Home Blog Page 567

पुनीत बालन यांचा ‘रानटी’ आजपासून चित्रपटगृहात.

आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ चित्रपटात विष्णूची आणि त्याच्या जिगरबाज अंदाजाची कथा पहायला मिळणार आहे. ‘मारायला हत्यार कशाला पाहिजे मीच हत्यार आहे , मीच रानटी’ आहे अशी धमकी देत ‘विष्णू’ ने त्याच्या शत्रूंच्या मनात कशी दहशत निर्माण केली आहे? आपली मैत्री, प्रेम आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी ‘विष्णू’ नेमकं काय करतो? कोणत्या नीतीचा अवलंब करून ‘विष्णू’ त्याच्या शत्रूंना कसं नेस्तनाबूत करणार? हे चित्रपटात पाहणं रंजक आहे. विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं सूडनाट्य प्रेक्षकांना आज प्रदर्शित झालेल्या ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर,नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे,माधव देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.

अॅक्शन, इमोशन, ड्रामा, लव्ह, जबरदस्त संगीत, उत्कंठावर्धक कथानक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं सादरीकरण यामुळे ‘रानटी’च्या रूपात मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेजच पहायला मिळणार आहे. ‘रानटी’ अॅक्शनपॅक्ड चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची ‘फूल टू ट्रीट’ असणार आहे. चित्रपटाचा वेग, निर्मितीमूल्य,त्याची मांडणी हे सगळं ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्यात दिग्दर्शक समित कक्कड यशस्वी झाले असून निर्माते पुनीत बालन यांची उत्तम साथ त्यांना लाभली आहे.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचंलिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाचे उद्घाटन

    पुणे : वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी  व  महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्यावतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवरती आधारित असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब हॉर्टीप्रोचे उपसंचालक डॉ. हर्षदीप सिंग, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, श्रद्धा रासने, विजय रासने तसेच  महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, भाग्यश्री पाटील, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप, मोरेश्वर काळे, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, महानंद माने आदी मान्यवर उपस्थित होते.

निबे म्हणाले की  शेतीला पूरक असलेला फुलोत्पादन आणि बागायत हा व्यवसाय
शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून तो फायद्याचा आहे. शेतकऱ्यांनी आपला पारंपारिक व्यवसाय जपत फलोत्पादन आणि बागायत व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. भारत हा कृषिप्रधान देश असून ज्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या शहरांमध्ये देखील हॉर्टीप्रोची संस्कृती रुजत आहे. घरातील गॅलरीमध्ये, अंगणात, परस बागेत विविध वाणाची फळझाडे आणि फुलझाडे मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत आणि याला मोठी मागणी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी या व्यवसायाला जोड्या व्यवसाय म्हणून प्राधान्य द्यावे.

सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पहाण्यासाठी उपलब्ध आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले असून  हॉर्टिकल्चर तज्ञांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना  हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

२२ ते २४ नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान (सिंचगर) येथे  सकाळी १० ते ७ पर्यंत सदरील प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

विश्वाचे कल्याण ही संविधानाच्या शिकवणुकीची पहिली पायरी : डॉ. श्रीपाल सबनीस

धर्मांधता दूर होण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष आवश्यक : डॉ. श्रीपाल सबनीस
भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान रत्न पुरस्काराने डॉ. श्रीपाल सबनीस, ॲड. शैलजा मोळक यांचा गौरव
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीचा उपक्रम

पुणे : राजकीय क्षेत्रात लोकशाहीचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानाला अपेक्षित भारत घडविणे हे राज्यकर्त्यांचे आणि जनमानसांचे आद्य कर्तव्य आहे. आज समाजात धर्मांधता वाढली आहे. या धर्मांधता, संघर्षापासून दूर राहण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस आणि शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. शैलजा मोळक यांना संविधान रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, प्रा. रतनलाल सोनग्रा मंचावर होते. शाल, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. सबनीस म्हणाले, भारतीय संविधान म्हणजे सर्व संतांच्या संतत्त्वाची, महापुरुषांच्या चांगुलपणाची, सत्य-शहाणपण-विवेक आणि धर्मनिपरक्षेतेची बेरीज आहे. दु:खमुक्त मानवता हा समाजातील प्रत्येकाचा ध्येयवाद असला पाहिजे. आज विश्वात अशांती, उपासमार, अन्याय, शोषण आहे अशा सामाजिक परिस्थितीत भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशा-देशाला, माणसा-माणसाला जोडणे हे कार्य निश्चितच घडू शकते. संविधानाच्या संस्कृतीचा अंगिकार केल्यास संपूर्ण विश्वाला कवेत घेता येणे शक्य आहे. विश्वाचे कल्याण ही संविधानाच्या शिकवणुकीची पहिली पायरी आहे.

