सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा
नवी दिल्ली-न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ॲटर्नी ऑफिसचे म्हणणे आहे की अदानी यांनी भारतातील सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स (सुमारे 2110 कोटी) लाच देण्याचे आश्वासन दिले होते.
अदानींव्यतिरिक्त, सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांचा इतर सात लोकांमध्ये समावेश आहे. हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे.सागर आणि विनीत हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आहेत. सागर हा गौतम अदानी यांचा पुतण्या आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेल्याने अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आणि अमेरिकन कायद्यानुसार तो पैसा लाच म्हणून देणे गुन्हा आहे.बुधवारीच, अदानी यांनी 20 वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलर्स जमा करण्याची घोषणा केली होती. काही तासांनंतर, त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाला.
अमेरिकन ॲटर्नी कार्यालयाने अदानींवर लावलेले आरोप…
2020 ते 2024 दरम्यान, अदानींसह सर्व आरोपींनी भारत सरकारकडून सौर ऊर्जा करार मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले. या प्रकल्पातून 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा होती.
ही योजना पुढे नेण्यासाठी अदानी यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. सागर आणि विनीत या योजनेवर काम करण्यासाठी अनेक बैठका घेतात.
कोर्टाने म्हटले आहे की, सिरिल कॅबनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांनी लाचखोरी योजनेच्या ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) च्या तपासात अडथळा आणण्याचा कट रचला. या चौघांनीही योजनेशी संबंधित ईमेल, संदेश आणि विश्लेषणे डिलीट केली.
अदानी ग्रीन एनर्जीने करारासाठी निधी देण्यासाठी यूएस गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून एकूण 3 अब्ज डॉलर्स जमा केले.