Home Blog Page 563

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले, म्हणाला – “त्यामुळेच मला बँड तयार करून लाईव्ह परफॉर्म करायची प्रेरणा मिळाली!”

बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना याने नुकताच अमेरिकेतील पाच शहरांमध्ये – शिकागो, न्यूयॉर्क, सॅन जोस, न्यू जर्सी आणि डलास येथे आपला म्युझिक टूर पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी त्याच्या परफॉर्मन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनयासोबत संगीत ही त्यांची दुसरी आवड आहे, असे अनेकदा सांगणाऱ्या आयुष्मानने सांगितले की, त्यांच्या लाईव्ह सिंगिंग प्रवासाची सुरुवात कशी झाली.

आयुष्मानने खुलासा केला की त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्समागे अरिजीत सिंगचा मोठा वाटा आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या अभिनय कौशल्याबद्दल आत्मविश्वास बाळगला आणि गाणे फक्त चित्रपटांसाठीच योग्य आहे असे वाटले. हजारो लोकांसमोर स्टेजवर गाण्याचा विचारही कधी केला नव्हता. परंतु २०१३ साली डलासच्या दिवाळी मेळ्याच्या निमित्ताने अरिजीत सिंगमुळे माझ्या पहिल्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली. त्यावेळी अरिजीतने मला फोन करून परफॉर्म करण्याची विनंती केली. त्याला तातडीच्या कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, पण त्याचा बँड डलासला पोहोचला होता. आधी मी संकोच केला, पण अरिजीतची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा चाहता असल्यामुळे, मी शेवटी होकार दिला.”

पहिल्या अनुभवाबद्दल आयुष्मान म्हणाला , “जेव्हा मी कॉन्सर्टला पोहोचलो तेव्हा स्टेडियम लोकांनी खचाखच भरलेले होते, सुमारे पन्नास हजार लोक तिथे होते. माझ्यासाठी ही ड्राइंग रूम च्या गाण्यापासून थेट स्टेडियमपर्यंतची मोठी उडी होती. मी अरिजीतच्या टीमसोबत सुमारे १० गाणी सादर केली आणि प्रतिसाद खूपच चांगला होता. या अनुभवामुळे मला स्वतःचा बँड तयार करून लाईव्ह परफॉर्मन्स सुरू करायचा आहे हे समजले. याचे सर्व श्रेय अरिजीत सिंगला जाते.”

आयुष्मानच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘थामा’ (मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील) आणि धर्मा व सिख्या प्रोडक्शन्ससोबतचा एक अन टायटल  प्रोजेक्ट समाविष्ट आहे.

१९ वर्षीय सातव आणि २४ वर्षीय सातपुते ला देशी पिस्तुलासह पकडले

पुणे : वारजे पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते (वय २४, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी), सोहम अनंत सातव (वय १९, रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मनोज पवार व विकास पोकळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की आकाशनगरकडे जाणार्‍या रोडवर दोघे जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी रोजरी स्कुलचे विरुद्ध दिशेला आकाशनगरकडे जाणार्‍या रोडला दोघांना पकडले. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल,तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक मोपेड असा ६५ हजार ३०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.ओंकार ऊर्फ टेड्या सातपुते याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, राईट, जबरी चोरी, घरफोडी, अग्नीशस्त्रे बाळगणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे गुन्हे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, मनोज पवार, विजय भुरुक, दक्ष पाटील, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, विकास पोकळे, सत्यजित लोंढे यांनी ही कामगिरी केली आहे.

दरोड्याच्या तयारीतील चुहा गँगच्या चौघांची धरपकड

पुणे- मोक्का प्रकरणात न्यायालयाने २ वर्ष तडीपार केले असतानाही चुहा गँगने शहरात येऊन दरोडा टाकण्याच्या तयारीकेली आणि या तयारीत असतानाच चुहा गँगच्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून आत टाकले आहे .

तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जनाब (रा. कॅम्प) हा पळून गेला आहे.याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.त्याला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी ६ नोव्हेबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता.

कात्रज येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत आपल्या साथीदारांसह तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी त्यांना घेरुन चौघांना पकडले. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल,एक जिवंत काडतुस व मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने , पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, मोहन कळमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी हीकामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर ̈मो.9881802890अधिक तपास करीत आहेत.