मधुकर भावे म्हणाले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा पाया धरून रचलेले संविधान स्वीकारल्याशिवाय देश चालविता येणार नाही. संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मांना समान न्याय मिळू शकतो, परंतु आजच्या सामाजिक परिस्थितीत संविधानाचा अनादर करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. घटनेवर आधारित राजकारण आज होते आहे का या विषयी राज्यकर्त्यांनी विचार करणे आवश्यक आहे.
ॲड. शैलजा मोळक यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत संविधानाविषयी अभ्यास, वाचन तसेच त्यानुसार आचरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संविधानाच्या विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा, जातपात-धर्मविरहित समाज एकत्र यावा यासाठी आपण अखंडित कार्यरत राहणार आहोत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन ईटकर यांनी संविधानाची उपयुक्तता सांगितली तर स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

पाकिस्तानात प्रवासी व्हॅनवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू

0

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवासी व्हॅनवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत. खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम खोऱ्यात ही घटना घडली. ही व्हॅन पेशावरहून कुर्रमच्या दिशेने जात होती. कुर्रम डीपीओनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याआधी मंगळवारी रात्री खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात लष्कराच्या चौकीवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तेथे सहा दहशतवादीही मारले गेले.

माहिती देताना पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने सांगितले की, दहशतवाद्यांनी चेक पोस्टच्या भिंतीवर वाहन घुसवले आणि त्यात ठेवलेल्या स्फोटकांद्वारे स्फोट घडवून आणला. या स्फोटात 12 जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल लष्करानेही 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला.16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या पश्चिमेकडील बलुचिस्तान प्रांतात लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा दलाचे 7 जवान शहीद झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वृत्तसंस्था एएफपीने एका स्थानिक व्यक्तीच्या हवाल्याने सांगितले की, या हल्ल्यात 40 ते 50 बलुच बंडखोरांचा सहभाग होता.यादरम्यान बलुच बंडखोरांनी लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले असून 15 जवान जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी 9 नोव्हेंबरला स्फोट झाला. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेनेही या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.बीएलएच्या प्रवक्त्याने सांगितले की, मजीद ब्रिगेड युनिटने हा आत्मघाती हल्ला केला आहे. त्यांचे टार्गेट इन्फंट्री स्कूलचे सैनिक होते, जे कोर्स पूर्ण करून जाफर एक्सप्रेसने पेशावरला जाणार होते. क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलचे प्रवक्ते वसीम बेग यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनला सांगितले की, मृतांमध्ये 14 लष्करी जवान आणि 12 नागरिकांचा समावेश आहे.

२९वी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ पासून

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजन
(२४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत विविध क्षेत्रातील वक्त्यांची व्याख्याने)

