पुणे- कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत कुरघोड्यांनी या पक्षाची वाताहत लावली आहे,केवळ गांधी नाव आणि गांधी घराण्याच्या कर्तुत्वावर, कॉंग्रेस पक्षाच्या योगदानावर उभ्या असलेल्या या पक्षाचा फायदा असंख्य नेत्यांनी घेऊन स्वार्थ साधला पण पक्षाचे काहीही भले केले नाही.पुण्यात दक्षिणेतला कॉंग्रेस पक्ष आता संपवला,पूर्वी पूर्वेचा संपवला,पश्चिमेकडचा संपवला आणि उत्तरेकडचाही संपवला अर्थात यात पक्षातील नेतेच नाही तर या पक्षाचे सहकारी पक्ष नेते शरद पवार, अजित पवार यांचाही प्रामुख्याने हात राहिला आहे.पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघ हा धड ना पूर्वेला येतो न धड पश्चिमेला न उत्तरेला न दक्षिणेला,म्हणूनच कदाचित येथे तो रमेश बागवे यांच्या शक्तीरूपाने टिकून असावा.मात्र तिथे त्यांना वंचित आघाडीचा सामना करून निवडणूक जिंकण्यासाठी कारकीर्द पणाला लावावी लागते.तेवढे सोडले तर आता शहरातला कॉंग्रेस पक्ष देखील संपण्याच्या बेतात आला आहे.भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघ, मुक्ता टिळक स्वर्गवासी झाल्यावर,गिरीश बापट रुग्णालयात पोहोचल्यावर दीपक मानकर, बागवे यांच्या मदतीने धंगेकर यांच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या ताब्यात आला आता हा मतदार संघ भाजपला पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे त्यासाठी केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार व्यूह रचना केली आहे.अर्थात शहराच्या एकूणच बाबतीत त्यांनी एका माजी खासदाराला वगळून चूक केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अन्यथा अन्य मतदार संघात त्यांना बाहेरून पंकजा मुडेंना आणण्याची गरज पडली नसती. काहीही असले तरी पुण्यात एकमेकांना सभेत,सभागृहात आणि जनतेच्या व्यासपीठावर सत्तेसाठी लढताना स्वतःचे अस्तित्व राखताना काही नेते कायमच ‘एकत्र फराळ खाऊ ‘ अशा कार्यक्रमात उपस्थिती लावतात हे सर्वांना ठाऊक आहे.तिथे पुण्याची संस्कृती या नावाखाली सारे झाडून एकत्र येत हास्यविनोद करत जो काही फराळ असेल त्यावर ताव मारताना दिसतात पण राजकारणात मात्र त्यांच्या कुरघोड्या प्रांतिक च काय पण राष्ट्रीय पक्षांची वाताहत लावण्याची प्रक्रिया देखील जोरातच सुरु असते .ज्यावरून यांची डबल ढोलकी जनतेसमोर आल्याशिवाय राहत नाही.
या नेहमीच्या राजकारण व्यतरिक्त हल्ली मात्र पुण्याच्या कॉंग्रेस पक्षात गेल्या वर्ष दीड वर्षापासून मोठी दुही तीही माजली आहे. हा पक्ष संपविण्याची सुपारीच जणू कुणी घेतली आहे कि षड्यंत्र रचले आहे ? अशी शंका यावी अशी स्थिती आहे. शिवाय केवळ पुण्यातून नव्हे तर राज्य पातळीवरील नेते हि यात सामील असावेत अशीही शंका घेण्यात आली तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे. कसब्यात कमल व्यवहारे,आणि भोकरे असे दोन उमेदवार उभे राहिल्याने कॉंग्रेसच्या धंगेकर यांचा पराभव निश्चित होईल असे अनेकांना वाटते आहे. आता त्यांचा पराभव होईल तर निवडून कोण येईल ? हा प्रश्न विचारला तर रासने असे नाव पुढे येते.म्हणजेच भाजपने हा किल्ला पुन्हा मिळविण्यासाठी व्यूह रचना केल्याचा जो दावा केला जातो तो याच आधारावर असावा अशी स्थिती आहे.