धर्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच विश्व शांती नांदेल -आध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता

एमआयटी डब्ल्यूपीयूत २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन

पुणे, दि.२५ नोव्हेंबर: “धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय घरा घरात झाला तर प्रत्येकाला शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. हेच सूत्र समाजासाठी लागू झाल्याने विश्वशांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. तसेच प्रत्येकाने चेहर्‍यावर हास्य ठेवणे या क्रांतिकारी प्रयोगामुळे ही जीवनात शांतीचा अनुभव येतो. प्रत्येकाने संकल्प करावा की घरामध्ये प्रवेश करतांना चेहर्‍यावर हास्य ठेवावे.” असे विचार उज्जैन येथील आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधित आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
पंडित विजयशंकर मेहता म्हणाले, “संतती, संपत्ती, संबंध आणि  दुर्बल आरोग्य  या चार मार्गाने जीवनात अशांती येते. अशा वेळेस शांतीसाठी जीवनाला चार टप्प्यांमध्ये विभाजीत करावे. व्यावसायिक जीवनात निष्काम राहणारे, सामाजिक जीवनात वचन बद्धतेचे पालन करणे, कुटुंबाला प्राथमिकता देणे आणि स्वतःला शांत ठेवावे. यामुळे कुटुंबात, समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदेल.”
ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर म्हणाले,” भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून जगाला वारकरी संप्रदायाने शांतीचा मार्ग दाखविला आहे. आजच्या युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची वेगळी परिभाषा करणे योग्य नाही. आत्म स्वरूपाचा विचार करणे हे अध्यात्म असून ते सर्व धर्मात आहे. खर पाहता विश्वाला शांतीची गरज आहे आणि ती विज्ञानातून मिळेल. मनुष्याने ज्ञानाचा योग्य वापर केल्यास ते शक्य आहे. ज्ञान हे आंतरिक विचार करतो त्यासाठी रोज संतांचे वाङ्मय वाचावे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,” वर्तमान काळात मानवाने विज्ञानाच्या आधारे सर्व गोष्टी साध्य केल्यात परंतू जीवनात सुख आणि शांती नाही. यासाठी आध्यात्मिक व आत्मज्ञान आवश्यक आहे. सत्याची परिभाषा ओळखणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाल सुरू केली आहे. येथे सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वरसेवा पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते. ”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,”धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे जीवनात सर्वात महत्वाचे असून त्याचे पालन करावे. देशाचा विकास पाहता भारत तीसरी आर्थीक व्यवस्था म्हणून उदयास येत आहे. अशा वेळेस हा देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल आणि विश्वगुरू बनेल.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण व प्रस्तावना मांडली.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय योग महासंमेलन संपन्न

आळंदी : योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते . विख्यात योगाभ्यासी असे प्रिन्सिपल ऑफ योग कॉलेज कैवल्यधाम येथील डॉक्टर शरदचंद्र भालेकर, द लोणावळा इन्स्टिट्यूट चे संचालक डॉक्टर मन्मथ घरोटे, भारतीय संस्कृती दर्शन चे संचालक डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख, तसेच प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ व योगाभ्यासी डॉक्टर विश्वास येवले यांची दर्जेदार व्याख्यान झाले . तर अनेक योगी खेळ आणि योगी संगीत रजनी सारख्या करमणुकीच्या कार्यक्रमातून सर्वांचे मन प्रसन्न झाले, याबरोबर आपला महाराष्ट्र योग शिक्षक संघ योग शिक्षकांसाठी काय कार्य करत आहे योग विषयाला योग्य न्याय कसा मिळावा यासाठी आपले संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार यांनी मार्गदर्शन केले. हा योगशिक्षक संघ कोणी एकाचा नसून फक्त आणि फक्त योगशिक्षकांचा आहे यामध्ये कोणीही अधिकारी किंवा पद धारण करणारा असा नसून प्रत्येक जण योग्य शिक्षक आहे आणि प्रत्येकाला आपले मत आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. , असे देखील सांगण्यात आले. तसेच संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉ.श्री.शरदचंद्र भालेकर यांनी योगशिक्षक एकत्र येणे का गरजेचे आहे हे सांगितले तसेच डॉ मन्मथ घरोटे सर यांनी समाज स्वास्थ्य घडविणारा हा योगशिक्षक एकत्र आलाच पाहिजे तर डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी आश्वासन दिले की योगशीक्षकांच्या 12मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. तसेच ओमानंद स्वामी आणि गेठेमहाराज यांनी आशीर्वाद दिले. संस्थेचे स्मरणिका प्रकाशन व कुणाल महाजन लिखित योग गीता या पुस्तकाचे प्रकाशन माननीय पाहुण्यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास माननीय श्रीमती इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, पद्मश्री डॉ.विजय भटकर सर बेलराईज इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर सुप्रिया बडवे, यांच्या शुभेच्छा होत्या.