पुणे, दि.२१ नोव्हेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संत श्री ज्ञानेश्वर-संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होईल.
याचे उद्घाटन २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वा. उज्जैनचे आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता व संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड उपस्थित राहतील.
व्याख्यानमालेचा समारोप ३० नोव्हेंबर रोजी स. ११ वा.नवी दिल्ली येथील मौलाना आझाद नॅशनल उर्दु विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. फिरोज बख्त अहमद यांच्या प्रमुख उपस्थित होईल. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, (सेवा निवृत्त) व्हीएसएम, एव्हीएसए, पीव्हीएसएम हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील.
२५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी ४ वा. होणार्‍या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे महामहोपाध्याय प्रा. सदाशिव द्विवेदी, (भारतीय ज्ञान परंपरा व विश्वशांती) व आयआयएसईआर चे प्राध्यापक प्रा.डॉ. रामकृष्ण भट (विज्ञान, अध्यात्म आणि धार्मिक ग्रंथांचे संघटन), मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख (विज्ञान आणि आध्यात्माचा सुसंवादः जागतिक शांततेसाठी आयकेएस आणि एनईपी २०२० चा मार्ग उजळणे), माजी मुख्य वनसंरक्षक व हभप रंगनाथ नाईकडे, सुप्रसिध्द अभिनेते श्री. सुरेंद्र पाल (द्रोणाचार्य – धर्म, नीती आणि कर्तव्य यांच्यातील संघर्षाचे प्रतिक) आणि यूजीसीचे माजी उप संचालक डॉ.भूषण पटवर्धन (जीनोम ते ओम) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच रोज स. ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होईल. यामध्ये प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, प्रसिद्ध लेखक डॉ. ज्ञानश्री लेले, रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी आर्यानंद,  प्रसिद्ध संशोधक डॉ. निलेश ओक, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे,  शिवम फाउंडेशनचे संस्थापक आचार्य श्री शिवम, भारत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री शेखर सेन, प्रा.डॉ. अक्षय मल्होत्रा, डॉ. श्रृती निरगुडकर, डॉ. ज्ञानदेव निलवर्णा, संकल्प संघई, प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, आणि शिव व्याख्याते नितिन बालगुडे इत्यादी विविध विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्ये आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी स. ७ ते ८ या वेळात योगासन वर्गाचे आयोजन क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मिलिंद पात्रे यांनी दिली.
ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.

भालबा केळकर, राजा नातू एकांकिका स्पर्धा

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे मंगळवारी शिक्षक प्रतिनिधींसाठी कार्यशाळा
नेपथ्य, प्रकाशयोजनेविषयी प्रदीप वैद्य करणार मार्गदर्शन

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींसाठी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळा मंगळवार, दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता द बॉक्स, पाळंदे कुरिअर समोर, एरंडवणे, कर्वे रोड येथे होणार असून प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ प्रदीप वैद्य मार्गदर्शन करणार आहेत.
भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 10 ते दि. 12 जानेवारी 2025 तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 13 ते दि. 21 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 32वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रत्येक शाळेतील दोन शिक्षक प्रतिनिधींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांचे प्रवेश अर्ज याच दिवशी स्वीकारले जाणार आहेत.

संजय आणि सुकन्या मोने यांना यशवंत-वेणू पुरस्कार जाहीर

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सोमवारी होणार गौरव

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत-वेणू पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते संजय मोने आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांचा सोमवारी गौरव केला जाणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्काराचे यंदाचे 7वे वर्ष असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सोमवार, दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सुहास जोशी यांना या प्रसंगी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमित गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‌‘तो राजहंस एक‌’ हा संगीतकार श्रीनिवास खळे संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदार आपटे आणि मनिषा निश्चल गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन दीपक गुप्ते, दीपक पवार, गिरीष गोडबोले करीत असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण

  • ८५ स्पर्धकांनी घेतला सहभाग

पुणे :
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धा 2024 चा बक्षिस वितरण रविवारी पार पडला. या स्पर्धेत तब्बल ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत स्वराज्य दौलत दुर्गानाथ प्रतिष्ठान साकारलेल्या पुरंदर घेरा हा देखावा सर्वोत्कृष्ट ठरला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने राज्य स्तरीय ऑनलाईन किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात पार पडला. ज्येष्ठ इतिहास संशोधक व दुर्ग अभ्यासक पांडूरंग बलकवडे आणि एच व्ही देसाई कॉलेजचे विभाग प्रमुख गणेश राऊत हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिल्या क्रमांकाला ९ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. त्यात मुंबई विभागात आयुष पाटील हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. यांनी त्यांनी सुवर्णदुर्ग साकारला होता. तर द्वितीय क्रमांक ओमकार मित्र मंडळ – सरस भेड दुर्ग देखाव्याला मिळाले. तर तृतीय क्रमांक घरकूल मित्र मंडळ यांनी साकारलेल्या प्रतापगड दुर्गाला मिळाले.
कोकण विभागात आदर्श मित्र मंडळाने साकारलेल्या वेल्बोर – साजरा – भोजर यांना प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक किल्ले रायगड साकारलेल्या अष्टप्रधान मंडळाला मिळाले.
पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रथम क्रमांक सांगलीच्या स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानने साकारलेल्या पुरंदर वज्रगड पुरंदर घेरा पुरंदरच्या देख्याव्याला तर सिंहगड हलता देखावा करणाऱ्या पुण्याच्या मिरजकर परिवाराला द्वितीय आणि किल्ले अहिवंतगड आणि किल्ले मार्कड्याचा देखावा करणाऱ्या सांगलीच्या विजेता तरुण मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला.

