पक्षनेत्यांसोबत सुप्रिया सुळे,सुरेंद्र पठारे यांचाही नोटीशीत उल्लेख
पुणे :पोर्षे कार अपघात प्रकरणी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टिकेचे लक्ष्य बनलेले आमदार सुनील टिंगरे हे टीका करणाऱ्या नेत्यांना बदनामीच्या कायदेशीर नोटीसा पाठविण्याच्या कृतीने पुन्हा टीकेचे धनी बनले आहेत.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील जाहीर सभामधून नोटीस प्रकरणाने राजकीय धुराळा उडाला आहे. 8 नोव्हेंबर रोजी येरवडा येथे जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयाला तोंड फोडले.’पोर्षे कार अपघात प्रकरणी टीका केल्यास कायदेशीर कारवाई करू, अशा नोटीसा शरद पवार यांना आली आहे. पवार साहेब ईडी च्या नोटीसना घाबरले नाहीत ते तुझ्या नोटीसला घाबरतील का? ‘ अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना ललकारले होते. त्या नंतर नोटीस प्रकरण हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दाच बनला. शरद पवार यांना कायदेशीर नोटीस ही बातमी राष्ट्रीय वृत्तपत्रात, वाहिन्यांवर गाजली. टिंगरे यांचा खुलासाही झळकला मात्र ते बचावात्मक पवित्र्यात दिसलें.
शरद पवार, उद्धव ठाकरे,काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष यांना या नोटीसा टिंगरे यांनी वकिला मार्फत पाठवल्या आहेत.सुप्रिया सुळे, सुरेंद्र पठारे हे विविध माध्यमातून पोर्षे कार प्रकरणात टीका करीत असल्याचा उल्लेख याच नोटिशीत टिंगरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वडगाव शेरीतील कार्यकर्त्यांनी या नोटीसा माध्यमाना उपलब्ध करून दिल्यावर टिंगरे हे पुन्हा टिकेचे धनी बनले. तसेच पोर्षे प्रकरणाचा पुन्हा धुराळा उडाला. दुसरीकडे पोलीस तपास, चौकशी च्या बातम्याही माध्यमातून झळकत असून प्रचाराचे इतर मुद्दे किमान पुणे आणि वडगाव शेरीत मागे पडल्याचे दिसत आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार बापूसाहेब टिंगरे यांच्या पथ्थ्यावर ही परिस्थिती पडली आहे. आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमकपणे हा मुद्दा उचलताना दिसत आहेत.