कार्यक्रमात प्रसाद कुलकर्णी यांची राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली तसेच राज्य कोषाध्यक्ष म्हणून संतोष खरटमल यांची नेमणूक करण्यात आली.
त्याचबरोबर ऑनलाईन राज्यस्तरीय योग क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचे पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. यासाठी मानली देव आणि राहुल येवला यांनी कमकाज पाहीले आपले विभागप्रमुख प्रा. श्री सदानंद वाली सर,
मी पुणे जिल्हाध्यक्ष सौ. चंद्रज्योती दळवी, उपाध्यक्ष सौ सारिका काकडे, मारिया पारतापूर्वाला, सचिव आरुषी शिंगोटे गौरी पाटील कोषाध्यक्ष आश्लेषा मोहिते कार्यकारी सचिव तानाजी पाटील उज्वला गायकवाड श्री दिगंबर काष्टे सर तसेच आपले सोशल मीडिया प्रभारी श्री राहुल सांडभोर सर अवनी शहा माहिती दिली

चंद्रकांतदादा पाटलांनी वाढविले कोथरूडचे मताधिक्य

नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. पुणे शहरातील आठ पैकी सात जागांवर महायुती विजयी झाली. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून होते तो म्हणजे कोथरुड मतदारसंघ. या मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निवडणूक लढवत होते. यानिवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी १ लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून चंद्रकांतदादांना २५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. पण या निवडणुकीत सर्व कसर भरुन काढत १ लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. त्यामुळे २५ हजारापासून ते एक लाखापासूनचा प्रवास अतिशय खडतर आणि कठोर परिश्रम युक्त म्हणावा लागेल.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रकांतदादा पाटील यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यानंतर, दादांनी सर्वस्व पणाला लावून काम केले. त्यावेळी मतदारसंघ नवीन असल्याने, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद प्रस्थापित करुन मतदारांपर्यंत पोहोचणं आणि जुन्यांना सोबत घेऊन काम करणं अशी अनेक आव्हाने दादांसमोर होती. पण ही सर्व अडथळ्यांची मालिका पार करत चंद्रकांतदादा पाटील यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणला. या निवडणुकीत घरचा विरुद्ध बाहेरचा असा अपप्रचार देखील झाला. त्यामुळे त्याचा मतदारांवर देखील विपरित परिणाम झाला. अनेक प्रभागात मतदानाचा टक्का रोढावला. या निवडणुकीत एकूण मतदारांच्या तुलनेत ४८.०२ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख पाच हजार २४६ (५२.९३ टक्के) मतदान झाले. तर विरोधी उमेदवार असलेल्या किशोर शिंदे यांना ७९ हजार ७५१ (४०.८७ टक्के) मतदान झाले होते. तर नोटाला २.०६ टक्के मतदान झाले होते.
यंदा २०२४ च्या निवडणुकीचा विचार केला, तर एकूण ५२.१८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख ५९ हजार २३४ (६८.४ टक्के), चंद्रकांत मोकाटे यांना ४७ हजार १९३ (२०.२७ टक्के), आणि किशोर शिंदे यांना केवळ १८ हजार १०५ (७.७८ टक्के) मते मिळाली. तर नोटाला १.३५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना तब्बल एक लाख १२ हजार ४१ मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना १४.४७ टक्के मते जास्त मिळाल्याने हा विजय सहज शक्य झाला. लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून एक लाख पाच हजाराचे मताधिक्य मिळाले होते.
पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले
. आता एवढे मताधिक्य मिळण्यापाठिमागे गेल्या पाच वर्षातील चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत कारणीभूत ठरली. कारण गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ २५ हजाराचे मताधिक्य मिळाल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने सेवा कार्य आणि विकासकामे केली, त्यामुळे कोथरुडमधील जनतेच्या मनात कामाचा माणूस अशीच प्रतिमा तयार झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोविडची प्रचंड लाट संपूर्ण जगात आली. याकाळात सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण होते. अनेकांचा हातातील रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच, धान्य पुरवठा करणे, कोविड बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणे, कोविडची कमी लक्षणे असणाऱ्य रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे उपलब्ध करुन देणे, महापालिकेच्या कोविड सेंटरसाठी दीड कोटीचा निधी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिला.
कोविडची लाट ओसरल्यानंतर ही हे सेवा कार्य असेच सुरु ठेवले. यामध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विवाह इच्छुक मुलींना ‘झाल’ उपलब्ध करुन देणे, त्याशिवाय गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसह रुग्णालयात उपचारासाठी लोकसहभागातून खर्च देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया सारखा उपक्रम, किंवा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी महा ई-सेवा केंद्र कार्यन्वित करुन नागरिकांची सोय करणे, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ देणे, बालगोपाळांमध्ये साघिंक भावना वाढीस लागावे यासाठी किल्ले बनवा स्पर्धा, नवोदित कलाकारांसाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोथरुडमधील प्रत्येक कुटुंबाशी एक नाते तयार केले.