  • पुरंदर घेरा ठरला सर्वोत्कृष्ट किल्ला
    स्वराज्य दौलत दुर्गानाथ प्रतिष्ठान साकारलेल्या पुरंदर घेरा यांनी 11 किल्ले एकत्र एकूण जो देखावा सादर केलेला देखावा सर्वोत्कृष्ट ठरला. त्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस होते. तर वेद इनामदार या लहान मुलाने साकारलेल्या मल्हारगडला आणि महिलांनी साकारलेल्या स्वयंभू गर्जनाच्या- रायगडच्या देखाव्याला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे उत्तेजनार्थ बक्षिसाचे स्वरूप होते.

मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती गौतम अदानीला हिशोब चुकता करावा लागेल!

मुंबई, दि. २१ नोव्हेंबर २०२४
उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले पण अमेरिकेच्या तपास यंत्रणाच्या तपासात अदानीने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही? भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानीला जेलमध्ये टाकावे ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने व सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, उर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रात अदानीची मक्तेदारी सुरु असून त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. अदानीला देश विदेशातील कंत्राटे देण्यासाठी पंतप्रधान मोदीच मदत करत आहेत हे उघड आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटी रुपयांची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. मुंबईचे विमानतळही अदानीच दिले आहे. यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्कम पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करु शकत नाही. भारत सरकारने कारवाई करून देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

गॅदरींगचा वाद अन नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच त्याच्या मित्राने चिरला काचेने गळा-हडपसरची घटना

पुणे- मांजरी परिसरातील एका शाळेत वार्षिक समारंभाचे आयाेजन करण्यात आले हाेते. मात्र, वार्षिक समारंभाच्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने मित्राने गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका 14 वर्षीय दाेषी मुलाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात आराेपी मुला विराेधात तक्रार दिली आहे. मांजरीतील खासगी शाळेत नववी तक्रारदार मुलगा शिकण्यास आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला मुलगा त्याच्याच वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये जाेरदार वाद झाला होता. 19 नोव्हेंबर राेजी दुपारी अडीच वाजण्च्या सुमारास तक्रारदार मुलगा वर्गात बसला होता. त्यावेळी वर्गातील मुलगा त्याच्या पाठीमागून आला आणि त्याने थेट धारदार काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली व मुलांची धावपळ झाली.या घटनेनंतर गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाने त्याला धमकावत त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे पुढील तपास करत आहेत.

रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले

0

रशियाने पहिल्यांदाच युक्रेनवर आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइलचा (ICBM) हल्ला केला आहे. ICBM 5,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करू शकते. हे विशेषतः अण्वस्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाते.
युक्रेनच्या हवाई दलाने गुरुवारी या हल्ल्याला दुजोरा दिला. युक्रेनने रशियावर ब्रिटिश आणि अमेरिकन क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी युक्रेनने ब्रिटीश क्षेपणास्त्र स्टॉर्म शॅडो क्रूझने रशियावर हल्ला केला. एका रशियन सैनिकाने ऑनलाइन दावा केला की कुर्स्क भागात किमान 12 क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
याआधी मंगळवारी युक्रेनने अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या एटीएसीएमएस बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने रशियावर हल्ला केला. तेव्हापासून युक्रेन ब्रिटीश क्षेपणास्त्रांचा वापर करू शकेल, अशी अटकळ बांधली जात होती.
रशियाने गेल्या महिन्यात म्हटले होते की, जर नाटो देशांची शस्त्रे आपल्या भूमीवर वापरली गेली तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात मानली जाईल.

