सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी पॅराप्लेजिक सेंटर येथे भाऊबीजेचे आयोजन
पुणे : चाकांच्या खुर्चीवर आपले संपूर्ण आयुष्य धैर्याने जगणा-या तसेच अपंगत्वावर मात करून नव्याने सुरू झालेल्या आयुष्यात खंबीरपणे उभ्या असलेल्या सैनिकांसोबत आगळीवेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली. भारतमातेच्या जयघोषात बहिणींनी सैनिकांना ओवळून औक्षण करण्यासोबतच पेढ्याचा घास भरवतानाचे दृश्य मायेची अनुभूती देणारे होते.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसोबत भाऊबीजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, शिरीष मोहिते उपस्थित होते. अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शकुंतला खटावकर यांनी जवानांशी संवाद साधून कृतज्ञता व्यक्त केली.
वृंदा साठे अकादमीच्या नृत्यांगनांचे सादरीकरण आणि मनीषा निश्चल यांची देशभक्तीपर गीते यांनी कार्यक्रमात रंगत आणली. सुवर्णा बोडस, वृंदा साठे, रजनी सबनीस, हेमा गांधी, कल्याणी सराफ यांनी संयोजन केले. अपंग सैनिक पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. कर्नल मुखर्जी, कर्नल भार्गव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
आनंद सराफ म्हणाले, सण-उत्सवांच्या माध्यमातून जवानांना आनंद देत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास देण्याकरिता उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. दिव्यांग सैनिकांना समाजासोबत जोडण्याचा हा प्रयत्न आहे. अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण-उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते, असेही त्यांनी सांगितले.