याशिवाय मतदारसंघात ही विविध विकास कामांचा डोंगर उभा करुन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या. यात प्रामुख्याने डीम्ड कन्वेयन्स सारखे विषय असोत, किंवा रिडेव्हलपमेंटसाठी सोसायटीतील नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध भागातील प्रलंबित रस्त्यांचे विषय मार्गी लावणे, बाणेर बालेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन, बाणेर-बालेवाडी-सुतारवाडी भागातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी उपकेंद्रास जागा उपलब्ध करुन देणे, सुतारवाडीतील स्माशानभूमीतील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेणे, असे एक ना अनेक विषय सोडविल्यामुळे कोथरुड करांच्या मनात दादांनी घर केले. याशिवाय पुणे महापालिकेने रद्द केलेली ४० टक्के करसवलत पुन्हा लागू करुन घेतल्यामुळे केवळ कोथरुडच नव्हे; संपूर्ण पुण्यातील जनता चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड समाधानी होती. याचाच प्रत्यय निवडणुकीत देखील आला.

निवडणूक प्रचारादरम्यान कोथरुड मधील अनेक नागरिक चंद्रकांतदादा पाटील यांच्या बद्दल भरभरुन बोलत होते. त्यामुळे दादा पुन्हा आमदार होणार यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पत्रकार देखील चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्य किती असेल, याचीच चर्चा करत होते. त्यामुळे निवडणूक निकाला दिवशी देखील त्याचा प्रत्यय सर्वांना आला. मतमोजणी सुरु झाल्यापासून प्रत्येक क्षणाला दादांचे मताधिक्य वाढतच होते. असा एक ही प्रभाग नव्हता, जिथे दादांना मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे दादा म्हणजे कोथरुड आणि कोथरुड म्हणजेच दादा असं काहीसं समीकरण तयार करण्यात गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांना यश मिळालेलं आहे. आता चंद्रकांतदादा पाटील यांचा हा पॅटर्न महाराष्ट्र भाजपाने संपूर्ण राज्यात राबविला, तर संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचा बालेकिल्ला होईल, यात शंका नाही.

पुणे शहर आणि जिल्हा कॉंग्रेसमुक्त

पुणे-मावळत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातून तीन आमदार होते. संग्राम थोपटे, संजय जगताप आणि रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या तीनही आमदारांना पराभव पत्करावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जिल्ह्यात गेल्यावेळी एकही आमदार नव्हता. यावेळी बाबाजी काळे हे शिवसेनेचे आमदार आहेत. एका अपक्षाबरबरच शिंदे गटाचा देखील पुणे जिल्ह्यात एक आमदार निवडून आला आहे.जिल्ह्यातील सात विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जुन्नरचे अतुल बेनके, खेडचे दिलीप मोहिते, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, काँग्रेसचे भोरमधील संग्राम थोपटे आणि पुरंदर मधील संजय जगताप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे अशोक पवार आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पराभूत झाले आहेत.