रशियाने मंगळवारी दावा केला की युक्रेनने पहिल्यांदाच अमेरिकेकडून मिळालेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आपल्या हद्दीत डागली. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनने मंगळवारी सकाळी ब्रायन्स्क परिसरात सहा लांब पल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) क्षेपणास्त्रे डागली.

रशियाने 5 क्षेपणास्त्रे पाडल्याचे सांगितले. अहवालानुसार, युक्रेनियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनीही रशियावर एटीएसीएमएसचा वापर केल्याची पुष्टी केली आहे. यानंतर बुधवारी कीवमधील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला. नंतर अमेरिकन गुरुवारी ते उघडण्याबद्दल बोलले.

दिल्ली पोलिसांनी फटाक्यांच्या विक्रीवर,वापरावर घातली बंदी-12वीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन, 50% कर्मचाऱ्यांना घरून काम

0

नवी दिल्ली -दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. पाच दिवसांनंतर, गुरुवारी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स 379 नोंदवले गेले. 300-500 मधील AQI गंभीर मानला जातो.त्याच वेळी, दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांना राजधानीत ऑनलाइन फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) ई-कॉमर्स कंपन्यांना ई-मेल केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशामुळे दिल्ली पोलिसांनी हा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमसी मेहता विरुद्ध भारत सरकार या खटल्यात प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालावी, असे निर्देश दिले होते.राष्ट्रीय राजधानीत श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना-4 (GRAP-4) लागू आहे. बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन करण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचे 50 टक्के कर्मचारी घरून काम करतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना डिजिटल सुनावणीचा पर्याय दिला आहे.

भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना म्हणाले की, जेथे शक्य असेल तेथे न्यायालयांनी डिजिटल पद्धतीने सुनावणी घ्यावी. वकील आभासी वकिली करू शकतात. खरे तर कपिल सिब्बल यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकिलांनी ही मागणी केली होती. न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणेही बंधनकारक केले आहे.18 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान आप सरकारच्या वकील ज्योती मेहंदीरत्ता यांनी सांगितले होते की, 10वी आणि 12वी वगळता इतर सर्व वर्ग ऑनलाइन आहेत. पाचवीपर्यंतचे शिक्षण बंद आहे. यावर न्यायमूर्ती ओका यांनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले – हा काय विनोद आहे? 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची फुफ्फुसे इतरांपेक्षा वेगळी असू शकत नाहीत. त्यांचे वर्गदेखील थांबवा आणि ते ऑनलाइन सुरू करा.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने GRAP-3 आणि GRAP-4 लागू करण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल आयोग आणि सरकारला फटकारले होते. पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण एनसीआरमधील शाळा बंद ठेवाव्यात, असेही सांगण्यात आले. सुप्रीम कोर्टाने सीएक्यूएमला कठोर होण्याचे निर्देश दिले होते आणि सांगितले होते की बंदी लागू करण्याचे काम स्थानिक अधिकाऱ्यांवर सोडले जाणार नाही.हवेची प्रदूषण पातळी तपासण्यासाठी त्याची 4 प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरासाठी स्केल आणि उपाय निश्चित केले आहेत. याला ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) म्हणतात. त्याच्या 4 श्रेणींमध्ये, सरकार निर्बंध लादते आणि प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय जारी करते.

सर्व आरोप अदानी उद्योग समूहाने फेटाळले-कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार

0

मुंबई : अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर अमेरिकेत लाच दिल्याचा तसेच फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर भारतीय शेअर बाजारात लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत झालेल्या या आरोपांनंतर आदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. यातील चार कंपन्यांना तर थेट लोअर सर्किट लागले आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या आरोपांवर अदानी उद्योग समूहाकडून स्पष्टीकरण आले आहे. अमेरिकेत करण्यात आलेले सर्व आरोप अदानी उद्योग समूहाने फेटाळले आहेत.

अदानी समूहाने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप फेटाळले आहेत. अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचं अदानी उद्योग समूहाने म्हटलंय. अभियोगातील आरोप हे आरोप आहेत आणि प्रतिवादी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जातात, असं अदानी समूहाने म्हटले आहे. आम्ही सर्व ते शक्य कायदेशीर मार्ग शोधू असं अदानी उद्योग समूहाने प्रसिद्ध केलेल्या आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.

