पुणे-कॉंग्रेसने घडविलेले एक मोठे प्रस्थ ,माजी महापौर उल्हास ढोले-पाटील वय 81 यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी माजी आमदार कमल ढोले-पाटील, राहुल आणि सागर ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ढोले पाटील यांनी दुग्धव्यवसायात जम बसवला होता. सन १९७४ मध्ये त्यांनी प्रथम महापालिकेची निवडणूक लढवली. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सलग सहा वेळा ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले.त्यांच्या पत्नीही कमल ढोले पाटील याही कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या.त्या नंतर आमदारही झाल्या.
ढोले पाटील सन १९७६ मध्ये ते महापौर झाले. “दूधवाला महापौर’ असेही त्यांना संबोधत असत. ३८ वर्षे ते महापालिकेचे नगरसेवक होते. तत्कालिन पुणे आणि पिंपरी चिंचवड परिवहन महामंडळाचे ते अध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाने घडविलेल्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते .1985 साली त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले त्यानंतर अखेरपर्यंत ते शरद पवार यांच्या सोबतच राहिले .