जिल्ह्याच्या आमदारांमध्ये चार नवीन चेहरे आले आहेत. त्‍याचप्रमाणे जिल्‍ह्यात तीन माजी आमदारांना पुन्‍हा विधानसभेची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात 21 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.नव्‍या पाच चेहऱ्यांमध्ये कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने, चिंचवडमध्ये शंकर जगताप, खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माउली कटके, भोरमध्ये शंकर मांडेकर यांचा समावेश आहे. माजी आमदार असलेले जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पुण्यात 21 पैकी नऊ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. यामध्ये चंद्रकांत पाटील (कोथरूड), माधुरी मिसाळ (पर्वती), सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), भीमराव तापकीर (खडकवासला), हेमंत रासने (कसबा पेठ), राहुल कुल (दौंड), शंकर जगताप (चिंचवड )आणि महेश लांडगे (भोसरी) यांचा समावेश आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत.यामध्ये स्वतः अजित पवार (बारामती), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), माउली कटके (शिरूर), अण्णा बनसोडे (पिंपरी), सुनील शेळके (मावळ), शंकर मांडेकर (भोर), चेतन तुपे (हडपसर) आणि दत्तात्रय भरणे (इंदापूर) यांचा समावशे आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला खेडमध्ये बाबाजी काळे यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वडगाव शेरीमध्ये बापूसाहेब पठारे, त्याचबरोबर शिवसेनेचे विजय शिवतारे हे पुरंदरमधून, तर जुन्नरमध्ये शरद सोनवणे हे अपक्ष विजयी झाले आहेत.

खडकवासला निवडणूक कार्यालयाचा निरोप साभारंभ उत्साहात पार पडला

0

पुणे: खडकवासला विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनानंतर, कार्यालयाने अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी निरोप साभारंभाचे आयोजन केले. या साभारंभात निवडणूक प्रक्रियेतील उत्कृष्ट व्यवस्थापन, अचूकता, आणि पारदर्शकतेचा उल्लेख करत योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. “खडकवासला कार्यालयाने पारदर्शक व अचूक निवडणूक प्रक्रियेसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे,” असे त्यांनी नमूद केले. डॉ. माने यांनी पुढे सांगितले की, खडकवासला विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यात कर्मचार्‍यांनी अत्यंत मेहनत घेतली, त्याचबरोबर त्यांच्या कार्यशक्तीच्या आणि कुशलतेच्या जोरावर प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी मतमोजणी प्रक्रिया, ईव्हीएम व्यवस्थापन, आणि मतदान केंद्र नियोजनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमात प्रशिक्षक प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाजूंवर मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
साभारंभात नायब तहसीलदार सचिन आखाडे (इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी), नारायण पवार (इव्हीएम कक्षाचे सहाय्यक), अंकुश गुरव (कार्यक्रम समन्वयक), मनीष झंसारी, दिपगौरी जोशी (पोस्टल बॅलेट कक्ष अधिकारी), प्रमोद भांड (सहा. महसूल अधिकारी), धम्मदीप सातकर, साहिद सय्यद, भूमेश मसराम (मनुष्यबळ कक्ष अधिकारी) यांच्या निवडणूक प्रक्रियेत अचूकता आणि दक्षता राखण्याच्या कार्याची प्रशंसा केली.मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्षाचे नोडल अधिकारी प्रा. मनिष खोडस्कर यांच्या कामगिरीचेही विशेष कौतुक करण्यात आले. मीडिया कक्ष प्रमुख योगेश हांडगे यांनी जागरूकता निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. माने यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि निवडणूक प्रक्रियेतील एकात्मता व कार्यसंघाचा आदर्श निर्माण करण्यात सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले.
या निरोप साभारंभाने खडकवासला विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या यशस्वी कार्यकाळाचा समारोप केला.

ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता

0

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला .एकूण 288 पैकी 193 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे.मात्र, उर्वरित 95 मतदारसंघ असे आहेत की, मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, 76 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. परिणामी ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो.

या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यातच आता एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे.त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत 66.05 टक्के एवढे साधारणपणे गेल्या 30 वर्षांतील विक्रमी मतदान झाले. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिल्याने महायुतीने 230 जागा जिंकल्या.तर, महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.

त्यातच आता ईव्हीएमबद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारीही समोर आली आहे. आमगाव, उमरखेड, लोहा, औरंगाबाद पूर्व, भोसरी, परळी, देगलूर, हिंगोली, वैजापूर, कळवण, चांदवड, दिंडोरी, कागल, बोईसर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करमाळा, सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्य या 19 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेते जास्त मते आढळली.