गौतम अदानी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप

0

सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा

नवी दिल्ली-न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी ऑफिसचे म्हणणे आहे की अदानी यांनी भारतातील सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स (सुमारे 2110 कोटी) लाच देण्याचे आश्वासन दिले होते.

अदानींव्यतिरिक्त, सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा ​​आणि रूपेश अग्रवाल यांचा इतर सात लोकांमध्ये समावेश आहे. हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे.सागर आणि विनीत हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​अधिकारी आहेत. सागर हा गौतम अदानी यांचा पुतण्या आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेल्याने अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आणि अमेरिकन कायद्यानुसार तो पैसा लाच म्हणून देणे गुन्हा आहे.बुधवारीच, अदानी यांनी 20 वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलर्स जमा करण्याची घोषणा केली होती. काही तासांनंतर, त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला.

अमेरिकन ॲटर्नी कार्यालयाने अदानींवर लावलेले आरोप…

2020 ते 2024 दरम्यान, अदानींसह सर्व आरोपींनी भारत सरकारकडून सौर ऊर्जा करार मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले. या प्रकल्पातून 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती.
ही योजना पुढे नेण्यासाठी अदानी यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. सागर आणि विनीत या योजनेवर काम करण्यासाठी अनेक बैठका घेतात.
कोर्टाने म्हटले आहे की, सिरिल कॅबनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा ​​आणि रूपेश अग्रवाल यांनी लाचखोरी योजनेच्या ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) च्या तपासात अडथळा आणण्याचा कट रचला. या चौघांनीही योजनेशी संबंधित ईमेल, संदेश आणि विश्लेषणे डिलीट केली.
अदानी ग्रीन एनर्जीने करारासाठी निधी देण्यासाठी यूएस गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून एकूण 3 अब्ज डॉलर्स जमा केले.

राहुल म्हणाले- 2000 कोटींचा घोटाळा करूनही अदानी तुरुंगाबाहेर,PM मोदी अदानींना वाचवत आहेत

0

नवी दिल्ली-अमेरिकेतील उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले- अदानीजी 2 हजार कोटींचा घोटाळा करत आहेत आणि बाहेर फिरत आहेत, कारण पंतप्रधान मोदी त्यांना संरक्षण देत आहेत. गौतम अदानी यांनी अमेरिकेत गुन्हे केले आहेत, मात्र भारतात त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. अदानीच्या संरक्षक सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानींसह 8 जणांवर अब्जावधी रुपयांची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाचे म्हणणे आहे की भारतात सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना 265 मिलियन डॉलर्स (सुमारे 2200 कोटी) लाच दिली किंवा देण्याची योजना आखली.

राहुल यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता म्हणून मी हा मुद्दा मांडत आहे. अदानी भाजपला पूर्ण पाठिंबा देतात. आमची मागणी JPC स्थापन करण्याची आहे. भारताचे पंतप्रधान अदानीजींच्या मागे उभे आहेत. एखादी व्यक्ती छोटासा गुन्हा करूनही तुरुंगात जातो. अदानींना मात्र काही होत नाही.
अदानी तुरुंगाबाहेर का आहेत हा प्रश्न आहे. अदानी यांनी गुन्हा केल्याचे अमेरिकन एजन्सीने सांगितले आहे. पण पंतप्रधान काहीच करत नाहीत. ते काहीही करू शकत नाहीत कारण पंतप्रधान मोदी त्यांच्या दबावाखाली आहेत.
अदानींना काही होणार नाही, त्यांना अटक होणार नाही, कारण मोदी त्यांच्यासोबत आहेत. या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाई करावी.
अमेरिकेच्या एफबीआयने तपास केला आहे. अदानी भ्रष्टाचार करत असल्याचे मी आधीच सांगत आहे. चौकशी झाली पाहिजे, असे मी यापूर्वी दोन-तीन वेळा पत्रकार परिषदेत सांगितले होते. अदानीला अटक झाल्याशिवाय गोष्टी सुटणार नाहीत. अदानीजी भाजपला निधी देतात.
नरेंद्र मोदी अदानींना अटक करू शकत नाहीत. मोदींनी असे केले तर ते (मोदी)ही जातील. अदानींनी देश हायजॅक केला आहे.