नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सोमवारी होणार गौरव
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत-वेणू पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते संजय मोने आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांचा सोमवारी गौरव केला जाणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्काराचे यंदाचे 7वे वर्ष असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सोमवार, दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सुहास जोशी यांना या प्रसंगी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमित गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘तो राजहंस एक’ हा संगीतकार श्रीनिवास खळे संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदार आपटे आणि मनिषा निश्चल गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन दीपक गुप्ते, दीपक पवार, गिरीष गोडबोले करीत असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.