‘या’ मतदारसंघात मतदानाच्या तुलनेत कमी मते :
अक्कलकुवा, गंगाखेड, विलेपार्ले, नवापूर, पाथरी, चांदिवली, साक्री, घनसावंगी, शिरपूर, बदनापूर, सायन कोळीवाडा, चोपडा, औरंगाबाद पश्चिम, मुंबादेवी, भुसावळ, पनवेल, जळगाव शहर, गाणगापूर, कर्जत, चाळीसगाव, नांदगाव, अलिबाग, पाचोरा, मालेगाव बाह्य, आंबेगाव, जामनेर, शिरूर, अकोट, बागलाण, इंदापूर, अकोला पश्चिम, सिन्नर, बारामती, निफाड, मावळ, मोर्शी, नालासोपारा, कोथरूड, वर्धा, वसई, खडकवासला, सावनेर, भिवंडी पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, मीरा भाईंदर, वणी, ओवळा माजीवाडा, नांदेड दक्षिण, मुखेड, कोपरी पाचपाखाडी, कळमनुरी, दिंडोशी, जिंतूर, चारकोप, खानापूर, कोल्हापूर उत्तर, सोलापूर शहर मध्य.

कॉंग्रेसचे माजी महापौर उल्हास ढोले-पाटील यांचे निधन

पुणे-कॉंग्रेसने घडविलेले एक मोठे प्रस्थ ,माजी महापौर उल्हास ढोले-पाटील वय 81 यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी माजी आमदार कमल ढोले-पाटील, राहुल आणि सागर ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ढोले पाटील यांनी दुग्धव्यवसायात जम बसवला होता. सन १९७४ मध्ये त्यांनी प्रथम महापालिकेची निवडणूक लढवली. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सलग सहा वेळा ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले.त्यांच्या पत्नीही कमल ढोले पाटील याही कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या.त्या नंतर आमदारही झाल्या.

ढोले पाटील सन १९७६ मध्ये ते महापौर झाले. “दूधवाला महापौर’ असेही त्यांना संबोधत असत. ३८ वर्षे ते महापालिकेचे नगरसेवक होते. तत्कालिन पुणे आणि पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाचे ते अध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाने घडविलेल्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते .1985 साली त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले त्यानंतर अखेरपर्यंत ते शरद पवार यांच्या सोबतच राहिले .

उद्योजकतेला नवकल्पनांची जोड असावी

प्रा.डाॅ.सुनिता कराड; ‘एमआयटी एडीटी’चा ४८+ कंपन्यांशी सामंजस्य करार
पुणेः  सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतू आता नवीन शिक्षणपद्धती स्विकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणाऱ्या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड यांनी व्यक्त केले.
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४८ हून अधिक नामवंत कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह  प्र.कुलगुरू डाॅ. मोहित दुबे, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ.स्वाती मोरे, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डाॅ.कराड पुढे म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक धोरणात(एनईपी) विद्यार्थ्यांमधील संशोधन व उद्योजकतेवर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. एनईपीची देशभरात घोषणा होण्यापूर्वीच एमआयटी एडीटी विद्यापीठाने संशोधन व उद्योजकतेवर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची अंमलबजावनी केलेली आहे. एआय सारख्या नवतंत्रज्ञान वर आधारीत कौर्सेसची माहिती देखील विद्यार्थ्यांना सातत्याने देण्यात येत असते. विद्यापीठाने यापूर्वीच टाटा मोटर्स, अँपल सारख्या कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून यावर्षी ४८ हून कंपन्यांशी सामंजस्य करार करत आहोत. ज्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
यावेळी, प्रा.डाॅ. दुबे म्हणाले, सध्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना सोबतच सुशिक्षित बरोजगारांच्या संख्येतही भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे, पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्याच्याच एक प्रयत्न म्हणून आम्ही देशभरातील नामवंत कंपन्यांना सामंज्यस्यासाठी साद घातली, ज्याला ४८ हून अधिक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने यापूर्वीही अनेक उद्योजक घडविले असून आज केलेल्या करारामुळे त्यामध्ये निश्चितच मोठी भर पडेल.
दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार डाॅ.छबी चव्हाण यांनी मानले.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना:अमित शहा यांच्यासोबत रात्री बैठक

मुंबई–महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. भाजपला बहुमत असल्याने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. रात्री साडे 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली करण्यात येत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्ली रवाना झाले असून रात्री साडे 10 वाजता त्यांची अमित शहांसोबत बैठक होणार असल्याचे माहिती आहे. फडणवीसांपाठोपाठ अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

पुणेकर ग्राहकांची पारंपरिक तसेच आधुनिक मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांना पसंती –

 गोदरेज जर्सीच्या मिल्क रिपोर्टमधील माहिती

·  उत्पादनांच्या यादीत 81% गायीचे तूप आणि 80% लोणी हे पदार्थ अव्वल

पुणे, 25 नोव्हेंबर, 2024: नॅशनल मिल्क डे च्या निमित्ताने सादर झालेल्या गोदरेज जर्सीच्या समग्र मिल्क रिपोर्टमधून पुणेकरांची पारंपरिक तसेच आधुनिक मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांविषयीची मजबूत आवड समोर आली आहे.

