श्रद्धा खानविलकर यांचा गझल प्रतिभा पुरस्काराने गौरव
करम प्रतिष्ठान, रंगत-संगत प्रतिष्ठानचा उपक्रम
पुणे :
क्षणाक्षणाला दृश्यांचा रंग जो वेगळा दिसला
केवळ जवळून बघणाऱ्याला त्यात सापळा दिसला
पुन्हा पायरीशी आल्यावर एक प्रचिती आली
मला तुझा गाभारा येथुन फार मोकळा दिसला
या भावपूर्ण ओळी सादर केल्या त्या गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित युवा गझलकारा श्रद्धा खानविलकर यांनी!
करम प्रतिष्ठान आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गझल प्रतिभा पुरस्काराने गझलकारा श्रद्धा खानविलकर (पनवेल) यांचा आज (दि. 10) सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी मनोगत व्यक्त करीत काही शेर आणि गझल ऐकविल्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, निरुपमा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत खानविलकर यांचा गौरव करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रद्धा खानविलकर पुढे म्हणाल्या, कलाकाराने आपण जोपासत असलेल्या कलेचे प्रामाणिक रसिक होणे आवश्यक आहे. कला ही नेहमीच आनंद देण्या-घेण्यासाठी असते. जे-जे मनाला भिडते, पटते ते सुंदर असते. अशा सुंदर गोष्टींना सोबत घेऊन जीवनप्रवास सुरू राहिला पाहिजे. लिखाणाच्या माध्यमातून अल्प काळात अनेक सुहृद जोडले गेले. सुरुवातीस गझल, कविता विरंगुळा म्हणून आवडत असे; छान वाटत असे. परंतु जस जसे गझलेचे तंत्र समजत गेले, मुशायरे ऐकत गेले त्यातून आनंद घेत माझी गझल परिपक्व होत गेली आणि तिचे गांभीर्य समजले. व्यवसायामुळे अनेक कुटुंबे जोडली गेली त्यातून त्यांचे जीवन उलगडत गेले आणि त्यांच्या अनुभवातून माझ्या गझलांना लिखित स्वरूप प्राप्त झाले.
स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले. सन्मानपत्र वाचन वैशाली माळी यांनी तर परियच माधुरी डोंगळीकर यांनी करून दिला. आभार भूषण कटककर यांनी मानले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे मराठी स्वरचित गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात नचिकेत जोशी, स्वाती यादव, रुपाली अवचरे, मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, योगेश काळे, डॉ. मंदार खरे, मीना शिंदे, स्मिता जोशी-जोहरे, प्रा. शैलजा किंकर, भालचंद्र कुलकर्णी, नूतन शेटे यांचा सहभाग होता. वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले तर मुक्ता भुजबले यांनी संयोजन केले.