हा झाला कसब्याचा भाग पण कॉंग्रेस अंतर्गत नेमके चाललय तरी काय ? या निवडणुकीत शिवाजी नगर,पर्वती, आणि कसबा अशा तिन्ही मतदार संघातून कॉंग्रेसच्या मातब्बर उमेदवारांनी बंडखोरी केली,अर्थात याला बंडखोरी म्हणावे कि ‘न्याय का अधिकार ‘ मागणे म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.४०/ ४० वर्षे ज्यांनी पक्षात काढली त्या आबा बागुल,आणि कमल व्यवहारे यांना पक्षातून निलंबित केलंय असे म्हणतात .त्याबरोबर मनीष आनंद यांनाही केल्याचे सांगितले जातेय.मोठी गमतीची गोष्ट आहे.कमल व्यवहारे म्हणतात ,काँग्रेस पक्षाचा मी रीतसर राजीनामा दिला आहे, तरीही माझ्यावर का कारवाई करण्यात आली माहीत नाही. कारवाई करणाऱ्याला घटना माहिती नसेल, काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर 6 वर्ष निलंबनाची कारवाई केल्याची बातमी आल्यावर त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आबा बागुल यांचे मित्र मंडळी म्हणतात माझ्यापुढे ध्येय आहे,पर्वतीचा कायापालट करण्याचे..या मतदार संघाच्या बाहेर जावेसे वाटले नाही पाहिजे, एवढ्या सोयी सुविधा आणि अत्याधुनिक प्रकल्प राबविण्याची माझी इछ्या आहे. महापालिका स्तरावर ४० वर्षात मला जे जे काही करता येईल ते मी सत्ता असताना व नसताना देखील केलंय. आणि माझे नगरसेवक पदावर असतानाचे काम हीच माझी राजकीय शिदोरी आहे. आणि पक्ष निष्ठा देखील आहे. कामाचा बायोडाटा घ्या सर्वांचा, आणि माझा नंबर कुठे लागतो ते सांगा ? ४० / ४० वर्षे पक्षाचे काम केल्यानंतरही न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला नाही काय ?ज्याला न्याय डावलायचा आणि त्यालाच कारवाई चा बडगा दाखवायचा? तोही कुणी? काल आलेल्यांनी, न्याय डावलल्यानी..त्यांनी पक्षाचा विचार काही केलाय कि सर्वच चांगल्या नेत्यांना दुर्लक्षित करून पक्ष दुर्बल करायचे ठरवलेय याबात एकदा आत्मचिंतन व्हायला हवे.आता आबा जनतेच्या न्यायालयात आहेत तिथे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वांची धारणा आहे.
मनीष आनद यांचे समर्थक म्हणतात,कायम पडणाऱ्या उमेदवारांना पुन्हा पुन्हा पडण्यासाठी का उभे केले जातेय ? जरा इतर चेहऱ्यांना आपली ताकद अजमावू द्या.
एकूणच विधानसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सोनिया गांधींनी मिळणारे पंतप्रधानपद नाकरलंय,पदाच्यासाठी कधीही राजकरण न केलेला हा पक्ष ज्या पक्षाचे शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ यांचे नाव हे गांधी घराण्याचे आणि कॉंग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत म्हणून त्यांच्या हयातीत आणि नंतरही घेण्यात येते त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. मग त्यांचे पुत्र अशोक चव्हाण का पक्ष सोडून गेले ? गाडगीळ यांचे पुत्र अनंतराव का अक्षता टाकण्यापुरतेच कार्यकर्ते मानले जातात याचाही विचार नको का व्हायला ? कॉंग्रेस मुक्त भारत हि घोषणा जरी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केली असली तरी तिची सुरुवात कॉंग्रेस मधूनच कॉंग्रेसवाल्यांनीच या पूर्वीच सुरु केलेली आहे.जे स्वातंत्र्य काळातील पक्षाचे योगदान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बलिदान या साऱ्याचा फायदा लाटून गब्बर होऊन बसले आहेत अन्यथा कॉंग्रेसला पानिपत वर नेऊन ठेवण्याची भाषा देखील कोणी करू शकले नसते. एवढा मोठा आणि इतिहास लाभलेला हा पक्ष आहे. जो आता नामोहरम होताना कार्यकर्त्यांना दुर्दैवाने पाहावा लागतोआहे.