पारंपरिक दुग्धजन्य उत्पादने पुण्याच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवत असून, 81% पसंतीसह तूप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे, तर त्यापाठोपाठ 80% पसंती लोणी या दुग्धजन्य पदार्थाला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, पुणेकरांची पारंपरिक दुग्धजन्य उत्पादनांशी असलेली घट्ट नाळ कायम असून, पनीर आणि दही यांना 77% ग्राहक पसंती मिळाली आहे. आधुनिक दुग्धजन्य उत्पादनेही स्वीकारली जात आहेत. 52% ग्राहक आपल्या आहारात योगर्टचा समावेश करतात, तर 46% ग्राहकांना फ्लेवर्ड दूध आवडते.

‘बॉटम्स अप… इंडिया सेज चिअर्स टू मिल्क!’ या नावाने प्रकाशित झालेल्या या सविस्तर अहवालात दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथील ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर आधारित माहिती दिली आहे. ग्राहकांच्या दुग्धजन्य उत्पादनांबाबतच्या आवडींसह, शेतातून थेट घरापर्यंत पोहोचणाऱ्या प्रीमियम दुधासाठीची गुणवत्तेची आवड आणि त्यासाठी खर्च करण्याची तयारी यांचाही अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला.

दुग्धजन्य उत्पादनांविषयीच्या या अनोख्या आवडीवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सूरी म्हणाले, “भारतीय ग्राहक पारंपरिक आवडींशी नाळ जोडून ठेवत आधुनिक दुग्धजन्य उत्पादनांबद्दलही खुलेपणाने विचार करतात. दही, पनीर आणि तूप यांसारख्या पारंपरिक आवडत्या उत्पादनांपासून योगर्ट आणि फ्लेवर्ड दूध यांसारख्या नव्या पर्यायांपर्यंत, आजचे दुग्धजन्य पदार्थांचे ग्राहक गुणवत्तेच्या आणि पोषणमूल्यांच्या बाबतीत जागरूक  आहेत. भारताचे दुग्धजन्य पदार्थांचे उद्योगक्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती समजून घेऊन त्यांना योग्य उत्पादने देण्यास गोदरेज जर्सी कटिबद्ध आहे.”

भारतीय दुग्धजन्य उत्पादनांचे व्यापक चित्र पाहता गुणवत्तेवर स्पष्ट भर दिला जात असल्याचे दिसते. अहवालानुसार, अर्ध्याहून जास्त म्हणजे 54% भारतीय ग्राहक दुग्धजन्य उत्पादने खरेदी करताना गुणवत्तेला प्राधान्य देतात, तर पुण्यातील 64% ग्राहकांसाठी ही गुणवत्ता उच्च प्राधान्यक्रमावर आहे. दुग्धजन्य उत्पादनांत भेसळ नसावी याविषयीची जागरूकता वाढल्याने ग्राहक सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी जास्त किंमत देण्यास तयार असल्याचे दिसून येते.

या सर्वेक्षणाचे युगॉव्हने (YouGov) डिझाइन केले असून त्यांनीच ते राबविले आहे. गोदरेज जर्सी ब्रँडअंतर्गत उत्पादन विक्री करणाऱ्या गोदरेज ग्रुपच्या वैविध्यपूर्ण अन्न व कृषी व्यवसाय गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडची (GAVL) क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड ही उपकंपनी आहे.

गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देत गोदरेज जर्सी भारताच्या दुग्धजन्य पदार्थांच्या उद्योगाच्या विकासात योगदान देत आहे. कंपनीच्या एकात्मिक पशुपालन आणि शाश्वत शेतीविषयक उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील सर्वोत्तम पद्धतीचा अंगीकार करून उत्पन्न वाढवता येत आहे.

बांगर यांना आणण्यासाठी ‎मुख्यमंत्र्यांनी पाठवले विमान‎:हैदराबादहून मुंबईला रवाना

0

हैदराबाद-कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना‎ तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले. ‎‎त्यांना घेऊन जाण्यासाठी ‎‎‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎‎ यांनी हैदराबाद येथे खासगी ‎‎‎विमान पाठवले आहे.‎‎रविवारी सायंकाळी ते‎‎मुंबईकडे रवाना झाले‎‎ आहेत.‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎‎यांचे विश्‍वासू आमदार‎म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख‎आहे. विधानसभा ‎निवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहाती‎ विजय मिळवला. हिंगोली येथे शनिवारी‎ मारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरव‎ बांगर यांना पोटात गोळी लागली. गौरव‎ यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार‎सुरु आहेत. त्यांच्या देखभालीसाठी आमदार ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद येथे‎थांबले आहेत.

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री‎एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांना मुंबईत ‎पोहोचण्याचे आदेश दिले. त्यांना हैदराबाद‎येथून मुंबईला येण्यासाठी खासगी विमानही‎पाठविले. त्यामुळे दुपारी खासगी विमान‎हैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतर‎सायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवाना‎झाले. त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेश‎मिळाल्यामुळे आमदार बांगर यांची‎ मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा सुरु‎ झाली आहे. मतमोजणीपुर्वीच आमदार बांगर‎यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते.‎

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता‎आमदारांना तातडीने मुंबईला बोलावले जात‎आहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगर यांनाही मुंबईला ‎बोलावल्याने पुढील निर्णयाकडे हिंगोली‎ जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.‎

अमित शाह यांनी जाणून घेतली भाजप नेत्यांची मते: CM साठी एकनाथ शिंदेंचे सदस्य आग्रही

शपथविधीसाठी कुठल्याही मुदतीचे बंधन नाही

नवी दिल्ली- अमित शाह, जे.पी. नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी निकालाची माहिती दिली. मुख्यमंत्रिपदावर कुणाची वर्णी लावायची याबाबत शाह यांनी मते जाणून घेतली. फडणवीसांशिवाय अन्य पर्याय कोण? यावरही विचारणा झाली. दोन्ही प्रभारींनी मात्र फडणवीसांसाठी आमदार आग्रही असल्याचे सांगितले. पण शिंदे व अजित पवारांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या, अशा सूचना शाह यांनी दिल्या. आता शिंदे, पवार व फडणवीस यांंच्यासह तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक होईल. त्यातील निर्णय दिल्लीला कळवला जाईल. सर्वसंमतीने नाव ठरत असेल तर अमित शाह लगेच मंजुरी देतील. पण मुख्यमंत्री भाजपचाच करण्यावर दिल्लीतील नेतेही आग्रही आहेत. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची औपचारिकता रविवारी पूर्ण केली. मात्र भाजपचा नेता अजून ठरलेला नाही. तसेच मुख्यमंत्री कुणाचा? यावर अजूनही खल सुरूच आहे. प्रदेश भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह सुरू असून राष्ट्रवादीमधूनही त्यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. मात्र शिवसेना अजूनही एकनाथ शिंदेंच्या नावावर अडून बसल्याचे समजते.

महायुतीतील एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री कोण याचा निर्णय दिल्लीत होईल. त्यातही भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांच्याच पक्षाकडे नेतृत्व जाण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे यांनी अजून आपली ‘ना हरकत’ कळवलेली नाही. किमान पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तरी शिंदे यांनाच अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रिपदी ठेवावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. सायंकाळी झालेल्या नूतन आमदारांच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आग्रहपूर्वक मागणी केली.

विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. तोपर्यंत शपथविधी झाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी चर्चा होत आहे. मात्र तसे काही होणार नसल्याचे विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी व नेत्यांचे म्हणणे आहे. २६ नोव्हेंबरपूर्वी फक्त १५ व्या विधानसभेची अधिसूचना निघणे आवश्यक असते. केंद्रीय निवडणूक अधिकारी व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे निकालाची अधिसूचना, नूतन आमदारांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली आहे. राज्यपाल सोमवारपर्यंत त्याला मंजुरी देऊ शकतात. तेव्हापासून नवीन विधानसभा अस्तित्वात येईल. त्यानंतर पुढे शपथविधीसाठी कुठल्याही मुदतीचे बंधन नाही. परिणामी राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचे सांगण्यात आले.