या विकासकामांची माहिती नागरिकांना देत, ‘कमळ’ चिन्हासोबत असलेला प्रगतीचा आश्वासक संदेश मांडण्यात आला.

श्री सद्गुरु शंकर महाराज पालखी सोहळा:

धनकवडी बालाजी नगर येथे आयोजित श्री सद्गुरु शंकर महाराज प्रकट दिन पालखी सोहळ्यात खासदार रवी किशन आणि भीमराव अण्णा तापकीर यांनी सहभाग घेतला. त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती:

यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजप-महायुतीच्या वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीतील जनसमुदायाचा उत्साह पाहून खडकवासला मतदारसंघ पुन्हा महायुतीच्या विजयाची नोंद करणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

भीमराव अण्णा तापकीर यांचे आवाहन:

“उत्तर भारतीय बांधवांसह मतदारसंघातील सर्व नागरिकांनी महायुती सरकारच्या ‘विकासाच्या प्रवाहात’ सहभागी होण्यासाठी, ‘कमळ’ चिन्हाला मतदान करावे आणि पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करण्यासाठी माझ्या हातात बळ द्यावे,” असे भीमराव अण्णा तापकीर यांनी यावेळी सांगितले.

रवी किशन यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले असून, खडकवासला मतदारसंघात भाजप महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होते.

रमेश बागवेंना सर्वाधिक मताधिक्य देणार आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निर्धार

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इतर उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार आज विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

रिपब्लिकन युवा मोर्चा व महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवयुग बँक्वेट हॉल या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वांनी निळे फेटे परिधान केले होते. रमेश बागवे यांनादेखील निळा फेटा परिधान करून सन्मान करण्यात आला. सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयदेव गायकवाड यांनी ” जात्यांध शक्तीला पराभूत करण्यासाठी बागवे यांना सर्व ताकतीने निवडून देण्याचे आवाहन केले.

उमेदवार निवडून आणणे, भाजपाचा पराभव करणे हाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे ज्येष्ठ नेते अविनाश साळवे यांनी सांगितले. रमेश बागवे विक्रमी मतधिक्याने विजयी होण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक नेता व कार्यकर्ता काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंबेडकरी जनतेचे जीवनमान उंचावणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे दिलेले अधिकारांचे संरक्षण करणे हे माझे जीवनध्येय आहे, असे रमेश बागवे यांनी याप्रसंगी सांगितले.

” रमेश बागवे हे आंबेडकरी चळवळीचा चाळीस वर्षांपासुन अविभाज्य घटक राहिलेले असून दलित पँथरपासून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. चळवळीशी संबंधित प्रत्येक आंदोलन व कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने कोणत्याही प्रकारची मतविभागणी न करता बागवे यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत, ” अशी माहीती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (सामाजिक न्याय ) अॅड. जयदेव गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात ,माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते अविनाश साळवे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रशेखर जावळे ,रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष अशोक जगताप ,मेळाव्याचे संयोजक राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे, अनिल हतागळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रिपाइंचे आनंद कांबळे, दीपक ओव्हाळ, विठ्ठल गायकवाड, अक्षय कांबळे यांच्यासह आंबेडकरी संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी रमेश बागवे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंडगार्डन येथे सकाळी नऊ वाजता पदयात्रेला जल्लोषात सुरुवात झाली. बर्निंग घाट, चंचल मित्र मंडळ, रागविलास सोसायटी, संत गाडगे महाराज वसाहत, कवडेवाडी, दरवडेमळा, मदारवस्ती या मार्गे निघालेल्या पदयात्रेचा रेणुकावस्ती येथे समारोप झाला. सायंकाळी ताडीवाला रस्ता, भीमशक्ती चौक, सिद्धार्थ चौक, इनाम मशीद, इंदिरा विकास नगर, कुमार पिनॅकल भाजी मार्केट चौक, सिद्धेश्वर चौक, आनंद मित्र मंडळ, शूरवीर चौक, मारुती मंदिर, बालमित्र मंडळ, वनप्पा चौक, लोकसेवा मंडळ, पंचशील येथे कार्यकर्त्यांच्या उत्साहात पदयात्रा निघाली.

संगीता तिवारी,दीपक रामनानी, कविराज संगेलिया, विजय जगताप, प्रकाश बर्गे, जनार्दन बोया, माणिक यादव, योगेश वाघेला, प्रदीप परदेशी, संजय कवडे, मिलिंद अहिरे, मीरा शिंदे, संतोष माथे, बापू उजगरे, योगेश वाघेला यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप तसेच विविध संघटना यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षांच्या झेड्यांनी संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता.